बिगोनिया : (कुल–बिगोनिएसी). शोभिवंत पानांमुळे व फुलांमुळे बागेत किंवा खिडकीतल्या कुंड्यांत व वाफ्यांत विशेष स्थान मिळविणाऱ्या या वनस्पतींना मिशेल बेगॉन या फ्रेंच वनस्पतिविज्ञांचे नाव दिले आहे. या फुलझाडांच्या बिगोनिया वंशात एकूण सु. ९०० जाती असून त्या उष्ण व उपोष्ण कटिबंधांत विशेषतः द. अमेरिकेत आढळतात. ह्या सर्व बहुधा मांसल, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ओषधी किंवा साधी क्षुपे (झुडपे) असून ती उंच सरळ किंवा पसरटपणे वाढतात काही मुळांच्या साहाय्याने आधारावर चढतात. कित्येकांना जमिनीत मूलक्षोड व ग्रंथिक्षोड [⟶ खोड] असते. पाने साधी, एकाआड एक दोन रांगांत असून तळाशी असमात्र, हृदयाकृती किवा छत्राकृती, सोपपर्ण, दातेरी, खंडित किंवा अखंडित असतात. पानांच्या बगलेत येणाऱ्या कंदिकांपासून किंवा कापून लावलेल्या पानाच्या तुकड्यांपासून नवीन वनस्पती निर्माण होतात [⟶ पुनर्जनन]. फुले एकलिंगी, एकसमात्र किंवा अरसमात्र केसरपुष्पात परिदले ४, रंगीत संदले २ आणि प्रदले लहान २ किंज पुष्पात पाच, क्वचित दोन सारखी रंगीत परिदले केसरदले असंख्य, सुटी व तळाशी जुळलेली. किंजदले २-३, किंजपुट अधःस्थ व त्रिपक्षयुक्त कप्पे ३ व अक्षलग्न बीजकविन्यास बीजके अनेक [⟶ फूल]. फळ त्रिपक्ष, बहुधा रंगीत बोंड बीजे असंख्य व सूक्ष्म.
बिगोनिया रेक्स या जातीचा रस जळवांना विषारी असतो व ही वनस्पती रेवंदचिनीऐवजी वापरतात ती आसामात व मिरमी टेकड्यांत आढळते. शोभिवंत पानांमुळे या वंशाला ‘शोभापर्ण’ असे नाव दिलेले आढळते. याच्या सु. १३० जाती शोभेची झाडे म्हणून लागवडीत आहेत. खोडाचे तुकडे लावूनही नवीन लागवड करतात.
“