माँतेन, मीशेल एकेमद : (१५३३–९२) एक श्रेष्ठ फ्रेंच निबंधकार, शातो द माँतेन पेरीगॉर येथे जन्म. वडील रोमन कॅथलिक पंथी, सधन जमीनदार-व्यापारी. आई स्पॅनिश ज्यु वंशाची. मातृभाषेच्याही आधी वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत माँतेन लॅटिन भाषा शिकला. बॉर्दो येथील महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास केल्यानंतर तेथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून १५७० पर्यंत त्याने काम केले. १५८१–८५ या काळात तो बॉर्दोचा नगराध्यक्ष होता. १५७१ नंतर त्याने निबंध लेखन केले. त्याच्या निबंधांचे (एसॅ) पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले (१५८०). त्यानंतर प्रकृतिस्वास्थासाठी जर्मनी आणि इटलीत प्रवास. या प्रवासाचे वर्णनही प्रसिद्ध झाले. १५८८ मध्ये त्याच्या निबंधसंग्रहाचे सुधारून वाढविलेले पहिले दोन भाग व तिसरा भाग एकत्र प्रसिद्ध झाले. त्यांतील निबंधांवरील टीका-टिप्पणीवजा परिष्करण तो आमरण करीत होता.
प्राचीन अभिजात लेखकांच्या विशेषतः प्लूटार्क विचार वचनांवरील सहजस्फूर्त चिंतन-मनन असे माँतेनच्या निबंधाचे आरंभीचे स्वरूप होते. उत्तरोत्र आपल्या लेखनास त्याने अखंड आत्मपरीक्षण आणि मानवी स्वभावाचे व समाजाचे चिकित्सक निरीक्षण यांची जोड दिली. म्हणूनच त्याचे निबंध त्याच्या वैचारिक व्यक्तीमत्त्वाचे आणि विकासाचे निदर्शक ठरतात. त्यांतून विकासाचा काही एक क्रमही दिसून येतो. मानवी जीवनातील दुखः दैवाधीनता, मृत्यू यांसारख्या गोष्टींबद्दलची आरंभीची तटस्थता नंतरच्या दुसऱ्या टप्प्यावर दूर होऊन माँतेन संशयवादी झाल्याचे दिसते. अंतिम सत्य जाणण्याची मानवी अक्षमता माँतेनला जाणवली होती. ‘मला काय माहीत ?’ असे प्रश्नचिन्ह त्याच्या लेखनातून सतत जाणवते. ही पायरी ओलांडून माँतेन जीवनविषयक एका अंतिम निर्णयाप्रत आल्याचे शेवटी दिसते. माणसाच्या अंतर्बाह्य शक्तीचा सुसंवाद हाच मानव्याचा सद्गुण ह्या विचारांचा पुरस्कार त्याने अखेरच्या लेखनातून केला.
आत्मनिष्ठेचे हृद्य दर्शन हे माँतेनच्या निबंधाचे खास वैशिष्ट्य. ‘माझ्या ग्रंथांचा विषय मीच आहे’, असे तो म्हणत असे. त्याच्या शारीरिक विशेषांपासून नीतिविवेकापर्यंत अनेक व्यक्तीगत गोष्टी त्यात येतात. सहजता, ताजेपणा, प्रासादिकता, ओजस्वीपणा, रंजक व उद्बोधक अवतरणे व उदाहरणे आणि मार्मिक विनोदात्मकता ही माँतेनच्या शैलीची वैशिष्ट्ये होत. सुभग तत्त्ववचने हा त्याच्या शब्दकळेचा अनिवार्य घटकच आहे. मात्र रूपबंध किंवा निबंधरचनेची सुविहित घाट त्याच्या लेखनात दिसत नाही. सार्वजनिक आपत्ती, शिक्षण, अनुताप, संवादकौशल्य, मृत्यू इ. विषयावरील त्याचे निबंध उल्लेखनीय आहेत. माँतेनचे निबंध इंग्रजी निबंधलेखनाचे जनकच ठरले. इंग्रजी ‘एसे’ हा शब्दही माँतेनच्या ‘एसॅ’ (प्रयत्न) ह्या शब्दावरून घेतला गेला.
माँतेनचे लेखन हे फ्रेंच प्रबोधनकाळाचे एक गोमटे वैचारिक फळ म्हणता येईल. सोळाव्या शतकातील धार्मिक राजकीय संघर्षाच्या काळाआधी मतमतांतरांच्या गलबल्यात राहूनही माँतेनने वैचारिक सहिष्णुतेचा आणि जीवनातील सुसंवादाचा पुरस्कार केला. वैचारिक आणि वाङ्मयीन दृष्टीने माँतेनचे निबंधलेखन त्याच्या काळाच्या या पार्श्वभूमीवर विशेषच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. उत्तरकालीन फ्रेंच तात्त्विक गद्यलेखनावर माँतेनचा मोठाच प्रभाव आहे.
संदर्भ : 1. Frame, D. Montalgne’s Discovery of Man, 1955.
2. Strowski, F. Montaigne, 1906.
जाधव, रा. ग.
“