बाल्मर (बामर), योहान याकोब : (१ मे १८२५–१२ मार्च १८९८). स्विस गणितज्ञ व भौतिकीविज्ञ. आणवीय सिद्धांताच्या विकासात महत्त्वाच्या ठरलेल्या एका गणितीय सूत्राचात्यांनी शोध लावला. त्यांचा जन्म लॉसेन येथे झाला. बाझेल, कार्लझ्रूए व बर्लिन येथे शिक्षण घेतल्यानंतर १८४९ मध्ये त्यांनी बाझेल विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविली. बाझेल येथील एका माध्यमिक शाळेत १८५९ पासून मृत्यूपावेतो त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी बाझेल विद्यापीठात १८६५–९० या काळात भूमितीचे अर्धवेळ अध्यापक म्हणून काम केले.
बाल्मर यांनी १८८४ मध्ये प्रथमच हायड्रोजनाच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्णरेषांच्या तरंगलांबींना लागू पडणारे गणितीय सूत्र यशस्वी रीत्या शोधून काढले
[⟶ वर्णपटविज्ञान]. हे सूत्र ‘बाल्मर सूत्र’ या नावाने व या वर्णरेषा ‘बाल्मर क्षेणी’ म्हणून ओळखल्या जातात. या सूत्रात एकच स्थिरांक असला, तरी आणवीयहायड्रोजनाच्या दृश्य प्रकाशातील व निकट जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) भागातील सर्व वर्णरेषा ते अचूकपणे निदर्शित करते. बाल्मर यांचे हे सूत्र अनुभवसिद्ध परंतु अगदी अचूक होते आणि नील्स बोर यांनी १९१३ मध्ये दोन साध्या गृहीततत्त्वाच्या साहाय्याने ते सिद्ध करून दाखविले. बाल्मर यांनी पूर्वीच सूचित केल्याप्रमाणे बोर यांनी हायड्रोजनाच्या इतर रेषांच्या श्रेणींचे भाकित केले आणि त्यानंतर थिओडोर लायमन, फ्रीड्रिख पाशेन इ. शास्त्रज्ञांनी अशा श्रेणी शोधूनही काढल्या. वर्णरेषांच्या इतर सूत्रांना (उदा., जे. आर्. रिडबर्ग, एच्. कायसर, सी. रुंगे इ. शास्त्रज्ञांच्या सूत्रांना) बाल्मर यांचे सूत्र नमुनेदार ठरल्याने आणवीय वर्णविज्ञानात हे सूत्र मूलभूत म्हणून मानले गेलेले आहे. १८९७ मध्ये त्यांनी वर्णरेषांविषयीच्या आपल्या विचारांचा एका निबंधाद्वारे इतर कित्येक मूलद्रव्यांच्या वर्णपटांकरिता विस्तार केला. ते बाझेल येथे मृत्यू पावले.
पहा : पुंज सिद्धांत वर्णपटविज्ञान.
भदे, व. ग.