‘ख्राइस्ट पॅन्टॉक्रटर’ : सिसिली येथील मॉन्रेआलेच्या कॅथीड्रलमधील कुट्टिमचित्रण,१२वे – १३वे शतक.

बायझंटिन कला : (इ.स. सु. ३३॰ ते १४५३). पूर्व रोमन साम्राज्यात विकसित झालेल्या ख्रिस्ती कलेला सामान्यपणे बायझंटिन कला असे म्हटले जाते. कॉन्स्टंटीन या रोमन बादशहाने आपली राजधानी रोमहून बायझंटियमला नेली व त्याच्या नावावरून तिला कॉन्स्टँटिनोपल असे नाव पडले. पश्चिमेकडे इटली व स्पेनचा दक्षिण भाग, पूर्वेकडे सध्याचा तुर्कस्तान, मध्य पूर्वेतला पश्चिम भाग, उत्तरेकडे संपूर्ण ग्रीस आणि दक्षिणेकडे आफ्रिका खंडाचा उत्तरेकडचा पट्टा एवढ्या अफाट पसरलेल्या बायझंटिन साम्राज्यात हे शहर मध्यवर्ती होते. प्रबोधन काळापर्यंत म्हणजे तुर्कांनी १४५३ मध्ये शहर जिंकेपर्यंत ते ख्रिस्ती धर्माच्या सांस्कृतिक व कलात्मक चळवळींचे मुख्य केंद्र होते.

वास्तुकला : कॉन्स्टंटीनसह रोमनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला व आपल्या कला-संस्कृतीचा वारसा ख्रिस्ती प्रवाहात विलीन केला. रोमन बॅसिलिकांचा न्यायदानासाठी व सार्वजनिक कामासाठी सभागृहासारखा उपयोग होई. आयताकृती बॅसिलिकांच्या रुंदीच्या एका बाजूला दंडगोलासारखा अंतर्वक्र भाग समाविष्ट केलेला असे, त्याला ‘ॲप्स’ अशी संज्ञा होती. दर्शनी भागापासून ॲप्सपर्यंत दोन्ही बाजूंनी उंच खांब व त्यावर छप्पर असलेले मध्यवर्ती सभागृह (नेव्ह) असे. रोमनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर दर आठवडयाला सामुदायिक प्रार्थनेसाठी फार मोठा जनसमुदाय एकत्र येऊ लागला. त्यासाठी तशाच प्रकारच्या भव्य वास्तूंची निर्मिती केली गेली. बॅसिलिकातील ॲप्सच्या मंचावर ⇨चर्चमध्ये वेदी स्थानापन्न झाली. वर्तुळाकार कमानी, घुमट, क्रॉस आणि कुट्टिमचित्रण ही बायझंटिन चर्च-वास्तुकलेची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. ‘हाज सोफिया’ किंवा ‘सांता सोफिया’ (५३२ – ५३७) ही चर्चवास्तू बायझंटिन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. सम्राट जस्टिनिअनच्या आश्रयाखाली ती उभारली गेली व तिचा वास्तुकल्प ट्रॅलेझचा अँथीमिअस व मायलीटसचा इझिडोरस यांनी केला. डेरेदार घुमट, त्याला जोडलेले अर्धघुमट, स्तंभ, कमानी, संगमरवरी जाळी, कुट्टिमचित्रणाची झळाळी, वास्तूत खेळणारा प्रकाश व अतिभव्यपणा हे या वास्तूचे खास विशेष होत. या चर्चची रचना चौरसाकार असून मध्यभागी घुमट, पुढच्या व मागच्या बाजूंना दोन अर्धघुमट, त्याच्या बाजूने आणखी अर्धघुमट होते. घुमटाच्या पायथ्याशी कमानदार खिडक्या असून त्यातून आत प्रकाश खेळवलेला असे. पुढे तुर्कांच्या आक्रमणानंतर (१९५३) तिचे मशिदीत रूपांतर झाले व आता त्या ठिकाणी बायझंटिन कलेचे संग्रहालय झाले आहे.भित्तिचित्रे : रोमनांच्या बॅसिलिकांध्ये व प्रारंभीच्या ख्रिस्ती काळातील भूमिगत थडग्यांमध्ये भित्तिचित्रे रंगवलेली असत. रोमन बॅसिलिकांच्या धर्तीवर चर्चमध्येही भित्तिचित्रे रंगवली गेली. नंतरच्या काळात त्यांची जागा कुट्टिमचित्रांनी घेतली. तरी पण काही वास्तूंमध्ये उल्लेखनीय भित्तिचित्रे आहेत. उत्तर इटलीमधील कास्तेलसेप्रियो येथील स्ता मारिया चॅपेलमधील द जर्नी टू बेथलीएम (१॰ वे शतक) व नेरेझी, मेसेडोनिया येथील द डीपोझिशन (सु. ११६४) ही दोन भित्तिचित्रे भावनाविष्काराच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत.कुट्टिमचित्रण : चर्चमधील गूढ गंभीर अवकाश या कुट्टिमचित्रांनी अर्थपूर्ण केले. या कुट्टिमचित्रण-तंत्राच्या साहाय्याने बायबलमधील कथाप्रसंगांचे चित्रण करण्यात आले. चर्चच्या भिंतींवर, कमानींवर व घुमटांच्या अंतर्भागात सर्वत्र कुट्टिमचित्रे आढळतात. सहाव्या शतकातील राव्हेना येथील ‘सान व्हायतल’ चर्चमधील एम्प्रेस थिओडोरा अँड अटेंडंट्स (सु. ५४७ पहा : मराठी विश्वकोश : ४, चित्रपत्र ९), द एम्परर जस्टिनिअन अँड हिज स्वीट (५४६ – ५४८) माउंट सिनाईच्या सेंट कॅथरिनच्या मठातील ‘चर्च ऑफ द व्हर्जिन’’ मधील द ट्रान्सफिगरेशन (सु ५४॰) तसेच रोममधील ‘सांता पुदेन्झियाना’ या चर्चच्या ॲप्स भागातील येशू ख्रिस्त व त्याचे धर्मदूत (अपॉसल्स) यांचे कुट्टिमचित्रण (चौथे शतक) इ. प्रसिद्ध आहेत.हस्तलिखितांची सजावट : चित्रांनी सजवलेले धार्मिक ग्रंथ व पोथ्या हा बायझंटिन कलेचा आणखी एक विशेष होय. अक्षराकार अलंकारित करून अधूनमधून बायबलमधील प्रसंग लघुचित्रांतून आविष्कृत केले आहेत. पाचव्या व सहाव्या शतकातील द व्हिएन्ना जेनिसिस, द रोझ्झानो गॉस्पेल्स आणि सिनोप गॉस्पेल्स ही विशेष महत्त्वाची हस्तलिखिते होत.

