जिने : दगडात खोदलेल्या किंवा दगड, ओंडके एकमेकांवर रचून केलेल्या वेलांना वा दोरांना गाठी मारून वा दोन दोरांत काठ्या अडकवून केलेल्या एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवरून दुसऱ्या पातळीवर चढण्या-उतरण्याच्या सोईमधूनच प्रगत जिन्याचा जन्म झाला. जिन्याच्या उपयुक्ततेबरोबरच त्याने शहराचे किंवा इमारतीचे सौंदर्य वाढेल, अशी जिन्याची रचना गेल्या काही शतकांतच सुरू झाली. नद्या, पुष्करणी यांवरील अजस्त्र व सुबक दगडी घाट प्राचीन मंदिरांच्या, दिल्लीच्या जुम्मा मशिदीच्या किंवा मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील पायऱ्या तसेच स्वराज्यप्राप्तीनंतर बांधलेल्या बंगलोरच्या विधानसौधासमोरील पायऱ्या ही याची उदाहरणे आहेत. कित्येक बागांमध्येही शोभा वाढविण्यासाठी पायऱ्याचा उपयोग केलेला आहे. जिना हा इमारतीचा एक महत्वाचा भाग असल्याने तो दर्शनी भागात ठेवून, त्याला योग्य प्रकारे विविध आकार देऊन अथवा  त्यावर नक्षीकाम करून सुशोभित करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. जिन्याला सोपान अथवा दादर असेही म्हणतात. दगड, विटा, लाकूड या परंपरागत साहित्याबरोबरच सिमेंट काँक्रीट, लोखंड, निष्कलंक पोलाद, ॲल्युमिनियम यांचाही जिन्यांच्या बांधणीत वापर होत असून साहित्याच्या वापरानुसार जिन्यांचे वर्गीकरण करण्याची प्रथा आहे.

आ. १. जिन्याचे घटक : (१) जमीन, (२) पायसर, (३) चढ, (४) अंधारी, (५) नाकाड, (६) गराद, (७) आधाररूळ, (८) नैला, (९) झेप, (१०) रमणा, (११) पाटली.घटक :जिना अनेक पायऱ्यांचा बनतो. पायसर, चढ, अंधारी आणि नाकाड मिळून पायरी गराद, आधाररूळ व नैले मिळून कठडा जिन्याच्या सलग एकसर पायऱ्या म्हणजे झेप दोन झेपांना जोडणारा चौथरा म्हणजे रमणा जिन्याच्या पायऱ्याच्या दोन्ही बाजूंस असलेले उतरते  आधार म्हणजे पाटल्या, असे जिन्याचे घटक असतात (आ. १). जिन्याच्या सभोवर भिंतीनी मर्यादित केलेल्या जागेला जिनाघर म्हणतात. 

आ. २. जिन्यांच्या काही रचना : (अ) बेचकी रचना, (आ) प्रांगणी रचना, (इ) वक्राकार रचना.रचना व प्रकार : जिन्याची जुनी व सोपी रचना म्हणजे सर्व पायऱ्या एका झेपेत ठेवणे. सु. पंधरा पायऱ्यांपेक्षा जास्त पायऱ्या असल्या, तर मधे रमणा करून दोन झेपा सरळ रेषेत किंवा कोनात ठेवून जिन्याची रचना करतात. दोन झेपा एकमेकींशी १८० अंशांच्या कोनात वळवून केलेली बेचकी रचना ( आ. २ अ ) जास्त प्रमाणात वापरली जाते. याचे मुख्य कारण या जिन्याकरिता कमी जागा लागते हे होय. दोन अलग रमणे ठेवून त्यांवर जिन्याच्या तीन झेपा एकमेकींशी काटकोनात बसवून प्रांगणी जिना करतात ( आ. २ आ.). नैले न बसविता एकसरी कठड्याचा जिना करतात त्याला वक्राकार जिना (आ. २ इ) म्हणतात व एका खऱ्या किंवा कल्पित नैल्यासभोवार मळसूत्री रचनेने पायऱ्या करतात त्याला गोलाकार जिना म्हणतात. दोन जाड बांबू, वासे अगर चौरस लाकडाच्या किंवा लोखंडी पाटल्यांमध्ये अरुंद पायसर व अंधारीविना उंच चढ असलेल्या पायऱ्यांच्या सुटसुटीत जिन्याला शिडी म्हणतात. हे जिन्यांचे मुख्य प्रकार आहेत. 

