बाजरी : (हिं.गु. बाजरा क. सज्जे, सजुगरे इं. पर्ल मिलेट, बुलरश मिलेट लॅ. पेनिसेटम स्पायसेटम, पे टायफॉइडस कुल-ग्रॅमिनी). या गवताचे मूलस्थान मध्य आफ्रिका असून तेथील उष्ण प्रदेश, अरबस्तान व भारत या प्रदेशांत या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड हाते. अलीकडे हे पीक अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत आणि जगाच्या इतर भागांत धान्य अथवा चाऱ्याचे पीक म्हणून लागवडीत आहे. भरीव खोड सु. १.५ – २ मी. उंच वाढते व त्यावर अनेक फांद्या व साधारणत: ॰.५ मी. लांब व अरुंद पाने असतात मध्यशीर जाड व आवरक (वेढणाऱ्या) पर्णतलावर केस असतात. खोडाला तळाशी फुटवे येतात. फुलोरा लांबट, दंडगोलाकार, रोमश (केसाळ), कणिश (६–३५ x ५–४.२५सेंमी.) [⟶पुष्पबंध]. असून कणिशकातील प्रत्येक फुलाच्या जोडीतील खालची फुले नर व वरची फुले द्विलिंगी असतात. पूर्ण पक्व कणिशकाला ताठर केसांचे छदमंडल असते [⟶फूल]. फळे (कृत्स्न) पिवळट करडी अथवा फिकट निळसर व बारीक असतात.
ठोंबरे, म. बा.
भारतातील क्षेत्र व उत्पादन : भारतातील हे एक महत्त्वाचे बारीक तृणधान्याचे पीक आहे. क्षेत्र आणि उत्पादन यांच्या दृष्टीने भात, गहू व ज्वारी यांच्यानंतर या पिकाचा क्रमांक लागतो. १९७५-७६ साली या पिकाखाली देशात १ कोटी १५.८३लक्ष हेक्टर क्षेत्र होते आणि ५७.२६लक्ष टन उत्पादन झाले. राजस्थानात सर्वांत जास्त क्षेत्र (सु ३२%) होते. गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा व उत्तर प्रदेश ही क्षेत्रबाबतीत इतर महत्त्वाची राज्ये असून आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू व पंजाब या राज्यात १ ते ५% क्षेत्र होते. पुढील राज्यांत ५% पेक्षा जास्त उत्पादन झाले : गुजरात २४%, राजस्थान २॰%, उत्तर प्रदेश१२%, हरियाणा १॰.५%, महाराष्ट्र १॰%, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी ६%, कर्नाटकमध्ये ते ५% पेक्षा थोडे कमी होते. देशातील एकूण बाजरीच्या क्षेत्रापैकी फक्त सु.३% क्षेत्र बागायतीखाली आहे.
महाराष्ट्रात १९७५-७६ साली बाजरीचे १८.१ लक्ष हेक्टर क्षेत्र होते व ५.६लक्ष टन उत्पादन झाले. नासिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बीड, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर हे बाजरी पिकविणारे प्रमुख जिल्हे आहेत. नासिक जिल्ह्यात सर्वांत जास्त क्षेत्र (१९%) आणि उत्पादन (२५%) झाले आहे. बाकीच्या जिल्ह्यांपैकी परभणी, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत २% अथवा त्याहूनही कमी क्षेत्र होते. बाजरीचे पीक बहुतांशी पावसावर अवलंबून असल्यामुळे वार्षिक उत्पादनात बराच चढउतार दिसून येतो. १९६६-६७पासून १९७५-७६ या दहा वर्षांच्या काळातील महाराष्ट्रातील बाजरीचे क्षेत्र व उत्पादन पुढील कोष्टकात दिले आहे, त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.
