बिग्नोनिएसी : (टेटू कुल). ह्या वनस्पति-कुलाचा समावेश फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील ‘पर्सोनेलीझ’ गणात केला जातो. ⇨पेडॅलिएसी (तिल कुल), ⇨ॲकँथेसी (वासक कुल) आणि ⇨स्क्रोफ्यूलॅरिएसी (निरब्राह्मी कुल) या कुलांशी याचे आप्तभाव आहेत पर्सोनेलीझ गणात याशिवाय आणखी ८ कुलांचा समावेश केलेला आढळतो. सोलॅनेलीझ [⟶ सोलॅनेसी] आणि पर्सोनेलीझ यांना स्क्रोफ्यूलॅरिएसी हा जोडणारा दुवा समजतात. पर्सोनेलीझ गणातील कुलात पुढील महत्त्वाची लक्षणे आढळतात : फुले द्विलिंगी, एकसमात्र, अवकिंज असून पुष्पमुकुट बद्धौष्ठी (दोन ओठांप्रमाणे परंतु त्यात थोडा अडथळा असणारा) संवर्त बहुधा सतत राहणारा केसरदले २ किंवा ४ किंजदले २ व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यात एक किंवा दोन कप्पे [⟶ फूल]. ए. एंग्लर यांच्या पद्धतीत बिग्नोनिएसीचा समावेश ट्युबिफ्लोरी गणात केला आहे. टेटू, आकाशनिंब, कॅलबाश वृक्ष, मेढशिंगी, कारंज-वृक्ष, रक्त-रोहिडा, परळ, पाडळ इ. उपयुक्त वनस्पती बिग्नोनिएसी कुलात अंतर्भूत आहेत. (या वनस्पतींवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत). सु. ७५०-८०० जाती व ११० वंश यात समाविष्ट असून त्यांचा प्रसार मुख्यतः द. अमेरिकेत, आफ्रिकेच्या उष्ण भागात व भारतात आहे. बहुतेक जाती वृक्ष व झुडपे असून सर्व झुडपे मोठ्या वेली [⟶ महालता] आहेत काही मुळांनी व काही तणाव्यांनी आधारावर चढतात तर काही वेढे देत चढतात (वलयिनी). पाने साधी किंवा संयुक्त पिच्छाकृती, समोरासमोर, अनुपपर्ण (पानाच्या तळाशी उपांगे नसलेली) खोडाची अंतर्रचना वेलींमध्ये असंगत [⟶ शारीर, वनस्पतींचे ] फुलोरा विविध प्रकारचा : कुंठित, अकुंठित, द्विशाखी वल्लरी, परिमंजरी, शुंडी इत्यादी [⟶ पुषपबंध]. फुले एकसमात्र, द्विलिंगी, अवकिंज, सच्छद व आकर्षक. संदले व प्रदले प्रत्येकी पाच व जुळलेली पुष्पमुकुट द्व्योष्ठक, घंटेसारखा किंवा नसराळ्यासारखा पण अनियमित केसरदले चार, दीर्घद्वयी पाचवे केसरदल वंध्य किंवा ते नसते. किंजदले दोन एका ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे बीजकविन्यास अक्षलग्न एक कप्पा असल्यास तटलग्न [⟶ फूल]. फळ शुष्क (बोंड) पुटक-भीदुर किंवा पटलभिदुर अथवा मृदुफळ [⟶ फळ]. बीजे बहुधा पंखधारी तर कधी शिरवाळू (केसांचा झुबका असलेली) असतात.पहा : ट्रंपेट व्हाइन बिग्नोनिया.

संदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. जा.