मॉम, विल्यम समरसेट : (२५ जानेवारी १८७४–१६ डिसेंबर १९६५). इंग्रज कथा–कांदबरीकार आणि नाटककार. जन्म पॅरिस शहरी. फ्रेंच तो मातृभाषेप्रमाणे शिकला होता. वयाच्या दहाव्या वर्षी मॉम अनाथ झाला त्याचे पालनपोषण त्याच्या काकांनी केले. लंडनच्या ‘सेंट टॉमस मेडिकल स्कूल’ मधून १८९७ मध्ये वैद्यकाचे शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर झाला. त्याच वर्षी लिझा ऑफ लँबेथ ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. लँबेथ ह्या लंडनमधील गरीब वस्तीच्या ठिकाणी, एक शिकाऊ डॉक्टर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने तीत ग्रथित केलेले आहेत. तिचे यश फार मोठे नसले, तरी तिच्यामुळे लेखनाची त्याची उमेद वाढली. वैद्यकीय व्यवसाय सोडून त्याने लेखनाला वाहून घेतले. ए मॅन ऑफ ऑनर हे त्याचे पहिले नाटक १९०३ मध्ये रंगभूमीवर आले. १९०८ पर्यंत नाटककार म्हणून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती परंतु ऑफ ह्यूमन बाँडेज (१९१५) ह्या कादंबरीने त्याला विशेष यश मिळवून दिले. त्यानंतर कथा, कादंबऱ्या, नाटके असे विपुल साहित्य त्याने सातत्याने निर्माण केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात मॉमने गुप्तहेरखात्यात काम केले होते. त्या निमित्ताने फ्रान्स, इटली, रशिया, अमेरिका अशा देशांचा प्रवास त्याला घडला होता. युद्धानंतरही त्याने भरपूर प्रवास केला होता. मॉमचे बरेचसे लेखन आत्मचरित्रात्मक आहे आणि त्याच्या प्रवासाचे संस्कार त्याच्या साहित्यावर स्वाभाविकपणेच झालेले आहेत. १९२८ मध्ये फ्रान्समध्ये तो कायम वास्तव्यासाठी गेला. फ्रान्समधील नीस येथे त्याचे निधन झाले.
कादंबरीकार म्हणून मॉमची ख्याती मुख्यतः त्याच्या चार कादंबऱ्यांवर अधिष्ठित आहे : ऑफ वूमन बाँडेज (१९१५), द मून अँड सिक्स पेन्स (१९१९), केक्स अँड एल (१९३०) व रेझर्स एज (१९४४). ऑफ ह्यूमन बाँडेज ही कादंबरी आत्मचरित्रात्मक आहे. द मून… मध्ये विख्यात चित्रकार पॉल गोगँ ह्या कलंदर कलावंताच्या जीवनाचे चित्रण आहे. केक्स अँड एल मध्ये टॉमस हार्डी आणि ह्यू वॉलपॉल ह्या इंग्रज साहित्यिकांची जीवने आहेत, तर रेझर्स एज एका तरुण अमेरिकनाच्या आध्यात्मिक प्रवासाची कहाणी आहे. भारतीय गूढवादाचा संदर्भही मॉमने ह्या कादंबरीत आणला आहे.
द सर्कल (१९२१), अवर बेटर्स (१९२३), द कॉन्स्टंट वाइफ (१९२७) ही मॉमची विशेष उल्लेखनीय अशी नाटके. शेपी (१९३३) ह्या त्याच्या नाट्यकृतीवरून पु. ल. देशपांडे ह्यांनी भाग्यवान (१९५३) हे नाटक लिहिले आहे.
मानवी स्वभावाचे विविध पैलू दाखविणाऱ्या अनेक कथा मॉमने लिहिल्या. त्यांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. रंगतदार व्यक्तिरेखन, कथाकथनकौशल्य, रचनासौष्ठव, रोचक उपरोध आणि प्रासादिक शैली ही मॉमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. कलावंत म्हणून आपल्या जीवानाचे तत्त्वज्ञान मॉमने आपल्या द समिंग अप (१९३८) आणि द रायटर्स नोटबुक (१९४९) ह्या ग्रंथांत विशद केले आहे.
संदर्भ : 1. Calder, R. L. W. Somerset Mangham and the Quest for Freedom, 1972.
2. Cordell, Richard, Somerset Maugham: A Biographical and Critical Study, 1961.
3. Curtis, Anthony, The Pattern of Maugham, 1974.
4. Menard, William, The Two Worlds of Somerset Maugham, Los Angeles, 1965.
5. Raphael, Frederic, Somerset Maugham and His World, 1977.
देसाई, म. ग.
“