बॅसिडिओमायसिटीज : (गदाकवक इं. क्लब फंजाय). कवकाच्या [बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीच्या ⟶ कवक] निरनिराळ्या वर्गांपैकी हा सर्वांत प्रगत वर्ग आहे. या वर्गात सर्वांत मोठ्या आकारमानाची कवकफले (गदाफले) आढळून येतात. ‘कंस कवक’ (ब्रॅकेट फंजाय) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवकाची झाडांवर अथवा इमारती लाकडांवर वाढणारी अर्धवर्तुळाकार गदाफले सु. ५० सेंमी. अथवा जास्त व्यासाची असतात. काही भूकंदुके (चेंडूच्या आकाराची व फुटल्यावर बीजुकांचा–सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांचा–मेघ जोराने उत्सर्जित करणारी कवके पफ बॉल्स) याच्या तिप्पट आकारमानाची असतात. तसेच २० सेंमी. व्यासाचे छत्र असलेली ⇨ भूछत्रेही आढळून येतात. या गदाफलातून असंख्य बीजुके (गदाबीजुके) दररोज बाहेर पडतात. आर्थिक दृष्ट्या या वर्गातील काही कवके फार महत्त्वाची असून त्यांपासून काणी, तांबेरा आणि वनांतील व रस्त्यांवरील झाडांची कूज यांसारखे मोठ्या प्रमाणावर आढळून येणारे नुकसानकारक रोग होतात. भूछत्रांसारखी काही कवके खाद्य आहेत. या वर्गातील बहुसंख्य कवके शवोपजीवी असून काही वैकल्पिक जीवोपजीवी व काही अनिवार्य जीवोपजीवी (सदा जीवोपजीवी) असतात [⟶ जीवोपजीवन]. शवोपजीवी कवकांमुळे मृत वनस्पती व प्राणी यांचे अपघटन (घटकद्रव्ये अलग होणे) घडून येते.

कवकजाल: या वर्गातील कवकजाल [तंतुमय जाळे ⟶कवक] विकसित व पटयुक्त (तंतुंमध्ये विभाजक भित्ती असलेले) असून त्याचे दोर, पेड अथवा पंख्याच्या आकाराच्या संरचना आढळून येतात. कवकजाल पांढरे अथवा रंगीत असून पालापाचोळा, माती, ⇨ ह्यूमस, खत अथवा पोषक वनस्पतीच्या आत वाढते. कवकजालात प्राथमिक व द्वितीयक असे भेद असून प्राथमिक कवकाच्या कोशिका (पेशी) जातीप्रमाणे एक-प्रकली (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या एकाच गोलसर भागाने युक्त) किंवा अनेक-प्रकली असून कवकजालाची रचना साधी असते. जेथे बहुप्रकलावस्था आढळून येते तेथे ती फक्त प्रथम तयार झालेल्या कवकतंतूमध्येच असते. विभाजक पटांमुळे एक-प्रकली कोशिका मागाहून तयार होतात. द्वितीयक कवकजालातील कोशिका सातत्याने द्विप्रकली असतात. कवकजालाच्या उत्पादक थराला हायमेनियम अशी संज्ञा आहे. तंतुजटा आणि जलाशय [⟶ कवक] ही या वर्गात आढळून येतात. होमोबॅसिडिओमायसिटी उपवर्गात दोन निकटवर्ती कोशिकांत संधर-योग (विभाजक पटांच्या भोवती तयार होणारे व खालच्या कोशिकेला अग्राने जोडणारे नलिकाकार भाग) आढळून येतात. द्विप्रकली कवकतंतूमध्ये एका द्विप्रकली कोशिकेपासून नवीन द्विप्रकली कोशिका प्रस्थापित करण्याच्या कामी संधर-योगांचा उपयोग होतो.

गदाकोशिका : ही या वर्गाची वैशिष्ट्यपूर्ण संरचना आहे. या वर्गातील निरनिराळ्या बीजुकांपैकी गदाबीजुके ही प्रमुख बीजुके असून ती गदाकोशिकेवर बाहेरील बाजूवर येतात.

