बालवाङ्मय : सामान्यपणे चार ते सोळा वर्षे वयाच्या मुलांच्या बौद्धिक आकलनाच्या आवाक्यात येऊ शकणारे व त्यांना वाचनीय वाटणारे वाङ्मय म्हणजे बालवाङ्मय , असे म्हणता येईल. ‘बाल’ या संज्ञेने शिशू, बाल, किशोर व कुमार अशा बालपणातील सर्वच अवस्थांचा निर्देश होतो. बालवाड्मय हे समाजातील एकूण वाङ्मयसृष्टीचाच एक भाग असले, तरी बालमनाच्या जाणिवा वेगळ्या असतात भाषा व भावना याही वेगळ्या असतात त्यामुळे बालवाड्मयातील आशय आणि अभिव्यक्ती यांचेही स्वरुप वेगळे ठरते. अद्भुतरम्यता, हास्यकारकता, कल्पनासौंदर्य, सुबोध व नादमधुर भाषाशैली यांसारखे गुणविशेष बालवाङ्मयात विशेषत्वाने दिसून येतात. मनोरंजन, उद्बोधन आणि बालकांच्या तीव्र कुतूहलबुद्धीचे समाधान यांसारख्या प्रेरणा बालवाङ्मयाच्या निर्मितीमागे असू शकतात. बालकांची भावसृष्टी भाषारुप व चित्ररुप अभिव्यक्तीसाठी धडपडत असते. या धडपडीचेही प्रतिबिंब बालवाङ्मयात दिसून येते.

बालवाङ्मयाची व्याप्ती मोठी आहे. कथा, कविता, नाटिका यांसारखे सगळे साहित्यप्रकार त्यात आढळतात. किशोरवयापर्यंतच्या वाचकांसाठी लिहिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पुस्तकांचा यात समावेश होतो. मूलत: प्रौढांसाठी निर्माण झालेल्या पण मुलांनाही वाचनीय ठरतील अशाही पुस्तकांचा त्यात अंतर्भाव होतो. काही प्रतिभावंत मुलांनी–उदा., ऋचा गोडबोले-निर्माण केलेले बालसाहित्यही या सदरात मोडते पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सचित्र सजावट हेही त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण होय.

इतर सर्व वाङ्मयाप्रमाणेच बालवाङ्मयाची सुरूवातही मौखिक कथनपद्धतीने झाली. आजीबाईच्या गोष्टी, कहाण्या व आईने बाळाला खेळवण्यासाठी रचलेली बडबडगीते व चिऊकाऊच्या कथा ही आजच्या बालवाङ्मयाची पूर्वपीठिका मानता येईल. ही मौखिक परंपरा मुद्रणकला उदयास येईपर्यंत चालत आली. प्रत्येक देशात या प्रकारचे बालवाङ्मयाची अस्तित्वात आहे. इंग्लिश भाषेतील ‘नर्सरी ऱ्हाइम्स’ म्हणजे शिशुगीते वा लालनगीते- उदा., ‘जॅक अँड जिल’, किंवा मराठी भाषेतील ‘अडगुलं-मुडगुलं’ सारखी बडबडगीते-यांचा वानगीदाखल निर्देश करता येईल. पाश्चात्त्य देशांत पंधराव्या शतकात पुस्तके छापली जाऊ लागली, त्यानंतरच्या काळात बालवाङ्मयाची विकास व प्रसार झपाट्याने होत गेला. एक स्वतंत्र व स्वायत्त साहित्यप्रकार म्हणून त्याचा विचार अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच होऊ लागला.

