बारी, हाइन्ऱिख ॲताँद : (२६ जानेवारी १८३१-१९ जानेवारी १८८८).जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींच्या) जीवनवृत्ताचे सखोल व काळजीपूर्वक निरीक्षण आणि शैवले व उच्च दर्जाच्या वनस्पती यांविषयीचे संशोधन हे त्यांचे महत्वाचे कार्य होय. त्यांचा जन्म फ्रँकफुर्ट-आम-मेन येथे झाला. १८४८ साली पदवी मिळविल्यावर त्यांनी वैद्यकाचा अभ्यास करून १८५३ साली वैद्यकाची पदवी संपादन केली व काही काळ वैद्यकीय व्यवसाय केला. १८५४ साली ट्यूर्बिगेन विद्यापीठात ते वनस्पतिशास्त्राचे प्रशिक्षक म्हणून दाखल झाले. नंतर फ्रायबर्ग (१८५५), हाल (१८६७) व स्ट्रॅस् बर्ग (१८७२) येथे त्यांची वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वनस्पतींच्या वर्णनात्मक शारीराविषयीच्या ( शरीररचनाशास्त्राविषयीच्या) माहितीत त्यांनी बरीच भर टाकली असून तत्संबंधीचा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ आजही संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. त्यांनी ⇨कवकांसंबंधी केलेल्या संशोधनामुळे त्यांना आधुनिक कवकविज्ञानाचे संस्थापक मानतात. काही कवकांपासून इतर वनस्पतींना रोग होतात आणि काही कवकांच्या (उदा., गव्हावरील तांबेरा) जीवनचक्रातील भिन्न अवस्था भिन्न व परस्परांशी संबंध नसलेल्या आश्रयी वनस्पतींवर वाढताना आढळतात, हे त्यांनीच सिद्ध केले. तसेच जीवोपजीवी (दुसऱ्या जीवांवर- वनस्पतींवर-जगणाऱ्या) वनस्पती व आश्रयी वनस्पती यांच्यातील क्रियावैज्ञानिक परस्परसंबंधांचाही त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. ⇨शैवले व⇨नेचे यांसंबंधीचे त्यांनी केलेले संशोधन महत्वाचे आहे. त्यांनी अनेक वनस्पतिशास्त्रज्ञांना संशोधनविषयक मार्गदर्शन केले होते. १८७९ साली त्यांनी ‘सिम्बायॉसिस’ म्हणजे ⇨ सहजीवन ही संज्ञा तयार केली होती. ते स्ट्रॅस् बर्ग (आता फ्रान्स) येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.