मास्ती वेंकटेश अयंगार : (६ जून १८९१ – ). प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व समीक्षक. ‘श्रीनिवास’ या टोपणनावाने त्यांनी काव्य व कथालेखन केले. म्हैसूर राज्यातील मास्ती गावाजवळील होंगेन हळळी येथे त्यांचा जन्म झाला. शिवरामपट्टण, म्हैसूर, बंगलोर आणि मद्रास येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. त्यांची मातृभाषा तमिळ, पण सर्व लेखन कन्नडमध्ये आहे. मद्रास विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळवून एम. ए. झाल्यावर त्यांनी त्यावेळ्च्या म्हैसूर संस्थानात विविध खात्यात नोकरी केली. ते उत्तम प्रशासक म्हणून गणले जात. १९४२ मध्ये ते अबकारी आयुक्ताच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून १९६२ पर्यंत त्यांनी जीवन मासिकाचे उत्कृष्ट संपादन करून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. इंग्रजीवर तसेच संस्कृतवरही त्यांचे चांगले प्रभुत्व असून एक नाणावलेले वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. सध्या त्यांचे वास्तव्य बंगलोर येथे आहे.
आपल्या प्रदीर्घ साहित्यसेवेत त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली व त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. १९४६ मध्ये मद्रास येथे भरलेल्या दक्षिण भारतीय भाषा परिषदेचे अध्यक्ष १९६१ मध्ये मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे अध्यक्ष अखिल भारतीय ‘पेन’ चे उपाध्यक्ष (१९७४) व नंतर अध्यक्ष (१९७६) कन्नड साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष (१९४३) व नंतर अध्यक्ष (१९५३) साहित्य अकादेमीचे फेलो (१९७४) तसेच सदस्य बेळगाव येथे १९२९ मध्ये भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इ. मानाची पदे त्यांनी भूषविली. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना १९४२ मध्ये ‘राजसेवा प्रसक्त’ हा किताब देऊन तसेच कर्नाटक विद्यापीठाने (१९५६) त्यांना सन्मान्य डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला. १९६८ मध्ये सण्ण कथेगळु ह्या त्यांच्या कथासंग्रहात साहित्य अकादेमी-पुरस्कार तसेच १९८३ मध्ये भारतीय ज्ञानपीठाचा दीड लाख रुपयांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.
बी.ए. ला असतानाच १९१०–११ मध्ये त्यांची पहिली लघुकथा ‘रंगपन्न मदुवे’ (म. शी. रंगाचे लग्न) प्रसिद्ध झाली आणि त्यांनी कन्नड साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. मातृभाषा कन्नड नसूनही कर्नाटकातील वास्तव्याने तेथील मातीशी अतूट नाते ठेवून कन्नड साहित्य समृद्ध करणारे लेखक म्हणून मास्ती ओळखले जातात.
त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या सु. ११८ भरते. त्यांनी भावगीते, कथाकाव्ये. नाटके (गद्य व पद्य), चरित्र, कथा, कादंबरी व कादंबरिका, ललित निबंध, समीक्षा, अनुवाद, आत्मचरित्र इ. प्रकारांत विपुल लेखन केले.
माणसावर मास्तींची नितांत श्रद्धा असून ती त्यांच्या सर्वच लेखनात प्रतिबिंबित झालेली आहे. त्यांनी आपल्या विविध कृतींतून माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याची सुखदुःखे आशा-आकांक्षा, यशापयश, त्याचे बरेवाईट अनुभव यांचे चित्रण केले. नैतिक मूल्यांचा आणि भारतीय परंपरेतील चांगल्या चात्यांनी हिरिरीने व सतत पुरस्कार केला आहे. त्यांच्या साहित्याची पाळंमुळ भारतीय व कर्नाटकाच्या मातीत घट्ट रूजलेली आहेत.
सरकारी नोकरीनिमित्त कर्नाटकाच्या विविध भागांत त्यांना जावे लागले आणि त्या निमित्ताने अनेक प्रकारची माणसे त्यांना जवळून न्याहाळता आली. मानवी स्वभावाच्या ह्या विविध पैलूंचे सखोल दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. त्यांच्या स्वभावातच नम्रता व स्वाभिमान यांचे विलक्षण मिश्रण आहे. ते धार्मिक बंधनाच्या पलीकडे आहेत. व म्हणूनच त्यांनी विविध धर्मातील थोर व्यक्तींच्या गौरवपर लिहिले आहे. आपण एक कन्नड लेखक व भारतीय असल्याचा त्यांना रास्त अभिमान आहे. अत्यंत सरळ, रोखठोक व न्याय्य मार्गाने ते जगत आले आहेत. आपल्या पुरस्काराची रक्कम त्यांनी कन्नड साहित्य प्रकाशनार्थ ठेवल्याचे जाहीर केले आहे. नवोदित साहित्यिकांना ते नेहमीच प्रोत्साहन देतात व मदतही करतात. वयाच्या चौऱ्याण्णवाव्या वर्षीही त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांचे लेखन सातत्याने सुरू आहे. त्यांना के.एम. पणिक्कर यांनी ‘कन्नड साहित्याचे भीष्माचार्य’ म्हणून जे गौरविले ते रास्तच होय. कन्नड साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे स्थान चिरंतन आहे.