विकसित न झालेल्या गदाकोशिकेत दोन प्रकल असतात. त्यांचा संयोग झाल्यावर संयोगित प्रकलाचे प्रथम न्यूनीकरण विभाजन व समविभाजन [⟶ कोशिश] होऊन त्यातून उत्पन्न झालेल्या चार एकगुणित (ज्यांतील गुणसूत्रांची म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची संख्या नेहमीच्या पेक्षा निम्मी असलेल्या) प्रकलांपासून चार एककोशिक गदाबीजुके तयार होतात. काही अपवाद वगळता गदाबीजुके गदाकोशिकेवर प्रांगुलांच्या (नाजुक देठांच्या) टोकांवर येतात. गदाकोशिकेतील प्रकल प्रांगुलातून गदाबीजुकात प्रवेश करतात. होमोबॅसिडीओमायसिटी उपवर्गात गदाकोशिका अखंड असतात. हेटेरोबॅसिडिओमायसिटी उपवर्गात गदाकोशिकांत आडवे, उभे किंवा तिरके विभाजक पट असतात किंवा गदाकोशिका अखंड असतात. उस्टिलजिनेलीझ गणातील सर्व आणि युरेडिनेलीझ गणातील पुष्कळशा कवकांच्या गदाकोशिकांचे प्रकल प्रथम जाड कोशिकावरणाच्या टेलिओ-बीजुकांत समाविष्ट असतात. टेलिओ-बीजुकातून पातळ आवरणाची गदाकोशिका बाहेर येते, तिला ‘प्रोमायसीलिअम’ (कवकजालाची पूर्वावस्था) असे नाव आहे. प्रोमायसीलिअमावर गदाबीजुके येतात, त्यांना या गणात बीजाण्वी (स्पोरिडियां) असे म्हणतात. बॅसिडिओमायसिटीज वर्गातील इतर कवकांच्या गदाकोशिका पातळ कोशिकावरणाच्या असून त्या कवकजालाशी संलग्न असतानाच त्यांवर गदाबीजुके येतात.

गदाफल : या वर्गातील कवकफलांना गदाफल ही संज्ञा आहे. आकार आणि संरचना यांबाबतीत गदाफलांत पुष्कळ भिन्नता आढळून येते. गदाफले ही कवकाच्या विकासातील सर्वांत वरचा टप्पा समजला जातो. विकासाच्या खालच्या थरावरील (हायमेनोमायसिटीज) गदाफलांत गदाकोशिकांचा थर उघडा असतो व वरच्या थरावरील (गॅस्ट्रोमायसिटीज) गदाफलांत तो पक्वावस्थेपूर्वी झाकलेला असतो. गदाफले कागदासारखी, चर्मासारखी, कॉर्क झाडाच्या बाह्यत्वचेसारखी, मांसल अथवा काष्टमय असतात. गदाफलांची संरचना व आकार यांवरून या वर्गातील कवकांना निरनिराळी नावे आहेत जसे चर्मकवक, प्रवाळकवक, शूलकवक, बहुच्छिद्रकवक, पटलकवक, भूकंदुक, भूतारका, नीडकवक, पूतिकवक [⟶ कवक].

बहुच्छिद्रकवकांपैकी झाडांवर अथवा इमारती लाकडांवर आढळून येणाऱ्या आणि अर्धवर्तुळावर, काष्ठमय गदाफले असलेल्या कवकांना कंस कवक ही संज्ञा आहे. यांचे कवकजाल झाडाच्या ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहात) वाढते व त्यामुळे झाडाचा तेवढा भाग कुजतो. बाहेर दिसून येणाऱ्या काष्ठमय मागाच्या (गदाफलाच्या) खालच्या बाजूवर छिद्रांचा थर असून त्यात गदाबीजुके तयार होतात. अशा प्रकारची कवके झाडात पुष्कळ वर्षे जिंवत राहातात व मागील हंगामाच्या छिद्रांच्या थरावर नवीन छिद्रांचा थर तयार होतो. फोम्स अप्लॅनेटस या सामान्यपणे आढळून येणाऱ्या कंस कवकाचे छिद्रांनी व्यापलेले क्षेत्र सु. ९३० चौ. सेंमी. असते त्यातून २४ तासांत सु. ३,००० कोटी गदाबीजुके बाहेर पडतात.