हस्तीदंती कोरीव काम : राजांची सिंहासने किंवा धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या हस्तिदंती वस्तूंवर-उदा., पोथीसाठी लागणाऱ्या पेटया वगैरे –कोरीव काम करून त्या आकर्षक केल्या जात. हस्तिदंतासारख्या कठीण माध्यमातून मानवाकृती अतिशय कौशल्याने कोरलेल्या आढळतात. अलंकरणासाठी प्राणी, पशुपक्षी तसेच पानेफुले यांचा उपयोग अतिशय सुंदर केला आहे. द थ्रोन ऑफ मॅक्सिमिअन (सु.५५॰) हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण होय. सु. सहाव्या शतकातील ब्रिटिश म्यूझीयममध्ये असलेला आर्कएंजेलोचा शिल्पपट्ट हेही एक महत्त्वाचे उदाहरण आहे.ख्रिस्ती धर्म हा संघटित धर्म होता. ख्रिस्ताचा छळ रोमनांनी केला. पण ख्रिस्ताच्या शरीराला वेदना झाल्या, तरी त्याच्यातील परमेश्वरी चैतन्याने त्या वेदनेवर मात केली होती. ख्रिस्ताला ज्या क्रुसावर चढवले होते, त्या क्रुसाबरोबर ही वेदनाही ख्रिस्ती धर्मात अमर केली गेली. परस्परांना छेदणाऱ्या उभ्या व आडव्या अशा दोन रेषात्मक प्रेरणांनी बनलेला ⇨क्रॉस   हा जीवनातील सुखदु:खाच्या विरोधाभासाचे प्रतीक बनला. ख्रिस्ती धर्मात समाविष्ट झालेल्या धातुरसविद्येच्या (आल्केमी) पंथात क्रुसासारख्या दिसणाऱ्या मंडलाकृतीच्या चार टोकांवर विश्वातील अग्नी, वायू, जल व पृथ्वी ही तत्त्वे प्रस्थापित केली गेली होती. धातूचे शुद्धीकरण करताना आत्म्याचे शुद्धीकरण होते, असा तेजोमय आत्मा परमेश्वराच्या जवळ जातो, प्रकाशतत्त्वात ईश्वरी अंश आहे, अशी या रसविद्या पंथाची श्रद्धा होती. ‘जीवनातील सुखदु:ख, सौंदर्य-कुरूपता, शरीर-आत्मा ही द्वंद्वे परमेश्वराने निर्माण केलेलया विश्वातच आहेत, म्हणून ती जीवनात आवश्यक आहेत’, अशी भूमिका कॉन्स्टंटीनच्या काळातच सेंट ऑगस्टीनने घेतली होती. हे विरोधी तत्त्व ग्रेको-रोमन काळात सौंदर्याकृतीच्या बाबतीतही स्वीकारले गेले. रसविद्येमध्येही हा विरोधाभास अभिप्रेत होता. या सर्वांचा परिणाम ख्रिस्ती कलेवर आणि तत्कालीन सौंदर्यकल्पनांवर झाला. विरुद्ध ध्रृवीय तत्त्वातून आविष्कृत झालेली रसविद्येमधील मंडलाकृती बायझंटिन चर्चच्या रचनेत प्रभावी ठरलेली दिसते. सान व्हायतल व ‘मार्टरिअन ऑफ सेंट बाबीलॉस’ या दोन चर्चवास्तू ही याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. चर्चच्या घुमटातील व मध्यदालनातील खिडक्यांतून प्रकाश आतल्या अवकाशात खेळवला गेला, त्यात ईश्वरी तत्त्वाची पाखर अभिप्रेत होती. पुढील रोमनेस्क व गॉथिक काळात या खिडक्यांमध्ये ⇨चित्रकाचतंत्र वापरून आतील प्रकाश विलोभनीय केला गेला. कुट्टिमचित्रणतंत्राच्या वापरामुळे फुटलेल्या रेषा व फाटलेले रंगाकार यांचा भावप्रत्यय अनायासे घडवला गेला. त्यामुळे कुट्टिमचित्रे कलादृष्टया महत्त्वाची ठरतात.


