बागोर : मध्याश्मयुगीन संस्कृतीच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थान राज्यातील एक स्थळ. हे भिलवाड्यापासून पश्चिमेस सु. २५ किमी. अंतरावर असून अमेटच्या ईशान्येस कोठडी नदीच्या काठावर वसले आहे. पुणे विद्यापीठातर्फे येथे प्रा. व्ही. एन्. मिश्र यांनी उत्खनन केले. अत्खननात तीन कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिली वस्ती. इ.स.पू.सु.५॰॰॰ ते २८॰॰ या दरम्यानही होती. त्या वेळी कुडाच्या झोपड्यांत लोक राहत असल्याचे दिसते. तेथील जमीन फरश्यांच्या तुकड्यांची बनविलेली असे. क्षुद्राश्म हत्यारांचा वापर ते करीत. तसेच निरनिराळ्या जनावरांचाही ते उपयोग करीत. ही या कालखंडाची काही वैशिष्ट्ये होत. या काळात मृतांना पूर्व-पश्चिम ठेवून पुरले जाई. इ.स.पू. सु २८॰॰ ते ६॰॰या काळातील दुसऱ्या वस्तीच्या वेळी लोक क्षुद्राश्म हत्यारेच वापरीत परंतु त्याचबरोबर तांब्याच्या वस्तू व कोरून नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही त्यांच्या वापरात होती, असे आढळले. मृताचे दफन करण्याची पद्धती आधीच्या कालखंडासारखीच राहिली परंतु या काळात मृताबरोबर मृत्पात्रे, तांब्याची हत्यारे व बहुधा अन्नही ठेवले जाई. शेवटची वस्ती इ.स.पू. ६॰॰ ते इ.स. २॰॰ या काळात झाली व ती लोहयुगीन होती. बागोर येथील उत्खननासंबंधीची माहिती देणारा प्रा. व्ही. एन्. मिश्र यांचा शोधनिबंध वर्ल्ड आर्किऑलॉजी, खंड १, क्रमांक १ (१९७३) यात प्रसिद्ध झाला.
देव शां. भा.