बाल्सा : (इं. बाल्सावुड, कॉर्कवुड, डाउन ट्री लॅ. ऑक्रोमा पिरॅमिडेल, ऑ. लॅगोपस कुल-बॉम्बॅकेसी). सु. १८-२० मी. उंच व १.५ मी. घेर असलेला व फार जलद वाढणारा हा वृक्ष मूळचा उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील (विशेषत: एक्वादोरमधील) असून भारतात काही ठिकाणी कमीजास्त प्रमाणात याची लागवड केली आहे. केरळातील वायनाडच्या जंगलात व तमिळनाडूच्या दक्षिण कोईमतूर भागामधील जंगलात याची मोठी लागव़ड असून बंगलोर, कूर्ग, विशाखापट्टनम्, आसाम, बंगाल आणि अंदमान बेटे येथे हा लहान प्रमाणावर लागवडीत आहे. याची पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), हृदयाकृती, काहीशी खंडयुक्त, कोनीय व लवदार असतात. फुले पिवळट किंवा लालसर, मोठी, पंचभागी, द्विलिंगी, अवकिंज असून फांद्यांच्या टोकांस येतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच व त्रिभागी छदमंडल शीघ्रपाती (लवकर गळून पडणारे) असते.
पाकळ्या १२-१५ सेंमी. लांब असतात [⟶ फूल]. फळे (बोंडे) उभी, लांबट (२.५ सेंमी. लांब) व पिंगट असतात पिकल्यावर मार्च-मेमध्ये त़डकून त्यांची प्रत्येकी पाच शकले होतात. बिया गुळगुळीत, अनेक व रेशमी लालसर तपकिरी (कापसासारख्या) धाग्यांनी वेढलेल्या असतात. लाल सावरीत [⟶ सावर, लाल] व सफेदसावरीत बोंडात असाच धाग्यांचा पुंजका आढळतो. हे धागे फळाच्या आतील भागापासून बनलेले असतात. ⇨गोरख चिंच, दूरियन, लाल आणि सफेद सावर या वनस्पतींची कित्येक लक्षणे बाल्साप्रमाणे असून सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बॉम्बॅकेसीमध्ये (शाल्मली कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
साधारणपणे सखल प्रदेशात व टेकड्यांवर ६०० मी. उंचीपर्यंत बाल्साचे वृक्ष चांगले वाढतात. दमट हवा, २०°-२५° से. तापमान, किमान १२५ सेंमी. पाऊस, सकस व निचऱ्याची गाळाची जमीन व भरपूर सूर्यप्रकाश त्यांना आवश्यक असतो. बियांची अंकुरणक्षमता (रुजण्याचे सामर्थ्य) १६-१८ महिन्यांपर्यंत चांगली असते. त्या मुदतीत प्रत्यक्ष बी फेब्रुवारी किंवा प्रत्यक्ष तयार केलेली रोपे (सु.१५-२० सेंमी. उंच) मे-जूनमध्ये लावतात व दोन रोपांत सु. ५ मी. अंतर ठेवतात. पेरण्यापूर्वी बी थंड पाण्यात १२ तासांपर्यंत ठेवतात वाफ्यांत गॅमेक्झिन किंवा १०% हेक्झॅडॉल फवारून नंतर पेरणी केलेल्या रोपाचे जगण्याचे प्रमाण अधिक असते. आसमंतात तणाची वाढ होऊ नये म्हणून तूर, बाजरी, राळा. इ. धान्ये त्या क्षेत्रात पेरतात. रोपे लावल्यापासून ३-४ वर्षांत नवीन फुले व फळे येऊ लागतात. ६-९ वर्षे वाढलेल्या झाडाचे लाकूड फार उपयुक्त मानतात. गर्द रंगांच्या चिकण मातीत वाढलेल्या झाडांचा घेर अधिक असतो. याचे लाकूड रंगाने पांढरट असून त्यावर लालसर किंवा भुरी छटा असते ते कठीण, गुळगुळीत, चमकदार व अत्यंत हलके असते. बुचापेक्षाही निम्म्याने हलके असल्याने व्यापारात त्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. एक घन मीटर लाकडाचे वजन ८० -३३६ किग्रॅ. भरते व्यापारी दृष्ट्या एक घन मीटरला १२८-२२४ किग्रॅ. वजन असलेले व गाठी नसलेले ओंडके पसंत करतात. तरंड व तराफे यांसारखी तरंगण्याची साधने, विमानबांधणी आणि विद्युत् निरोधक, उष्णतानिरोधक, ध्वनिनिरोधक वस्तू इत्यादींकरिता हे विशेषेकरून उत्कृष्ट असते. बुचाऐवजीही कोठे कोठे त्याचा वापर करतात. थंड केलेले नाशवंत पदार्थ (यीस्ट, दुधाचे पदार्थ, ताजी फळे, मांस व मासे इ.) घालून जहाजमार्गाने पाठविण्यास बाल्साच्या लाकडाचे कोष अधिक टिकाऊ व स्वस्त असल्याने फार वापरले जातात. मात्र ओलसर हवामानाला हे टिकत नाहीत तथापि रंगरोगणे व इतर परिरक्षक (उदा.,गरम मेण) पदार्थांचा लेप देऊन त्याचा टिकाऊपणा वाढविता येतो. स्थानिक पुरवठा पुरेसा नसल्याने बव्हंशी एक्कादोरमधून याची आयात केली जाते. कागदनिर्मितीत लगद्याकरिता बाल्साचे लाकूड उपयुक्त ठरले आहे. सालीपासून बळकट धागा काढतात व तो दोर, दोऱ्या इत्यादींकरिता वापरतात. खोडाची साल वांतिकारक (ओकाऱ्या आणणारी) असते मुळाची साल मूत्रल (लघवी साफ करणारी) व रेचक असते. गाद्या व उश्या भरण्यास फळांतील धाग्यांचा उपयोग करतात. त्यात सावरीचा कापूसही मिसळतात.
पहा : शाल्मली सावर, लाल.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.
2. MacMillan, H. F. Tropical Planting and Gardening, London, 1956.
परांडेकर, शं. आ.
“