हवामान : बाजरीच्या पिकाला मध्यम कोरडी हवा आणि कमी पाऊस लागतो. पिकाच्या वाढीच्या काळात २८°-३२° से. पेक्षा जास्त तापमान असल्यास पीक लवकर फुलावर येते व कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी असते. मात्र बाजरी तयार होण्याच्या सुमारास हवामान थोडेफार उष्ण असावे लागते. लागवडीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत वार्षिक पर्जन्यमान १८ ते १॰॰ सेंमी असते. हे पीक अवर्षणातही येत असल्यामुळे १५ सेंमी. पासून ५॰ सेंमी. पर्जन्यमानापर्यंतच्या प्रदेशात विशेषेकरून घेतात. पावसाचे प्रमाण १५ सेंमी इतके कमी असल्यास व तो चांगल्या तऱ्हेने विभागून पडल्यास चांगले पीक येऊ शकते. बी उगवण्याच्या वेळी, झाडे फुलावर असते वेळी आणि कापणीच्या वेळी जोराचा पाऊस नुकसानकारक असतो. तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक व हरियणामध्ये उन्हाळ्यात बाजरीचे बागायती पीक घेतात.
जमीन : राजस्थानात वाळूमिश्रित जमिनीत पाण्याचा योग्य पुरवठा असल्यास चांगले पीक येते. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये हे पीक भारी काळ्या जमिनीत, गुजरातमध्ये गाळाच्या जमिनीत व दक्षिणेकडील पठारी भागात ते मध्यम काळ्या अथवा हलक्या जमिनीत घेतात. मात्र जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी कारण ६ ते ८ तासांपेक्षा जास्त काळ पाणी साचून राहिल्यास ते पिकाला हानिकारक असते. जमिनीचे pH मूल्य [⟶पीचएच मूल्य] ६.५ ते ७.५ असावे. ज्वारीचे पीक चांगले येत नाही अशा भागांत हलक्या जमिनीत कमी पावसात हे पीक घेता येते.
महाराष्ट्रातील बाजरीचे क्षेत्र आणि उत्पादन१९६६-६७ ते १९७५-७६
|
वर्ष
|
क्षेत्र (हजार हेक्टर) |
उत्पादन (हजार टन)
|
१९६६-६७ |
२,०१८ |
४६६ |
१९६७-६८
|
२,०२६ |
५३४ |
१९६८-६९ |
२,०३४ |
६३९ |
१९६९-७०
|
२,१२३ |
७१४ |
१९७०-७१ |
१,९४६
|
७८२ |
१९७१-७२ |
१,३१२
|
२६३ |
१९७२-७३ |
१,४२९
|
२२६ |
१९७३-७४ |
२,२३४
|
८५६ |
१९७४-७ ५ |
१,८८५
|
५८१ |
१९७५-७६ |
१,८०८
|
५६० |
प्रकार : १९६५ पर्यंत भारतात बाजरीच्या स्थानिक प्रकारांचीच लागवड होत असे. त्यांचे हेक्टरी उत्पन्न 3 क्विंटलच्या आसपास असे. १९६५ मध्ये बाजरीचा पहिला संकरित, अधिक उत्पन्न देणारा प्रकार (एच.बी.१) लागवडीसाठी देण्यात आला. त्यानंतर एच.बी. २, एच.बी. ३, एच.बी. ४ आणि एच.बी. ५ हे संकरित प्रकारलागवडीसाठी देण्यात आले. ३ ते ५ वर्षानंतर ते केवडा अथवा गोसावी आणि अरगट रोगांना फार बळी पडतात, असे आढळून आले व शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करण्याचे सोडून दिले.१९७७ पासून गोसावी रोगाला काही अंशी प्रतिकारक असे पुढील संकरित प्रकार लागवडीसाठी देण्यात आले आहेत : (१) बी.जे. १॰४, (२) बी.जे ५६॰, (३) बी.डी. १११ (४), सी.जे. १॰४ (फक्त गुजरात राज्यासाठी). कमी पावसाच्या प्रदेशात त्यांचे हेक्टरी उत्पन्न १७.४ ते १८.८ क्विंटल आणि पुरेशा पावसाच्या प्रदेशात २१ ते २२ क्विंटलपर्यंत मिळते. बी.डी. १११ खेरीज बाकीच्या प्रकारांना पेरणीपासून कापणीपर्यंत ८५ ते ९५ दिवस लागतात व बी.डी. १११ला ८॰-८५ दिवस लागतात. हे सर्व प्रकार शेतकरी वर्गात फार लोकप्रिय झाले आहेत. पहिले दोन प्रकार महाराष्ट्रात केवडा-गोसावी रोगाला प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.
धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकाबरोबरच चाऱ्याचे पीक म्हणूनही बाजरीचे पीक पाण्याचा चांगला निचरा असलेल्या हलक्या जमिनीत पावसाळी हंगामात पंजाब, गुजरात, तमिळनाडू व आंध्र प्रदेशात घेतले जाते. चाऱ्यात प्रथिनाचे प्रमाण ११% असते. चवीला तो ज्वारी अथवा मक्याच्या चाऱ्यापेक्ष कमी प्रतीचा असतो. चाऱ्यासाठी सहसा मोठ्या दाण्याचे प्रकार लावतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने भरपूर उंच वाढणारा व वर्षातून दोन वेळा चाऱ्याचे दिवसांनी पुन्हा ओल्या चाऱ्यासाठी कापणी करता येते व हेक्टरी ३॰ ते ४॰ टन चारा मिळतो. ओल्या चाऱ्यासाठी दु उत्पादन घेऊन धान्याचेही पीक मिळू शकेल असा बाजरीचा प्रकार विकसित केला आहे. चाऱ्याचे पहिले उत्पादन पेरणीपासून अवघ्या ५॰ ते ५५ दिवसांत हाती येते व त्यावेळी हेक्टरी ५॰-७५ टन ओला चारा मिळतो त्यानंतर ५॰ सरी कापणी न केल्यास हेक्टरी १५ – २॰क्विंटल बाजरी व शिवाय वाळलेला चारा (सरमाड) मिळतो.
मशागत : जमीन २ – ३वेळा कुळवतात. काही जमिनी उथळ (१॰ ते १२.५सेंमी.) नांगरतात. संकरित बाजरीच्या पिकासाठी ८ ते १॰ टन शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत मिसळतात. पेरणीच्या वेळी जमीन भुसभुशीत न ठेवता कुळवाच्या पाळीने अथवा हलक्या फळीने टाळूवर आणतात (कठीण करतात).
पेरणी : पेरणीचा हंगाम देशाच्या निरनिराळ्या भागांत स्थानिक परिस्थितीनुसार मेपासून ऑगस्टपर्यंत (पावसाला आरंभ झाल्यावर) असतो. गुजरातच्या काही भागांत पावसापूर्वी कोरड्या जमिनीत पेरणी करतात. दक्षिण भारतात काळ्या जमिनीत ईशान्य मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करतात. बागायती पीक जानेवारी-मार्चमध्ये पेरतात. सर्वसाधारणपणे निरनिराळ्या महिन्यांतील पावसाचे मान लक्षात घेऊन पेरणी केव्हा करावयाची ते ठरविले जाते. हे पीक तिन्ही हंगामात घेतले जाते. महाराष्ट्रात जूनच्याअखेरीपासून जुलैच्या तिसऱ्या आठवडयापर्यंत जिरायती पिकाची पेरणी करतात. पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात बरीच घट येते. काही अटळ कारणांमुळे पेरणीला उशीर झाल्यास आधी रोपवाटिकेत रोपे तयार करून त्यांचे ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात स्थलांतर केल्यास उत्पन्नात घट येत नाही, असे दिसून आले आहे. सुमारे ७ आर (७॰॰ चौ.मी) क्षेत्रातील रोपे १ हेक्टर क्षेत्रात लावण्यास पुरेशी असतात. बी फोकून अथवा पाभरीने पेरतात. फोकून पेरण्याची पद्धत विशेषत: तमिळनाडूत आढळते. पाभरीने पेरल्यास दोन ओळींतील अंतर सर्वसाधारणपणे २२.५ ते ३॰ सेंमी. ठेवतात परंतु ३७.