बालमणिअम्म, नालप्पाट्टू : (१९ जुलै १९०९-). आधुनिक मलयाळम् कवयित्री. जन्म मलबारमधील पुन्नयूरक्कुळम् (ता. वन्नेरी) येथे. माता-पिता कोच्चुअम्म व चिट्टन्नूर कुंजुण्णी राजा. पती कै. एम्. व्ही. नायर. मातृभूमि या नियतकालिकाचे कै. नायर हे प्रदीर्घ काल कार्यकारी संचालक होते. बालमणी अम्म यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही पण त्यांनी घरीच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण घेतले. नालप्पाट्टू नारायण मेनन हे मल्याळम् कवी व लेखक त्यांचे मामा होत. असा साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण व्यतीत झाले. माधवी कुट्टी (कमला दास) ह्या बालपणी अम्म यांच्या कन्या असून त्यांनी मलयाळम्मध्ये कथा-कादंबरीलेखन आणि इंग्रजीत कवितालेखनही केले.
बालमणी अम्म यांना ‘साहित्यनिपुणा’ (१९६३), ‘केरळ साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६४-मुत्तश्शि ह्या काव्यसंग्रहास) आणि ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६६-मळुविंटे कथा ह्या काव्यास) हे बहुमानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
आतापर्यंत त्यांचे सु. १३ काव्यसंग्रह, चार-पाच इतर काव्ये व एक निबंधसंग्रहही-जीवितत्तिलूटे (१९६९-म.शी. जीवनातून)-प्रसिद्ध झाला. त्यांतील प्रमुख संग्रह व काव्ये पुढीलप्रमाणे : अम्म (१९३३- म. शी. आई), कुटुंबिनि (१९३६-गृहलक्ष्मी), धर्ममार्गत्तिल (१९३८-धर्ममार्गावर), स्त्रीह्रदयम् (१९३९), प्रभांकुरम् (१९४२-प्रकाशांकुर), भावनयिल (१९४२-कल्पनेत), वेळिच्यात्तिल (१९५१-प्रकाशात), अवरपाटुन्नु (१९५२-ते गातात), प्रणामम् (१९५४-अभिवादन), लोकांतरंगळिल् (१९५५-दुसऱ्या जगात-विलापिका), सोपानम्(१९५९-सोपान-निवडक कवितांचे बृहद् संकलन), मुत्तश्शि (१९६२-आजी), मळुविंटे कथा (१९६६-परशूची कथा- परशुराम, बिभीषण व विश्वामित्र यांच्या जीवनावरील तीन आख्यानपर भावकाव्ये), अंपलत्तिल (१९६७-मंदिरात), नगरत्तिल (१९६८-शहरात) इत्यादी.
बालमणी अम्म यांचा पिंड मुख्यत्वे भावगीतात्मक असून त्यांच्या बहुतांश कविता लहान व चिंतनपर आहेत. मातृत्वाची गौरवगीते गाणारी कवयित्री म्हणून त्यांचे वैशिष्ट्य पूर्ण स्थान आहे. त्या आस्तिक-ईश्वरवादी-असून त्यांना घरात मंदिराचा आणि बाल्यात ईश्वराचा साक्षात्कार होतो. त्यांचा आशावादही दुर्दम्य आहे. आपल्या व्यथा-वेदनाही जीवनाकडे आनंदी वृत्तीने पाहणाऱ्या विश्वासू सहचरात त्या सहज परिवर्तित करतात. दैनंदिन जीवनातील घटनांत दडून असलेल्या सौंदर्याची कलात्मक अभिव्यक्ती त्या कल्पकतेने करतात. त्यांनी आपल्या काकांच्या मृत्यूवर लिहिलेली लोकांतरंगळिल् ही विलापिका अत्यंत सरस उतरली असून समीक्षक तिची तुलना दान्तेच्या दिव्हीना कोम्मेदीआ (डिव्हाइन कॉमेडी) शी करतात. मळुविंटे कथा ह्या आख्यानपर काव्यातून त्यांची प्रतिभेची झेप व खोली प्रत्ययास येते. परशुरामाचे पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याचे जीवनकार्य या काव्यात रंगवताना कवयित्रीच्या स्वत:च्या जीवनविषयक तत्वज्ञानाचेही प्रत्ययकारी दर्शन घडते. हे काव्य बळी राजाच्या अखेरच्या आत्यंतिक विनम्र भावाच्या स्तोत्राने संपते. बालमणी अम्मांच्या जीवनावर गांधीजींच्या ध्येयवादी विचारांचा जो प्रभाव पडला, त्याचेही दर्शन त्यांच्या काही कवितांतून घडते. त्यांच्या साहित्यिक जीवनावर त्यांचे मामा नालप्पाट्टू नारायण मेनन, ⇨ वळ्ळत्तोळ नारायण मेनन व ⇨रवींद्रनाथ टागोर या पूर्वसूरींचा प्रभाव आहे.
आजवर कोणाही कवीस न सापडलेला एक नवीन, आल्हादक स्वर बालमणी अम्मांनी मलयाळम् काव्यास प्रदान केला. मातृत्वाची व स्त्रीत्वाची गौरवगीते गाणारी बालमणींसारखी कविता इतर भाषातील साहित्यातही क्वचितच आढळेल, असे म्हटले जाते.
भास्करन्, टी. (एं.) कर्णे, निशा (म.)
“