कन्नड साहित्यात त्यांना लघुकथाकार, कादंबरीकार व कवी म्हणून विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक कन्नड लघुकथेचे ते जनक मानले जातात. लघुकथेच्या क्षेत्रात सर्वस्वी नवीन तंत्राचा अवलंब करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी विपुल कथालेखन केले असून त्यांच्या कथांचे आजवर तेरा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या काही कथा त्यांनी स्वतःच इंग्रजीत अनुवादित करून त्या प्रसिद्धही केल्या आहेत.
मास्तींचे काव्यलेखन १९३० च्या सुमारास उदयास आलेल्या कन्नड कवींत वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिन्नह (१९२२), अरूण (१९२४), तावरे (१९३०), चेलुवु (१९३१), मलार (१९३३), सुनीत (१९४६), मनवि (१९५१) यांसारखे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. बिन्नह आणि मानवीमध्ये त्यांची सर्वस्वी नवीन प्रकारची -हरिदासी भक्तीपरंपरेतील – भक्तीगीते आहेत, तर मलारमध्ये त्यांच्या ‘अष्टषट्पदी’ (सुनीते) आहेत. स्थळगळ हेसरू गळू, गौडर मल्ली, रामनवमी, मूकनमवकळु, श्रीरामपट्टाभिषेक, नवरात्री (५ भागांत) ह्या त्यांच्या कथाकाव्यांत निर्यमक रचना व गद्यसदृश शैली असूनही त्यांत सहजता, प्रवाहीपणा, भावपूर्णता, कल्पनाविलास, जीवनदर्शन इ. गुणविशेष प्रकर्षाने प्रगट झाल्याचे दिसते. श्रीरामपट्टाभिषेकमध्ये त्यांनी राम हा अवतारी पुरुष नसून माणूस आहे व आपल्या सदाचरणाने व कर्तृत्वाने उच्चपदी पोहोचल्याचे प्रतिपादन केले आहे. मूळ रामायणाचा सखोल अभ्यास, कवीची संवेदनशीलता मौलिकता व चिंतन यांचा परिपाक या त्यांच्या काव्यात दिसून येतो.
मास्तींनी ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक कथांचा उपयोग करून तेरा एकांकिका, नाटके व श्रुतिकाही लिहिल्या. त्यांतील सावित्री (१९२३), उषा (१९२७), शांता (१९२८), ताळीकोटे (१९२९) शिवछत्रपती (१९३२), तिरुपाणि (१९३२), यशोधरा (पद्यनाट्य, १९३३), चित्रागंदा (१९४५), पुरंदरदास इ. नाटके विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची काही नाटके रंगभूमीवरही आली – एका नाटकावर चित्रपटही (कानन कोडी) निघाला – पण ती फारशी यशस्वी ठरली नाहीत.
यांव्यतिरिक्त त्यांनी कन्नड भाषा व साहित्य, संस्कृती, साहित्यसमीक्षा, चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकारचे विपुल व दर्जेदार लेखन केले आहे. आदिकवि वाल्मीकि (१९३८), भारत तीर्थ (१९५२), कर्नाटक जनपद साहित्य (१९३७), साहित्य (१९२४), विमर्शे (४ खंड –१९२६, २९, ३३, ३९) इ. त्यांचे चिंतनपर व समीक्षापर दर्जेदार ग्रंथ होत.
शेक्सपिअरच्या काही नाटकांचा संपूर्ण, तर काही नाटकांतील निवडक भागांचा त्यांनी कन्नडमध्ये ‘सरळ रगळे’ म्हणजे निर्यमक पद्यात अनुवाद केला आहे. भाव (३ खंड) मध्ये त्यांचे आत्मचरित्र आले आहे. पॉप्युलर कल्चर इन कर्नाटक (कर्नाटकातील लोकसंस्कृतिविषयक ग्रंथ), पोएट्री ऑफ वाल्मीकि (१९४३), शॉर्ट स्टोरीज (४ खंडांत), सुब्बण्णा, रवींद्रनाथ टागोर (१९४६) इ. त्यांचे इंग्रजी ग्रंथ होत.