आ. ३. पाटलीवर पायसर बसविण्याचे प्रकार : (अ) कापलेल्या पाटल्या : (१) पायसर, (२) पाटली (आ) पाटलीवर तीर बसविणे : (१) पायसर, (२) पाटली, (३) तीर.दोन समांतर भिंतींत लाकडी वा दगडी पायऱ्या गुंतवून किंवा एका बाजूच्या भक्कम भिंतीत पायरीचे एक टोक गुंतवून पायऱ्या झुकत्या ठेवून किंवा दगडविटांच्या बांधकामाच्या माथ्यावर पायऱ्या ठेवून जिना करण्याच्या जुन्या पद्धती आहेत. अलीकडील काळात जिन्याच्या रुंदीच्या प्रमाणात दोन किंवा तीन पाटल्यांवर पायऱ्या आधारून जिने करतात. पाटल्यांची वरची कड पायसर बसेल अशी कापून ( आ. ३ अ) किंवा तिच्यावर तीर बसवून (आ. ३ आ) त्यावर पायरस बसवून जिना करण्याची एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीत लाकडी पाटलीला आतील बाजूस खोबणी घेवून त्यात पायऱ्या बसवून जिना करतात (आ. ४ अ). पाटल्या लोखंडी असल्या तर आतील बाजूस तीर बसवून त्यावर लाकडी, लोखंडी किंवा पूर्वनिर्मित काँक्रीटच्या पायऱ्या बसवितात (आ. ४ आ).आ. ४. पाटलीमध्ये पायसर बसविण्याचे प्रकार : (अ) आतून खोबणी घेणे : (१) पाटली, (२) पायसर (आ) लोखंडी पाटलीवर तीर बसविणे : (१) लोखंडी पाटली, (२) पायसर, (३) तीर.

 बिडाच्या अगर पूर्वनिर्मित सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या मध्यवर्ती नैल्यात ओवून किंवा पोलादी पायऱ्या मध्यवर्ती नैल्यावर वितळजोडाने (वेल्डिंगने) बसवून गोलाकार (सर्पिलाकार) जिने करतात (आ. ५). गोलाकार जिना घराच्या भिंतीवर किंवा जमिनीवर आधारून रुंद गोलाकार जिने करतात. त्यांना मध्यवर्ती नैला नसतो.आ. ५. गोलाकार (सर्पिलाकार) जिना. 

काँक्रीटचे जिने : जिन्याकरिता वापरावयाच्या बांधकाम साहित्यामध्ये प्रबलित (पोलादी सळ्यांचा सांगाडा वापरून बल वाढविलेल्या) सिमेंट काँक्रीटचा वापर दिवसेंदिवस वाढत असून त्याद्वारे निरनिराळ्या आकाराचे जिने सहजगत्या बांधता येतात. काँक्रीटचा जिना बांधताना जिन्याचे खालचे व वरचे टोक तुळईवर आधारून प्रबलित काँक्रीटची उतरती लादी ओततात व त्यावर त्याबरोबरच काँक्रीटच्या पायऱ्या ओततात. लादीच्या आधारास तुळई नसेल, तर उतरत्या लादीच्या सळया वाकवून रमण्यापुरेशा आडव्या नेऊन त्या पलीकडील भिंतीत अगर नजीकच्या तुळईत गुंतवितात (आ. ६). दुसऱ्या पद्धतीत प्रबलित काँक्रीटच्या दोन पाटल्या दोन्ही बाजूंना व त्यांवर किंवा त्यांच्या पोटात प्रबलित काँक्रीटच्या पायऱ्या ओततात. बेचकी पद्धतीचा काँक्रीटचा जिना मधल्या रमण्यासह वरच्या व खालच्या मजल्यांवर अर्धबहालासारखा पेलून एकसंध ओतता येतो.


आ. ६. प्रबलित सिमेंट काँक्रीटचा जिनाजिन्याबद्दलचे विनिर्देश : जिन्याने एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर होणारी वाहतूक सुलभ व सुरक्षितपणे व्हावी म्हणून जिन्यांचे अभिकल्प (आराखडे) करताना इमारतीच्या उपयोगानुसार पुढील प्रकारच्या शिफारसी (विनिर्देश) वापरतात. (१) पायसराची रुंदी व चढाच्या उंचीची दुप्पट यांची बेरीज ५८ सेंमी. किंवा पायसराची रुंदी व चढाची उंची यांचा गुणाकार ४२० ते ४३० यावा. (२) पायसर कमीत कमी २५ सेंमी. व चढ जास्तीत जास्त १९ सेंमी. असावा. (३) एकाच झेपेत १५ पेक्षा अधिक चढ असू नयेत. (४) जिन्याची रुंदी कमीत कमी ७५ सेंमी. व अडथळारहित उंची २·१ मी. असावी. सार्वजनिक वापराकरिता करावयाच्या जिन्यांच्या आकारावर, संख्येवर व साहित्यावर निर्बंध आहेत. 

फिरता जिना : (एस्कॅलेटर). वरखाली जा-ये करणाऱ्याची सतत रीघ असते अशा रेल्वे स्थानकासारख्या ठिकाणी फिरत्या पायऱ्यांचा जिना करतात. पायऱ्यांची उतरती अखंड माळ रहाटगाडग्यासारखी विद्युत्‌ चलित्राच्या (मोटरच्या) साहाय्याने फिरत असते. रमण्याजवळ पायसर व अंधारी उघडून रमण्याच्या पातळीत येते तेव्हा माणूस रमण्यावर उतरतो व उलगडलेली पायरी रमण्याखालील रहाटावरून वळून खालच्या दिशेकडे वाटचाल करते [→ फिरता जिना].

  

संदर्भ : 1. Indian Standard-1256, Code of Practice for Building By-laws, New Delhi, 1967.

  2. Indian Standard-1644, Code of Practice for Fire Safety of Buildings, New Delhi, 1960.

  3. National Building Organization, govt. of India, Handbook for Building Engineers in MetricSystems, New Delhi, 1966.

  4. Sane, Y. S. Construction Engineering. Vol. I, Poona, 1966.                  

कानिटकर, अ. गो.

विविध प्रकारचे जिने