बालचित्र समिति, भारतातील : (चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी). भारत सरकारने नियुक्त केलेल्या चित्रपट चौकशी समितीच्या शिफारशीवरून बालचित्रसमिती मे १९५५ मध्ये स्थापन करण्यात आली. ह्या समितीने किशोरावस्थेपर्यंतच्या मुलांना रस वाटेल अशा ⇨ बालचित्रपटांच्या निर्मिति-वितरणाची आणि प्रदर्शनांची शिफारस केली होती. या संस्थेचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत : (१) चित्रपटांच्या माध्यामाद्वारे बालकांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास करणे (२) करमणूक-प्रकारांचा आस्वाद घेण्याची मुलांची क्षमता वाढविणे (३) मुलांकरिता खास तयार केलेल्या किंवा त्यांना रस वाटेल अशा चित्रपटांच्या निर्मितीचे, वितरणाचे आणि प्रदर्शनाचे कार्यक्रम हाती घेणे, अशा प्रकारच्या इतर कार्यक्रमांना मदत करणे, प्रोत्साहन देणे किंवा त्यांचे संयोजन करणे व (४) बालमनावर होणाऱ्या चित्रपटांच्या परिणामासंबंधी संशोधन करणे.
बालचित्रसमितीचे निर्मितिकेंद्र मुंबईमध्ये आहे. समितीचा १६ मिमी. चित्रपटांचा एक संग्रह आहे. या फिल्मालयाचे सभासदत्व शाळा, मंडळे किंवा सामाजिक संस्था स्वीकारू शकतात. फिल्मालयाकडून ६० मिनिटांचे कार्यक्रम बिनव्यापारी प्रदर्शनाकरिता मिळण्याची सोय करण्यात येते. ही संस्था नियमितपणे दर रविवारी दिल्ली येथील सप्रू हाउस व निगम रंगशाला येथे आणि मुंबईच्या ताराबाई हॉलमध्ये बालचित्रपट दाखविते. प्रस्तुत संस्था आंतराष्ट्रीय बाल आणि युवा चित्रपटांचे केंद्र या संस्थेची (इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म् स फॉर चिल्ड्रेन ॲड यंग पीपल) देशिक शाखा म्हमून कार्य करते.
संस्थेचा खर्च भारत सरकारकडून मिळणारे अनुदान तसेच दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या उत्पन्नातून, विक्री केलेल्या चित्रपटांतून किंवा विविध राज्यांच्या वर्गणीतून केला जातो.
मुलांकरिता खास चित्रपटांची निर्मिती करणे, ही एक सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी मानली गेली असल्यामुळे समितीचे धोरण ठरविण्यासाठी प्रसिद्ध चित्रपटनिर्माते,वितरण वर्गणी देणाऱ्या राज्यांचे प्रतिनिधी तसेच शिक्षण आणि बालमानसशास्त्र या विषयांतील अधिकारी व्यक्ती यांची एक साधारण समिती आहे.कार्यकारी शाखा संस्थेची वित्तव्यवस्था व व्यवस्थापन पाहते.
प्रथितयश चित्रपटनिर्मात्यांची एक समिती चित्रपटनिर्मितीचा वार्षिक कार्यक्रम तयार करते. काही वेळा उत्कृष्ट ठरलेले बालचित्रपट ही संस्था परदेशांतूनही विकत घेते व ते हिंदीत भाषांतरित करते. प्रत्येक भाषेत चित्रपट काढणे आर्थिक दृष्ट्या कठीण असल्यामुळे संस्था सध्या तरी हिंदीमधूनच चित्रपटनिर्मिती करते. मात्र दक्षिण भारतातील मुलांसाठी ते चित्रपट त्या त्या भाषेत भाषांतरित केले जातात.
या संस्थेने आजपर्यंत शंभरहून अधिक चित्रपट तयार केले असून, सु. ६० चित्रपट इतर भाषांतून रूपांतरित केले आहेत. दहांपेक्षाही अधिक चित्रपटांना देशी किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. संस्था देशात लहान चित्रपटमहोत्सव साजरे करते. डिसेंबर १९७६ मध्ये समितीने पहिला स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय बालचित्रपटमहोत्सव साजरा केला. या महोत्सवात २५ देशांनी भाग घेतला होता. एकवीस बालकांनी न्यायमंडळाचे सभासद म्हणून उत्कृष्ट चित्रपटांची निवड केली. या चित्रपटमहोत्सवाला आता बाल आणि युवक चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने प्रथम दर्जा दिला आहे. दुसरा आंतरराष्ट्रीय बालचित्रपटमहोत्सव मद्रास येथे नोव्हेंबर १९८१ मध्ये झाला. भारताखेरीज पॅरिस, लॉस ॲजेल्स, मॉस्को, सालिनो (इटली) व गेहाड (पूर्व जर्मनी) येथील बालचित्रपटमहोत्सव ‘अ’ दर्जाचे मानले जातात.
शहाणे, नर्मदा
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..