इस्लाम धर्माच्या उदयाबरोबर मूर्तिविरोधाची लाटच आली. सेंट ऑगस्टीननेही ख्रिस्ताचे चित्रण करण्याला विरोध केला होता. आठव्या शतकातील आयसॉरीयन राजा तिसरा लीओ याने राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील ख्रिस्ताच्या मूर्तीचा विध्वंस केला व तिथे क्रुसाची स्थापना केली. या क्रुसाखाली कोरलेल्या लेखात म्हटले आहे, की ‘ख्रिस्ताची ही प्रतिमा बोलू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही, म्हणून राजाला ती सहन झाली नाही व त्याने त्या ठिकाणी क्रूस हे ख्रिस्ताचे प्रतीक स्थापन केले.’ परमेश्वराने निसर्ग निर्माण केला, मानवाने नगरे बसविली, हा विचार या काळात प्रभावी ठरत होता. त्यामुळे मानवाने निर्मिलेल्या मानवाकृतिप्रधान चित्रकलेला प्रखर विरोध होऊ लागला व त्याऐवजी प्रतीकात्मक चित्रणाची प्रवृत्ती वाढीस लागली. ग्रेको-रोमन संस्कृती, कला आणि तत्तवज्ञान हे पाखंडी समजून दडपून टाकण्याची लाट आली. यात ग्रीक-रोमन शिल्पांचा विध्वंस झाला. ख्रिस्ताच्या जन्मापासून हजार वर्षांनी विश्वाचा अंत होणार, या अंधश्रद्धेपोटी दहाव्या शतकात नवी कलानिर्मिती व वास्तुनिर्मितीही बंद झाली. अलंकरणावर भर असल्याने धार्मिक विधीमध्ये वापरावयाच्या वस्तू, पोथ्या व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तू यांवरील अलंकरण मात्र वैपुल्याने निर्माण झाले. म्हणून बायझंटिन कलेत कारागिरी अधिक वेधक ठरली. तथापि जगबुडीचा सिद्धांत खोटा ठरल्याने पुढील काळात धर्माचा, जीवनाचा व कलेचा विचार नव्याने करणे आवश्यक ठरले. त्यातून रोमनेस्क व प्रबोधन काळाची पायाभरणी झाली. लघुचित्रे व भित्तिचित्रे यांच्या परंपरेतून जॉत्तो, बोत्तिचेल्ली यांसारख्या चित्रकारांनी आपल्या नवनवीन वाटा शोधून काढल्या. चर्चवरचे घुमट मागे पडून पिरॅमिडसारख्या छपरांच्या सुळक्यांनी त्यांची जागा घेतली. चौरसासारखी असलेली चौथऱ्याची धाटणी मागे पडून पुढच्या काळात ती अधिक क्रुसासारखी झाली.

पहा : आयकॉन कुट्टिमचित्रण प्रतिमाविद्या रोमन कला रोमनेस्क वास्तुकला.

संदर्भ : (1) Grabar, Andre Trans. Gilbert, Stuart &amp Emmons, James, Byzantium:From the Death of Theodosius to the Rise of Islam, London 1966.

            (2) Lasuus, Jean, The Early Christian and Byzantine World, London, 1966.

            (3) Micheles, Panayotis, A. An Aesthetic Approach to Byzantine Art, London, 1955.

            (4) Rice, David Talbot, Art of the Byzantine Era, London, 1963.

जोशी, ज्योत्स्ना.

द लेक्शनरी ऑफ द गॉस्पेल्स’, हस्तलिखित-सजावट, ११वे शतक

‘द थ्रो न ऑफ मॅक्सिमिअन’, हस्तिदंती कोरीव काम, सु. ५५०.

अँटिऑक येथील पुष्पपात्र

दुसऱ्या जस्टिनचा चांदीचा क्रॉस, व्हॅटकिन सिटी

उशीवरील कलाकाम, ७वे शतक, व्हॅटिकन सिटी

हस्तिदंती मंजूषा, १०वे शतक, व्हेरॉली, इटली

मयूर स्तंभशीर्ष, संगमरवर, ६वे शतक

 

द एम्परर जस्टिनिअन अँड हिज स्वीट’ कुट्टिमचित्रण, सान व्हायतल चर्च, ५४६-५४८

मेरी माता व बाल येशू यांते शिल्पांकन केलेले सुवर्णपदक, कॉन्स्टँटिनोपल.

अथेन्सच्या वास्तूचा दर्शनी भाग