बॅबून: बॅबून नरवानर गणातील प्राणी आहेत. हे पॅपिओ वंशातील असून यांच्या सु. १० जाती आहेत. त्यांपैकी चक्मा बॅबून (पॅपिओ अर्सिनस), गिनी बॅबून (पॅ. पॅपिओ), अरबी वा पवित्र बॅबून (पॅ. हॅमॅड्रिअँस), पिवळा बॅबून (पॅ. सायनोसेफॅलस), ॲनुबीस बॅबून (पॅ. ॲनुवीस) वगैरे जाती सुप्रसिद्ध आहेत.

बॅबून आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस आणि अरबस्तानात आढळतात. ते शुष्क गवतळ राने आणि खडकाळ प्रदेशांत राहणारे आहेत. अरण्यात ते क्वचितच आढळतात.

चक्मा बॅबून (पॅपिओ अर्सिनस)

बॅबून बोजड शरीराचे भूचर चतुष्पाद आहेत. डोके मोठे असते. मुस्कट लांब व बोटके असून त्यावर केस नसतात त्याच्या अग्रावर नाकपुड्या असतात. कपोलकोष्ठ (गालाच्या आतील बाजूंस अन्नाकरिता असलेल्या पिशव्या) मोठे असतात. हात व पाय बळकट असून सुळे दात फार मोठे असतात. चालताना ते आपल्या शेपटाची विशिष्ट प्रकारची कमान करतात. शरीरावरील केस जाडेभरडे असतात आणि त्यांच्या रंगात बरीच विविधता असते. प्रौढ नराच्या खांद्यावरील केस पुष्कळदा बरेच लांब होतात. शरीराची खालची बाजू, हात, पाय, चेहेरा आणि ढुंगण यांवर केस नसतात. पुष्कळदा ढुंगणाचा रंग भडक असतो. नर मादीपेक्षा बराच मोठा असतो. ऋतुचक्राच्या मध्यावर मादीच्या जननेंद्रियाच्या भोवतालचा भाग बराच सुजल्यामुळे ओंगळ दिसतो. सात महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला बहुतकरून एकच पिल्लू होते.

बॅबून सर्वभक्षी असून मुळ्या, भुईमुगाच्या शेंगा, फळे, किडे, पक्ष्यांची अंडी वगैरे खातात. साधारण मोठाले प्राणी ते हातांनी फाडून खातात. ते अनेक प्रकारचे आवाज काढतात. ते डुरकतात, किंचाळतात किंवा किचकिचतात. या प्रत्येक तऱ्हे चा आवाज काढण्याप्रमाणे ठराविक हेतू असतो. कुत्र्याच्या भुंकण्यासारख्या मोठा आवाज काढून ते धोक्याची सूचना देतात. निरनिराळ्या हावभावांनी आणि शेपटीच्या खुणांनी ते एकमेकांना आपले मनोगत कळवू शकतात. ते अतिशय बुद्धिमान आणि शिक्षणक्षम आहेत.

बॅबून पिकांची फार नासाडी करतात. यांचे मोठाले गट असल्यामुळे ते धोकादायक शत्रू आहेत. त्यांची समाजप्रियता आणि एकजूट उल्लेखनीय आहे. गटाचा पुढारी नर असतो. गटातील सर्व प्राणी सत्ताधारी नराच्या तंत्राने चालणारे असतात. तो गटातील माद्यांचे रक्षण करतो. गटातील प्राणी त्याच्या खाण्यापिण्याच्या व लैंगिक गरजांना प्राधान्य देतात.

चक्मा बॅबून दक्षिण अफ्रिकेत आढळतो. याचे तोंड काळे व शरीर करड्या-काळ्या रंगाचे असते. हा सर्वभक्षी असून सरीसृप (सरपटणारे) प्राणी, विचू, कीटक हे याचे भक्ष्य असते. कधीकधी हा नुकत्याच जन्मलेल्या व दूध पिणाऱ्या वासराला मारून त्याच्या पोटातील दूध पितो.

अरबी बॅबून पूर्वी नाईल नदीच्या खोऱ्यात आढळत असे व प्राचीन काळी ईजिप्तमधील लोक याला पवित्र मानीत असत. हल्ली हा सोमालीलँड (पूर्व आफ्रिका) व तांबड्या समुद्राचा किनारा येथे आढळतो. याचा नर रूपेरी रंगाचा असून त्याला लांब केसांची आयाळ असते. यातील मादी लहान व फिकट तपकिरी रंगाची असते. याचे आसनकिण (बसण्याच्या जागेवरील घट्टा) भडक लाल असते. हे टोळी करून डोंगराळ भागात राहतात. ॲनुबीस बॅबून पश्चिम व मध्य आफ्रिकेत तर पिवळा बॅबून दक्षिण आफ्रिकेत आढळतो.

थिरोपिथिकस वंशातील गेलाडा बॅबून (थिरोपिथिकस गेलाडा) हा जरी पॅपिओ वंशातील बॅबूनशी संबंधित असला, तरी याची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. उदा., याच्या नाकाची भोके मुस्कटाच्या बाजूंस असतात. इतर बॅबूनमध्ये ती मुस्कटाच्या अग्रावर असतात. गेलाडा बॅबून उत्तर इथिओपियात आढळतो.

पहा : नरवानर गण मँड्रिल.

इनामदार, ना. भा. जमदाडे, ज. वि.