बीजुकांचे विकिरण : बीजुकांच्या विकिरणासाठी (प्रसारणसाठी) या वर्गात निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केलेला आढळून येतो. बहुतेक जातींमध्ये बीजुके गदाकोशिकांतून जोराने बाहेर फेकली जातात. भूकंदुकांवर पावसाचे थेंब पडल्यास अथवा एखाद्या पदार्थाचा त्यावर आघात झाल्यास त्यातून फुंकरून उडविल्याप्रमाणे बीजुके बाहेर फेकली जातात. काही जातींची कवके बीजुकांच्या वितरणासाठी प्राण्यांवर अवलंबून असतात. उदा., पूतिकवकाच्या गदाफलांतून बीजुके बाहेर पडतात त्या वेळी ती जिलेटिनासारख्या व घाण वासाच्या पदार्थात मिसळलेली असतात व त्यांकडे माश्या आकर्षिल्या जातात. माश्यांच्या तोंडाला व पायांना बीजुके चिकटल्यामुळे त्यांचे वितरण होते. नीडकवकात बीजुके बहिर्गोल भिंगाच्या आकाराच्या, कठीण व तुळतुळीत संरचनांची कपाच्या आकाराच्या गदाफलात असतात. ही गदाफले पाहिल्यावर पक्ष्याच्या घरट्यात अंडी असावी असा भास होतो. त्यातील ‘अंड्यावर’ पावसाचे थेंब जोराने आपटल्यास ती सु.५ मी. दूर फेकली जातात. स्फीरोबोलस वंशाच्या कवकाच्या बीजुकांचे पुंज ४-५ मी. उंच फेकले जातात व फेकले जात असताना ऐकू येण्याइतपत आवाज होतो. हायमेनोमायसिटीज गटात आणि युरेडिनेलीझ गणात गदाबीजुके प्रांगुलाला ज्या ठिकाणी जोडलेली असतात त्या ठिकाणी द्रवाचा थेंब बाहेर पडतो आणि द्रवामुळे बीजुकांचे हवेमध्ये जोराने विकिरण होण्यास मदत होते.

प्रजोत्पादन : या वर्गातील कवकांच्या जीवनचक्रात प्रकलयुती, प्रकलसंयोग, न्यूनीकरण विभाजन आणि गदाकोशिकेच्या बाहेरील अंगावर एकगुणित गदाबीजुकांचे उत्पादन या प्रमुख अवस्था आहेत. फक्त तांबेऱ्याच्या कवकांमध्ये (युरेडिनेलीझ) लैंगिक अवयव आढळून येतात परंतु तेथेही दोन भिन्न लिंगी प्रकलांचे एकाच वेळी विभाजन होऊन त्यातून द्विप्रकली कोशिकांचे कवकजाल तयार होते. ही द्विप्रकलावस्था कवकाच्या शाकीय (वाढ होण्याच्या) अवस्थेत चालू राहाते व ती गदाकोशिकेत संपुष्टांत येते. तेथे दोन प्रकलांचा संयोग होऊन त्यानंतर न्यूनीकरण विभाजन होऊन एककोशिक व एकगुणित गदाबीजुकांची निर्मिती होते. या वर्गातील इतर कवकांमध्ये लैंगिक अवयव आढळून येत नाहीत परंतु युरेडिनेलिझाप्रमाणे अविकसित गदाकोशिका आणि कवकजालाच्या काही भागातील कोशिका नेहमीच द्विप्रकली असतात. द्विप्रकलावस्था निरनिराळ्या मार्गांनी प्रस्थापित होते. काही जातींमध्ये ती कवकाच्या जीवनचक्रात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रस्थापित होते व काहींमध्ये ती उशिरा प्रस्थापित होते.

द्विप्रकली कवकजाल, संधर-योग, गदाकोशिका, गदाबीजुके आणि मोठ्या आकारमानाची गदाफले ही बॅसिडिओमायसिटीज वर्गाची वैशिष्ट्ये आहेत.

