बालमृत्युमान :दर हजार जीवित जन्मांमध्ये असणारे बालमृत्यूंचे प्रमाण. बालमृत्यूचा विचार (अ) नवजात अर्भकावस्थेतील म्हणजे जन्मापासून १ वर्षांपर्यंत घडून येणारे मृत्यू व (ब) उत्तरकालीन बालमृत्यू असा करतात. सर्वसाधारण मृत्यूमानात घडून येणाऱ्या बदलांप्रमाणेच बालमृत्युमानातील बदलांची प्रवृत्ती असली, तरी बालमृत्युमानाचा वेगळा विचार करण्याचे कारण असे की, ज्या देशांमध्ये सामान्य मृत्युदर अधिक असतो, तेथे एक वर्षाच्या आतील अर्भकांच्या मृत्यूंचे प्रमाण इतर कोणत्याही वयोगटांच्या मृत्युमानापेक्षा अधिक असते. शिवाय बालमृत्यूंची कारणे ही इतर वयोगटांच्या मृत्युकारणांपेक्षा वेगळी असतात. आरोग्य-सेवेतील सुधारणांचा अनुकूल परिणाम बालमृत्युमानावर सर्वांत आधी दिसून येतो. परिणामी इतर वयोगटांतील मृत्युमानापेक्षा बालमृत्युमान अधिक वेगाने कमी होताना दिसते. अधिक जननदर असलेल्या समाजात बालमृत्युमान अधिक असल्याचेही आढळते.

बालमृत्यूंच्या कारणांची विभागणी (अ) अंतर्भव कारणे व (ब) बहिर्भव कारणे अशा दोन गटांत करता येते. अंतर्भव कारणांनी घडून येणाऱ्या बालमृत्यूंचा संबंध अर्भकांच्या गर्भावस्थेशी व जन्म घटकांशी असतो. या कारणांचा परिणाम नवजात अर्भकांच्या मृत्युदरावर अधिक होतो. बहिर्भव कारणे ही प्रसूतीनंतरची काळजी घेण्याची पद्धत, बालकाच्या पचनसंस्थेतील व श्वसनसंस्थेतील दोष आणि अर्भकाला होणारे संसर्गजन्य रोग यांच्याशी निगडित असतात. सार्वजनिक आरोग्यविषयक परिस्थितीतील सुधारणा, वैद्यकीय संशोधन आणि प्राणरक्षक औषधांमुळे बहिर्भव कारणांनी घडून येणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण कमी होत आहे.

अलीकडील संशोधनात बालमृत्युमानाचा संबंध अर्भकाचा जन्मक्रम, जन्माच्या वेळी असणारे वजन, जुळेपणा, मातांची वये ह्या जीवशास्त्रीय घटनांशी निगडित असल्याचे आढळून आले आहे. अपत्यजन्माच्या वेळी मातेचे वय अगदी कमी किंवा अधिक असले, दोन अपत्यांच्या जन्मांमधील अंतर कमी असेल किंवा मातेला बरीच अपत्ये झाली असली, तर अर्भकमृत्यूची संभाव्यता जास्त असते. सर्वसाधारणपणे अधिक जनन हे निकृष्ट आर्थिक-सामाजिक परिस्थितीतच आढळून येत असल्याने निकृष्ट जीवनमान असणाऱ्या समाजात बालमृत्युमान अधिक असते. घरातील गर्दी, अपुरा प्रकाश व हवा, पाण्याची कमतरता, आरोग्याच्या अपर्याप्त सोयी, अस्वच्छता तसेच घटसर्प, डांग्या खोकला वगैरे साथींच्या आजारांच्या वेळी योग्य ती काळजी न घेतली गेल्याने बालमृत्युमान अधिक असते. बालमृत्युमानावर नागरी व ग्रामीण राहणीचाही परिणाम वेगवेगळा झाल्याचे दिसते.

मातांच्या शैक्षणिक पातळीचा परिणाम बालमृत्युमानावर घडून येतो, असे १९६६ साली बृहन्मुंबईतील एका पाहणीत आढळून आले आहे. निरक्षर मातांच्या अपत्यांमध्ये बालमृत्युमान सर्वांत जास्त होते, तर शालान्त परीक्षेपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या मातांच्या अपत्यांमध्ये बालमृत्युमान खूप कमी असल्याचे दिसते.

भारतात १९३१ पूर्वी जन्मलेल्या दर हजार अर्भकांपैकी सु. एकचतुर्थांश अर्भके एक वर्षाच्या आताच मृत्युमुखी पडत असत परंतु त्यानंतरच्या काळात बालमृत्युमान कमी होत गेले. १९६१ ते १९७१ या दशकात भारतात पुरूष-अर्भकांत मृत्युमान दरहजारी १३५, तर स्त्रीअर्भकांत १३० असल्याचे दिसते.

 

हातेकर, र.दे.