बांधकाम, लाकडाचे : बांधकामातील लाकडाचा वापर फार प्राचीन काळापासून होत असून दगड-विटांच्या खालोखाल लाकूडच बांधकामास उपयुक्त साहित्य ठरले आहे. लाकडाचा सर्वप्रथम उपयोग जंगलातील नाले, ओढे पार करण्याकरिता आडव्या ओंडक्याच्या रूपाने केलेला आढळतो. वृक्षांच्या नैसर्गिक उंचीचा व जाडीचा उपयोग करून ते सहजरीत्या कापून आडवे करून ओढ्यावर जरूर त्या जागी ठेवून त्याचा बहाली पूल तयार करणे दगड-विटांपेक्षा (किंवा आजच्या काळातील अन्य सामग्रीपेक्षाही) सोपे असल्याने लाकडाचा उपयोग पुलासाठी फार पूर्वीपासून होत आला आहे. पोलाद व क्राँक्रीट यांचा शोध लागण्यापूर्वी पुलांचे स्तंभ, बहाल, कैच्या, कमानी व तक्तपोशी लाकडाच्या केलेल्या असत. दुर्गम अरण्य प्रदेशात व इतर ठिकाणच्या हंगामी कामचलाऊ पुलांसाठी आजसुद्धा लाकजडाचा वापर केला जातो. [⟶ पूल]. वजनातील हलकेपणा, उत्तम ताकद, टिकाऊपणा आणि कारागिरास बांधकामात लागणारी उत्तम कार्यसुलभता या गोष्टींमुळे लाकडाचा उपयोग पुलांशिवाय इमारतींच्या व इतर सांरचनिक कामात जेथे शक्य आहे तेथे सर्रासपणे केला जातो. इमारतींचे खांब, तुळ्या, बहाल, जमीन (तळ), तक्तपोशी, दरवाजे, खिडक्या, जिने, छत, छप्पर, विभाजक पडदा (पार्टिशन), पायातीलखुंट, स्तंभिका, पहाड (परांची), आडके (सेंटरींग), मचाण इत्यादींसाठी लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ताकद व हलकेपणा या गुणधर्माबरोबरच ते सहजपणे कापता येणे, जरूर तेथे खाच घेता येणे, रंधा मारून दर्शनी बाजू सफाईदार करता येणे, सहज उचलता व हाताळता येणे या प्रत्यक्ष बांधणीस उपयुक्त अशा गुणधर्मामुळे इतर कोणत्याही बांधकाम सामग्रीपेक्षा लाकूड हे सर्वांत जास्त कार्यसुलभ साहित्य ठरले आहे. लाकडी घटकांची जोडणी व बांधणी सुद्धा सहज करता येते. त्यासाठी खास कसबी कारागीरीची किंवा अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता असतेच असेही नाही. लाकडातील सळांच्या (कणांच्या) नैसर्गिक सौंदर्यांमुळे लाकडी बांधकामात सौंदर्य आणणेही सहज शक्य होते. ते दगडासारखे कठीण नसल्याने इमारतीच्या जमिनीसाठी विशेषकरून रंगमंच व नृत्यगृह यांच्या जमिनीसाठी सुयोग्य ठरते. इमारती बांधकामाच्या दृष्टीने लाकडाचे मुख्य दोष म्हणजे त्यांचा अतिशय कमी अग्निरेधकता, वाळवी, भुंगे व इतर विनाशक कीटक व सूक्ष्मजंतू यांमुळे आणि आर्द्रतेच्या परिणामामुळे त्याची ताकद कमी होणे व कुजणे हे होत. यासाठी खास परिणामकारक संरक्षक उपाय योजावे लागतात. आधुनिक काळातील वाढत्या मागणीच्या मानाने लाकडाची दुर्मिळता व सतत वाढती किंमत यांमुळे आणि किंमतीत कमी पण सामर्थ्याने जास्त असे काँक्रीट आणि बांधकामास सुलभ व लाकडापेक्षा किती तरी पटींनी सामर्थ्यवान असे पोलाद यांसारख्या अन्य नवीन साहित्याची उपलब्धता होऊ लागल्यापासून मात्र बांधकामात लाकडाचा उपयोग हळूहळू कमी होऊन आता दारे, खिडक्या, विभाजक पडद्या, पहाड, आडके, क्राँक्रीटच्या कामासाठी लागणारे साचे व फार्मे एवढ्यापुरताच मर्यादित राहिला आहे. तरी नागरी वस्त्यांमध्ये विविध कामांसाठी लागणारे निवारे (उदा. दूधकेंद्रे, छोटी दुकाने, बस थांब्यावरील निवारा, चौक्या इ.) अजूनही लाकडाचेच बनवितात. जंगल प्रदेशात जिथे लाकूड विपूल प्रमाणात उपलब्ध होते अशा ठिकाणी मात्र पूल व इमारतीच्या सर्व घटकांसाठी लाकडाचा वापर अजूनही केला जातो.

इमारती लाकडाचे प्रकार व सांरचनिक गुणधर्म : इमारतींसाठी वापरण्यास योग्य असे लाकूड ‘इमारती लाकूड’ (टिंबर) म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये उपलब्ध होणाऱ्‍या इमारती लाकडासंबंधीची माहिती ‘लाकूड’ या नोंदीत दिली आहे. टिकाऊपणाच्या दृष्टीने लाकडाचे तीन वर्ग केले आहेत : वर्ग–१ : सरासरीने दहा वर्षे किंवा अधिक काळ टिकणारे लाकूड (उदा., देवदार, सागवान), वर्ग –२ : पाच ते दहा वर्षे टिकणारे लाकूड (उदा., ओक, किंजळ, धामणी) आणि वर्ग–३ : पाच वर्षापेक्षा कमी टिकणारे लाकूड (उदा., आंबा, बाभूळ), बांधकामात ज्या घटकासाठी लाकूड वापरले असेल त्याचे महत्त्व, त्याच्या कार्याचे स्वरूप, इमारतीतील त्याचे स्थान व भोवतालचे वातावरण आणि मुख्य म्हणजे उपलब्धता आणि किंमत यांनुसार योग्य वर्गातील लागडाची निवड करावी लागते. भारतीय मानक संस्थेने भारतात उपलब्ध असणाऱ्‍या इमारती लाकडांचे सांरचनिक गुणधर्म चाचण्यांच्या आधारे निश्चित केले आहेत. लाकडाची ताकद व टिकाऊपणा हे मुख्यतः लाकडाची जात, ते तोडण्याची व रापविण्याची पद्धत, त्यातील आर्द्रता, त्यातील सळांची दिशा, सळांच्या वलयांची घनता, त्यामध्ये असणारे तडा, भेगा, चिरा, गाठी यांसारखे नैसर्गिक दोष यांवर अवलंबून असतात. लाकूड जेवढे रापविलेले असेल तेवढे चांगले. त्यात जेवढी आर्द्रता जास्त तेवढे बल कमी असते. सळांच्या वलयांची घनता जेवढी जास्त तेवढी ताकद जास्त असते. हवेत सुकविलेले लाकूड व भट्टीत कृत्रिम रीत्या सुकविलेले लाकूड यांत तसा फरक केला जात नाही. संरक्षक प्रक्रिया किंवा अग्निरोधक उपचारांमुळे लाकडाची शक्ती कमी होत नाही. लाकडाचे ताणरोधक बल व दाबरोध बल किंवा कर्तन बल हे सळांच्या कलावरही अवलंबून असते. सळांच्या दिशेने ही बले सर्वांत जास्त, तर सळांच्या लंब दिशेने ती सर्वांत कमी असतात. कित्येक वेळा संपूर्ण घटकभर सळांची दिशा एकच असणे शक्य नसते. अशा वेळेस भाराच्या मार्गातील कोणत्याही सळांची दिशा एकच असणे शक्य नसते. अशा वेळेस भाराच्या मार्गातील कोणत्याही सळांची दिशा आणि अनुज्ञात प्रतिबल (विकृती निर्माण करणाऱ्‍या प्रेरणा) घेताना गृहीत धरलेली दिशा यांमधील फरक स्पर्श –१ १/१० [⟶त्रिकोणमिती] यापेक्षा जास्त असता कामा नये. याशिवाय लाकडातील गाठी, चिरा, तडे, भोके यांसारखे दोष ज्या भागावर ज्स्तीत जास्त भार येत असतील अशा ठिकाणी (उदा., तुळईच्या मध्यावर) येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते.

