बापट, विष्णु वामन : (२२ मे १८७१ – २॰ डिसेंबर १९३३). महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती. कोकणातील धालवल (तालुका राजापूर जि.रत्नागिरी) हे त्यांचे जन्मग्राम. शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे इंग्रजी पाचवीपर्यंत. त्यानंतर तारमास्तराच्या कामाचे ज्ञान मिळविले निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांतून नोकऱ्या केल्या. त्या करीत असतानाच संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे संस्कृत शिकले व वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सु. अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधकाची नोकरी केली. 1903 ते 1912 ह्या काळात सिंध हैदराबाद येथील संस्कृत पाठशाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९१२ साली पुण्यास येऊन ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (मासिक), आचार्य (पाक्षिक) आणि आचार्यकुल (मासिक) ह्यांसारखी नियतकालिके चालविली. प्राचीन आचार्यांच्या ग्रंथविवरणाच्या द्वारा सनातन वैदिक धर्माचे सोपपत्तिक समर्थन करणे त्याचे ज्ञान बहुजनसमाजास विवेचक पद्धतीने करून देणे आणि श्रुत्युक्त धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृत विद्या ह्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी तात्त्विक धर्मविचार व भाषांतरासह शास्त्रीय प्रकरणग्रंथ प्रसिद्ध करणे अशी उपर्युक्त तीन नियतकालिकांची अनुक्रमे उद्दिष्टे होती. ग्रंथप्रकाशनाच्या कामी, वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी ह्यांचे बापटांना मोलाचे साहाय्य झाले. संस्कृतातील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य बापटांनी मराठीत आणले, ही त्यांची फार मोठी कामगिरी होय. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र ह्या प्रस्थानत्रयीचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडविला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले. रामानुज, पूर्णप्रज्ञ, माहेश्वर, जैमिनी-पाणीनी ह्या दर्शनांवर त्यांनी समतभेद लिहिले तर जैन, बौद्ध, चार्वाक ह्या दर्शनांचा परिचय घडविताना त्यांचे खंडनही केले. ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थही त्यांनी तीन भागांत सांगितला. मूळ सूत्र, सूत्रार्थ, शांकरभाष्य, अवतरणे, स्पष्टीकरण आणि भामत्यादी टीकाकारांचा अधिक आशय व्यक्त करणाऱ्या टीपा ह्यांसह हा भाष्यार्थ त्यांनी दिला आहे. शंकराचार्यकृत आत्मबोध आणि अपरोक्षानुभूती ह्या ग्रंथांचे त्यांनी केलेले अनुवादही (१९॰२ १९॰३) उल्लेखनीय आहेत. त्यांनी मराठीत अनुवादिलेल्या ग्रंथात सोमदेवाच्या कथासरित्सागराचाही समावेश होतो (भाग १ ते ४ १९११-१९१२). धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. ह्या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर ह्यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३). बापट हे निष्ठावंत शांकरमतानुयायी असल्यामुळे टिळकांच्या गीतारहस्यातील कर्मयोगवादी भूमिकेला त्यांनी विरोध केला. बापटांनी १९२५ मध्ये ‘आचार्यकुल’ ह्या नावाची एक अध्यापनसंस्थाही स्थापिली होती. हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. पुणे येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ.र.