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मुद्रणसंस्था आल्या. त्यानंतर प्राथमिक शाळांच्या स्थापनेबरोबरच, १८२५-२६ सालापासून क्रमिक पाठ्यपुस्तके लिहिली जाऊ लागली. सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी लिहिलेले बाळमित्र हे या योजनेतील पहिले बालपुस्तक होय. ते स्वतंत्र नसून अनुवादित होते. परंतु खऱ्या अर्थाने मराठी बालवाङ्मयाची विपुल प्रमाणावर निर्मिती ⇨विनायक कोंडदेव ओक (१८४०-१९१४) यांनी केली. त्यांनी मुलांसाठी स्वतंत्र वा अनुवादित अशी पुष्कळ पुस्तके तर लिहिलीच, पण त्याशिवाय त्यांनी केवळ बालांसाठी बालबोध नावाचे मासिक १८८१ साली सुरू करून मराठी बालवाङ्मयाच्या विकासास चालना दिली. या मासिकातून कथा, कविता, चरित्रे, चुटके, माहितीपर लेख असे विविध बालवाङ्मयाचे प्रकार त्यांनी बालांपुढे सादर केले.हे मासिक त्यांनी ३४ वर्षे चालवले. तदनंतर १९०६ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी आनंद मासिक सुरू केले, ते अद्यापही प्रकाशित होत असते. आपट्यांनंतर गोपीनाथ तळवलकर व विद्यमान संपादिका श्यामला शिरोळकर यांच्या संपादकत्वाखाली या मासिकाची वाटचाल चालू आहे. यानंतर मराठीमध्ये बालमासिकांची एक अखंड परंपराच सुरू झाली. त्यात पालवणकरांचे खेळगडी, चित्रशाळेचे शालापत्रक, भा. रा. भागवतांचे बालमित्र ही पूर्वीची बालमासिके उल्लेखनीय आहेत. विद्यमान बालमासिकांपैकी महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक निर्मिती मंडळातर्फे प्रकाशित होणारे किशोर, बालविकास (मुंबई) उपमन्यू (कल्याण, जि. ठाणे) कुमार, बिरबल, गोकुळ (पुणे) बालशक्ती (जळगाव) मुलांचे मासिक (नागपूर) चांदोबा (मद्रास) इ. उल्लेखनीय आहेत.

बालवाङ्मयाच्या विकासाच्या प्रारंभकाळातील वाङ्मय मुद्दाम बालांसाठी लिहिले गेले नव्हते, परंतु प्रौढवाङ्मयापैकी निवडक पुस्तकांचे बालोचित संस्करण करून ते बालांच्या हाती देण्यात येऊ लागले.⇨ इसापच्या बोधकथा, पंचतंत्र, कथासरित्सागर, रामायण, महाभारत व इतर पुराणे यांतील कथांचे संस्करण या सदरात येईल. पाश्चात्य वाङ्मयातही याचप्रमाणे हर्क्यूलीझच्या साहसकथा, राजा आर्थर व त्याचे सरदार यांच्या कथा, रॉबिन हुड इत्यादींची संक्षिप्त संस्करणे बालवाङ्मय म्हणून प्रसिद्ध झाली. या संस्कारित ग्रंथनिर्मितीचे उत्तम उदाहरण म्हणजे, अरबी भाषेतील सुरस व चमत्कारित गोष्टींपैकी काही कथांचे अनुवाद देशोदेशी छापले गेले, हे होय.

यानंतर बालवाङ्मयाला एक नवी दिशा लागून उर्जितावस्था येऊ लागली. पाश्चात्त्य लेखकांच्या मोठ्या कादंबऱ्यांची संस्करणे बालांसाठी प्रसिद्ध होऊ लागली. स्टीव्हन्सनचे ट्रेझर आयलंड, चार्ल्स डिकिन्झचे ऑलिव्हर ट्विस्ट व डेव्हिड कॉपरफील्ड, मार्क ट्वेनचे टॉम सॉयर इ. पुस्तकांच्या संक्षिप्त आवृत्त्या अद्यापही मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. मराठीमध्येही हरी नारायण आपटे यांच्या कादंबऱ्यांची संक्षिप्त संस्करणे प्रसिद्ध झाली. तसेच साने गुरूजींनीही काही पाश्चात्त्य कादंबऱ्यांची मुलांसाठी छोटी व उत्तम संस्कारणे केली.