लाकडी घटकांचा सांरंचनिक अभिकल्प : संरचनेच्या लाकडी घटकांचा अभिकल्प (आराखडा) करताना पदार्थ बलविज्ञान [⟶ पदार्थांचे बल] व संरचना सिद्धांत [⟶ बांधकाम : संरचना सिद्धांत व अभिकल्प] यांतील सूत्रांचा अवलंब करून त्यांचे आकारमान ठरविले जाते. घटकावर येणाऱ्‍या सर्व प्रकाराच्या भारांनुळे त्यात येणारी प्रतिबले व प्रतिविकृती अनुज्ञात प्रतिबलांपेक्षा जास्त असू नयेत हे पाहावे लागते.लागडी बांधकामातील सांधे व जोड : लाकडी बांधकामात वेगवेगळया घटकांच्या संरचनात्मक जोडीसाठी आणि लांबी वाढविण्यासाठी सांधकामाची जरूरी असते. इमारतीच्या लाकडी बांधकामात अवजड भार येत असल्याने साधे सुतारी सांधे पुरेसे होत नाहीत. त्यांना अधिक मजबुती आणण्यासाठी धातूचे विविध प्रकारचे संयोगक वापरणे जरूर असते. संयोगकांचे सामान्य प्रकार म्हणजे लाकडी खुंट्या, पोलादी खिळे, स्क्रू, नट-बोल्ट-वॉशर व पट्ट्या होत. जोडकामासाठी आजकाल विविध प्रकारच्या⇨आसंजकांचा (चिकटवून सांधणाऱ्‍या द्रव्यांचा) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

खिळ्यांचे तारखिळे व कुऱ्‍हाडी (चपटे) खिळे असे दोन प्रकार असतात. तारखिळे लवचिक असतात पण ते लाकडात सहज ठोकले जातात (अर्थात लाकडी भागाच्या जाडीनुसार व लाकडाच्या प्रकारानुसार योग्य व्यासाचा खिळा घेणे आवश्यक आहेच, नाहीतर खिळा वाकतो). कुऱ्‍हाडी खिळा हा दृढ असतो. तो सहज ठोकला जाऊ शकत नाही. लाकूड कठीण असल्यास ते फाटण्याची किंवा चिरा पडण्याचीही शक्यता असते. तारखिळे अथवा स्क्रूमुळे लाकडाच्या सळांना इजा पोहोचत नाही व घटकाची ताकदही कमी होत नाही. दोन लाकडी घटक जोडण्यासाठी खिळ्यांचा, तर लाकडी भागावर पोलादी वा अन्य धातूच्या पट्ट्या, बिजागिरी वा अन्य प्रकारचे संधानक बसविण्यासाठी स्क्रूचा चांगला उपयोग होता. अधिक मजबूत जोडणीसाठी अर्थातच खिळ्याऐवजी स्क्रूचा वापर श्रेयस्कर असतो. जोडलेले काम सोडविणेही स्क्रूमुळे सहज शक्य होते. लाकूड दुभंगणे वा त्याला चिरा जाणेही स्क्रूमुळे टळते. खिळे वापरताना लाकडात छिद्र घेण्याची जरूरी नसते. स्क्रू बसविण्यापूर्वी मात्र स्क्रूच्या पेचदार भागाच्या गाभ्याच्या व्यासाचे छिद्र लाकडात आधी पाडून घेणे इष्ट असते. त्यामुळे सांध्याची मजबुती कमी न होताही स्क्रू बसविणे सोपे जाते. स्क्रू हा नेहमी पिळवूनच बसवावा लागतो. तो ठोकून बसविणे चूक होय. लांबी, डोक्याचा आकार, पेचाचा प्रकार यांनुसार स्क्रू व खिळ्यांचे वेगवेगळे प्रकार असून ते ६ ते १५० मिमी. लांबीचे व वेगवेगळ्या २० व्यासांचे उपलब्ध आहेत [⟶खिळे स्क्रू]. लाकडी खुंटी वा पिन म्हणजे कठीण लाकडाचा वर्तुळाकार लांब तुकडा होय. खिळ्याऐवजी याचा वापर सुतारी सांध्यामध्ये जास्त करून होतो. इमारती बांधकामाचे दोन मोठे लाकडी घटक जोडण्यासाठी बोल्टच्या व्यासाइतके छिद्र लाकडात प्रथम घ्यावे लागते. त्यामुळे घटकाची व अर्थातच सांध्याची शक्ती कमी होते. सांध्याची मजबुती वाढविण्यासाठी पोलादी अथवा अन्य धातूंच्या पट्ट्याचा उपयोग होतो. छपराच्या कैच्यांच्या विविध घटकांसाठी T, L, K व U अशा विविध आकाराच्या जोड-पट्ट्या वापराव्या लागतात.

आ. १. लाकडी बांधकामातील सांरचनिक सांधे : (अ) आरोही (अथवा गोद किंवा छादन) सांधा (आ) चावीयुक्त आरोही सांधा : (१) चावी (इ) खंडप्रक्षेपी संधान पट्टी सांधा (ई) साधा कड (किंवा टक्कर वा संधान पट्टी) सांधा : (१) पोलादी वेष्टन पट्टी (उ) तिर्यक् ग्रीवापट्ट सांधा (ऊ) अर्ध-आरोही ग्रीवापट्ट सांधा (ए) चावीयुक्त ग्रीवापट्ट सरळ सांधा : (१) चावी (ऐ)सरळ प्रक्षेपी ग्रीवापट्ट सांधा (ओ) तिर्यक् प्रक्षेपी ग्रीवापट्ट सांधा (औ) चावीयुक्त सरळ प्रक्षेपी ग्रीवापट्ट सांधा (क) चावीयुक्त तिर्थक तिर्थक प्रक्षेपी ग्रीवापट्ट सांधा (ख) लाकडी सांध्यात वापरल्या जाणाऱ्‍या विविध संघान पट्ट्या.

