बाजिन : (२५ नोव्हेंबर १९॰४ – ). विख्यात अराज्यवादी चिनी कादंबरीकार. खरे नाव फॅइ-गान बाकून्यिन व क्रपॉटक्यिन ह्या रशियन अराज्यवाद्यांच्या नावातील ‘बा’ आणि ‘क्यिन्’ ह्या अक्षरांचे चिनी उच्चार एकत्र आणून त्याने ‘बा जिन’ हे आपले टोपणनाव तयार केले. सेच्वान प्रांतातील चंगडू ह्या शहरी एका श्रीमंत, जमीनदार कुटुंबात बा जिनचा जन्म झाला. आरंभीचे काही शिक्षण ग्वान्-युआन् (बा जिनचे वडील येथे न्यायाधिश होते). आणि चंगडू येथे घेतल्यानंतर नानकिंग विद्यापीठात त्याने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले (१९२५). बा जिन सु. ५॰ माणसांच्या एकत्र कुटुंबात वाढलेला. सरंजामशाही शैलीने चालणारा कौटुंबिक कारभार, कुटुंबातील अंतर्गत मतभेद आणि संघर्ष घरातील नोकरचाकरांना मिळणारी अन्याय्य वागणूक बा जिनने अनुभवली होती ह्या अनुभवांमुळे किशोरवयातच तो अराज्यवादी विचारांकडे वळला होता. तसेच आईवडील, बहीण अशा निकटच्या नातेवाईकांचे मृत्यूही त्याने लहानपणी पाहिले होते. त्यामुळे मृत्यू आणि मानवी जीवनातील दु:ख यातना ह्यांचे खोल संस्कार त्याच्या हळव्या, संवेदनाशील मनावर झाले होते. १९२७ मध्ये तो फ्रान्समध्ये शिक्षणासाठी आला. तेथे फ्रेंच भाषेचे त्याने अध्ययन केले व म्ये वांग् (१९२९, इं.शी. ड्रिस्ट्रक्शन) ही आपली पहिली कादंबरी पूर्ण केली. १९२९मध्ये बा जिन चीनला परतला, तेव्हा श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झालेली होती. सर्वसामान्य कष्टकरी जनतेबद्द अपार कळवळा बाळगणाऱ्या ह्या कादंबरीच्या नायकावर बा जिनच्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणीय छाया दिसून येते. म्ये वांग् नंतर आय् च्यींग् उ सान्-वु-त्च्यू [इं.शी.लव्ह, अ ट्रिलजी ३ खंड वू (इं.शी.फॉग), यू (इं.शी. रेन) आणि द्यन् (इं.शी लाइटनिंग) आणि ‘लाइटनिंग’ च्या आधी लै (इं.शी. थंडर) हा उपोद्घात (१९३१ – ३४)], ज्ये ल्यव् [इं.शी द टोरंट, अ ट्रिलजी ३ खंड ज्या (इं.शी द फॅमिली), च्यव् (इं.शी. ऑटम्), छ् वुन् (इं.शी. स्प्रिंग) १९३३-४॰], डि-स्य बिंग्-शृ ( इं. शी.वार्ड नं. फोर) आणि हान् ये ( इं. शी. कोल्ड नाइट्स) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या आय् च्यींग् … (लव्ह …) ह्या शीर्षकाने सुचविल्याप्रमाणे प्रेम हाच त्या कादंबरीचा मुख्य विषय होय. मानवी जीवनाचे उद्दिष्ट, क्रांती, राजकीय निष्ठा, मैत्री अशा विविध विषयांवरील बा जिनचे चिंतनही ह्या कादंबरीतून व्यक्त झालेले आहे. ज्ये ल्यव् (टोरंट…) ही कादंबरी लिहिताना बा जिनच्या डोळ्यांसमोर चंगडू येथील त्याचे कौटुंबिक अनुभव होते. १९३१मध्ये त्याच्या वडील भावाने आत्महत्त्या केली होती. एकत्र कुटुंबव्यवस्थेमुळे सोसाव्या लागणाऱ्या व्यथावेदनांचा तो बळी ठरला होता. ज्ये ल्यव् मधील कादंबरीत्रयीतून चंगडू येथील एका कुटुंबाची कहाणी बा जिनने मांडलेली असून तीत पारंपरिक आचारविचारांविरुद्ध आव्हानपूर्वक लढणाऱ्या तरुणतरुणींची जीवने रंगविली आहेत. कादंबरीकार म्हणून बा जिनचे सामर्थ्य ह्या कादंबरीत्रयीतून विशेषत्वाने प्रत्ययास येते. डि-स्य-विंग्-शृमध्ये एका रुग्णालयात माजलेली भयंकर दुरवस्था आणि ती नाहीशी करण्याचा असफल प्रयत्न करणारी ध्येयवादी डॉक्टरीण त्याने दाखविली आहे. हान् ये ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी. एका जोडप्याच्या आयुष्याची दारुण शोकात्मिका तीत त्याने प्रभावीपणे उभी केली आहे. बा जिनच्या अन्य कादंबऱ्या अशा : स्स त्स्यू ड् थाय्-यांग (१९३॰, इं.शी. द सन व्हिच हॅज सेट), छवुन् थ्यन् ड् च्यव् थ्यन् (१९३२, इं.शी द ऑटम कम्स इन स्प्रिंग) हाय् डी मंग् (१९३२,इं.शी द ड्रीम ऑन द सी), स्यिन षंग् (१९३३, इं.शी. न्यू लाइफ), व्हो (3 खंड १९४१, १९४२, १९४५ इं.शी. फायर) आणि च्यी युआन (१९४४, इं.शी द गार्डन ऑफ रेस्ट). बाजिनने उत्कृष्ट कथालेखनही केले आहे.‘ग्लोरी’ (१९३१, इं.शी), ‘इलेक्ट्रिक चेअर’ (१९३२, इं.शी.) स्पाव् रन् स्याव् शृ (१९४७, इं.शी. लिट्ल मेन लिट्ल थिंग्ज)आणि ‘स्टोरीज ऑफ हिरोज’ (१९५३, इं.शी.) हे त्याचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. ह्यांखेरीज प्रवासवर्णने, निंबंध असे लेखनही त्याने केलेले आहे. इंग्रजी, जर्मन, इटालियन, पोलिश आणि रशियन भाषांत त्याच्या विविध साहित्यकृतींचे अनुवाद झालेले आहेत. बाजिनचे साहित्य आजही चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. शासकीय प्रकाशसंस्थांनी त्याचे अनेक ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. चीनमधील विविध वाङ्मयीन संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्याने काम केलेले आहे. साम्यवादी पक्षाचा तो अजूनही सदस्य नाही.

संदर्भ : 1. Hsia, C.T.A. History of Modern Chinese Fiction : 1917-1957, New Haven, London, 1961.    

            2. Lang, Olga, Pa Chin and His Writing, Cambridge, Mass, 1967.

कुलकर्णी, अ.र.