बॉल्टिमोर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मेरिलंड राज्यामधील सर्वांत मोठे व देशातील नवव्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ७,८३,३२० (१९८०). राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी २०.७% लोकसंख्या एकट्या बॉल्टिमोर शहारात एकवटलेली आहे. हे वॉशिंग्टनच्या ईशान्येस ६४ किमी. चेसापीक उपसागराच्या पटॅप्स्को नदीमुख-खाडीवर वसले आहे. शहराची स्थापना १७२९ मध्ये झाली. इंग्लंडमधील बॉल्टिमोर घराण्याच्या नावावरूनच शहराला हे नाव पडले. सुरुवातीला तंबाखूच्या व धान्याच्या निर्यातीसाठी या बंदराचा विकास करण्यात आला. जहाजबांधणी हा येथील मुख्य उद्योग असून ‘कॉन्स्टेलेशन’ हे अमेरिकन आरमारातील सर्वांत जुने जहाज (१७९७) या बंदरात नांगरण्यात आलेले असून राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक म्हणून ते जतन करण्यात आले आहे. १९०४ मधील आगीमध्ये शहराचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर शहराची योजनाबद्ध पुनर्रचना करण्यात आली. विसाव्या शतकातील पहिल्या व दुसऱ्या महायुद्धकाळांत जहाजबांधणी आणि सैनिकी रसद पुरविण्याचे हे प्रमुख केंद्र होते.
रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्गांचे हे मुख्य केंद्र आहे. येथून कोळसा, धान्य, लोह-पोलाद व तांब्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. जहाजबांधणी व दुरुस्ती, साखर, खाद्यपदार्थ प्रक्रिया, तेल व तांबे शुद्ध करणे, रसायननिर्मिती, कपडे, पोलादी वस्तू व अवकाशयानांचे साहित्य, खते इ. उद्योगधंदे शहरात चालतात.
शैक्षणिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्याही बॉल्टिमोर महत्त्वाचे आहे. येथे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ (१८७६), बॉल्टिमोर विद्यापीठ (१९२५), सेंट मेरीज विद्यापीठ (१७९१) इ. विद्यापीठे तसेच विविध ज्ञानशाखांची बाविसांवर महाविद्यालये आहेत. शहरात उद्याने, मैदाने, वस्तुसंग्रहालये वगैरे सुविधा आहेत. मेरिलंड विज्ञान अकादमी, वॉशिंग्टन स्मारक, वॉल्टर्स कलावीथी, बॉल्टिमोर कला संग्रहालय, देशातील सर्वांत जुनी पील संग्रहालय-वास्तू, देशातील पहिले रोमन कॅथलिक कॅथीड्रल (१८०६-२१), यूनिटेअरिअन चर्च (१८१७), एडगर ॲलन पो हाउस (१८३०), फ्लॅग हाउस इ. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या वास्तू शहरात पहावयास मिळतात. द स्टार स्पँगल्ड बॅनर हे अमेरिकेचे राष्ट्रगीत फ्रॅन्सिस स्कॉट की (१७७९-१८४३) या अमेरिकन वकिलाने येथेच लिहिले त्याचे मूळ हस्तलिखित मेरिलंड हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये पहावयास मिळते. थोर अमेरिकन साहित्यिक एच्. एल्. मेंकन यांची ही जन्मभूमी आहे.