मॉरल री-आर्ममेंट: (एम्. आर्. ए.-नैतिक पुनरुत्थान). अमेरिकन ल्यूथरन पंथाचे एक ‘मिनिस्टर’ डॉ. फ्रँक एन्. डी. बुकमन (१८७८–१९६१) यांनी मानवाचे नैतिक पुनरुत्थान करण्याच्या हेतूने सुरू केलेली चळवळ. ही चळवळ आता जवळजवळ जगभर पसरलेली आहे. व्यक्तिगत जीवनात परिवर्तन घडवून आणावयाचे आणि त्याच्या आधारे सामाजिक, वांशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बदल घडवून आणावयाचे, हे या चळवळीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. या चळवळीचे कार्यकर्ते या तत्त्वज्ञानाचा प्रचार करीत असतात. या बाबतच्या आपल्या कल्पनांचा प्रयोग डॉ. बुकमन यांनी प्रथम १९०८ साली अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे केला. प्रामाणिकपणा, शुद्धता, निःस्वार्थी वृत्ती आणि प्रेम या सर्व धर्मांमध्ये समान रीतीने आढळणाऱ्या स्वयंपूर्ण अशा चार नैतिक मूल्यांवर त्यांनी भर दिला. तसेच, त्यांनी अंतरात्म्याच्या आवाजाला अनुसरून वागण्याचा आणि उपर्युक्त मूल्ये कृतीत उतरविण्याचा निर्णयही घेतला. या निर्णयाचा परिणाम म्हणून स्वार्थ, द्वेष आणि भय या समस्यांवरची उत्तरे शोधण्याच्या बाबतीत ते लोकांना मदत करू लागले. अशा रीतीने, एक व्यक्तिगत अनुभव म्हणून जी गोष्ट सुरू झाली, ती जनसमूहापर्यंत जाऊन पोहचली आणि १९२१ साली डॉ. बुकमन यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे आपल्या जीवितकार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला. १९२८ मध्ये डॉ. बुकमन ऑक्सफर्डचे काही तरुण घेऊन द. आफ्रिकेत गेले आणि तेथे त्यांनी कार्य केले. त्यामुळेच या चळवळीला ‘ऑक्सफर्ड ग्रुप’ असे नाव मिळाले. १९३८ साली जर्मनी युद्धासाठी शस्त्रसज्ज होत होती, तेव्हा डॉ. बुकमन यांनी पुढील विचार मांडला : ″यापुढची महान चळवळ ही जगाला नैतिक व आत्मिक दृष्ट्या सज्ज करण्यासाठी (वा त्याचे नैतिक पुनरुत्थान करण्यासाठी) असेल.” त्यानंतर जून १९३८ मध्ये ही चळवळ लंडन येथे ‘मॉरल री-आर्ममेंट’ या नावाने अधिकृतपणे सुरू करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धानंतर या चळवळीला अधिक गती मिळाली. पश्चिम जर्मनीचे चान्सलर आडनौअर यांनी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात समेट घडवून आणण्याच्या बाबतीत परिणामकारक भूमिका पार पाडल्याचे श्रेय मॉरल री-आर्ममेंटला दिले होते. आपल्या शेजाऱ्यांशी समेट घडवून आणण्याच्या बाबतीत जपानने केलेले प्रारंभीचे प्रयत्नही या चळवळीच्या व्यासपीठावरूनच झाले होते. आसाम आणि खासी व गारो ह्या डोंगराळ भागांतील आदिवासी यांच्या नेत्यांमधील संघर्ष सद्‌भावनेने मिटविण्यास या चळवळीची मदत झाली आणि या घटनेचेच पुढे मेघालय राज्याच्या निर्मितीमध्ये पर्यवसान झाले. जगाच्या अनेक भागांतून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या बाबतीतही या चळवळीने महत्त्वाचे कार्य केले आहे. मॉरल री-आर्ममेंटद्वारा डॉ. बुकमन यांनी त्या त्या देशांत केलेल्या बहुमोल सेवाकार्याबद्दल ग्रीस, फ्रान्स, प. जर्मनी, राष्ट्रीय (नॅशनॅलिस्ट) चीन, चपान, फिलिपीन्स, थायलंड आणि इराण ह्या आठ देशांनी त्यांना सन्मानित केले. जर्मनीतील फ्रॉइडनश्टाट येथे डॉ. बुकमन यांचे निधन झाले.