५ते ४५ सेंमी. अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते. एका हेक्टरमध्ये सु. दोन लक्ष झाडांची संख्या असणे बाजरीच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी हितावह असते, असे आढळून आले आहे. दोन ओळींतील अंतर ४५-५॰ सेंमी. आणि दोन झाडांतील अंतर ९-१२ सेंमी. ठेवल्याने एक हेक्टर क्षेत्रातील झाडांची संख्या पावणेदोन ते दोन लक्ष राहते. महाराष्ट्रात सामान्यत: हे पीक तूर, कुळीथ, मूग, उडीद, मटकी, गवार, अंबाडी, तीळ, एरंडी इ. पिकांबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. बाजरीच्या काही ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरतात. काही वेळा इतर पिकांचे बी विशिष्ट प्रमाणात बाजरीच्या बियांतच मिसळून पेरतात. दुर्जल प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी कोरडवाहू पद्धतीत समपातळीत पेरणी करतात. त्यात २१ ओळी बाजरीच्या व नंतर ७ ओळी भुईमूग, मटकी, कुळीथ यांसारख्या धूप-प्रतिबंधक पिकाच्या याप्रमाणे पेरणी करतात. दरसाल पेरणी करताना पट्ट्यांची जागा बदलली जाते. त्यामुळे पिकाच्या फेरपालटीचाही फायदा मिळतो. बी २ ते ४ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही, याची काळजी घेतात. पीक स्वतंत्र बाजरीचेच असेल, तर हेक्टरी २ ते ५ किग्रॅ. आणि मिश्रपिकात १ ते ३ किग्रॅ. बाजरीचे बी लागते. आंध्र प्रदेशाच्या काही भागांत वाफ्यात रोपे तयार करून त्यांचे तीन आठवडयांनंतर शेतात स्थलांतर करतात. काही ठिकाणी बाजरीचे बी ४५x४५ सेंमी. अंतरावर टोकून पेरण्याचीही पद्धत आहे.
फेरपालट : दक्षिण भारताच्या काही भागात बाजरीचे पीक सतत त्याच जमिनीत घेतात परंतु सर्वसाधारणपणे ते ऊस, गहू, ज्वारी, नाचणी, कपाशी, एरंडी, भुईमूग, तीळ व तंबाखू यांपैकी एक अथवा जास्त पिकांबरोबर फेरपालटीत घेतात.
आंतर मशागत : महाराष्ट्रात पिकाला दोन खुरपण्या व दोन कोळपण्या देतात आणि पीक ३॰ सेंमी. उंचीचे झाल्यावर त्यावर फळी फिरवितात. त्यामुळे फुटवे येण्यास मदत होते.
पाणी देणे : बागायती पिकाला आवश्यकतेप्रमाणे पाणी देतात. पिकाला फुटवे येताना, पीक पोटरीत येताना आणि दाणे भरताना जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक असते.
वर खत : रासायनिक खताचा वापर शक्यतो मध्यम व भारी जमिनीतच करणे इष्ट असते. वरकस जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे अशा जमिनीतील पिकासाठी रासायकिन खताचा वापर करणे धोक्याचे असते. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बाजरीच्या पिकाला खत देत नाहीत. उसासारख्या पिकानंतर बाजरीचे पीक घेतल्यास जमिनीतील खताचा अंश बाजरीच्या पिकाला उपयोगी पडतो. स्थानिक प्रकारांच्या जिरायती पिकाला हेक्टरी १२ किग्रॅ. नायट्रोजन, बागायती पिकाला २५ किग्रॅ. नायट्रोजन व २५ किग्रॅ. फॉस्फरस व संकरित बाजरीला ५॰-७५किग्रॅ. नायट्रोजन, ५॰ किग्रॅ. फॉस्फरस व ५॰ किग्रॅ. पोटॅश देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. संकरित बाजरी १६॰ किग्रॅ. पर्यंत नायट्रोजनाला प्रतिसाद देते, असे आढळून आले आहे. नायट्रोजन खत विभागून दिले असता जास्त उत्पन्न मिळते, असे आढळून आले आहे. या पिकाला नायट्रोजन व पोटॅशची जास्त गरज असते तर फॉस्फरसची गरज मध्यम असते.