 

लाकडी बांधकामात खालील प्रकारचे संरचनात्मक सांधे आढळतात : (१) दीर्घक सांधे, (२) धारक सांधे व (३) चौकटी अथवा स्कंध सांधे. दीर्घक सांधे अर्थातच घटकांची लांबी वाढविण्यासाठी वापरतात. अशा सांध्यात साधारणपणे अक्षीय ताण किंवा संकोची भार येत असल्याने यासाठी पोलादी बांधकामाप्रमाणेच आरोही (अथवा गोद किंवा छादन) सांधा व कड (किंवा टक्कर) अथवा संघान पट्टी सांध्यांचा वापर केला जातो. आरोही सांध्यात [आ. १ (अ)] दोन घटक टोकास एकमेकांच्या वर बसवून खिळ्यानी जोडले जातात त्यामुळे ते वेगवेगळ्या पातळ्यांत राहतात. अशा सांध्याची मजबुती वाढविण्यासाठी कधीकधी दोन्ही घटकांच्या स्पर्श होणाऱ्‍या बाजूंत खाचा घेऊन त्यात चावी (कठीण लाकडाचा खास तुकडा) वापरली जाते. अशा सांध्यास चावायुक्त आरोही सांधा म्हणतात [आ. १ (आ)]. कड सांध्यात अथवा संधान पट्टी सांध्यात [आ.१ (इ)] लाकडी किंवा पोलादी वेष्टन (किंवा आवरण) पट्ट्यांची आवश्यकता असते. अशा सांध्यांची मजबुती वाढविण्यासाठी मूळ लाकडी घटकात खाच व त्या समोरील संधानक लाकडी पट्ट्यामध्ये प्रक्षेपी भाग घेऊन ते एकमेकांत अडकवून सांध्यात खिळे ठोकले जातात. अशा सांध्यास खंड-प्रक्षेपी संधान पट्टी सांधा [आ. १ (ई)] म्हणतात. आरोही सांध्यातील दोन भाग सम पातळीत न येणे हा दोष व कड सांध्यातील संधान पट्ट्यांची आवश्यकता ह्या गोष्टी टाळण्यासाठी दोन्ही लाकडी घटकांची जाडी अर्ध्याने सरळ कमी करून किंवा तिरकस कमी करून ते भाग एकमेकांवर आरोहित करतात व त्यांमध्ये छिद्रे घेऊन बोल्ट बसवून सांधा तयार करतात. यामुळे दोन्ही घटक एका पातळीत येऊन संधान पट्ट्यांचीही आवश्यकता राहत नाही हा या सांध्याचा गुण होय. या सांध्यास ग्रीवापट्ट सांधा  [आ. १ (उ) व (ऊ)] म्हणतात. हा सांधा फक्त लाकडी बांधकामातच घेता येता. अशा सांध्यामध्ये दोन्ही घटकांची जाडी कमी होत असल्याने सांध्याची शक्ती खूपच कमी होते, हा या सांध्याचा मोठा दोष होय.सांध्याच्या मजबुतीसाठी दोन्ही घटकांच्या अक्षीय स्पर्श भागांमध्ये समोरासमोर खाचा घेऊन त्या पोकळीत चावी वापरतात. अशा साध्यास चावीयुक्त ग्रीवापट्ट सरळ सांधा [आ. १ (ए)] म्हणतात. दोन्ही घटकांच्या आडव्या स्पर्श भागांमध्ये विविध प्रकारे खाचा व प्रक्षेपी भाग घेऊन विविध प्रकारचे प्रक्षेपी ग्रीवापट्ट सांधे होतात [आ. १ (ऐ), (ओ), (औ) व (क)].

धारक सांध्यासाठी व चौकटी अथवा स्कंध सांध्यांसाठी नेहमीच्या सुतारी–लाकडी–सांध्याचा वापर केला जातो (‘धातु व अधातु जोडकाम’या नोंदीतील आ. ५ पहा). इमारती घटकांमध्ये भार मोठ्या प्रमाणावर येत असल्याने मजबुतीसाठी घटकांच्या दोन्ही बाजूंस विविध आकाराच्या पोलादी संधान पट्ट्यांचा [आ. १ (ख)] वापर केला जातो. या सांध्यांचा वापर लाकडी चौकटी किंवा सांगाडे तयार करण्यासाठी केला जातो. अलीकडे सांध्यामधील दोन घटक सरकू नयेत म्हणून सांध्याचा कर्तन प्रतिरोध वाढविण्यासाठी वेगवेगळे कर्तन संधानक वापरतात. यासाठी लोहकड्यांचा व खिळ्यांच्या जाळ्यांचा (आ. २) वापर पाश्चात्य देशांत मोठ्या प्रमाणावर होतो. भारतात यांचा उपयोग फारसा केला जात नाही.

आ. २. लाकडी बांधकामात वापरले जाणारे कर्तन संधानक :
(अ) विभाजित पोलादी कडे(आ) दातेरी कडे (इ) नखी लोहपट्टः (१) नर, (२) मादी, (३) नखी लोहपट्टाचा आणखी एक प्रकार (ई) कर्तन पट्टः (ई१) दाबलेल्या पोलादाचे : (१) पुढून, (२) मागून (ई२) वर्धनीय लोखंडाचे : (१) पुढून, (२) मागून (उ) विविध प्रकारच्या खिळ्यांच्या जाळ्या :(१) सपाट, (२) एकेरी वक्राची, (३) दुहेरी वक्राची.
आ. ३. कडीपाटाची तलरचना : (१) भिंत, (२) भिंतीतील तुळई, (३) कडी, (४) खोबण-जीभ पद्धतीने जोडलेले पाट (फळ्या).
आ. ४. लाकडी छप्परे : (अ) वाशांचे साधे एक ढाळी एकेरी छप्पर (आ) वाशांचे साधे दुधाळी एकेरी छप्पर (इ) ताण-तुलायुक्त वाशाचे एकेरी छप्पर : (१) ताण-तुला (ई) गळ-तुलायुक्त वाशाचे छप्पर : (१) गळ-तुला (उ) पाख-तुलायुक्त दुहेरी छप्पर : (१) आढे, (२) पाख-तुला, (३) कैचीचे वासे.

बांधकामामध्ये होणारे लाकडाचे उपयोग : लाकडाचा उपयोग इमारतीच्या प्रायः सर्व भागांसाठी होतो. वनप्रदेशात जिथे लाकूड विपुल प्रमाणात सहज उपलब्ध होते अशा ठिकाणी संपूर्ण लाकडी घरे बांधलेली आजही आढळतात. तरीसुद्धा इतर सर्व ठिकाणी लाकडाचा उपयोग प्रामुख्याने इमारतींमध्ये कडीपाट, तक्तपोशी, छपरे, कैच्या, दरवाजे, खिडक्या, जिने, खोलीतील विभाजक यांसाठी होतो.