यानंतरचा कालखंड हा बालवाङ्मयाचा उत्कर्षकाळ मानला जातो. मुलांसाठी जाणीवपूर्वक स्वतंत्र लेखन केले पाहिजे, या कल्पनेचा प्रसार या काळात झाला. त्यास अनुसरुन ⇨ याकोप ग्रिम व व्हिल्हेल्म ग्रिम या बंधूंनी संकलित केलेल्या व लिहिलेल्या परीकथा, ⇨ हॅन्स क्रिश्चन अँडरसनच्या परीकथा, तसेच ल्यूइस कॅरलची ॲलिस इन वंडरलँड ही स्वतंत्र अद्भुतरम्य कथा इ. उत्तम साहित्याची निर्मिती झाली. या काळात बालसाहित्याला कादंबरी, नाट्य, काव्य, ऐतिहासिक वा सामाजिक आशयाच्या कथा, लोककथा, चरित्रे असे अनेक प्रकारचे धुमारे फुटले. इंग्रजी नियतकालिकांतील बालवाङ्मय-विभागांबरोबरच, खास मुलांसाठी वा मुलींसाठी निघणारी कथावार्षिकेही लोकप्रिय झाली.


बालवाङ्मयाच्या या विकासाबरोबरच त्याच्या शास्त्रशुद्ध जडणघडणीकडेही चिकित्सक लेखकांचे लक्ष वेधले गेले. बालमानसशास्त्र, बालांच्या मनोविकासाच्या पायऱ्या, ग्रहणशक्तीच्या कक्षा यांचा अभ्यास होऊ लागला. कोठल्याही तऱ्हेचे अनिष्ट संस्कार मुलांच्या मनावर होऊ नयेत, यासाठी बालवाङ्मयाचे मानदंड कोणते असावेत, हेही चर्चिले जाऊ लागले व त्यानुसार शिशू (वयोमर्यादा सु. ४ ते ८), बाल (वयोमर्यादा सु. ८ ते १२) व कुमार (वयोमर्यादा सु. १२ ते १६) अशा तीन वयोगटांत बालवाङ्मयाच्या तीन श्रेणी कल्पिण्यात आल्या व या तिन्ही श्रेणींकरिता स्वतंत्र वाङ्मयनिर्मिती होऊ लागली.

 

शिशुगटातील बालवाङ्मयात सोपी आणि अगदी छोटी वाक्ये तसेच वाक्यातील नाद, लय व ताल यांवरच विशेष भर असतो, उदा., ‘ऊ-टू’ च्या गोष्टीतील भाजीबद्दलची वाक्ये- 

‘चिरू कशी : खसा खसा !

शिजवू कशी : रटारटा!

खाऊ कशी : मटामटा!’

इ. वाक्ये त्यातील तालबद्धतेने मुलांना प्रिय होतात. असेच दुसरे उदाहरण ‘चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक’ या छोटुकल्या कथेचे. यातील म्हातारीच्या ‘मुलीकडे जाते-लठमुठ्ठ होते’ यांसारख्या वाक्यांत लयबद्वतेबरोबर म्हातारीच्या त्याच त्या शब्दांची पुनरावृत्ती येते, तीही मुलांना आवडते. त्याचप्रमाणे त्यांच्या बालपणापासूनच्या ओळखीच्या ‘माऊ, चिऊ, काऊ, भू भू’ इत्यादींच्या प्राणिकथाही त्यांना प्रिय असतात. ताराबाई मोडक, म. का. कारखानीस इत्यादींनी अशा कथा लिहिल्या आहेत. याच गुणांनी परिपूर्ण अशी शिशुगीते व बडबडगीते मुलांचे उत्कृष्ट रंजन करू शकतात.

