माहॅन, ॲल्फ्रेड थेअर : (२७ सप्टेंबर १८४०–१ डिंसेंबर १९१४). अमेरिकी नौसेनेतील एक नौसेनापती (ॲड्मिरल). सागरी बळ आणि युद्धसज्ज नौसेना या विषयांवरील वैचारिक तसेच सैद्धान्तिक प्रणालीबद्दल पाश्चात्य राष्ट्रांत तो प्रसिद्ध आहे. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकी साम्राज्यविस्तार व वसाहतवाद यांचा माहॅन एक कट्टर पुरस्कर्ता होता. १८५६ ते १८९६ या कालात तो नाविक जीवन जगला. राष्ट्रपती ⇨ थीओडोर रूझवेल्ट व बरेच अमेरिकी राजकीय पुढारी यांच्यावर त्याच्या साम्राज्य वसाहतवाद विचार सरणीचा प्रभाव पडला होता.
माहॅनचे वडील वेस्ट पॉईंट प्रबोधिनीत अध्यापक होते. माहॅनचे शिक्षण अमेरिकी नाविक प्रबोधनीतच झाले (१८५६–५९). गुणवत्तेत त्याचा दुसरा क्रमांक लागला होता. अमेरिकी यादवी युद्धात त्याने सागरी नाकेबंदीचे कार्य केले, तर त्यानंतर नाविक अधिकारी म्हणूनही नौसेनेची विविध कामे त्याने पार पाडली. १८८३ मध्ये त्याने द गल्फ अँन्ड इनलँड वॉटर्स (आखात आणि आंतरिक जलक्षेत्र) नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या प्रसिद्धीमुळे १८८४ मध्ये नाविक युद्ध महाविद्यालयात त्याला नाविक युद्धतंत्र या विषयावर व्याख्याने देण्याचे आमंत्रण मिळाले. प्रस्तुत व्याख्यानांतूनच सागरी बळाचा इतिहासावरील प्रभाव अशा आशयाच्या द इन्फ्लुएन्स ऑफ सी पॉवर अपॉन हिस्टरी : १६६०–१७८३ या त्याच्या आगामी (१८९०) ग्रंथातील विचारांचा उद्भव झाला होता. तो पर्यंत अमेरिकेने आंतरराष्ट्रीय व्यापात न पडता केवळ स्वसंक्षणाकडे लक्ष द्यावे या मतावर त्याचा भर असे तथापि सागरी बळाचा सांगोपांग विचार केल्यावर सुदृढ सागरी बळामुळेच राष्ट्रीय शक्ती जोपासता येते असे त्याचे ठाम मत झाले. १८९२ मध्ये त्याचे द इन्फ्लुएन्स ऑफ सी पॉवर अपॉन द फ्रेंच रिव्होल्यूशन अँन्ड एम्पायर (फ्रेंच राज्यक्रांतीवरील सागरी बळाचा प्रभाव) हा द्विखंडात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथामुळे सैनिकी विचारवंत म्हणून अमेरिका, युरोप व जपानमध्ये त्याचा बराच बोलबाला झाला. प्रस्तुत ग्रंथात त्याने पुढील प्रमाणे विचार मांडले : ‘अमेरिकेने केवळ अमेरिका खंडातच गुंतून न पडता अमेरिकेबाहेर साम्राज्यविस्तार करावा व वसाहती स्थापाव्या. त्यासाठी युद्धसज्ज व खड्या नौसेनेची आवश्यकता असते. नौसेनेच्या हालचाली व संचारासाठी जगात योग्य जागी नाविकतळ स्थापावेत’. हे सर्व सैद्धांन्तिक विचार आक्रमक स्वरूपाचे होते, म्हणून त्यांची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक ठरते.