(अ) कडीपाट व तक्तपोशी : इमारतींच्या तलरचनेत (उदा., जमीन पाटणी) लाकडी तुळ्या, कड्या व पाट (फळ्या) वापरतात. सामान्यतः ३ ते ४ मी. गाळाच्या तक्तपोशीसाठी ४० सेंमी. अंतरावर कड्या ठेवतात. कड्यांची रुंदी भाराप्रमाणे ५ ते ८ सेंमी. व उंची गाळ्याच्या प्रमाणात १० ते १५ सेंमी असते. तक्तपोशीचा गाळा मोठा असल्यास २ ते २.५ मी. अंतरावर तुळ्या ठेवून त्यांवर वरीलप्रमाणे कड्या ठेवतात. कड्यांच्या वर २० मिमी. जाडीच्या खोबणजीभ पद्धतीने जोडलेल्या लाकडी फळ्या तलपृष्ठ म्हणून वापरतात (आ. ३). खोबण-जीभ पद्धतीचा फायदा म्हणजे वरच्या मजल्यावरील धूळ व कचरा खाली गळत नाही, तसेच एका फळीवर येणारा भार बाजूच्या दोन्ही फळ्यांवर घालवता येतो. लाकडी पूल, जहाजे, नृत्यगृहे, रंगमंच यांच्या तक्तपोशी लाकडीच वापरल्या जातात. लाकडी फळ्यांचे विटा किंवा फरशीसारखे तुकडे करून ते कलात्मक रीत्या जोडून तयार केलेल्या तक्तपोशी सुंदर व आकर्षक दिसतात. थंड प्रदेशात लाकडी तक्तपोशीमुळे उबदारपणाही मिळतो. नृत्यगृहातील किंवा रंगमंचाच्या लाकडी तक्तपोशीमुळे आवश्यक तो ध्वनि-परिणाम निर्माण करता येतो. अन्य साहित्याच्या (दगड, विटा किंवा काँक्रीटच्या) तुलनेने लाकडी तक्तपोशी खूपच लवचिक, नरम व कमी निसरडी असल्याने रंगमंचावरील पात्रांना वावरायला सुखकर आणि नृत्यास सुयोग्य ठरतात. लाकडी तक्तपोशी सर्वसाधारणपणे वरच्या मजल्यासाठी वापरली जाते. लाकडी इमारतींमध्ये तळ मजल्यास जमिनीतील आर्द्रता व उंदीर, घुशी आणि वाळवी यांपासून संरक्षण मिळविण्याची प्रामुख्याने काळजी घ्यावी लागते. डेहराडून येथील वनसंशोधन संस्थेने या दिशेनेही संशोधन केले असून त्यासाठी बांधणीची योग्य अशी पद्धतही सुचवली आहे.

(आ) छप्परे : ज्या भिंतीवर छप्पर घ्यावयाचे असेल त्यांमधील गाळ्यानुसार छप्पराची रचना ठरते. हा गाळा ३ मी. पेक्षा कमी असल्यास, साधे लाकडी वासे ३० सेंमी. अंतरावर ठेवून ते वरच्या बाजूस आढ्यावर तर खालच्या बाजूस भिंतीवर आधारून त्यांवर आडव्या पट्ट्या आणि त्यांवर कौले अशा एकेरी छप्पराची रचना असते [आ. ४ (अ), (आ)]. छप्पराचा ढाळ एका बाजूस किंवा दोन्ही बाजूंस असू शकतो. गाळा ३ मी. पेक्षा जास्त असल्यास व ढाळही जास्त असल्यास वाशांमधील संकोची भार खालच्या बाजूस भिंतीवर आडवा रेटा देतो. अशा वेळी वाशांचे पाय ताण-तुलेने जोडतात [आ. ४ (इ)]. ही पद्धत ४ मी. गाळ्यांपर्यंत सोयीची ठरते. काही वेळा वासे पायापासून जरा वरच्या बाजूस गळ-तुलेने जोडतात [आ. ४ (ई)]. त्याचा आकार इंग्रजी A अक्षरासारखा दिसतो. या जोडणीमुळे मध्यावर भरपूर मोकळी जागा मिळते. ५ मी. पेक्षा जास्त गाळा असल्यास वाशांना आडव्या तुलांचा आधार देऊन त्या कडेला चांदई भिंतीवर व मधे कैच्यांवर आधारल्या जातात. वाशांना आधार देणाऱ्‍या या तुलांना पाखाडे किंवा पाख-तुला म्हणतात व असे छप्पर दुहेरी छप्पर म्हणून ओळखले जाते [आ. ४ (उ).].

लाकडी कैच्यांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. ९ मी. गाळ्यापर्यंत एक स्तंभी तर ९ ते १३ मी. गाळ्यासाठी द्विस्तंभी कैच्या वापरतात (आ. ५). छप्पराच्या आत पोटमाळा घ्यावयाचा असल्यास अशा द्विस्तंभी कैचीचा उपयोग होतो. गाळा त्याहून जास्त असून छप्पराखाली मोठी खोली घ्यावयाची असल्यास दुढाळी (फ्रांस्वा मांसार या फ्रेंच वास्तुशिल्पज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्‍या) कैचीचा (आ. ६) उपयोग केला जातो. [⟶छप्पर].

(इ) दरवाजे, खिडक्या : आजच्या युगात इमारतीच्या विविध घटकांसाठी पोलाद, काँक्रीट, दगड व विटा यांचा वापर होत असला, तरी दरवाजे मात्र अनिवार्यपणे लाकडीच वापरतात. कोणत्याही दरवाज्याचे मुख्य भाग म्हणजे भिंतीत बसविली जाणारी दरवाज्याची लाकडी चौकट, दरवज्याच्या झडपा किंवा दारे. दरवाज्याची चौकट ही माथ्याकडील आडवा शीर्षदंड व बाजूचे दोन स्तंभदंड यांनी युक्त असते (आ.७). खऱ्‍या अर्थाने चौथरा आणि पायाकडील दंड (तलदंड) म्हणजे जुन्या घरांमधून आढळणारा उंबरा हल्ली नसतो. भिंतीचे बांधकाम होत असतानाच दरवाज्याची चौकट उभी करून दरवाजा भिंतीपासून निघू नये म्हणून दोन्ही बाजूंना बंधक-पट्ट्या जोडून त्या भिंतीत गुंतवल्या जातात. तसेच चौकटीस उंबरा नसल्यास उभ्या स्तंभदंडाच्या खाली उभ्या लोखंडी किंवा लाकडी खुंट्या ठेवून त्या जमिनीत-तळात-गुंतविल्या जातात. चौकटीच्या शीर्षदंडाची टोके कानासारखी उभ्या स्तंभदंडाबाहेर येऊन ती भिंतीत गुंतविली जातात. दरवाज्यास वातायन (हवा खेळती राहण्यासाठी वरच्या बाजूस असणारी झडपेसारखी योजना) ठेवायचे असल्यास आणखी एक आडवा उपशीर्ष दंड ठेवावा लागतो. भिंतीच्या बांधकामाला चिकटून राहणारी चौकटीची बाजू व टोके यांना संरक्षण म्हणून डांबर लावले जाते.