तणांचे नियंत्रण : पावसाळ्यात तणांची वाढ फार होते व शेतातील ओलीमुळे हाताने तण काढणे शक्य होत नाही. शिवाय बाजरीसारख्या पिकात हाताने तण काढणे आर्थिक दृष्टया परवडत नाही. यासाठी बाजरीची रोपे उगवून येण्यापूर्वी ॲट्रॅझीन अथवा प्रोपाझाईन या तणनाशकांची हेक्टरी ॰.५ किग्रॅ. या प्रमाणात फवारणी करून पीक उगवून आल्यावर तीन आठवडयांनी एकदा हातांनी खुरपणी केल्यास कमी खर्चात यशस्वी रीतीने तणांचा नाश होतो, असे प्रयोगांती आढळून आले आहे.
रोग : केवढा : (इं. डाउनी मिल्ड्यू). हा रोग स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनीकोला या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यहीन सूक्ष्म वनस्पतीमुळे) उदभवतो. यात पाने पिवळी पडतात व त्यांच्या खालच्या बाजूवर कवकाची पांढरट वाढ आढळते. पुढे पाने तपकिरी रंगाची होऊन वाळतात. पिकाची वाढ खुरटते. कणसात दाणे न भरता त्याठिकाणी पर्णमय वाढ होते. त्यामुळे या रोगाला ‘हिरवा गोसावी’ किंवा ‘बुवा’ असेही म्हणतात. पावसाळी हवामानात हा रोग विशेष प्रमाणात आढळून येतो. वाळलेल्या पानात कवकाची रंदुके [दोन प्रजोत्पादक कोशिकांच्या- पेशींच्या –संयोगाने बनलेली ⟶कवक] नावाची विश्रामी बीजुके तयार होतात आणि ती मातीत राहिल्याने त्यांपासून पुढील वर्षी रोगोद्भव होतो.
उपाय : हा रोग प्रथमत: जमिनीतून आणि नंतर हवेतून पसरत असल्याने रोगप्रतिकारक जातीची लागवड करणे हाच एक खात्रीचा उपाय आहे. रोगाची सुरुवात दिसून येताच रोगट झाडे उपटून जाळून टाकल्यामुळे रोगाला आळा बसतो. १.५ किग्रॅ. डायथेन झेड-७८ हे कवकनाशक ५॰॰ लि. पाण्यात मिसळून उभ्या पिकावर फवारतात. जरूरीप्रमाणे आणखी एक अगर दोन फवारण्या करतात. [⟶केवडा रोग].
अरगट : क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफाला या कवकामुळे हा रोग होतो. उशिरा पेरलेली बाजरी फुलोऱ्यावर असताना अधून मधून थंड व दमट हवा, पाऊस आणि वारा असल्यास या रोगाचे प्रमाण जास्त असते. जमिनीतील कवकाच्या विश्रामी अवस्थेतील जालाश्मापासून (अन्न साठविणाऱ्या कवक तंतूंच्या कठीण पुंजक्यापासून स्क्लेरोशियापासून) अथवा बीजुकापासून या रोगाची सुरुवात होते. किंजपुटांत (अंडाशयांत) कवकाची वाढ होते. त्यामुळे कणसात दाणे भरण्याऐवजी त्यातून सुरुवातीला मधासारखा चिकट, गुलाबी द्रव पाझरतो. या द्रवात कवकाची बीजुके असतात. हा द्रव गोड असून त्याकडे मुंग्या, माश्या व इतर कीटक आकर्षिले जातात व रोग फैलावण्यास कारणीभूत होतात. रोगाच्या वाढीला हवामान प्रतिकूल झाल्यावर कवकाचे रूपांतर कवक जालाश्मात होते. हे जालाश्म रंगाने काळे असून बुडाला रुंद व पुढे टोकदार असतात. त्यात ॰.४२% पर्यंत अरगोटॉक्सिन नावाचे विष असते. हे जालाश्म धान्याबरोबर दळले गेल्यास त्या पिठातून मनुष्याला विषबाधा होऊन मळमळ, उलट्या, जुलाब व भोवळ येणे ही लक्षणे होतात व गंभीर परिस्थितीत मृत्यूही येण्याचा संभव असतो.
