बाल्सम : काही वनस्पतींच्या शरीरातील ⇨ऊतककरांना इजा झाल्यामुळे होणाऱ्या जखमांतून अथवा काही वनस्पतीतून सहजगत्याही स्त्राव बाहेर पडत असतो. हिंग, डिंक, लाख,रबर इ. पदार्थ वनस्पतींच्या अशा स्त्रावातून मिळतात. बाल्सम हा अशाच तर्‍हेचा वनस्पतींच्या शरीरातील ऊतककरांना इजा झाल्यावर त्यांतून होणारा स्त्राव आहे. बाल्समिनेसी या तेरड्याचया कुलातील वनस्पतींशिवाय लेग्युमिनोजी, हॅमामेलिडेसी, पापिलिनेसी, झँथोऱ्होएसी इ. कुलांतील वनस्पतींतून होणाऱ्या अशा स्त्रावाने बाल्समे मिळतात. पुष्कळशा बाल्समांमध्ये रोगनिवारक गुणधर्म आहेत व त्यांवरून बाल्सम (बाम) हे नाव पडले आहे. बाल्समामध्ये रेझीन,बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) तेले व अँरोमॅटिक अम्ले [⟶ अँरोमॅटिक संयुगे] व त्यांची एस्टरे (विशेषत: बेंझॉइक व सिनॅमिक अम्ले आणि त्यांची एस्टरे) असतात. काहींत अल्प प्रमाणात डिंकही असतो. जेव्हा तेलाचे प्रमाण जास्त असते व घनरूप अँरोमॅटिक अम्ले व एस्टरे अजिबात नसतात तेव्हा त्या बाल्समांचा ओलिओरेझिने या वर्गात समावेश होतो [⟶रेझिने].जी बाल्समे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत ती बहुधा चिकट किंवा अर्धघन असून सुगंधी आहेत. उदा., पेरू बाल्सम, टोल्यू बाल्सम, द्रव स्टोरॅक्स इत्यादी. काही महत्वाच्या बाल्समांची माहिती पुढे दिली आहे.

पेरू बाल्सम : मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या मायरोझायलॉन परेरी या झाडाच्या खोडापासून हे मिळविता येते. झाडाची साल तापवून आतील खोड भाजून काढतात. या जखमेतून बाल्समाचा स्त्राव सुरू होतो. त्या जखमेवर कपडा टाकून स्त्राव शोषून घेतात व कपड्यातून दाबाने बाल्सम वेगळे करतात आणि ते पाण्याबरोबर उकळून शुद्ध करतात. त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळा असून त्याला गोड, व्हॅनिलासारखा वास असतो व तो दाटसर मंद प्रवाही पदार्थ असतो. त्याचे वि. गु. १.४० ते १.७० व प्रणमनांक (निर्वातातील प्रकाशाचा वेग व प्रकाशाचा दिलेल्या माध्यमातील–येथे पेरू बाल्समातील–वेग यांचे गुणोत्तर) १.५८० ते १.५८६ आहे. पेरू बाल्समामध्ये २५ ते ३०% रेझीन व ६० ते ६५% बाष्पनशील तेल असते. या बाल्समाचा उपयोग सुवासिक पदार्थांमध्ये करतात. औषधी दृष्ट्या याला फारसे महत्त्व नाही. कृत्रिम अंबर (एक प्रकारचे सुगंधी द्रव्य) तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.

