साखळी दुकाने : एकाच प्रकारच्या मालाची विक्री करणारी आणि एकाच मालकीखाली असणारी दोन किंवा अधिक दुकाने. अशी साखळी दुकाने मुख्यतः किरकोळ विक्रीक्षेत्रात आढळतात. मध्यवर्ती मालकी हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय. ही दुकाने मुख्यतः मोठ्या शहरांतच असतात. सर्व साखळी दुकाने किरकोळ विक्री करतात पण काही दुकाने घाऊक व्यापारातदेखील भाग घेतात. काही साखळी दुकाने आपल्या मालकीचे स्वतंत्र कारखाने काढून किंवा कारखाने विकत घेऊन त्यांतील उत्पादनावर आपला संपूर्ण ताबा मिळवितात. बऱ्याच वेळेस माल उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भाग भांडवलावर पुरेसा ताबा मिळवूनही मालाचा नियमित पुरवठा आपणास निश्चितपणे होत राहील, अशी व्यवस्था साखळी दुकानांना करता येते.

देशभर पसरलेल्या अनेक साखळी दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित कंपनीला आपली कार्यालयीन संघटना अत्यंत काटेकोरपणे व कार्यक्षमतेने चालवावी लागते. साधारणतः ⇨ खरेदी, ⇨ विक्री, ⇨ जाहिरात व ⇨ किंमत यांसंबंधीची महत्त्वाची धोरणे मध्यवर्ती कार्यालय ठरविते. प्रत्येक दुकानाच्या व्यवस्थापकावर केवळ विक्री व ग्राहकसेवा एवढ्यापुरतीच जबाबदारी टाकलेली असते. दुकानावरील एकूण नियंत्रण व पर्यवेक्षण परिणामकारकपणे व कार्यक्षमतेने व्हावे, म्हणून प्रत्येक व्यवस्थापकाकडून विशिष्ट नमुन्यात सविस्तर माहिती मागविण्यात येते व तिची मध्यवर्ती कार्यालयात काटेकोरपणे छाननी केली जाते. मोठ्या साखळीसंस्था प्रादेशिक कार्यालयांची स्वतंत्रपणे स्थापना करून त्यांच्यावर काही प्रमाणात देखरेखीची व खरेदीविक्रीचीही जबाबदारी सोपवितात.

साखळी संघटनांना इतर स्वतंत्र किरकोळ व्यापाऱ्यांपेक्षा अधिक स्वस्त दराने व विशेष सवलतीने माल विकत घेता येतो. खरेदीकौशल्याचा फायदा साखळीसंस्थांना मिळतो. घाऊक व किरकोळ व्यापाराचे एकत्रीकरण केल्यामुळे बहुतांश साखळी दुकानांना त्यांपासून विशेष फायदा मिळू शकतो. या दुकानांची बहुतेक विक्री रोखीने असते. विशिष्ट मालाचाच ते व्यापार करीत असल्याने तो फार वेळ पडून राहण्याचा किंवा उलाढालीच्या अभावी नुकसान होण्याचा धोका फारसा संभवत नाही. स्वस्त दराने उच्च प्रतीच्या मालाची खरेदी व मर्यादित विक्रीखर्च यांमुळे साखळी दुकाने किरकोळ विक्रीव्यवसायात अन्य विक्रीकेंद्रांना मागे टाकू शकतात. नफ्याची मर्यादा अल्प ठेवूनही विक्रीचे प्रमाण मोठे असल्यामुळे त्यांना भरपूर फायदा मिळविता येतो.

साखळी संघटनांचे अनेक फायदे असले, तरी काही तोटेदेखील आहेत. त्या केवळ प्रमाणित मालांचेच व्यवहार करू शकतात. अशा दुकानांत ग्राहक सेवासुविधा फारशा मिळत नसल्यामुळे बरेचसे ग्राहक अन्य विक्रीकेंद्राकडे वळतात व तेथे अधिक किंमत देऊनही माल खरेदी करतात. स्वतंत्र किरकोळ विक्रेते व्यापारामध्ये जी धडाडी व कौशल्य दाखवितात, त्याचा प्रत्यय साखळी दुकानांत आढळत नाही.

काही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली साखळी दुकाने अत्यंत कार्यक्षमतेने चालवितात.

पहा : दुकाने व विक्रीकेंद्रे व्यापार, किरकोळ व घाऊक.

धोंगडे, ए. रा.