सुमारे ८ ते १२ वर्षे या वयोगटातील मुलामुलींची ओढ अद्भुत वाङ्मयाकडेच अधिक दिसून येते. अर्थात त्या दृष्टीने परीकथा व लोककथा यांचे आकर्षण त्यांना फार वाटते. त्यांत अद्भुतरम्यता खूपच असते शिवाय त्यांत ड्रॅगन, चेटकी, परी इ. लोकविलक्षण पशू व व्यक्तिरेखा असल्यानेही या गोष्टी मुलांना या वयात प्रिय वाटतात. या दृष्टीने प्रौढ लोककथा बालायोग्य करून लिहिणारे मराठी लेखक म्हणजे वामन चोरघडे, मालती दांडेकर, दुर्गा भागवत इ. होत. जरा मोठ्या प्राणिकथा व बोधकथाही मुलांना आवडतात. निसर्गनिर्मित जगाबद्दलचे त्यांचे कुतूहल याच सुमारास जागे होते. त्या दृष्टीने वृक्ष, फुले, फळे, आजूबाजूची माणसे, वन्य प्राणी, नदी वगैरे विषयांवरील कथा व कविता त्यांना आवडतात. बालांसाठी नेमक्या विषयांवर काव्यरचना करणाऱ्या मराठी कवींमध्ये वा. गो. मायदेव, ग. ह. पाटील, राजा मंगळवेढेकर इ. उल्लेखनीय आहेत. १२ ते १६ वर्षे हा कुमार मुलामुलींचा वयोगट. या वयात मुलांच्या मनावरची अद्भुतरम्यतेची मोहिनी उडून गेलेली असते, त्यातील स्वप्नरंजन त्यांना नको वाटते. तर जगाचे वास्तव दर्शन त्यांना हवे असते. अर्थात लोककथांची आवड कमी झाली असली, तरी त्या कथांमधील साहस व शौर्य त्यांना आवडते. शिवाय पुढे तारुण्यात अवतरणाऱ्या प्रेमभावनेची पुसटशी चाहूल त्यांना या सुमारास येऊ लागलेली असते, त्यामुळे ‘तरूण नायकाने राजकन्येला राक्षसाच्या तावडीतून सोडवले’ यासारख्या घटनेतील प्रेमाची मुग्धावस्थाही त्यांना आकर्षित करते. पण एकंदरीत, त्यांच्या दैनंदिन जीवनावरील वास्तवदर्शी कथा, कादंबरिका त्यांना यावेळी मनापासून पसंत पडतात. म्हणूनच मुलांचे शालेय जगत, त्यांचा खोडकर स्वभावधर्म, त्यांच्या गप्पागोष्टी वगैरे विषयांना वाहिलेल्या कादंबरिका जगातील सर्व भाषांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या दृष्टीने उल्लेखनीय मराठी पुस्तके म्हणजे ना. धों. ताम्हनकर यांचा गोट्या, भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे, सुधाकर प्रभूंचा राजू प्रधान इ. होत. मुलांचे भावविश्व व स्वभावविशेष या पुस्तकांतून उत्कृष्टपणे व्यक्त झाले आहेत.

