बाजार : सामान्य अर्थाने वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण. ‘बाजार’ हा शब्द पर्शियन भाषेतील मूळ संस्कृत शब्द ‘हट्ट’, यावरून ‘हाट’म्हणजे बाजार असा मराठी भाषेत हा शब्द आला. ‘बाजारहाट’ असाही शब्द ‘बाजार’ या अर्थी रूढ आहे. मात्र बाजार, हाट व गंज यांमध्ये थोडीशी अर्थभिन्नता आहे. ‘बाजार’ म्हणजे रोज किंवा आठवडयाने किंवा नियमित दिवशी भरणारा. ‘हाट’ फक्त नियमित वेळीच भरणारा बाजार आणि ‘गंज’ म्हणजे बाजारपेठ. बाजारांचे वर्गीकरण (अ) विक्रीस ठेवलेल्या वस्तूंच्या अनुरोधाने व (ब) कालमानानुसार करण्यात येते. धान्यबाजार, भाजीबाजार, गुरांचा बाजार इ. पहिल्या प्रकारांत तर दैनिक, साप्ताहिक बाजार हे दुसऱ्या प्रकारात मोडतात.

बाजारांच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने पैशाचा वापर होण्याआधीचे व पैशाचा विनिमय –माध्यम म्हणून सर्रास वापर होऊ लागल्यानंतरचे बाजार, असे दोन टप्पे पडतात. दहाव्या-अकराव्या शतकांत यूरोपातील सरंजामशाहीमधील बाजार प्रामुख्याने किल्ल्यांच्या तटांखाली किंवा प्रार्थना-मंदिरांच्या आवारांत भरत असत. सरंजामशाही उत्पादनपद्धती ही स्वयंपूर्णतेच्या तत्त्वावर आधारलेली व मर्यादित उत्पादन करणारी असल्याने बाजारही दैनंदिन गरजेच्या वस्तुपुरता मर्यादित असे. अल्प उत्पादन करणारा कारागीर आपल्या वस्तू या बाजारात आणत असे. कालांतराने पूर्वीच्या साध्या बाजाराचे स्थान व्यापारी जत्रांनी घेतले. अशा जत्रा फ्रान्समधील शँपेन प्रांतात भरत असत. मध्ययुगाच्या प्रारंभकाळातील आठवड्याचा बाजार व बाराव्या ते पंधराव्या शतकांत विकसित झालेल्या व्यापारी जत्रा यांमधील एक फरक असा की, पूर्वीच्या बाजारांमध्ये स्थानिक वस्तूची, विशेषत: शेतमालाची, विक्री होई तर जत्रांमध्ये विविध प्रकारचा माल त्यावेळी ज्ञात असलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असे. ह्या व्यापारी जत्रांना स्थानिक सत्ताधीशांचे संरक्षण लाभत असे. वाईट रस्ते व चोरांचे भय यांमुळे असे संरक्षण आवश्यक होते. व्यापारी जत्रांची स्वतंत्र पोलीस यंत्रणा व न्यायालये असत. जत्रांमध्ये प्रत्येक वस्तूच्या विक्रीचे दिवस ठरलेले असत. जत्रेच्या अखेरच्या दिवशी चलनाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार होत असत.

भारतात सोळाव्या शतकातील विजयानगरच्या साम्राज्यातील संपन्न बाजारांचे वर्णन दूमिंग पाइश व फर्नाउन नूनिश या पोर्तुगीज प्रवाशांनी केलेले आहे. बिहारमधील सोनपूर येथे नोव्हेंबर महिन्यातील गंगास्नान पर्वकाळी जगातील सर्वांत मोठा गुरांचा बाजार भरतो तेथे बैलांपासून हत्तींपर्यंत अनेक प्राणी विक्रीस ठेवलेले असतात. धार्मिक उत्सवांच्या व जत्रांच्या निमित्ताने भरणारे बाजार सर्वत्र आढळतात. मुंबईचा घाऊक कापडबाजार ‘मुळजी जेठा मार्केट’ या नावाने प्रसिद्ध आहे.

उत्तर भारतातील शेतमालाच्या बाजाराला ‘मंडी’ म्हणतात. हापूर (उ. प्रदेश) येथील गव्हाची मंडी विख्यात आहे. शेतमालाच्या बाजारातील विक्री अंडत्यांमार्फत केली जाते.हे अडत्ये शेतकऱ्याना ‘हात-उसन्या’ किंवा आगाऊ रकमा देऊन, त्यांचा माल गुंतवितात. बाजारातील सर्व अडत्ये व व्यापारी यांच्या समक्ष मालाचा लिलाव केला जातो. उत्पादकाला मिळणाऱ्या रकमेतून अडत (कमिशन), धर्मादाय, पांजरपोळ, नगरपालिकेचे कर, क्वचित गुदामांचे भाडे वजा करून उर्वरित रक्कम उत्पादकाला दिली जाते. अशा बाजारांतील गैरप्रकार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने नियंत्रित बाजारपेठा स्थापन केल्या आहेत. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून शेतमालाच्या निरनिराळ्या बाजारपेठांतील आवक व किंमतींची माहिती दरररोज प्रसारित केली जाते.वस्तूंप्रमाणेच मजुरांचाही बाजार अनेक लहान शहरांतून व खेड्यांतून पहावयास मिळतो. आपापली कामाची हत्यारे घेऊन विशिष्ट ठिकाणी रोजंदारी मिळविण्याच्या उद्देशाने जमलेले कारागिरांचे व मजुरांचे थवे अनेक शहरांतूनही पहावयास मिळतात. महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रत्येक गाडीतळाच्या सान्निध्यातील छोटासा बाजार हा वाहतुकीच्या स्वरूपामुळे निर्माण झालेल्या बाजाराचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार समजला जातो.महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी स्थानिक आठवडयाचे बाजार भरत असतात. अशा बाजारांचे महत्त्व खेड्यांच्या आर्थिक-सामाजिक जीवनात मोठे असते. रोजंदारीवरील मजुरांना त्यांचे वेतन आठवडयाचा बाजार-दिवस लक्षात घेऊन देण्याचा प्रघात आहे. बाजाराच्या दिवशी पंचक्रोशीतील निरनिराळ्या गावांचे लोक एकत्र येत असल्याने सामाजिक स्वरूपाच्या देवघेवींचे अनेक व्यवहार पार पडतात.

आठवड्याच्या बाजारात पंचक्रोशीच्या आर्थिक जीवनाचे, तेथील उत्पादन प्रकारांचे व आर्थिक उलाढालींचे प्रतिबिंब उमटलेले असते. ग्रामीण विभागात लोकोपयोगी सेवा, उदा., दवाखाने, शेतीला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने इ. बाजाराच्या ठिकाणी निर्माण केल्यास या सेवांचा लाभ ग्रामीण लोकांना अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. बाजारांची व्यवस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाहिली जाते.

हातेकर, र. दे.