बार्ट, हाइन्ऱिख : (१६ फेब्रु. १८२१-२५ नोव्हें. १८६५). आफ्रिकेचा प्रवास करणारा जर्मन प्रवासी. जन्म हँबर्ग येथे व शिक्षण बर्लिन शहरी झाले. बार्टचे इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, अरेबिक व आफ्रिकेतील विविध भाषांवर प्रभुत्व होते. त्याने भूमध्य सागरी देशांच्या किनारी भागांचा प्रवास १८४५-४७ दरम्यान केला व त्यांविषयीची माहिती १८४९ मध्ये प्रकाशित केली. नंतर तो प्राध्यापक झाला परंतु तेथील विरोधामुळे त्याने प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला.
यावेळीच १८५० मध्ये ब्रिटिश सरकारच्यावतीने आफ्रिकेतील सूदान विभागाची (सेनेगल, गिनी, माली, नायजर, चॅड, सूदान, गँबिया, अपर व्होल्टा व गिनी बिसाऊ आणि कॅमेरूनचा उत्तर भाग) शास्त्रीय, व्यापारविषयक, ऐतिहासिक, भौगोलिक व सामाजिक माहिती घेण्यासाठीच्या सफरीवर जेम्स रिचर्डसन याची नेमणूक झाली होती. त्याचे साहाय्यक म्हणून ब्रिटिश सरकारने बार्ट व डॉ. आडोल्फ ओव्हरव्हेक यांची नेमणूक केली होती. आफ्रिकेतील सूदानच्या प्रवासासाठी सहारा वाळवंटातून मार्ग काढता येईल या कल्पनेने त्यांनी ट्रिपोली येथून प्रवासास आरंभ केला. सहारा वाळवंट पार करून ते चॅड सरोवरापर्यंत आले. तेथे मार्च १८५१ मध्ये रिचर्डसनचे निधन झाले. नंतर या सफरीचे नेतृत्व बार्टने केले. त्याने चॅड सरोवराच्या आग्नेय व दक्षिण भागांत तसेच नायजरची उपनदी बेन्बेच्या उगमाकडील भागातही प्रवास केला. दरम्यान सप्टेंबर १८५२ मध्ये ओव्हरव्हेक मृत्यू पावला. अशा प्रकारे सहकारी दिवंगत झाले, तरी त्याने प्रवास चालूच ठेवला. तो सूदानच्या मध्य व पश्चिम भागांचा प्रवास करून तिंबक्तू येथे आला. तिंबक्तूच्या पश्चिमेकडील भागातही प्रवास करून तो पुन्हा आलेल्या मार्गेच इंग्लंडला परतला(१८५५).
बार्टने आफ्रिकेतील प्रवासावर आधारित असे ट्रॅव्हल्स ॲड डिस्कव्हरीज इन नॉर्थ सेंट्रल आफ्रिका(१८५७-५८), हे पुस्तक पाच खंडांत प्रकाशित केले. या त्याच्या प्रवासामुळे सूदान विभागाच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक व भाषाविषयक माहितीत भर पडली. या त्याच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याचा गौरव केला.
नंतर बार्ट आशिया मायनर, तुर्कस्तान, स्पेन, इटली, आल्प्स या सफरींबरोबरही गेला होता. बर्लिन विद्यापीठात भूगोलाचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक १८६३ मध्ये झाली. बर्लिन येथे त्याचे निधन झाले.
शाह, र. रू.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..