बालकन-जी-बारी : मुलांसाठी कार्य करणारी भारतातील एक संस्था. ‘बालकन-जी-बारी’ या सिंधी शब्दाचा अर्थ बालकांचे उद्यान म्हणजे बालोद्यान. मनोरंजनातून ज्ञान या श्रद्धेमुळे सेवक भोजराज या सिंधी गृहस्थांनी कराची येथे मुलांसाठी १९२३ मध्ये ‘बालकन-जी-बारी’ सुरू केली. सुरुवातीला बालकन-जी-बारी’ सदराखाली साप्ताहिकांतून सेवक ‘दादा’ या टोपणनावाने मुलांसाठी कथा, बालगीते, मनोरंजक माहिती वगैरे लिहीत. मुलांकडूनही लिहवीत. मुलांना जमवून कथाकथन, संघगीते, सहलींचे, खेळांचे कार्यक्रम होत. १ ऑक्टोबर १९२६ रोजी ‘बालकन-जी-बारी’ अशी संस्थाच स्थापन झाली. १९३५ मध्ये सेवकजींनी बालकन-जी-बारी चे मध्यवर्ती कार्यालय मुंबईमध्ये खरला आणले. १९४८ मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.
बालकन-जी-बारीमध्ये चार ते चौदा वर्षे वयाच्या मुलांसाठी अनेक खेळ, विविध कला, लेखन, वक्तृत्वादी छंद-शिक्षणाची, सहलींची, बालवाचनालयांची व्यवस्था आहे. संस्थेला पंतप्रधान नेहरूंचेही उत्तेजन मिळाले होते. गुलाबपुष्प हे संस्थेचे बोधचिन्ह आहे. शासनाचे सहकार्य व लोकांच्या भरीव देणग्यांमुळे संस्थेची स्वतःची इमारतही झाली. लवकरच संस्था ‘अखिल भारतीय बालकन-जी-बारी मध्यवर्ती संस्था’ झाली. संस्थेचे अगदी प्रारंभी गुलिस्तान मासिक होते. नंतर पुष्पा व होम ॲड द वर्ल्ड (इंग्रजी) ही मुलांची मासिके निघाली होती. शेवटच्या मासिकाचे आता वार्षिकात रूपांतर झाले आहे.