साहस व शौर्य यांचे चित्रण करणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचीही आवड या वयातील मुलांमध्ये स्वाभाविकपणेच वसत असते. त्या दृष्टीने झ्यूल व्हेर्नसारख्या पाश्चात्त्य लेखकांच्या काल्पनिक परंतु अप्रतिम शोधसाहसांच्या कादंबऱ्या त्यांच्यामध्ये विलक्षण लोकप्रिय ठरतात. ह्या पुस्तकांची सुरेख मराठी रुपांतरे भा. रा. भागवत यांनी चंद्रावर स्वारी, पातळलोकची अद्भुत यात्रा इ. नावांनी केली आहेत. तसेच हेन्री रायडर हॅगर्डच्या किंग्ज सॉलोमन्स माइन्सचे मराठी रुपांतर मालती दांडेकर यांनी सुलीमानचा खजिना या नावाने केले आहे. ही व अशा प्रकारची अनेक स्वतंत्र साहसकथांची पुस्तके कुमार जगात प्रिय ठरली आहेत. युद्धकथाही शौर्य व देशाभिमान जागृत करणाऱ्या असल्याने प्रसिद्ध ऐतिहासिक घटना, प्रसंग, व्यक्ती यांवर आधारलेल्या कथाकादंबऱ्याही कुमारांना खूप आवडतात. त्या दृष्टीने हरी नारायण आपटे, नाथ माधव इत्यादींच्या स्फूर्तिदायक ऐतिहासिक कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्र घडवणारे थोर पुरूष तर त्यांना परमदैवतासारखे वंद्य असतात. त्यांच्यावर लिहिलेले ब. मो. पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती मुलांमध्ये फार लोकप्रिय ठरलेले आहे. अशाच प्रकारची ‘खबरदार । जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या । उडविन राई राई एवढ्या ।’ किंवा वि. दा. सावरकरांचे ‘धन्य शिवाजी । तो रणगाजी । धन्यची तानाजी ।’ यांसारखी स्फूर्तिदायक कवनेही मुलांना आवडतात. कुमारवयीन मुलांसाठी नाट्यलेखनही मराठीमध्ये विपुल प्रमाणात झालेले दिसते. प्रसिद्ध लोककथा वा परीकथा यांवर आधारित उत्कृष्ट नाटके सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी इत्यादींनी लिहिली. जादूचा वेल, मधुमंजिरी, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा ही त्यांची नाटके अद्भुतरम्यतेच्या पार्श्वभूमीवर असूनही, त्यांतील विलक्षण नाट्यमय घटनांमुळे व त्यांना विनोदाची जोड दिल्याने प्रत्ययकारी व कुमारप्रिय ठरली. तद्वतच सई परांजपे यांची विनोदगर्भ अशी पत्तेनगरीत, शेपटीचा शाप इ. नाटके पु. ल. देशपांडे यांची नवे गोकुळ, वयं मोठ. खोटं गंगाधर गाडगीळ यांचे आम्ही आपले थोर पुरुष होणार इ. सामाजिक पार्श्वभूमीवरील नाटकेही उल्लेखनीय आहेत. पौराणिक कुमार नाटकांत प्र. के. अत्रे यांचे गुरुदक्षिणा हे विनोदासाठी उल्लेखनीय आहे.

दांडेकर, मालती


चित्र-सजावट : नव्यानेच अक्षरओळख झालेल्या मुलाला शब्दात गुंफलेला आशय केवळ शब्दातूनच आकलन होणे कठीण असते. अशावेळी आकलनाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असे, चित्राचे दृश्य-माध्यमच परिमाणकारक ठरते. मुलांच्या मनावर कथात्मक आशय परिमाणाकारकपणे ठसविण्यासाठी शब्दांपेक्षाही चित्रेच अधिक उपकारक ठरतात. म्हणून बालवाङ्मय सचित्र असावे लागते. चित्रे बोलकी असतात व ती शब्दांवाचूनही आशय कथन करू शकतात. या सूत्राचा आविष्कार पाश्चात्त्य लेखक-प्रकाशकांनी अनेकविध प्रकारे केलेला दिसतो. त्यामध्ये एक प्रकार मोठा मजेशीर असतो. पुस्तक उघडताच त्यातील कोरीव फर्म्याच्या (स्टेन्सिल) तंत्राने घडी करून ठेवलेले घटना-दृश्य पुस्तकाच्या मध्यावर उलगडून उभे राहते व आशय जिवंत होतो. या प्रकारच्या गोष्टींतील विविध प्रसंग चित्रमालिकेच्या साहाय्याने साकार करावे लागतात.