नेपोलियनचा पराभव १८१५ मध्ये झाल्याने यूरोप खंडातील फ्रान्सची एक प्रचंड शक्ती दुर्बल झाली होती. फ्रान्सचे सागरी बळ व नौसेना यांचा पाडाव ब्रिटिशांनी केला होता. परिणामतः ब्रिटिशांना आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलियात तसेच चीनमध्ये साम्राज्य विस्तार व वसाहती स्थापणे शक्य झाले. १८२३ मध्ये अमेरिकी राष्ट्रपती मन्रोच्या ‘मन्रो सिद्धान्ताप्रमाणे उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात या खंडाबाहेरील राष्ट्रांचा हस्तक्षेप अमेरिका खपवून घेणारा नाही’, हे जाहीर करण्यात आले. या कार्यासाठी सागरी बळाचा वापर अनिवार्य ठरतो तसेच ब्रिटिशांचा आंतरराष्ट्रीय व साम्राज्यांतर्गत प्रदेशांशी आणि वसाहतींशी असलेला व्यापार सागरी बळामुळेच टिकून राहत असल्याने प्रचंड व युद्धसज्ज नौसेनेच्या साहाय्याने सागरावरील प्रभुत्व आणि नियंत्रण (सागरीबळाचा आविष्कार) टिकवता येतो. असे निष्कर्ष माहॅनने प्रस्तुत केले होते. पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडणाऱ्या कालव्यावर (उ. पनामा कालवा) अमेरिकेचेच एकमेव नियंत्रण असण्यावर माहॅनचा भर होता. कॅरिबियन समुद्रातील नाविकतळांद्वारे हे नियंत्रण ठेवणे शक्य असल्याने त्या समुद्रातील बेटावर अमेरिकेची अधिसत्ता ठेवणे किंवा आव्हानविरहित राजकीय प्रभाव स्थापणे, त्याच्या दृष्टीने अनिवार्य ठरले. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरात ठिकठिकाणी अमेरिकी नाविक तळ असल्याशिवाय चीन व जपान यांच्याशी व्यापार करणे अशक्य होईल, असा त्यांचा दृढ विश्वास होता. त्या आक्रमक भूमिकेला पूरक असा आणखी एक सिद्धांत म्हणजे अमेरिकेची ‘अभिव्यक्त नियती’ (मॅनिफेस्ट डेस्टिनी) हा एक उपद्रवी सिद्धांत होय.
अमेरिकेने जगात स्वातंत्र्याचा प्रयोग करावा, असा नियतीचाच संकेत असल्याची घोषणा जॉन ओसलिव्हन याने १८४५ मध्ये केली होती. या अमेरिकेच्या अभिव्यक्त नियतीच्या घोषणेने माहॅन प्रभावित झाला. १८४५ पासून १९०० सालापर्यंत, अमेरिकेत, अमेरिका हे ईश्वराचे राष्ट्र व अमेरिकी जनता म्हणजे त्याने निवडलेले लोक असल्याने जगातील रानटी लोकांना सुसंस्कृत व ख्रिश्चन करण्याचे काम अमेरिकेचे आहे, तसेच केवळ अँग्लो-सॅक्सन लोकच राज्य करण्यास लायक आहेत, असे भरमसाट तर्कदुष्ट विचार रूजू झाले होते. माहॅनच्या सर्व लिखाणाची पार्श्वभूमी वरीलप्रमाणे आहे. अमेरिकेचे तत्कालीन श्रेष्ठ राजकीय पुढारी उदा., हेन्री कॅबट लॉज, थीओडोर रूझवेल्ट इत्यादींवर त्याचा जबरदस्त प्रभाव पडला. परिणामतः अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पेटविले. क्यूबा, फिलिपीन्स, ग्वॉम इ. राष्ट्रे अमेरिकेने काबीज केली. क्यूबाला स्वातंत्र्य परत देण्यात आले, परंतु फिलिपीन्स, ग्वॉम या आशियायी लोकांच्या राष्ट्रांना परतंत्र केले. तत्कालीन हवाई राष्ट्राच्या राणीला पदच्युत करून त्यास अमेरिकेच्या साम्राज्यात घातले. थीओडोर रूझवेल्ट हा त्यावेळी दुय्यम नाविक खात्याचा मंत्री होता. पुढे तो राष्ट्रपती झाला.
माहॅन १८९६ मध्ये निवृत्त झाला. स्पेन-अमेरिका युद्धात नाविक युद्ध समितीचा तो सदस्य होता. युद्धानंतर तो हेग निःशस्त्रीकरण परिषदेवर अमेरिकी प्रतिनिधी होता. माहॅनच्या सल्ल्यानुसार थीओडोर रूझवेल्टने पनामा कालवा अनिष्ट मार्गाने ताब्यात घेतला. १९१२ मध्ये वॉशिंग्टन येथील कार्नेगी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा तो सदस्य होता. अमेरिकी शिक्षणक्रमात त्याच्या जीवनाचा व विचारांचा अभ्यास केला जातो. त्याचे फ्रॉम सेल टू स्टीम हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे (१९०७).
संदर्भ : 1. Buiterfield Roger, The American Past, New York, 1966.
2. Earlk , E. M. Ed. Makers of Modern Strategy, Princeton, 1971.
3. Leekie, Rober. The Wars of America, New York, 1968.
4. Livezey, W. E. Mahan on Sea Power, New York, 1947.
दीक्षित, हे. वि.
“