बारेस, ऑगस्त मॉरिस : (१९ ऑगस्ट १८६२–५ डिसेंबर १९२३). फ्रेंच साहित्यिक आणि राजकारणी. जन्म लॉरेनमधील शार्म स्यूर मोझेल येथे. नॅन्सी येथे आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी बारेस पॅरिसला आला(१८८२) तथापि तेथे तो लेखनाकडे वळला. त्याच्या आरंभीच्या लेखनात क्युल्त द म्वा ह्या नावाने त्याने लिहिलेल्या तीन कादंबऱ्या विशेष लक्षणीय आहेत. सखोल आत्मविश्लेषण करण्याची त्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते. ह्या तीन कादंबऱ्या अशा (सर्व इं. शी. ): ‘अंडर द आय ऑफ द बार्बॅरिअन्स’ (१८८८) ‘अ फ्री मॅन’ (१८८९) आणि ‘द गार्डन ऑफ बेरेनिस’ (१८९१).
फ्रान्सचा राष्ट्रवादी वीर म्हणून अमाप लोकप्रियता मिळवलेला महत्वाकांक्षी आणि जर्मनद्वेष्टा फ्रेंच सेनापती झॉर्झ बूलांझे ह्याचा अनुयायी म्हणून बारेसने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. फ्रान्सचे लष्करी सामर्थ्य वाढविणे संसदीय प्रजासत्ताकाला विरोध आणि फ्रान्ससाठी नवे संविधान तयार करणे ही बूलांझेच्या पक्षाची मुख्य उद्दिष्टे होती. १८८९ मध्ये त्याच पक्षाचा उमेदवार म्हणून बारेसने ‘डेप्यूटी’ची (संसदसदस्य) निवडणूक जिंकली. नॅन्सीचा डेप्यूटी म्हणून ते संसदेत (चेंबर ऑफ डेप्यूटीज) बसू लागला. राजकारणात वावरत असताना व्यक्ती ही समूहावर किती अवलंबून असते, ह्याची त्याला जाणीव झाली. ह्या जाणीवेतून विचार केल्यानंतर व्यक्तिविकासाचा एक सिद्धांत तो मांडू लागला : व्यक्तीचा जन्म ज्या प्रदेशांत झालेला असतो, त्या प्रदेशाच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरांनी तिचा पिंड घडवलेला असतो आपल्या पूर्वजांच्या भूमीशी व्यक्तीचे रक्ताचे नाते जुळलेले असते साहजिकच ह्या भूमीचेच कार्य व्यक्ती विशेष कार्यक्षमतेने करू शकते ते करून व्यक्तीने आपला विकास घडवावा. मानवतेची कल्पना अमूर्त असून तीत वंशाच्या व प्रदेशाच्या बंधांना थारा नसल्यामुळे तिला चिकटून राहण्यात अर्थ नाही. बारेसच्या ह्या विचारांचे प्रतिबिंब ‘द अपरूटेड’ (१८९७) ‘द कॉलिंग ऑफ द सोल्जर’ (१९००) आणि ‘देअर फेसीस’(१९०२) ह्या इंग्रजी शीर्षकार्थांच्या कादंबऱ्यांत पडलेले आहे.
फ्रेंच सरकारने १८९४ मध्ये ड्रायफस ह्या निरपराध ज्यू सैन्याधिकाऱ्यावर जर्मनीला गुप्त कागदपत्रे पुरवल्याचा आरोप ठेवून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. ह्या शिक्षेविरुद्ध आवाज उठवून ड्रायफसच्या मुक्ततेची मागणी फ्रान्समध्ये पुरोगामी विचारांच्या व्यक्तींकडून केली गेली. आनातॉल फ्रांससारखे साहित्यिक ड्रायफसच्या बाजूने उभे राहिले तथापि ड्रायफसच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांत बारेस अग्रगण्य होता. त्यामुळे बारेस प्रतिगामी म्हणून ओळखला जाऊ लागला त्याची लोकप्रियताही बरीच ओसरली काही निवडणुकांतही पराभव पतकरावा लागला. १९०६ मध्ये संसदेत तो पुन्हा निवडून आला. ह्याच वर्षी फ्रेंच अकादमीवरही त्याची नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात बारेसने आपल्या लेखांच्या द्वारे देशातील जनतेचे नैतिक धैर्य टिकवून ठेवण्याच्या कार्यास महत्वाचा हातभार लावला.
पॅरिसमध्ये तो निधन पावला. १८९६ ते १९१८ ह्या कालखंडात बारेसने लिहिलेली रोजनिशी त्याच्या मृत्यूनंतर अकरा खंडांत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे(१९२९-३८).
टोणगावकर, विजया.