माँतेलिअस, ऑस्कर :(९ सप्टेंबर १८४३–४ नोव्हेंबर १९२१). स्वीडिश पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म स्टॉकहोम येथे झाला. त्याच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. प्रारंभी तो स्टॉकहोममधील राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालयात काम करीत असे (१८६३). त्यानंतर प्राध्यापक म्हणून (१८८८) व पुढे संचालक म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९०७–१३). त्याने संख्यात्मक अभिधानाद्वारे यूरोपातील ब्रॉँझयुगाचा अभ्यास केला आणि प्रगैतिहासिक काळातील बाँझयुगाच्या, विशेषतः ब्रिटिश बेटांतील कालक्रमाची निश्चिती केली. या त्याच्या पद्धतीला ‘स्वीडिश प्रकारविचार’ म्हणतात. त्यासंबंधी अद्यापि तंज्ञात मतभेद आहेत. या त्याच्या उपपत्तीनुसार भौतिक संस्कृती आणि जैवविकास एकाच प्रकारच्या उत्क्रांतिवादी प्रक्रियेनुसार घडत असतात. यासाठी त्याने पुढे यूरोपच्या प्रागैतिहासिक काळाचा ऐतिहासिक संस्कृतिच्या संदर्भात अभ्यास केला.
त्याने ब्राँझयुग आणि तत्संबंधीची उपपत्ती यांविषयी विपुल लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी ऑन डिटर्मिनिंग द पीरिअड्स हिदन द ब्राँझएज (१८८५), द सिव्हिलायझेशन ऑफ स्वीडन इन हिदन टाइम्स (१८८८), द ओल्डर कल्चरल पीरिअड्स इन द ऑरिएंट अँड यूरोप (१९०३–२३) इ. महत्त्वाचे आहेत.
निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्याने याच विषयाच्या संशोधनता व्यक्तीत केले. स्टॉकहोम येथे तो मरण पावला.
देशपांडे, सु. र.
“