टोल्यू बाल्सम : मायरोझायलॉन बाल्समम या झाडापासून टोल्यू बाल्सम मिळवितात. ही झाडे दक्षिण अमेरिकेतील कोलंबियातील टोलू प्रांतात मॅग्डालीना व कौका या नद्यांच्या काठी असलेल्या जंगलात खूप आढळतात. शिवाय व्हेनेझुएला, एक्वादोर, न्यू ग्रॅनडा या अमेरिकेतील विषुववृत्तीय प्रदेशात व ब्राझीलमध्ये ही झाडे विपुल प्रमाणात आहेत. या झाडांच्या खोडाला व्ही (V) या इंग्रजी अक्षराच्या आकारासारखी जखम करतात व खालच्या निमुळत्या टोकाशी बाल्सम गोळा करण्याकरिता भांडे अडकवून ठेवतात. वर्षातील जवळजवळ आठ महिने बाल्सम गोळा करण्याचे काम चालते. पावसाळ्याचे चार महिने घनदाट जंगलात शिरणे अशक्य असते. जमा केलेल्या बाल्समामधून त्यात जमलेली घाण, लाकडाचे तुकडे व किडे काढून टाकले की, शुद्ध बाल्सम मिळते. टोल्यू बाल्समाचा रंग तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी असतो. ते अर्धघन किंवा प्लॅस्टिकासारखे असते. त्याला बराच काळ टिकणारा असा सुखावह व व्हॅनिलाची आठवण करून देणारा गोड वास असतो. काही कालाने ते घनरूप बनते. त्याला आंबूस चव असते. ते ३०° से. ला मऊ होऊ लागते व ६०° ते ६५° से. ला वितळते. टोल्यू बाल्सम ९५% अल्कोहॉल, बेंझीन, ईथर, क्लोरोफॉर्म यांत विद्राव्य (विरघळणारे) आहे.

टोल्यू बाल्समामध्ये १२ ते १५% मुक्त सिनॅमिक अम्ल व ७ ते १०% मुक्त बेंझॉइक अम्ल असते. तसेच जवळजवळ ८% बाष्पनशील तेल असते. पेरू बाल्समापेक्षा यात रेझीनयुक्त भाग जास्त असतो (७५ ते ८०%). टोल्यू बाल्सम सुवासिक पदार्थ तयार करण्याच्या कृतींमध्ये सुवास स्थिरीकारक म्हणून वापरतात. तसेत कफोत्सारक (कफ बाहेर काढणारा पदार्थ) म्हणून खोकल्यावरील वडी किंवा पाक या स्वरूपातील औषधाचा एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. सर्दी झाली असता याचा हुंगण्याकरिता वापर केला जातो. टोल्यू बाल्समामधील बाष्पनशील तेलाचा सुगंधी पदार्थ, सौंदर्यप्रसाधने व साबण यांत उपयोग करतात.

स्टोरॅक्स : या बाल्समाच्या माहितीकरिता ‘शिलारस–२’ ही नोंद पहावी.

सिनॅमिक व बेंझॉइक घटकांचा समावेश नसलेली म्हणजे खऱ्या अर्थाने बाल्समे नसलेली परंतु व्यापारात ‘बाल्सम’ या नावाने ओळखली जाणारी काही बाल्समे खाली दिली आहेत. ही ओलि-ओरेझिने या प्रकारची आहेत.

कोपेब बाल्सम : व्हेनेझुएला, ब्राझील व कोलंबिया या देशांतील कोपाइफेरा लँड्सडॉर्फाय जातीच्या झाडाच्या खोडापासून हे काढतात. ते फिकट पिवळ्या रंगापासून तपकिरी पिवळ्या रंगापर्यंत निरनिराळ्या रंगांच्या द्रवरूपात असते. ते पारदर्शक व श्यान (दाट) असून अल्कोहॉल, ईथर, क्लोरोफॉर्म, बेंझीन व कार्बन डाय–सल्फाइड यांमध्ये विद्राव्य आहे. मात्र पाण्यात अविद्राव्य आहे. त्याचे वि. गु. ०.९४० ते ०.९८० आहे. या बाल्समाचा उपयोग औषधे, व्हार्निशे, लॅकर व सुवासिक पदार्थांमध्ये होतो.

