बॉगूस्लाव्हस्की, व्हॉइचेख : ( ९ एप्रिल १७५७–२३ जुलै १८२९). पोलिश नाटककार. पोलंडमधील पॉझनॉन येथे जन्मला. काही काळ सैनिकी नोकरीत काढल्यानंतर रंगभूमीकडे वळला. नट, नाटककार (८० हून अधिक नाटके त्याने लिहिली) आणि दिग्दर्शक अशी विविध प्रकारची कामगिरी त्याने बजावली. ‘क्रॅकोव्हिअन्स अँड माउंटेनीअर्स’ (१७९४, इं. शी.) ही एका पोलिश लोककथेवर आधारलेली त्याची सुखात्म संगीतिका विशेष प्रसिद्ध आहे. पोलिश आणि अन्य भाषांतली नाटके त्याने पोलिश रंगभूमीवर सादर केली. शेक्सपिअरच्या हॅम्लेटचा पहिला प्रयोग त्यानेच पोलंडमध्ये घडवून आणला. १७८३ ते १८१४ या कालखंडात पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीचा दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. १८११ मध्ये वॉर्सात एक नाट्यशिक्षणसंस्थाही त्याने सुरू केली होती. पोलिश रंगभूमीच्या विकासास त्याने मोलाचा हातभार लावल्यामुळे त्याला पोलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीचा जनक मानले जाते. वॉर्सा येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.