बाईआ व्ह्लांका : अर्जेटिनाच्या ब्वेनस एअरीझ प्रांतातील महत्त्वाचे शहर आणि बंदर. लोकसंख्या १,८२,१५८ (१९७०).हे ब्वेनम एअरीझ शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५६० किमी. नापोस्टा नदीकिनाऱ्यापासून आत सु. ५ किमी. अंतरावर वसले आहे. अठराव्या शतकात येथे आलेल्या संशोधकांनी या भागास ‘बाईआ व्ह्लांका’ (श्वेतउपसागर) असे नाव दिले. हे सर्व दळणवळण साधनांचे केंद्र आहे.
सागरी मार्गाने येणाऱ्या ब्राझीलियन व इतर आक्रमकांपासून उपद्रव होऊ नये म्हणून स्थानिक लोकांनी १८२८ मध्ये येथे संरक्षक तटबंदी उभारली. १८३८ मध्ये इटालियन वसाहतकारांनी मोठ्या प्रमाणावर येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. विसाव्या शतकात दक्षिण पँपासमधील पशुधन व पशुजन्य पदार्थ यांचे उत्पादन वाढल्याने व्यापार व उद्योग या दोन्ही दृष्टींनी या शहराचा विकास झाला. येथून धान्ये, लोकर, मांस व चामडी यांची निर्यात होते. या शहरात तेलशुद्धीकरण, कातडी कमावणे, दुग्धव्यवसाय, मांस डबाबंदीकरण इ. उद्योगधंदे चालतात. येथे जहाज बांधण्याचे मोठे कारखाने असून दक्षिण गोलार्धामधील सर्वांत मोठी सुकी गोदी आहे. ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द साउथ’ हे विद्यापीठ बेर्नार्दीनो रीव्हादाव्ह्या ग्रंथालय आणि अनेक संग्रहालये येथे आहेत.
अनपट, रा. ल.