वर्गीकरण : गदाकोशिकेचे आकारविज्ञान व संरचना आणि तिच्यावरील गदाबीजुकांची संख्या यांवर या वर्गाचे वर्गीकरण मुख्यत्वेकरून आधारलेले आहे. वर्गीकरणाच्या बाबतीत कवकशास्त्रज्ञांत एकमत नसले, तरी पुष्कळ शास्त्रज्ञांच्या मते या वर्गाचे होमोबॅसिडिओमायसिटी व हेटेरोबॅसिडिओमायसिटी असे दोन उपवर्ग असून पहिल्यात गदाकोशिका अखंड असतात व दुसऱ्यात त्या सर्वसाधारणपणे आडव्या किंवा उभ्या पटांनी विभागलेल्या असतात.

होमोबॅसिडिओमायसिटी : हा मोठा उपवर्ग असून यातील बहुतेक सर्व जातींमध्ये गदाफले आढळून येतात आणि त्यांतील काही मोठ्या आकारमानाची व ठळकपणे दिसून येणारी असतात. या उपवर्गात बहुसंख्य जाती शवोपजीवी आहेत काही जीवोपजीवी असून वनस्पतींना हानिकारक आहेत. ‘ऱ्हायझोक्टोनिया’ या सर्वसामान्य नावाने काही वनस्पतिरोग ओळखले जातात. यांपैकी एक रोग ‘सामान्य-हायझोक्टोनिया रोग’ या नावाने ओळखला जातो व तो वनस्पतींच्या निरनिराळ्या जातींवर जगाच्या सर्व भागांत आढळून येतो. या रोगाची कवकीय अवस्था (ऱ्‍हायझोक्टोनिया सोलॅनी) पोषक वनस्पतीवर आढळून येते व गदाकोशिकीय अवस्था (पूर्णावस्था थानाटेफोरस कुकुमेरिस) थेलेफोरेसी कुलात सहज ओळखता न येणाऱ्या शवोपजीवी अवस्थेत आढळून येते (या पूर्णावस्थेचे पूर्वीचे नाव पेलिक्युलेरिया फिलॅमेंटोजा असे होते). कवकीय अवस्था पोषक वनस्पतीच्या वाढीच्या एक अगर जास्त अवस्थांत आढळून येते आणि निरनिराळ्या अवस्थांत रोगाची निरनिराळी लक्षणे आढळून येतात. पुढील चार अवस्थांत हा रोग आढळून येतो : (१) रोपट्यांची कूज, (२) मूळकूज व व्रण अथवा खैरा (खोडावरील साल वाळणे व तडकणे), (३) साठवणीतील कूज, (४) पानावरील करपा अथवा ठिपके. या कवकामुळे कापूस, कोबी, बीट, बटाटा, वांगी, टोमॅटो इ. पिकांवर हा रोग आढळून येतो व एकाच कवकांमुळे होणाऱ्या रोगाला निरनिराळी प्रचारातील नावे पडली आहेत. त्याच्या कवकीय अवस्थेचा अपूर्ण कवकामध्ये [⟶ फंजाय इंपरफेक्टाय] वंध्य कवकात समावेश होतो. पिकाच्या एका हंगामापासून दुसऱ्या हंगामापर्यंतच्या काळात रोगाचे कवक जमिनीत असते अथवा पोषकाच्या प्रजोत्पादनाच्या भागांवर (उदा. बटाटे) जालाश्माच्या अवस्थेत असते. या कवकावर विबिजुके (अलैंगिक रीतीने तयार होणारी बीजुके) तयार होत नाहीत. मिरी, वांगी व टोमॅटोच्या बियांतून या कवकाचा प्रसार होतो, असे सिद्ध झाले आहे.

पेलिक्युलेरिया साल्मोनिकलर जातीच्या कवकामुळे संत्री, रबर, चहा, कॉफी, दालचिनी, आंबा वगैरे झाडांना ‘गुलाबी रोग’ होतो. उष्ण कटिबंधातील प्रदेशात हा रोग सर्वसामान्यपणे आढळून येतो. पावसाळी हवामानात या रोगाचे प्रमाण जास्त असते. रोगट झाडाची पाने कोमेजतात नंतर ती पिवळी पडतात व शेवटी गळतात. फांद्यांवर गुलाबी रंगाच्या टाचणाच्या माथ्याच्या आकाराच्या पुळ्या आढळून येतात. रोगाच्या पुढील अवस्थेत फांदीवरील साल तडकते, पाने गळून पडतात आणि सालीवर डिंकासारखा चिकट पदार्थ आणि खैरा आढळून येतात. उन्हाळ्यात रोगट भाग खरडून काढून त्या भागावर बोर्डो पेस्ट अथवा क्रिओसोट तेल लावतात. पावसाळ्यात रोग आढळून येताच रोगट फांद्या छाटून टाकतात व कापलेल्या जागी बोर्डो पेस्ट लावतात.

