बांडा, हेस्टिंग्जकामूझू:  (१४ मे १९०६ – ). आफ्रिकेतील मालावी प्रजासत्ताकाचा (पूर्वीचे न्यासालँड) पहिला पंतप्रधान आणि पुढे पहिला अध्यक्ष. चेवा जमातीतील एक गरीब कुटुंबात न्यासालँडमधील कासांगू जिल्ह्यात जन्म. प्राथमिक शिक्षण कासांगू येथील मिशनरी शाळेत घेऊन वयाच्या तेराव्या वर्षी तो जोहान्सवर्गला गेला. तेथे त्याने सु. ८ वर्षे सोन्याच्या खाणीत कारकुनाचे काम करीत रात्रीच्या शाळेत पुढील शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी पुढे अमेरिकेत गेला. अमेरिकेत त्याने मानवी वैद्यकातील एम्. डी. ही पदवी घेतली (१९३७). त्याच सुमारास तो शिकागो विद्यापीठात बांतू भाषेचा सल्लागार म्हणून काम करीत असे. अमेरिकेतून परत आल्यावर मानवी वैद्यकाचे विशेष उच्च शिक्षण घेण्यासाठी तो ग्रेट ब्रिटनला गेला. तेथे त्याने ग्लासगो व एडिंबर विद्यापीठांतून पदव्या घेतल्या आणि विझडन (इंग्लंड) येथे वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला. तेथे तो १९५३ पर्यंत होता तथापि न्यासालॅडमधील राजकीय घडामोडींशी त्याचा निकटचा संबंध होता. नव्याने स्थापन झालेल्या (१९४४) न्यासालँड आफ्रिकन काँग्रेसला त्याचा सक्रिय पाठिंबा होता. तो या पक्षासाठी निधी गोळा करीत असे व वेळोवेळी सल्लाही देत असे. त्याच्या राजकीय कारकीर्दीला या पक्षप्रवेशाने सुरूवात झाली. रेशल पॉलिसीज इन सदर्नं -होडेशिया हा शोधनिंबध १९५१ मध्ये प्रसिद्ध करून ऱ्होडेशियाच्या वांशिक धोरणावर त्याने टीका केली. १९५३ मध्ये द. ऱ्होडेशिया व न्यासालॅड यांचा संयुक्त संघ स्थापन करण्यात आला. त्या वेळी त्याने घाना येथील कुमासी भागातील गरीब झोंगो लोकांच्या शुश्रुषेस वाहून घेतले (१९५४–५८). १ ऑगस्ट १९५८ रोजी त्याची न्यासालँड येथील काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्याचे न्यासालँडमध्ये भव्य स्वागत झाले. त्याने संयुक्त संघाविरुद्ध देशभर प्रचार केला. ‘माझा स्वातंत्र्यलढा हा कोणत्याही जातीविरुद्ध नसून प्रचलित राज्यपद्धती व राज्यप्रणाली यांविरुद्ध आहे,’ असे तो म्हणे. परिणामतः न्यासालँडमध्ये अशांतता निर्माण होऊन आणीबाणी जाहीर करण्यात आली (१९५९). ३ मार्च १९५९ रोजी त्यास अटक करण्यात येऊन द. ऱ्होडेशियाच्या तुरुंगात १३ महिने ठेवण्यात आले. पुढे एप्रिल १९६० मध्ये त्याची बिनशर्त मुक्तता करण्यात आली. मुक्त झाल्यानंतर तो मालावी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला (१९६०).

 

न्यासालँड वसाहतीसाठी जून १९६० मध्ये नवे संविधान तयार करण्यात आले. त्यानुसार १९६१ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या व त्यात बांडाचा पक्ष बहुमतात आला. बांडाकडे संरक्षण खाते देण्यात आले (१९६१–६३). १ फेब्रुवारी १९६३ मध्ये तो देशाचा पहिला पंतप्रधान झाला. ६ जुलै १९६४ मध्ये न्यासालँड स्वतंत्र झाला आणि तो मालावी प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. या प्रजासत्ताकाचा बांडा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला (१९६६). त्याच्या एकपक्षीय राजवटीला मंत्रिमंडाळातील काही सहकाऱ्‍यांनी १९६४-६५ मध्ये बराच विरोध करून अवचित सत्तांतरणाचा प्रयत्न केला. तो त्याने निपटून काढून बंडखोरांना शासन केले. १९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने त्यालाच पाठिंबा देऊन त्याच्या पक्षाला विजय मिळवून दिला. १९७१ व १९८१ पर्यंत आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला विरोध करणाऱ्‍या मंत्र्यांची खाती बदलणे वा त्यांना काढून टाकणे, हे त्याच्या धोरणाचे सूत्र दिसून येते. मालावी प्रजासत्ताकाचा १९७१ मध्ये तहह्यात राष्ट्राध्यक्ष व पक्षाध्यक्ष झाल्या नंतर बांडाने देशांतर्गत धोरणात अधिकारशाहीचा वापर करून एकपक्षपध्दती राबविली आणि संसदेत आपले व्यत्किगत वर्चस्व प्रस्थापित केले. देशांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यासाठी वंशनिरपेक्ष धोरण अवलंबून ऱ्होडेशिया, द.आफ्रिका व पोर्तुगज वसाहती यांच्याशी त्याने सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आणि १६ ते २० ऑगस्ट १९७१ दरम्यान द. आफ्रिकेला अधिकृतरीत्या भेट दिली. निग्रो अध्यक्षाने द.आफ्रिकेला दिलेली ही पहिली भेट. त्या वेळी राजनैतिक वर्तुळास या भेटीसंबंधी उलटसुलट चर्चा झाली. वांशिक भेद नष्ट करून सर्व आफ्रिकी जनतेने आफ्रिका खंडाच्या उन्नतीसाठी एकत्र यावे, असे त्याला वाटते. ब्रिटनशी त्याने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. याच तत्त्वावर त्याने आफ्रिकन एकात्मता संघटनेशी (ओ. ए. यू.) द. आफ्रिका व ऱ्होडेशियाविरुद्ध संमत केलेल्या ठरावाला विरोध केला.

 

संदर्भ: 1. Italiaander, Rolf, Trans. McGovern, James, The New Leaders of Africa, Toronto, 1961.

           2. Short, Philip, Hastings Kamuzu Banda, 1979.

 

शेख, रुक्साना