उपाय : रोगट बी पेरण्यापूर्वी ते २॰% मिठाच्या द्रावणात बुडवून तरंगणारे हलके बी व जालाश्म काढून टाकतात आणि तळाशी असलेले जड बी स्वच्छ पाण्यानू धुवून वाळवून पेरण्यासाठी वापरतात. पीक पोटरीत असताना व त्यानंतर आणखी सात दिवसांनी कॅप्टन किंवा झायरम किंवा थायरम एक किग्रॅ. घेऊन ते ५॰॰ लि. पाण्यात मिसळून एका हेक्टरवर फवारल्याने रोग काही प्रमाणात आटोक्यात राहतो. उशिरा पेरलेल्या बाजरीवर हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. यासाठी पेरणी लवकर करणे आवश्यक असते. [⟶अरगट].
तांबेरा : पक्सिनिया पेनिसेटी या कवकामुळे पानांवर तांबेऱ्याचे बारीक ठिपके आढळतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने वाळतात व उत्पन्न घटते. या रोगावर सध्या परिणामकारक उपाय उपलब्ध नाही परंतु डायथेन झेड-७८ पाण्यात मिसळून रोगाची सुरुवात झाल्याबरोबर १५ दिवसांच्या अंतराने फवारल्यास रोगाला पुष्कळसा आळा बसण्याची शक्यता असते. [⟶तांबेरा].
काणी : टॉलिपोस्पोरियम पेनिसिलरी या कवकामुळे कणसातील काही दाण्यांत काळी भुकटी आढळते. तीत काणीच्या कवकांची बीजुके असतात. बीजुके हवेतून फुलोऱ्यावर पडून रोग प्रसार होतो.
उपाय : शेतातील रोगट कणसे दिसून येताच ती काढून नष्ट करतात [⟶काणी रोग].
किडी : बाजरीवर प्रामुख्याने हिंगे, बिनपंखी टोळ, खरपुडी व लष्करी अळी या किडी आढळतात.
हिंगे: (ब्लिस्टर बीटल, लिट्टा वंशातील जाती). हे कीटक फुलोरा व पराग खातात. त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत.
उपाय : ५% बीएचसी भुकटी २॰-२५ किग्रॅ. या प्रमाणात पिस्कारतात.
बिनपंखी टोळ : (कॉलेमानिया स्फेनारिओडिज). आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत ही बाजरीची पाने खाणारी फार नुकसानकारक कीड आढळते.
उपाय : पीक काढल्यावर शेत नांगरल्यामुळे (विशेषत: बांधांच्या कडेने) कीडीच्या अंडयांचे पुंजके जमिनीवर उघडे पडतात व उन्हामुळे भरतात. पिकावर १॰% बीएचसी भुकटी पिस्कारतात.
खरपुढी : (नाकतोडे, क्रोटोगोनस जाती). ही कीड विशेषत: गुजरात राज्यात विशेष नुकसानकारक आहे परंतु हवामान पोषक असल्यात इतर राज्यांतही उपद्रवी असते. पिले व पूर्ण वाढ झालेले नाकतोडे पाने व झाडांचे कोवळे शेंडे खातात. बिनपंखी टोळांप्रमाणे उपाय करतात.
लष्करी अळी : (सिर्फिस युनिपंक्टा). या अळ्या बहुतांशी रात्रीच्या वेळी पाने खातात व दिवसा पानांच्या सुरळीत अथवा ढेकळाखाली दडतात. उपाय : अंडयांचे पुंजके गोळा करून नष्ट करतात पीक काढल्यावर शेताची नांगरट करतात. ५% बीएचसी भुकटी हेक्टरी सु. ३२ किग्रॅ. या प्रमाणात संध्याकाळी पिस्कारतात [⟶ लष्करी अळी].