 

मुलांच्या वेगवेगळ्या वयोगटांनुसार जसे बालवाङ्मयाचे भिन्न भिन्न प्रकार संभवतात, तद्वतच चित्रसजावटही भिन्न भिन्न प्रकारे केली जाते. अगदी प्रारंभिक बालवाङ्मय म्हणजे संपूर्ण चित्रकथाच असतात. प्रत्यक्ष लिहिता-वाचता न येणाऱ्या शिशुंना बडबडगीते व चिमुकल्या गोष्टी यांची ओळख कथन, पाठांतररुपाने तसेच चित्रे दाखवून करून घ्यावी लागते. वर उल्लेखिलेली घडींची चित्रकथा-पुस्तके प्रामुख्याने दोन ते पाच या वयोगटातील शिशुंकरता असतात. साधारणपणे पाचव्या वर्षापासून मुलाच्या शालेय शिक्षणाला सुरुवात होते. या रुढ शिक्षणातही विशदीकरणासाठी चित्रांचा उपयोग करावा लागतो.  तथापि बालवाङ्मय आणि त्यातील चित्रेही प्रत्यक्ष जीवनानुभव बालापर्यंत पोहोचविण्यासाठीच काढलेली असतात. एक मोठे प्रसंगचित्र व खाली फक्त दोन-तीन ओळीत कथानिर्देश अशा पद्धतीने तयार केलेली पुस्तके साधारणपणे चार ते आठ या वयोगटातील शिशुंसाठी असतात. पऱ्यांची, पानाफुलांची गोड गाणी व पशुपक्ष्यांच्या मजेशीर गोष्टी या शिशुंना विशेष प्रिय असतात. बघताक्षणीच मुलाने पुस्तक आपणहून हातात घ्यावे व ते उघडून त्यात रमून जावे, इतक्या आकर्षकतेने या पुस्तकांची सजावट होणे आवश्यक असते. बालवाड्मयाच्या लेखकाला जसे शब्द जिवंत करावे लागतात, तसेच चित्रकाराला रंग, रेषा, आकार व अवकाश जिवंत करावे लागतात. शिवाय लेखकाला शब्दांतून जे उभे करता येत नाही, ते चित्रकाराला चित्रांतून साकार करून दाखवायचे असते. प्रत्यक्ष ‘जसे दिसते’ तसे चित्रित न करता स्वत: ‘बाल’ होऊन हे चित्रण करावे लागते. शब्द आणि चित्र दोन्हीही बालसुलभ निरागसतेतून साकार व्हावे लागतात. गोष्टीतील वाघ हा ‘वाघाबा’ वाटेल असाच चित्रित करावा लागतो. गोष्टीतील प्राणी व वस्तू बालांचे सवंगडी बनून यावे लागतात. त्यांची शारीरिक जडणघडण मानवी अवयवांसारखी लवचिक दाखवावी लागते. ज्या वस्तूचा मुलाला अनुभव द्यावयाचा, तिच्याबद्दलचे कुतूहल वाढवून ती ‘विस्मयवस्तू’ बनावी लागते. त्यासाठी चित्रकाराला स्वत: ‘बाल’ बनून ते कुतूहल व विस्मय यांचा साक्षात अनुभव घ्यावा लागतो. अवांतर तपशील वगळून लयदार व ठळक रेषांनी आकलनसुलभ व स्वभावपरिपोषक चित्रण करावे लागते. उठावदार व टवटवीत रंग वापरून वस्तूचे वस्तूपण न घालवता तिला निरागस बनावायचे एकीकडे वस्तुविश्वाचे ज्ञान तर द्यायचे पण उत्सुकता अधिकाअधिक वाढत जाण्यासाठी ते सुखद बनवायचे हे सर्व कल्पनाजालातूनच (फँटसी) होणे शक्य असते. उदा., चंद्र हा एक ग्रह आहे, तो आकाशात भ्रमण करतो वगैरे शास्त्रीय ज्ञान कोरडेपणाने न देता त्या ज्ञानाचे कल्पनाचित्रात रुपांतर करून मांडावे लागते. सहस्त्रयोजने दूर असलेल्याचंद्राला चिरेबंदी वाड्यात आणून परंपरेने ‘चांदोमामा’ बनवले, ते यामुळेच.

