माँटेरे : मेक्सिकोतील न्वेव्हो लेओन राज्याची राजधानी आणि तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १०,६४,६२९ (१९७९). हे देशाच्या ईशान्य भागातील सेरो दे ला सिल पर्वतपायथ्याशी, सँता कॅतारीना या नदीच्या मैदानी भागात स.स. पासून ५३८ मी. उंची वर वसलेले आहे.
इ. स. १५७९ मध्ये लेओन या नावाने वसविण्यात आलेले हे शहर, पुढे १५९६ पासून माँटेरे या नावाने प्रसिद्धीस आले. १८४६ मध्ये झालेल्या मेक्सिकन युद्धात जनरल झॅकारी टेलरच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या सैन्याने शहराची अतोनात हानी केली होती. लारेडो (टेक्सस राज्य) या शहराबरोबर हे १८८२ मध्ये लोहमार्गाने व १९३० मध्ये पॅन अमेरिकन महामार्गाने जोडण्यात आले. पुढे नैसर्गिक वायूचे नळ टेक्सस ते माँटेरेपर्यंत टाकण्यात आल्यावर शहराच्या विकासास चालना मिळाली. देशातील सर्वांत मोठ्या लोखंड पोलाद उद्योगाचे हे केंद्र आहे. याशिवाय विद्युत् उपकरणे, कापड, सिमेंट, सिगारेट, काच, भांडी इ. उद्योगधंदेही विकसित झालेले आहेत. शहराच्या पूर्व व उत्तर भागांत जलसिंचनाद्वारे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. लोअर रीओ ग्रांदेवरील फाल्कन धरणाचा शहराच्या विकासात मोठाच वाटा आहे.
माँटेरे हे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून तेथे न्वेव्हो लेओन (१९३३), लाबास्तीद (१९४७) माँटेरे (१९६९) ही विद्यापीठे व माँटेरे तंत्रविद्या व उच्च शिक्षण देणारी संस्था (१९४३) आहे. डोंगरी परिसर, कोरडी हवा, उष्णोदकाचे झरे यांमुळे आरोग्यधाम म्हणूनही यास महत्त्व आहे. येथील कॅथीड्रल (अठरावे शतक), कोस्तीया मिगेल इदाल्गो (१७५३–१८११) या मेक्सिकन धर्मोपदेशक – क्रांतिकारकाचा ब्राँझ पुतळा, बिशप पॅलेस (१७८२), नगर भवन, अल्मेदा सेंट्रल पार्क तसेच नजीकचा हॉर्स टेल हा धबधबा, गार्सीआ गुंफा इ. प्रवाशांची आकर्षणे आहेत.
गाडे, ना. स.