एक्झोबॅसिडियम व्हेक्सानस या कवकामुळे ‘फोड्या करपा’ (ब्लिस्टर ब्लाइट) नावाचा रोग चहाच्या पिकावर दार्जिलिंग, उत्तर आसाम, दक्षिण भारत येथे व श्रीलंकेत आढळून येतो. छाटणी केलेल्या चहाच्या झाडावर फुटून येणाऱ्या कोवळ्या पानांवर व लहान वयाच्या झाडांवर हा रोग विशेष प्रमाणात असतो. कवकाची वाढ पानांच्या ऊतकात होते. छाटणीच्या वेळापत्रकात फेरबदल केल्याने व लहान वयाच्या झाडांवर ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी केल्याने या रोगापासून होणारे नुकसान पुष्कळ कमी होते.


 बॅसिडिओमायसिटीज: (अ) होमोबॅसिडिओमायसिटी : (१) गदाकोशिका, (२) गदाबीजुक (आ) बटाट्यावरील -हायझोक्टोनिया रोग : (१) रोगट बटाटा, (२) रोगट अंकुर (इ) ज्वारीवरील काजळी रोग : (१) बीजुककोश, (२) टेलिओ बीजुके, (३) गदाकोशिका (प्रोमायसीलिअम). (४) गदाबीजुक (स्पोरिडियम) (ई) संत्र्यावरील गुलाबी रोग : रोगट फांदीचा भाग (उ) गव्हावरील तांबेरा रोग–कवकाच्या व्यवस्था : (१) पिक्निओबीजुककोश व बीजुके, (२) ॲसिडिओ - बीजुककोश व बीजुके, (३) युरिडो-बीजुककोश व बीजुके, (४) टेलिओ-बीजुककोश व बीजुके, (५) गदाकौशिका, (६) गदाबीजुक.


या उपवर्गातील पॉलिपोरेसी व अगॅरिकेसी कुलांतील जातींमुळे वनातील झाडे कुजतात. फोम्स इग्निआरिअस या कवकामुळे पॉप्लर, मॅपल, ओक, भूर्ज (बर्च), बीच, सफरचंद, नासपती (पेअर) इ. झाडांचा ‘मध्यकाष्ठकूज’ नावाचा रोग होतो व जगात तो सर्वत्र आढळतो. पटलकवकांपैकी बहुतेक कवके शवोपजीवी आहेत परंतु आर्मिलेरिआ मेलिआ या कवकामुळे वनातील व बागेतील पुष्कळ झाडांचा मूळकूज रोग होतो. या कवकाचे कठीण, काळे, दोरासारखे पेड (तंतुजटा) मुळांना वेढतात व कवकतंतू मुळांत प्रवेश करून ऊतककरापर्यंत [⟶ ऊतककर] पोहोचतात. परिणामी झाडाचा वरचा भाग हलके हलके वाळतो व शेवटी संपूर्ण झाड भरते.

हेटेरोबॅसिडिओमायसिटी : या उपवर्गात उस्टिलाजिनेलीझ व युरेडिनेलीझ हे दोन महत्त्वाचे गण आहेत. या दोन्ही गणांतील कवके जीवोपजीवी आहेत परंतु पहिल्या गणात काही जाती संवर्धन माध्यमावर वाढू शकतात. दुसऱ्या गणातील सर्व जाती मात्र अनिवार्य जीवोपजीवी आहेत.