झडपांच्या पृष्ठभागावर दरवाज्याचे तीन प्रमुख प्रकार होतात : (१) फळ्यांचा दरवाजा, (२) तक्त्याचा दरवाजा व (३) समपृष्ठ (फ्लश) दरवाजा. सर्वांत साधा दरवाजा म्हणजे उभ्या जोड फळ्यांचा दरवाजा. या फळ्या खोबण-जीभ पद्धतीने जोडतात. त्यांना वरच्या बाजूस , मध्यावर तसेच खालच्या बाजूस आडव्या ताणफळ्या जोडतात (आ.८). वरच्या व खालच्या ताणफळीला लांब कानाची गार्नेट बिजागरी बसवतात, तर मधल्या ताणफळीस अडसर, हस्तक (हँडल) किंवा मूठ बसवितात. दरवाजा रुंदीला मोठा असल्यास ताणपट्ट्यांच्या मधे दाब घेईल अशा कर्ण दिशेने तिरक्या नघ्री (बंधपट्ट्या) बसवितात (आ. ९). यामुळे दरवाजा ओघळत नाही व दरवाज्याचे वजन बिजागऱ्‍यांकडे जाते. याहून पुढचा प्रकार म्हणजे अशा दरवाज्याला चारही बाजूने चौकट देणे. अशा दरवाज्यास ताणयुक्त जोडफळ्यांचा नघ्री चौकटी दरवाजा (आ. १०) म्हणतात. फळ्यांची दारे दिसायला सुशोभित नसल्याने असे दरवाजे कमी महत्त्वाच्या ठिकाणी, तात्पुरत्या कामचलाऊ घरासाठी किंवा न्हाणीघर, परसातील दरवाजा अशा ठिकाणी वापरतात. निवासी इमारतींमध्ये साधारणतः तक्त्यांची चौकटी दारे वापरतात (आ.११). अशा दाराची चौकट दोन उभ्या पट्ट्यांची (ज्यास बाही म्हणतात) व जरूर तेवढ्या (साधारणपणे ३ ते ५) आडव्या बंधपट्ट्यांनी बनविलेली असते. या पट्ट्यांच्या मधल्या भागात लाकडी तक्ते असतात. तक्ते साधे उठाव नसलेले किंवा एक वा दोन्ही बाजूंना उठाव असलेले वापरतात. काही दरवाज्यांना वरच्या अर्ध्या बाजूस लाकडी तक्त्याऐवजी काचेची तावदाने वारतात. हल्ली प्रेक्षागृहे, हॉटेले, उपाहारगृहे, बँका, मोठी कार्यालये इत्यादींचे प्रमुख प्रवेश दरवाजे अखंड काचेचे वापरण्याची प्रवृत्ती आहे (आ. १२). अशा दरवाज्यांना ६ मिमी. जाडीची धक्क्याने फुटू नये म्हणून मुद्दाम टणक केलेली काच वापरून मधोमध आडवी हातपट्टी (किंवा ढकलपट्टी) लावतात. आधुनिक काळात मागणीच्या मानाने लाकडाची उपलब्धता जसजशी कमी होऊ लागली तसतसा कृत्रिम फळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर लाकडी बांधकामात होऊ लागला. चौकटीच्या मधल्या उरोभागात छोट्या पट्ट्या बसवून त्यांच्या दोन्ही बाजूंना प्लायवुड आसंजक पदार्थाने चिकटवून तयार केलेले समपृष्ठ दरवाजे (आ.१३) आजकाल अत्यंत लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यांचा पृष्ठभाग समतल असल्याने स्वच्छ दिसतो व पॉलिश केल्यावर सुरेख दिसतो. अशा दरवाज्यांना अंगचे कुलूपही बसविता येते. मात्र न्हाणीवर किंवा गच्चीच्या दरवाज्यांसाठी याचा वापर टाळावा कारण पाण्याच्या माऱ्‍याने अशी दारे कुजतात.

आ. ५. लाकडी कैच्या : (अ) एकस्तंभी (आ) द्विस्तंभी.
आ. ६. मांसार दुढाळी कैची
आ. ७. लाकडी दरवाज्याची चौकट (आकृतीतील चौकटीचा डावा भाग दरवाज्याला उंबरा असणारा व उजवा भाग उंबरा नसणारा दाखविला आहे) : (१) शीर्षदंड, (२) स्तंभदंड, (३) तलदंड-उंदरा, (४) बंधक, (५) खुंटी.
आ.८ ताणयुक्त जोड फळीचा दरवाजा : (१) वरची ताणफळी (२) गार्नेट बिजागरी (३) मधली ताणफळी (४) खालची ताणफळी
आ. ९. ताणयुक्त जोडफळीचा नघ्री दरवाजा : (१) ताणफळी, (२) नघ्री, (३) बिजागरी. / आ. १० ताणयुक्त जोडफळीचा नघ्री चौकटी दरवाजा : (अ) आतील बाजू (आ)बाहिरील बाजू.
आ.११. तक्त्यांच्या चौकटी दरवाजांचे विविध प्रकार : (१) बाही, (२) शीर्षपट्टी, (३) उपबाही, (४) सांधा तक्ता, (५) बंधपट्टी, (६) तळपट्टी, (७) उठावाचा तक्ता, (८) काच.

दरवाज्यांची उघडझाप करण्याची सामान्य पद्धत म्हणजे दाराच्या एका कडेला बिजागरी लावून ती लाकडी चौकटीला जोडणे व दुसऱ्‍या उघडझाप होणाऱ्‍या बाजूस अडसर, फिरकी, रोधिनी (लॅच) किंवा अंगचे कुलूप बसवितात. यास एकेरी दरवाजा म्हणतात. दुहेरी दरवाजा दोन झडपांचा असून त्या चौकटीच्या समोरासमोरच्या बाजूंस बिजागऱ्‍यांनी बसवितात व अडसर दोन झडपांच्या मध्ये येतो. काही वेळा बिजागऱ्‍यांनी बसविण्याऐवजी दारे आडवी सरकवून बाजूला करता येतील अशीही व्यवस्था करतात, तर काही वेळा अनेक अरुंद झडपा एकमेकींना बिजागऱ्‍यांनी जोडून शेवटची झडप दरवाज्याच्या चौकटीस जोडतात. यास घडीचा दरवाजा म्हणतात.

लाकडी खिडक्यांची रचना आणि प्रकार प्रायः दरवाज्यांप्रमाणे असतात. मात्र दरवाज्याच्या चौकटीला तलदंड नसला, तरी खिडकीच्या चौकटीला मात्र तलदंड आवश्यक असतो. खिडक्यांचा उपयोग हवा व उजेड यांसाठी असल्याने बाहेरचे दिसण्यासाठी व प्रकाशासाठी झडपांना लाकडी तक्त्यांच्या ऐवजी काचेची तावदाने वापरतात व मुख्य झडपांच्या बरोबर वायुवीजनासाठी (हवा खेळती राहण्यासाठी) वरच्या बाजूस वातायनाची व्यवस्था असते. [⟶खिडकी द्वार].

 

आ. १२. अखंड काचेचा चौकटी दरवाजा : (अ) बाहेरील बाजू, (आ) आतील चौकट.

(ई) जिने: लाकडी जिने हे टप्प्यासाठी लाकडी फळ्या व त्यांना आधार देण्यासाठी तिरक्या पाटल्या (आधारतुला) यांनी युक्त असतात. उघड्या जिन्यांमध्ये फक्त पायसरांसाठी आडव्या फळ्या असतात, तर बंदिस्त जिन्यांमध्ये दोन पायऱ्‍यांच्या पायसरांमध्ये उभ्या फळ्याही (अंधारी) असतात. या फळ्या पायऱ्‍यांनाही आधार देत असल्याने हा जिना मजबूत असतो पण चढण्याच्या सोयीसाठी पायसराची फळी ही अंधारीच्या जरा पुढे येईल अशी बसवावी लागते (आ.१४). पायसर व अंधारी यांच्या फळ्या कडेला पाटलीत आडव्या व उभ्या खाचा घेऊन त्यात पाचरीने अडकवून किंवा आधार बैठका वापरून स्क्रू किंवा खिळ्यांच्या साहाय्याने पक्क्या बसवितात. या प्रकारात जिन्याचे पायसर बाजूच्या दिशेने झाकले जातात. शोभेया दृष्टीने ते दिसायला हवे असल्यास पाटलीलाच वरच्या बाजूने  पायऱ्‍यांप्रमाणे खाचा घेऊन त्यावर पायऱ्‍या (पायसर) बसविल्या जातात. लाकडी जिने १ मी. पेक्षा जास्त रुंद असल्यास पायऱ्‍यांना दोन्ही टोकांस आणि मध्यावरही आणखी एक आधार देतात. त्यासाठी मध्यावर आणखी एक तिरकी पाटली वापरतात. जिन्याच्या बाजूने काठडा उभा केला जातो. काही ठिकाणी हे कठडे वेगवेगळ्या प्रकारे  शोभिवंत व अलंकारिक पद्धतीचे बनवून जिन्याची शोभा वाढविली जाते.