कॅनडा बाल्सम : ही खऱ्या अर्थाने ‘बाल्सम’ नव्हे तर ओलि-ओरेझिनच आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उत्तरेकडील भागात वाढणाऱ्या ⇨ बाल्सम फर (अँबिस बाल्समिया) या झाडापासून कॅनडा बाल्सम मिळवितात. याला कॅनडा टर्पेंटाइन किंवा बाल्सम ऑफ फर असेही म्हणतात. हे रंगाने फिकट पिवळे किंवा हिरवट पिवळे असून पारदर्शक व श्यान द्रव आहे. ह्याचा वास पाइनासारखा असतो व चव कडसर असते. याचे वि.गु. ०.९८३ ते ०.९९७ आहे. ते बेंझीन, क्लोरोफॉर्म, इतर, झायलॉल यांमध्ये विद्राव्य व पाण्यात अविद्राव्य आहे. याचा प्रणमनांक १.५२-१.५४ इतका आहे. इतर बाल्समांप्रमाणे याचा उपयोग सुगंधी द्रव्यांमध्ये फारसा करीत नाहीत. त्याचा उपयोग प्रामुख्याने प्रकाशीय काचेची भिंगे व उपकरमे यांमध्ये आसंजक (चिकटविणारा पदार्थ) म्हणून व सूक्ष्मदर्शकाने अभ्यास करावयाच्या नमुन्यांच्या कायम स्वरूपाच्या काचपट्ट्या तयार करण्यासाठी होतो [⟶ सूक्ष्म तंत्रे, जीवविज्ञानीय]. शस्त्रक्रिया आणि छायाचित्रणाची फिल्म व काचा यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ⇨ कलोडियमामध्ये, अनेक प्रकारच्या पलिस्तरांत व साबणांत हे द्रव्य वापरतात. शिवाय व्हार्निश, लॅकर व औषधे यांमध्ये याचा उपयोग करतात.

मक्का बाल्सम : (बाम ऑफ गिलेड). सौदी अरेबिया आणि इथिओपिया या देशांमध्ये वाढणाऱ्या कॉमिफोरा ओपोबाल्समम या झाडापासून हे बाल्सम मिळविता येते. ताजेपणी ते उग्रवास असलेला श्यान द्रव असते परंतु जास्त दिवस झाले असता ते घनरूप बनत जाते. त्याचा रंग पिवळा ते हिरवा अगर तपकिरी ते तांबडा असू शकतो. त्याला सुवासिक गंध असतो. ते पाण्यात अविद्राव्य व बेंझीन, अँसिटोन, क्लोरोफॉर्म, कार्बन डाय-सल्फाइड व ईथर यांमध्ये विद्राव्य आहे. ते सुगंधी द्रव्यांत व औषधांमध्ये वापरतात.

गुर्जन बाल्सम : (गुर्जन तेल इंडियन वुड ऑइल). हे ओलिओरेझीन डिप्टेरोकार्पसच्या अनेक जातींपासून भारत व इंडोनेशिया तयार करतात [⟶ चालन]. त्याची भौतिक अवस्था, रंग व विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) ते तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. चांगल्यापैकी व्यापारी प्रतीचे बाल्सम परावर्तित प्रकाशात हिरवट करड्या रंगाचे व किंचित गढूळ दिसते तर पारगम्य प्रकाशात पूर्णपणे स्वच्छ व तांबडट तपकिरी रंगाचे दिसते. त्याचा वास व चव कोपेब बाल्समासारखी असतात. त्याचे वि.गु. ०.९५ ते ०.९७ व प्रणमनांक १.५१० ते १.५१६ आहे. बाष्प ऊर्ध्वपातनाने (तापविलेल्या द्रवातून वाफेचे बुडबुडे जाऊ देऊन बनणारे बाष्प गोळा करून व ते थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेने) गुर्जन बाल्समापासून ६० ते ७५% बाष्पनशील तेल मिळते. या बाल्समाचे उपयोग ‘चालन’ या नोंदीत वर्णिल्याप्रमाणे आहेत.

संदर्भ : 1. Arefande, S. Perfumes and Flavour Materials of Natural Origin, Elizabeth, N. J. 1960.

2. Guenther, E. The Essential Oils, Vol. V. Princeton, 1960.

सूर्यवंशी, वि. ल. घाटे, रा. वि.