उस्टिलाजिनेलीझ : या गणतील कवकामुळे होणारे रोग सर्वसामान्यपणे काणी या नावाने ओळखले जातात [⟶ काणी रोग]. यातील काही रोगांमुळे पिकांचे फार नुकसान होते. या रोगात पोषकावर गडद तपकिरी अथवा काळे बीजकपुंज भुकटीच्या स्वरूपात आढळून येतात.बीजुकांना टेलिओ-बीजुके हे नाव असून ती विश्रामबीजुके (अवर्षण किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरणारी जाड भित्तींची बीजुके) आहेत. त्यांना क्लॅमिडो-बीजुके (बुरख्याखाली असणारी बीजुके) असेही नाव आहे परंतु खऱ्या अर्थाने ती क्लॅमिडो-बीजुके नाहीत. ज्या वेळी द्विप्रकली कवकजाल बीजुकनिर्मितीच्या अवस्थेत येते, त्या वेळी लहान कोशिका असलेल्या कवकतंतूंचे समूह तयार होतात. प्रत्येक कोशिकेच्या प्राकलाभोवती (निर्जीव आवरण-भित्ती-वगळून कोशिकेच्या उरलेल्या भागाभोवती) जाड आवरण तयार होते व अशा रीतीने कोशिकेचे टेलिओ-बीजुकात रूपांतर होते. ही बीजुके गोलाकार व एक कोशिक असतात. ती काही जातींत एकमेकांपासून अलग असतात, काही जातींत त्यांचे बीजकपुंज तयार होतात व काही जातीत ती एकमेकांस चिकटल्यामुळे त्यांचे गोलक तयार होतात. टेलिओ-बीजुकांत असलेल्या दोन भिन्नलिंगी प्रकलांचा संयोग होऊन त्यांपासून द्विगुणित प्रकल तयार होतो. विश्रामकालानंतर बीजुकाचे अंकुरण होऊन त्यातून पातळ आवरणाची गदाकोशिका बाहेर पडते. तिला प्रोमायसीलिअम असे नाव आहे. टेलिओ-बीजुकातील द्विगुणित प्रकल गदाकोशिकेत जातो आणि तेथे न्यूनीकरण व त्यानंतर समविभाजनामुळे चार एक गुणित प्रकल तयार होतात.

उस्टिलाजिनेसी कुलात गदाकोशिकेचे विभाजन होऊन चार कोशिका तयार होतात व त्यांतील प्रत्येक कोशिकेत एक एकगुणित प्रकल असतो. गदाकोशिकेच्या बाहेरील बाजूवर प्रत्येक कोशिकेवर एक याप्रमाणे गदाबीजुके (स्पोरिडिया) धरतात. गदाबीजुके तयार झाल्यावर ती गदाकोशिकेपासून अलग होतात व त्या जागी नवीन गदाबीजुके तयार होतात व तीही अलग होतात. गदाकोशिकेत प्राकल असेपर्यंत हा क्रम चालू राहतो. गदाबीजुकांचे ⇨ यीस्टप्रमाणे मुकुलन (पृष्ठभागावर गोलसर उंचवटे तयार होऊन त्यांपासून प्रजोत्पादन होण्याची क्रिया) होते. गव्हच्या काजळी रोगात गदाकोशिकेवर गदाबीजुके न येता संक्रामणतंतू येतात. टायलेशिएसी कुलात गदाकोशिका सुरुवातीला अखंड असून तिच्या टोकाला गदाबीजुके येतात. ती लांब व विळ्याच्या आकाराची असतात.

या गणात दोन एकगुणित गदाबीजुकांच्या अथवा दोन भिन्नलिंगी कवकतंतूंच्या कोशिकांच्या सायुज्यनामुळे (संयोगामुळे) द्विप्रकलावस्था प्रस्थापित होते. कवकाच्या जीवनक्रमात एक-प्रकलावस्था थोडा काळ टिकणारी असते. पोषक वनस्पतीचे संक्रामण बहुधा द्विपकल्पावस्थेत होते व ही अवस्था टेलिओ-बीजुकात संपुष्टात येते.  

या गणतील कवकामुळे निरनिराळ्या पोषकांच्या निरनिराळ्या अवयावांवर (किंजपुट, परागकोष, पुष्पाक्ष, पाने, खोड, मुळे) रोग आढळून येतात. भारतातील महत्त्वाच्या पिकांवरील काणी रोग कोष्टकामध्ये दिले आहेत.