साधारणपणे लाकडी जिने दोन मजल्यांमधील वा दोन रमण्यांमधील अंतराइतक्या लांबीचे बनवितात आणि रमण्याकडील तुळईच्या आधारे उभे करतात. रमण्याच्या तुळईला कधीकधी सोपान स्तंभाने आधार दिला जातो. लाकडी जिन्याचा मुख्य फायदा म्हणजे ते थोड्या जागेत सामावू शकतात. सहज बनविता व बसविता येतात आणि जरूर वाटल्यास त्यांना पाहिजे तसे शोभिवंत स्वरुप देता येते. [⟶जिने].

आ.१३ समपृष्ठ दरवाजा : (१) स्तरयुक्त किंवा धन लाकडाचा गाभा, (२) प्लायवुडाचा पृष्ठभाग, (३) मोठा केलेला काठ.
आ.१४ लाकडी जिना : (१) पायसर, (२) अंधारी, (३) पाटली.

 

आ. १५. काँक्रीट कामासाठी लागणारे साचे : (अ) पदाधार साचा : (१) मजबूत तार, (२) बंधक, (३) फळी, (आ) स्तंभ साचा : (१) बोल्ट, (२) जोखड (इ) तुळई व लादी साचे : (इ१) तुळई साचा : (१) ताप्तुरती पट्टी, (२) वडोद, (३) बंधक पट्टी, (इ२) तुळई साचा : (१) तळ साचा, (२) लादी साचा, (३) सम वासा, (इ३) तुळई व लादी साचा : (१) लादी सांचे, (२) तुळई साचा, (३) वडोद, (४) सम वासा, (५) बंधक पट्टी ,(६) बांबू बंधक.

 

आ.१६. भिंतीच्या बांधकामात लागणारा पहाड (परांची) : (१) सम वासा, (२) लंब वासा, (३) बंधक, (४) वाळू भरलेले
आ. १७. जुन्या बांधकामाच्या दुरूस्तीसाठी लागणारे टेकू.

 

(उ) लाकडी विभाजक व लाकडी तावदाने : कार्यालयीन इमारतींमध्ये आतील जागेच्या विभागणीसाठी किंवा अधिकाऱ्‍यांच्या कक्षांसाठी (केबीन्ससाठी) दगड-विटांच्या भिंतींऐवजी लाकडी विभाजक वापरतात. हे जाडीला कमी व वजनात हलके असल्याने छोटे छोटे कक्ष तयार करण्यास अतिशय उपयुक्त असतात. हे विभाजक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात ते संपूर्ण लाकडी (म्हणजे लाकडी चौकटीमध्ये लाकडी फळ्या किंवा तक्ते बसविलेले), तर दुसऱ्‍या प्रकारात लाकडी चौकटीवर एका किंवा दोन्ही बाजूला अँस्बेस्टसाचे किंवा लोखंडी पत्रे अथवा प्लायवुडाचे तक्ते बसवितात. हे पहिल्या प्रकारापेक्षा जास्त हलके, ध्वनिरोधक व अग्निरोधक असतात.

दरवाजे व खिडक्यांची तावदाने सुबकपणासाठी व हलकेपणासाठी लाकडाची करतात ह सुपरिचितच आहे. याशिवाय बँकात आणि दुकानांतून देवघेवीच्या व्यवहारासाठी लागणारी दीर्घमेजेही (काउंटर्सही) लाकडी फलकाची करतात. शिवाय उच्चपदस्थ अधिका ऱ्‍यांच्या कार्यालयीन कक्षांच्या भिंती व छते सुबक आणि सुंदर अशा विरचित लाकडी तक्त्यांनी समजवितात. जुन्या घरांमध्ये पूर्वी पडवी (व्हरांडा) आवेष्टित करण्यासाठी भिंतींऐवजी लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या वापरत असत. याचा फायदा असा की, बाहेरची बाजू आतील व्यक्तीस दिसते, पण बाहेरून लांबून आतले दिसत नाही. आता मात्र अशा जाळ्यांची जागा सिमेंटच्या जाळ्यांनी घेतली आहे.

वरील सर्व महत्त्वाच्या उपयोगांशिवाय इमारतीच्या बांधकामात काँक्रीटच्या कामासाठी लागणारे विविध फर्मे व साचे (उदा., पदाधार साचा, स्तंभ साचा, तुळई साचा, लादी साचा आणि आडके (आ.१५), भिंतीच्या बांधकामास लागणारे पहाड (आ.१६), जुन्या बांधकामाच्या दुरूस्तीसाठी लागणारे आधार सांगाडे व टेकू (आ.१७) हे सर्व लाकडी फळ्या, तुळ्या, बडोद, पाटल्या, वासे, मुंढे यांचा उपयोग करूनच तयार केले जातात. चर-खोदाईत बाजूच्या मातीला आधार देण्यासाठीही फळ्या आणि धिरायुक्त पार्श्वफलकाचा (आ.१८) वापर केला जातो. पुलाच्या बांधकामात पायातील स्तंभिका, कैच्या, कमानी, तुळ्या, बहाल व तक्तपोशी यांसाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असे पण आता हा वापर फक्त वनप्रदेशात पुलांच्या वरील सर्व भागांसाठी, तर इतर ठिकाणी पुलांच्या बहालांना तात्पुरता आधार देणारे मचाण किंवा घडवंची प्रस्तंभ (आ.१९) यांसाठी होतो. पाण्याच्या प्रवाहाने होणारी किनाऱ्‍याची धूप वाचविण्यासाठी लाकडी खुंट ओळीने रोवून त्यांमागे डबर भरतात. काही वेळेला कुंडन बांधासाठी सुद्धा लाकडी सांगाड्यात डबर घालून तो तयार करतात [⟶पाया].

(उ) लाकडी विभाजक व लाकडी तावदाने : कार्यालयीन इमारतींमध्ये आतील जागेच्या विभागणीसाठी किंवा अधिकाऱ्‍यांच्या कक्षांसाठी (केबीन्ससाठी) दगड-विटांच्या भिंतींऐवजी लाकडी विभाजक वापरतात. हे जाडीला कमी व वजनात हलके असल्याने छोटे छोटे कक्ष तयार करण्यास अतिशय उपयुक्त असतात. हे विभाजक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात ते संपूर्ण लाकडी (म्हणजे लाकडी चौकटीमध्ये लाकडी फळ्या किंवा तक्ते बसविलेले), तर दुसऱ्‍या प्रकारात लाकडी चौकटीवर एका किंवा दोन्ही बाजूला अँस्बेस्टसाचे किंवा लोखंडी पत्रे अथवा प्लायवुडाचे तक्ते बसवितात. हे पहिल्या प्रकारापेक्षा जास्त हलके, ध्वनिरोधक व अग्निरोधक असतात.

