बाल्स मिनेसी : (तेरडा वा तेरणा–कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव ⇨जिरॅनिएलीझमध्ये (तेरडा गणात) जे. हचिन्सन यांनी केला आहे व ⇨सॅपिंडेलीझमध्ये (अरिष्ट गणात) ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी केला आहे. जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी मात्र ह्या कुलातील वंशांचा जिरॅनिएसी कुलात समावेश केलेला आढळतो. इंपॅटिएन्स, हायड्रोसीरा, सेमिओकार्ड़ियम व इंपॅटिएन्टेला हे चारच वंश व सु. पाचशे जाती (जे. सी. विलिस यांनी) बाल्समिनेसी कुलात घातल्या आहेत ए. बी. रेंडेल यांनी फक्त एकच जाती इंपॅटिएन्स नोलिटँजरे (इं. टच मी नॉट) अंतर्भूत केली आहे. वर उल्लेखिलेल्या चार वंशांतील जातींचा प्रसार यूरेशिया, आफ्रिका, उ. अमेरिका इ. प्रदेशांत झालेला असून त्या सर्व ⇨औषधी आहेत. त्यांना बहुधा उपपर्णहीन, साधी व एकाआड एक पाने असतात. फुले द्विलिंगी, एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) व पंचभागी असतात संदले पाकळ्यांसारखी, त्यांपैकी दोन पुरश्च लहान किंवा ऱ्हसित आणि एकपश्च, शुंडिकायुक्त (लहान बंद नलिका असलेली) प्रदलांपैकी दोन बाजूंची दोन दोन जुळलेली, केसरदलांचे परागकोश जुळून किंजपुटावर त्यांचे टोपीसारखे आवरण होते व किंजपुटाच्या वाढीमुळे केसरदलांचे तंतू तळाशी तुटतात किंजपुट ऊर्ध्वस्थ व पाच कप्प्यांचा असून त्यात असंख्य अधोमुखी, लोंबती बीजके असतात [⟶फूल]. फळ (बोंड) एकदम तडकते व बिया फेकल्या जातात [गोफण यंत्रणा ⟶ विकिरण, फळांचे व बीजांचे] त्यात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. एच्. सांतापाव यांच्या मते इंपॅटिएन्सच्या एकूण सहाशे जातींपैकी भारतात फक्त १७५ आहेत. इंपॅटिएन्स बाल्समिना म्हणजे ⇨तेरडा ही जाती भारतात सर्वत्र आढळते. शोभेकरिता हिचे अनेक प्रकार बागेत लावतात, सेमिओकार्डियम भारतात आढळत नाही. हायड्रोसीराची एकच वर्षायू (एका हंगामात जीवनचक्र पूर्ण होणारी) जाती (हा. ट्रायफ्लोरा) भारतात पाणथळ जागी वाढते तिचे खोड पंचकोनी व पोकळ आणि बोंडे लाल असतात. हिचे बंगाली नाव ‘डोमुती’ आहे. हिला मोठी विविधरंगी (लाल, पिवळी व पांढरी) फुले येतात शोभेकरिता ही कुंड्यांत लावतात फुले मेंदीप्रमाणे नखे रंगविण्यास वापरतात. तेरड्याच्या फुलांचाही तसाच उपयोग करतात त्याच्या बिया तेलकट असून त्या खाद्य आहेत. इंपॅटिएन्टेलाची एकच जाती मॅलॅगॅसीत आढळते. सेमिओकार्डियमाची एकच जाती इंडोनेशियात चुनखडकांवर उगवते.
पहा : तेरडा.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V. New Delhi, 1959.
2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II. Cambridge, 1963.
3. Willis, J. C. Dictionary of the Flowering Plants and Farns, Cambridge, 1966.
परांडेकर, शं. आ.