या चळवळीमागची मुख्य कल्पना पुढीलप्रमाणे आहे :

जेव्हा माणूस ऐकतो, तेव्हा ईश्वर बोलतो

जेव्हा माणूस आज्ञापालन करतो, तेव्हा ईश्वर कृती करतो

जेव्हा माणूस बदलतो, तेव्हा राष्ट्रे बदलतात.

पुस्तके, चित्रपट, नाटके इ. च्या माध्यमांतून या चळवळीचा संदेश जगभर पोचविला जातो. पूर्णवेळ वा अर्धवेळ काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या परिषदांद्वारे देखील हेच कार्य केले जाते. देणग्यांमधून आणि आयोजित केलेल्या परिषदांद्वारे देखील हेच कार्य केले जाते. देणग्यांमधून आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नामधून या चळवळीचा खर्च चालतो. 

स्वित्झर्लंडमधील कॉक्स, इंग्लंडमधील चेशर आणि भारतातील पाचगणी (महाराष्ट्र, जि. सातारा) ही या चळवळीची जगातील प्रमुख अशी तीन केंद्रे असून तेथे बैठका, परिषदा आयोजित केल्या जातात. पाचगणी येथील केंद्राचे नाव ‘आशिया प्लॅटो’ असे असून तेथे उद्योग, शिक्षण इ. विषयांवर परिषदा भरविल्या जातात. या परिषदा विद्यार्थी, कुटुंबे, कामगार इ. साठी असतात. तसेच, आंतरराष्ट्रीय परिषदाही तेथे भरतात.

मॉरल री-आर्ममेंटसाठी नियमित वर्गणी भरून औपचारिक सदस्यत्वाची अट नाही. या कार्यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या भारतातील मानसेवी स्वयंसेवकांची संख्या अल्प असूनही ते पाचगणी, मुंबई, दिल्ली, पुणे, कलकत्ता, जमशेटपूर इ. ठिकाणी तेथील स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने विविध परिषदा, प्रशिक्षण केंद्रे यांचे तसेच या केंद्रांतून चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन व संयोजन करतात. भारतातील ‘फ्रेंड्स ऑफ मॉरल री-अपार्टमेंट’ ही संस्था मुंबई येथे एक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणीकृत झाली असून तिच्या विश्वस्तांची संख्या आठ आहे (१९८५). केंद्राच्या विविध कार्यक्रमांची व आर्थिक बाबींची जबाबदारी ह्या विश्वस्त मंडळावर आहे. चळवळीचे कार्य भारतातील जनतेपर्यंत नेऊन पोहचविण्याचे काम चळवळीची ध्येयधोरणे पटलेल्या शिक्षण, राजकारण, प्रशासन, उद्योगधंदे इ. क्षेत्रांतील हजारो व्यक्ती मोठ्या निष्ठेने व बांधीलकी मानून करत आहेत.

ही चळवळ आता एक जागतिक शक्ती बनली असून तिच्या संस्थापकांनी आखून दिलेला तिचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : स्वतःला बदला आणि इतरांना बदला ढासळणाऱ्या सभ्यतेचे रक्षण करा व लक्षावधींपर्यंत हा संदेश पोहचवा.

संदर्भ : 1. Clark. W. H. The Oxford Group: Its History and Significance, New York, 1951.

             2. Howard, Peter, Frank Buchman‘s Secret, New York, 1961.

लाला, आर्. एम्. (इं.) साळुंखे, आ. ह. (म.)