दरवाजे व खिडक्यांची तावदाने सुबकपणासाठी व हलकेपणासाठी लाकडाची करतात ह सुपरिचितच आहे. याशिवाय बँकात आणि दुकानांतून देवघेवीच्या व्यवहारासाठी लागणारी दीर्घमेजेही (काउंटर्सही) लाकडी फलकाची करतात. शिवाय उच्चपदस्थ अधिका ऱ्‍यांच्या कार्यालयीन कक्षांच्या भिंती व छते सुबक आणि सुंदर अशा विरचित लाकडी तक्त्यांनी समजवितात. जुन्या घरांमध्ये पूर्वी पडवी (व्हरांडा) आवेष्टित करण्यासाठी भिंतींऐवजी लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या वापरत असत. याचा फायदा असा की, बाहेरची बाजू आतील व्यक्तीस दिसते, पण बाहेरून लांबून आतले दिसत नाही. आता मात्र अशा जाळ्यांची जागा सिमेंटच्या जाळ्यांनी घेतली आहे.

वरील सर्व महत्त्वाच्या उपयोगांशिवाय इमारतीच्या बांधकामात काँक्रीटच्या कामासाठी लागणारे विविध फर्मे व साचे (उदा., पदाधार साचा, स्तंभ साचा, तुळई साचा, लादी साचा आणि आडके (आ.१५), भिंतीच्या बांधकामास लागणारे पहाड (आ.१६), जुन्या बांधकामाच्या दुरूस्तीसाठी लागणारे आधार सांगाडे व टेकू (आ.१७) हे सर्व लाकडी फळ्या, तुळ्या, बडोद, पाटल्या, वासे, मुंढे यांचा उपयोग करूनच तयार केले जातात. चर-खोदाईत बाजूच्या मातीला आधार देण्यासाठीही फळ्या आणि धिरायुक्त पार्श्वफलकाचा (आ.१८) वापर केला जातो. पुलाच्या बांधकामात पायातील स्तंभिका, कैच्या, कमानी, तुळ्या, बहाल व तक्तपोशी यांसाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असे पण आता हा वापर फक्त वनप्रदेशात पुलांच्या वरील सर्व भागांसाठी, तर इतर ठिकाणी पुलांच्या बहालांना तात्पुरता आधार देणारे मचाण किंवा घडवंची प्रस्तंभ (आ.१९) यांसाठी होतो. पाण्याच्या प्रवाहाने होणारी किनाऱ्‍याची धूप वाचविण्यासाठी लाकडी खुंट ओळीने रोवून त्यांमागे डबर भरतात. काही वेळेला कुंडन बांधासाठी सुद्धा लाकडी सांगाड्यात डबर घालून तो तयार करतात [⟶पाया].

पुनर्रचित लाकूड : एकाच झाडाच्या वेगवेगळ्या ओंडक्यांमधून घेतलेल्या वेगवेगळ्या तुकड्यांचे-छेदांचे सारंचनिक गुणधर्म सारखे असतातच असे नाही. गाभ्याकडील भाग, सालीजवळील भाग, खोडाकडील भाग, गाठ, चिरा, सळांची दिशा, झाडाचे आयुर्मान अशा वेगवेगळ्या कारणांनी हे गुणधर्म वेगवेगळे असू शकतात. गुणधर्मातील ही असमानता सांरचनिक अभिकल्पाच्या आड येते व लाकडाचा इष्टतम उपयोग होऊ शकत नाही. नैसर्गिक लाकडातील हे दोष टाळण्यासाठी व उपलब्ध लाकडाचा जास्तीत जास्त चांगल्या तऱ्‍हेने उपयोग होण्यासाठी व लाकडाचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने संस्कारित व पुनर्रचित लाकडाची निर्मिती सुरू झाली. आजच्या युगात या पुनर्रचित लाकडाने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त करून घेतले आहे. अशा पुनर्रचित लाकडामध्ये नैसर्गिक लाकडाचे दोष बऱ्‍याच प्रमाणात टाळून संरचनात्मक गुण वाढविता येतात.

पुनर्रचित लाकडामध्ये प्लायवुड, ठोकळी फलक, कठीण फलक (हार्डबोर्ड) आणि नरम फलक असे विविध प्रकार उपलब्ध आहेत [⟶प्लायवुड]. प्लायवुडातील दोन स्तरांतील सळ एकमेकांस काटकोनात असल्याने हे फलक दोन्ही दिशांनी मजबूत असतात. लाकड्याच्या सळांचे नैसर्गिक सौंदर्य तक्त्यावर आणण्यासाठी अशा पातळ पापुद्याची चादर दर्शनी बाजूस पृष्ठावरण म्हणून वापरून पातळ प्लायवुड तक्ता (व्हिनीयर बोर्ड) तयार करतात. असे तक्ते पॉलिश केल्यावर मोहक, सुंदर आणि आकर्षक दिसतात. यांचा उपयोग इमारतींमध्ये विशेषकरून भिंतींना लावायच्या तावदानांसाठी होतो.

आ. १८. चर-खोदाईच्या कामात लागणारे पार्श्वफलक.
आ. १९. पुलाच्या बहालांना तात्पुरता आधार देणारे लाकडी वडवंची प्रस्तंभ.
आ. २०. विविध स्तरयुक्त लाकडी तुळ्यांचे छेद.

ठोकळी फलक प्रामुख्याने समपृष्ठ दरवाजे, छत व फर्निचर यांमध्ये फळी म्हणून तसेच कक्ष विभाजकासाठी वापरतात. ठोकळी, कठीण व नरम या सर्व फलकांचा लाकडी फलक म्हणून जेथे जेथे उपयोग करता येईल तेथे तेथे केला जातो.

लाकडी फळ्या एकीवर एक सरसाने चिकटवून जोडून तयार केलेले स्तरयुक्त लाकडी बहाल व कमानी परदेशात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात (आ. २०). भारतात मात्र असे स्तरयुक्त सांरचनिक घटक विशेष प्रचलित नाहीत.