साधारण आठ ते बारा या वयोगटातील मुलामध्ये अद्भुताची ओढ जास्त असते. कारण तो बाह्य जगाचा कल्पनेने वेध घेऊ लागलेला असतो. ही अद्भुतता पंचतंत्र, इसापनीती इत्यादींमध्ये तसेच परंपरागत जादुगिरीच्या गोष्टींतून आढळून येते. सामान्यत: बारा ते सोळा हा वयोगट कुमार अवस्थेचा द्योतक असतो. या वयात अद्भुततेपेक्षा पराक्रमाने भरलेले व साहसी कथानक त्याला आवडू लागते व तो वास्तवाबद्दल जागरूक होऊ लागतो. याच वेळी जीवनातील खऱ्या वास्तवाचे भान त्याला येऊ लागते. या वास्तवाची ओळख त्याला कल्पनारम्यतेच्या अवगुंठनातून करून देणे आवश्यक असते. चित्रणातील तपशील वाढवून ते अधिक वर्णनात्मक करावे लागते. येथे वाड्मयीन तपशीलही वाढत जातो. या वयात नैतिक प्रेरणा, धैर्यशीलता, सहसवृत्ती व कारुण्याचे भान जोपासावे लागते. परंतु हे करीत असताना बालमनावर दडपण येण्याची शक्यता असते. तसे होऊ नये, म्हणून कल्पनाजालाचा आश्रय घ्यावा लागतो. त्याचा अनुभव सुखद असतो. त्यामुळे त्याच्याशी बालमन सहज एकरूप होते. कारण मानसशास्त्रीय दृष्टया कल्पनाजाल ही एक प्रकारे इच्छापूर्तीच असते. प्रत्यक्ष जीवनसंग्रामात इतकी सहज इच्छापूर्ती कधी होत नाही. यामुळे किशोरवयातील मुलांसाठी रंगवावयाच्या चित्रांत इच्छापूर्तीबरोबर हळूहळू चिंताही मिश्रित व्हावी लागते.

 

बालवाड्मय प्रौढांनाही आस्वाद्य होऊ शकते. बालवाड्मयाचे लेखक व चित्रकार कल्पनाजालातून मानवी मनाच्या निरागसतेचेच दर्शन घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नातून कधी कधी चांगल्या कलाकृती जन्माला येतात. मराठीतील वेधक उदाहरण म्हणजे विंदा करंदीकरांचे एटू लोकांचा देश (१९६३). या पुस्तकाची सजावट चित्रकार वसंत सरवटे यांनी आशयाला अनुरुप व परिपोषक ठरावी, अशा प्रकारे केली आहे. अशी पुस्तके पाहताना व वाचताना प्रौढांनाही बालमनाशी एकरूप होऊन निरागसतेचा आनंद लुटता येतो.

आधुनिक सचित्र बालवाड्मय यूरोप-अमेरिकेतून आपल्याकडे आले. खास मुलांसाठी म्हणून तीनशे वर्षांपूर्वी यूरोपात ‘हॉरन बुक’ या नावाने ओळखली जाणारी पुस्तके निघू लागली. त्यानंतर छोटी ‘प्रायमर्स’ म्हणजे प्राथमिक पुस्तके लिहिली गेली. पुढे धार्मिक आणि बोधपर कथा आणि रोमांचकारी साहसकथा प्रसिद्ध होऊ लागल्या. मुलांना आवडणाऱ्या पुस्तकांचे निश्चित अंदाज लेखक-प्रकाशकांना येऊ लागले. आणि त्यातूनच बालवाड्मयाचे विस्मयकारक विश्व निर्माण झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी नियतकालिकांतून चित्रकथांचा उदय झाला. त्यांत सामान्यत:व्यंगचित्रे छापली जात. त्यातच काही व्यक्तिचित्रांच्या गंमती देण्याच्या कल्पनेतून चित्रकथा अवतरल्या.