यांशिवाय टाळप (टारफुला) या सपुष्प परजीवी (दुसऱ्या वनस्पतींवर जगणाऱ्या) वनस्पतीचाही बाजरीला उपद्रव होतो. कारण ही वनस्पती बाजरीच्या मुळांतून अन्नरस शोषून घेते आणि त्यामुळे काही वेळा उत्पन्नामध्ये ४॰% पर्यंत घट येते. यावरील उपाय म्हणून टाळपांची झाडे फुलावर येण्यापूर्वीच उपटून नष्ट करतात. तसेच सोडीयम क्लोरेट किंवा पोटॅशियम नायट्रेट अथवा २,४-डी या तणनाशकाचा वापर करतात.
कापणी व उत्पन्न : महाराष्ट्रात सर्वसाधारपणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बाजरीची कापणी करतात. कणसे तयार झाल्यावर झाडे जमिनीलगत कापून २-३ दिवस शेतात वाळू देतात. नंतर त्यांच्या पेंडया बांधून त्या एके ठिकाणी रचून ठेवतात. कणसांची मळणी बैलांची पात धरून वा यंत्राने करतात. जिरायती बाजरीचे सर्वसाधारण उत्पन्न हेक्टरी ३॰॰ ते ५॰॰ किग्रॅ. असते परंतु चांगल्या जमिनीत व योग्य मशागतीखाली ते ७॰॰ ते १,२॰॰किग्रॅ. पर्यंत मिळते. याशिवाय ४,॰॰॰ ते ५,॰॰॰किग्रॅ. वैरण मिळते. खत व पाण्याचा योग्य पुरवठा केल्यास संकरित प्रकारांचे उत्पन्न २,॰॰॰ ते २,७॰॰किग्रॅ. पर्यंत मिळते. पीक स्पर्धेमध्ये हेक्टरी ३,४५॰किग्रॅ. उत्पन्न मिळाल्याची नोंद आहे. हिरव्या चाऱ्यासाठी लावलेले पीक फुलोरा आल्यानंतर कापतात. हेक्टरी २५,॰॰॰ ते ३॰,॰॰॰किग्रॅ. ओली वैरण मिळते.
उपयोग व रासायनिक संघटन : बाजरी (दाणे) हे देशाच्या पुष्कळ भागांतील लोकांचे प्रमुख अन्न आहे. पोषणमूल्याच्या दृष्टीने ते भात व गव्हाच्या तोडीचे आहे. दाण्यांत कोंड्याचे प्रमाण ८ ते १॰% असते. त्यामुळे दाणे सडून कोंडा काढून तांदळाप्रमाणे शिजवून अगर पातळ कांजीच्या स्वरूपात खातात अथवा दळून पिठाच्या भाकरी करतात. हिरवी कणसे भाजून व दाण्यांच्या लाह्या करून खातात. दाण्यांपासून माल्ट तयार करता येतो. जनावरे आणि कोंबड्यांचे खाद्य म्हणूनही बाजरीचा कोठे कोठे उपयोग करतात. वाळलेली वैरण जनावरांना खाऊ घालतात परंतु ही वैरण ज्वारीच्या कडब्याइतकी सकस नसते. बाजरीच्या दाण्यांमध्ये १२.४% जलांश, ११.६% प्रथिन, ५% स्निग्ध पदार्थ, ६७.१% कार्बोहायड्रेटे, १.२% तंतू आणि २.७% खजिन द्रव्ये असतात. १॰॰ ग्रॅमपासून ३६१ ऊष्मांक मिळतात.
पहा : गवते ग्रॅमिनी ग्रॅमिनेलीझ.
संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India Raw Materials Vol. VII, New Delhi, 1966.
2. Vaidya, V.G. Sahastrabuddhe, K.R. Khupse, V.S. Crop. Production and Field Experimentation, Poona, 1972.
आर्गीकर, गो. प्र. गोखले, वा. पु. रुईकर, स. के.
बाजरीच्या विविध प्रकारांची कणसे
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..