लाकूडकामाचे अंत्यसंस्करण : लाकडाची शेवटची सफाई, अंत्यरुपण व टिकाऊपणा आणण्यासाठी व अग्निरोधकता वाढविण्यासाठी करावे लागणारे संस्करण, रंगरंगोटी, पॉलिशकाम इ. गोष्टींचा यात समावेश होतो. लाकडाचे नैसर्गिक रेषासौंदर्य वाढवून त्याचे बाहेरील रासायनिक, घर्षणादि व पर्यावरणीय परिणामांपासून संरक्षण करणे हा मुख्य उद्देश अखेरच्या सफाईत व अंत्यरुपणात असतो. कृत्रिम उपायांनी लाकडाचे नैसर्गिक सौंदर्यही वाढविता येते. सुरूवातीस रंध्याच्या किंवा बारीक अशा प्रकारच्या घासकागदाने (सँड पेपरने) घासून बाहेर दिसणारी छिद्रे बुजवली जातात. लाकडाचा काही भाग कुजलेला अगर कठीण गाठीचा असल्यास तेवढा भाग काढून गाठीच्या भागांत आकारमानाप्रमाणे चांगल्या लाकडाचे गट्टू बसवितात किंवा लांबी वा मेण भरून पृष्ठभाग सारखा करतात व त्यावर आवश्यकतेनुसार व पसंतीनुसार तेल, व्हार्निश पॉलिश किंवा रंग लावतात. काही लाकडात चिकट अंश असल्यास पॉलिश किंवा रंग वाळण्यात व्यत्यय येतो व कधी कधी काही भागास हे रंग किंवा रोगण बरोबर लागत नाही, तर काही भागांवर डाग पडतात. हे टाळण्यासाठी क्षारयुक्त (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्‍या संयुगाने युक्त) द्रव किंवा कार्बनी (सेंद्रीय) द्रव अगोदर लावून लाकडाचा पृष्ठभाग साफ करतात. त्यामुळे जंतुसंसर्गापासूनही लाकाडाचे संरक्षण होते.

पावसाच्या पाण्याने पृष्ठभाग खराब झाल्यास विरंजन (मूळ रंग काढून टाकण्याची क्रिया) करतात. विरंजन करणारी द्रव्ये कुंचल्याने, फवाऱ्‍याने किंवा नुसती बुडवून लावतात.

वाळवी व इतर विनाशक कीटक व जंतू यांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत सुपरिचित उपाय म्हणजे डांबरापासून मिळविलेले क्रिओसोट तेल लाकडामध्ये जिरवणे हा होय. ही क्रिया अलीकडे दाबभट्ट्यांमध्ये आर्द्रतारहित केलेल्या लाकडावर मोठ्या दाबाखाली करतात. या प्रक्रियेमुळे लाकूड बरीच वर्षे टिकते. म्हणून इमारतीतील महत्त्वाच्या लाकडी घटकांवर ही क्रिया करणे निश्चितच अत्यावश्यक ठरते. जमिनीमध्ये गाडले जाणारे खुटं किंवा पाण्यात जाणारे लाकडी घटक यांना डांबर लावणे अत्यावश्यक असते. त्यामुळे ते कुजत नाहीत व जास्त काळ टिकतात.

लाकडामध्ये अग्निरोधक्षमता निरनिराळ्या अग्निरोधी द्रव्यांचा लेप लावून निर्माण करता येते पण ते शक्य नसल्यास शक्य तो जास्त आकारमानाचे मोठे कापीव छेद वापरणे, सर्व घटकांच्या कडा तासून गोल करणे या उपायांनीही लाकडाची ज्वालाग्रहणाची प्रवृत्ती कमी करता येते. [⟶ अग्निरोधन].

कित्येक वेळेला नैसर्गिक असंस्कारित लाकडाचे आकारमान हवेच्या परिणामाने बदलते  ज ते वाकडे-तिकडे होते. याला कारण लाकडातील आर्द्रतेत होणारा बदल हे होय. तो टाळण्यासाठी व लाकडात स्थिरता आणण्यासाठी अनेक प्रकारची स्थिरक द्रव्ये वापरतात. त्यामुळे बाहेरील अद्रता लाकडात जाण्याची किंवा लाकडातील आर्द्रतेचे प्रमाण बदलण्याची गती निश्चितच कमी केली जाते.

लाकडी बांधकामसंबंधी भारतातील आधुनिक काळातील संशोधन : भारतातील डेहराडून येथील वनसंशोधन संस्थेमध्ये लाकूड व त्याचा इमारती बांधकामातील उपयोग यावर कित्येक वर्षे खूप संशोधन चालू असून भारतात उपलब्ध असलेले लाकडाचे प्रकार, उपलब्धतेचे प्रमाण व ठिकाण, त्यांचे गुणधर्म, सुयोग्य असे वर्गीकरण, कोणते लाकूड कोणत्या कामात कसे वापरता येईल याची तपासणी व सूचना, भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या लाकडी तुकड्यांचा संरचना बांधणीसाठी उपयोग कसा करून घेता येईल याची तपासणी, त्या संबंधाने लागणाऱ्‍या सुयोग्य अशा जोडकामाची तपासणी, कीलसंधित लाकडी संरचनाची बांधणी व कार्यक्षमतेची तपासणी, इतकेच काय पण वाळवी, उंदीर धुशी यांच्यापासून लाकडी बांधकामाचे संरक्षण कसे करता येईल इ. बाबतींत बहुमोल असे कार्य झाले आहे. ३ मी. ते ३० मी. गाळ्याच्या लाकडी कीलसंधित कैच्या व कमानी, १५ मी. पर्यंत गाळ्याचे पुलाचे जालक-बहाल, बस स्थानकाचे लाकडी प्रक्षेप बहाली सांगाडे, क्रीडागाराच्या छपराच्या कैच्या, विद्युत् शक्ती प्रेषणाचे स्तंभ व मनोरे, २० मी. लांबीच्या गाळ्याची लाकडी पट्ट्यांची हिरकाकृती मेघडंबरी (लॅमेला छप्पर) इ. विविध संरचनांचे अभिकल्प तयार करण्यात आले असून त्यांचा देशामध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वापरसुद्धा केला गेला आहे.

पोलादाची वाढती कमतरता पाहता पोलादाची काटकसर करण्याच्या दृष्टीने प्रबलित काँक्रीटच्या कामामध्ये पोलादी सळ्यांऐवजी बांबूचा वापर करण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त संशोधन झाले असून असे बांबू-काँक्रीट अल्पभारी व दुय्यम संरचनांसाठी वापरणे शक्य असून ते अल्पखर्ची असल्याचेही आढळून आले आहे. यानुसार जेथे लाकूड सहज उपलब्ध असेल अशा प्रदेशांतील पुलांसाठी बांबू-काँक्रीटची लादी व लाकडी उभार पटलयुक्त संयुक्त टी-बहालाचा अभिकल्पही सादर करण्यात आला असून या दिशेने आणखी संशोधन चालू आहे.

पहा : प्लायवुड लाकूड सुतारकाम.

संदर्भ :

1. Abbett, R. W., Ed.,American Civil Engineering Practice. Vol. III, New York, 1957.

2. F. W. Dodga Corp. Timber Design and Construction Handbook, New York, 1958.

3. Hansen, H. J.Modern Timber Design, New York, 1948.

4. Hansen, H. J. Ed, Timber Engineer’s Handbook, New York, 1948.

5. Indian Standards Institute, I. S. 883-1970 : Code of Practice for Use of Structural Timber in Building. New Delhi, 1970.

6. Jacoby, H. S Davis, R. Timber Design and Construction, New York, 1949.

7. Masani, N. J. and others, Timber Engineering Manual, 2 Parts Dehra Dun.

8. Merritt, F. S., Ed., Building Constructions Handbook, New York, 1958.

9. Moxley, R. Mitchell’s Elementary Building Construction,Bombay, 1964.

10. National Building Organization, Handbook for Building Engineers, New Delhi, 1966.

11. Sane, Y. S. Construction Engineers, Bombay. 1966.

12. U. S. Department of Agriculture, Handbook No. 72 : Wood Handbook, Washington, 1955.

13. साने, य. शं. वास्तुरचना, पुणे, १९७३.

महाजन, कृ. द. कर्वे, श्री. रा.