न्यूयॉर्क वर्ल्डने १८९६ च्या मार्चमध्ये अमेरिकेत रंगीत चित्रमालेची पुरवणी प्रसिद्ध केली. बालवाङ्मयातील हा पहिलाच चित्रकथेचा प्रयोग लोकप्रिय ठरला. या पुरवणीपासून रिचर्ड आउटकॉल्ट या चित्रकाराने लहान मुलांचे एक गंमतीदार पात्र न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये रेखाटण्यास सुरुवात केली. ‘यलो किड’ नावाने हे पात्र प्रसिद्धीला आले. पिवळा झगा घातलेला हा छोकरा बोलत नसे पण त्याचे हृद्गत त्याच्या पिवळ्या झग्यावर लिहिलेले असे. हा नवा प्रयोग कल्पनातीत लोकप्रिय ठरला. त्यानंतर हळहळू स्वतंत्र चित्रकथा हा प्रकार अनेक शाखांनी समृद्ध बनला.

 

मराठीमध्ये सचित्र बालवाङ्मय अलीकडेच सुरू झाले. ‘इंडिया बुक हाउस’ सारख्या संस्था सचित्र बालकथांचेच प्रकाशन प्रामुख्याने करतात. भारतातील अनेक प्रमुख भाषांतून त्याच्या आवृत्या प्रसिद्ध केल्या जातात. मात्र खास स्वतंत्र अशा सचित्र कथा मराठीमध्ये वाअन्य भारतीय भाषांमध्ये कमी प्रमाणात आढळतात. मूळ इंग्रजी भाषेतील कथा, त्यांतील मजकूर इतर भाषांत अनुवादित करून देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. स्वाभाविकच त्यातील चित्रमय वातावरण व भाषेची घडण यांत काहीसा परकेपणा जाणवतो. चांदोबा, आनंद, कुमार, किशोर यांसारख्या मराठी नियतकालिकांतून मराठी बालवाङ्मय विशेषत्वाने जोम धरू लागले आहे. तसेच साप्ताहिकांतून व दैनिकांतून खास बालांसाठी विभाग देण्याची प्रथाही अलीकडे दिसून येते. विलोभनीय सचित्र पुस्तकांची निर्मिती करावयाची, तर त्यासाठी मुद्रणखर्च फार होतो. प्रादेशिक बालवाङ्मयाचे विक्रयक्षेत्र त्यामानाने मर्यादित असल्याने, इंग्रजी भाषेतील बालवाङ्मयाच्या तुलनेत प्रादेशिक बालवाङ्मय अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे, असे म्हणावे लागेल.

 

कदम, ज्योत्स्ना

पहा : कहाण्या, मराठी परीकथा बडबडगीत बोधकथा शिशुगीत लोककथा लोकसाहित्य.

 

संदर्भ :   १. Cameron, Elenor, The Green and Burning Tree: On the writing and Enjoyment of Children’s Books, Boston, 1969.

            २. Doyle, Brian, The who’s Who of Children’s Literature, New York, 1968.

            ३. Hazard, Paul Trans, Michell, Marguerite Books, Children and Men, Boston, 1960.

            ४. Hurlimann, Bettina Trans. Crawford, Elizabeth D. Picture Book World, London, 1968.

            ५. Smith, Lilian H. The Unreluctant Year: A Critical Approach to Children’s Literature, New York, 1968.

            ६. दांडेकर, मालती, बालसाहित्याची रुपरेखा, मुंबई, १९६४.

            ७. दावतर, वसंत, संपा. आलोचना :वर्ष अठरावे, अंक चौथा-पाचवा, मुंबई, डिंसें. १९७९-जाने. १९८०

            ८. वागूल, देवीदास, बालवाङ्मय, पुणे.

            ९. बाळ, शरयू सोहोनी, मा. के. बालमानसशास्त्र, पुणे, १९६४.