युरेडिनेलीझ : या गणातील कवके तांबेरा अथवा गेरवा रोगाची कवके म्हणून ओळखली जातात. ती सर्व अनिवार्य जीवोपजीवी असून फक्त जिवंत हिरव्या वनस्पतींवर जगू शकतात. यात सु. १३० वंश व सु. ३,००० जाती आहेत.


महत्त्वाच्या पिकांवरील काणी रोग

पिकाचे नाव

रोगाचे सर्वसामान्य नाव

शास्त्रीय नाव

भात

चिकट्या काणी (बंट)

निओव्होसिया हॉरिडा 

गहू

काजळी

उस्टिलागो ट्रिटिसाय 

गहू

चिकट्या काणी (खडबडीत बीजुकांचा प्रकार)

टायलेशिया कॅरिस 

गहू

चिकट्या काणी (गुळगुळीत बीजुकांचा प्रकार)

टायलेशिया फिटिडा 

गहू

कर्नाल चिकट्या काणी

निओव्होसिया इंडिका 

गहू

ध्वज काणी

युरोसिस्टिस ट्रिटिसाय 

ज्वारी

दाणे काणी

स्फॅसिलोथिका सॉर्घी 

ज्वारी

काजळी

स्फॅसिलोथिका क्रुएंटा 

ज्वारी

झिपऱ्या काणी

स्फॅसिलोथिका रैलियाना 

ज्वारी

लांबी काणी

टॉलीपोस्पोरियम एहेरनयर्गाय 

बाजरी

काणी

टॉलीपोस्पोरियन पेनिसिलेरी 

मका

सामान्य काणी

उस्टिलागो मायडिस 

मका

झिपऱ्या काणी

स्फॅसिलोथिका रैलियाना 

ऊस

चाबूक काणी

उस्टिलागो सिटॅमिनी 

मोहरी

मुळांवरील गाठी काणी

युरोसिस्टिस ग्रासिकी 

शेती उत्पादनाच्या दृष्टीने हा गण फार महत्त्वाचा आहे कारण तांबेऱ्यामुळे पिकांचे पुष्कळ नुकसान होते. कवकजालाची वाढ पोषकाच्या कोशिकांमधील जागेत होते व कवकाचे पोषण शोषकांद्वारे (पोषकाकडून अन्न शोषण्याचे कार्य करण्यासाठी वाढलेल्या संरचनेद्वारे) होते. या गणातील नमुनेवजा कवकाच्या जीवनक्रमात पाच प्रकारची बीजुके आढळून येतात. यांपैकी पिक्निओबीजुके व बॅसिडिओ-बीजुके (गदाबीजुके अथवा स्पोरिडिया) एकप्रकली असून ॲसिडिओ-बीजुके, युरिडो-बीजुके आणि टेलिओ-बीजुके द्विप्रकली असतात. टेलिओ-बीजुके प्रसुप्त बीजुके असून विश्रांतीनंतर त्यांचे अंकुरण होऊन त्यांतून चार कोशिकांची गदाकोशिका बाहेर पडते. तिच्या प्रत्येक कोशिकेत एक एकगुणित प्रकल असतो. प्रत्येक कोशिकेच्या प्रांगुलावर एक याप्रमाणे गदाबीजुके धरतात. टेलिओ-बीजुकांच्या आकारविज्ञानावरून या गणातील वंश निश्चित केले गेले आहेत.

पहा : कवक काणी रोग तांबेरा.

संदर्भ : 1. Alexopoulos, C. J. Introductory Mycology, New York, 1969.

          2. Gwynne-Vaughan, H. C. Narnes, B. The Structure and Development of Fungi,  Cambridge, 1962.

          3. Kamat, M. N. Handbook of Mycology, part II. Poona. 1976.

          4. Kamat, M. N. Introductory Plant Plant Pathology, Poona, 1967.

          5. Mundkur, B. B. Fungi and Plant Disease, New York, 1961.

          6. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. I. New York, 1955.

          7. Walker, J.C. Plant Pathology, New York, 1969.

भागवत, व. य. गोखले, वा. पु.