मास्तींच्या चिक्कवीर राजेंद्र ह्या १९५६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सु. ४५० पृष्ठांच्या प्रदीर्घ कादंबरीस १९८३ चा ‘भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांची पहिली कादंबरिका सुब्बण्ण (१९२८) ही असून तीत एकोणिसाव्या शतकातील जीवनचित्रण आले असले, तरीही तिचे आवाहन सार्वत्रिक व सार्वकालिक आहे. सुब्बण्णाच्या एकाकी जीवनाचे शोकांत चित्रण तीत असून तिला अतिशय लोकप्रियताही मिळाली. आतापर्यंत तिच्या १२ आवृत्त्या निघाल्या. शेषम्मा ही त्यांची अगदी अलीकडील कादंबरी होय.
ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील त्यांच्या दोन कादंबऱ्या आहेत. त्यांतील चेन्नबसव नायक (१९४९) ही एक असून तीत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बिदनूरचे राज्य हैदरने कसे गिळंकृत केले, याची शोकात्म कथा आली आहे. प्रत्यक्ष माता वीरम्मा व पुत्र चेन्नबसव यांच्यातील संघर्ष, त्यातून निर्माण झालेली अराजकता, त्यातून हैदरची सत्ता प्रस्तापित होऊन चेन्नबसव व त्याची पत्नी शांतव्वा यांचा मृत्यू तसेच वीरम्मा व नंबय्या हैदरचे कैदी होण्याचे चित्रण तीत आले आहे. बिदनूरच्या विनाशास कारण होणाऱ्या व्यक्तींची तसेच उदात्त अशा चेन्नबसव व त्याची पत्नी शांतव्वाच्या दुःखद अंताची अतिशय नेटकी व हृदयाचा ठाव घेणारी ही कथा.
चिक्कवीर राजेंद्र ही कोडगू (कूर्ग) येथील शेवटचा राजा वीर राजेंद्र याची व त्याच्या राज्याच्या अधोगतीची शोकांतिका आहे. राजेंद्र हा कामांध, क्रूर व दुराचरणी असतो. प्रजेचा व कर्तबगार व्यक्तींचा तो छळ करतो. आपला बालमित्र लंगडा बसव यास तो त्याची लायकी नसतानाही आपला मंत्री बनवतो. राजेंद्राचे वर्तन अधिकाधिक बेताल बनते. या अराजकाचा फायदा घेऊन कर्नल फ्रेझर कोडगूवर स्वारी करतो. युद्धात फ्रेझर सहज विजयी होतो, राज्य बळकावतो आणि राजा, राणी गौरम्मा व राजकुमारी पुट्टव्वा यांस कैद करतो. राज्य परत मिळणाच्या आशेवर राजेंद्र राजकुमारीस धर्मांतर करावयास लावतो. या धक्क्याने राणी गौरम्माचा मृत्यू होतो. राजेंद्र व राजकुमारी इंग्लंडला जातात. तेथे कॅप्टन कॅम्बेलशी राजकुमारी विवाह करते. कॅम्बेलपासून तिला एक मुलगी होते. त्या मुलीचा एकुलता एक मुलगा पुढे पहिल्या महायुद्धात ठार होतो. अशा प्रकारे कोडगू राजकुलाशी संबंधितांचा सर्वनाश होऊन कादंबरी संपते.
आपल्या अत्याचाराने राजेंद्रने स्वतःचा स्वतःच्या कुलाचा व कोडगू राज्याचा कसा विनाश घडवून आणला, हे मास्तींनी साधार दाखविले. त्याची व्यक्तिरेखा त्यांनी एकाच काळ्याकुट्ट रंगात रंगविली नाही, तर तिला काही चांगल्या मानवी गुणांची झालरही जोडली आहे. उदा., त्याचे आपली मुलगी पुट्टव्वा हिच्यावर असलेले अपार प्रेम, सदवर्तनी गौरम्मास तो कधीही विरोध करत नाही. गौरम्माची उदात्त, त्यागी, आदर्श, उत्तुंग अशी व्यक्तिरेखा तर वाचकाच्या नित्य स्मरणात राहते.
राजेंद्र, त्याची पत्नी गौरम्मा, मुलगी पुटव्वा, बहिण देवम्मा, मेहुणा चेन्नबसवय्या, मंत्री बोप्पणा, मंत्री लंगडा बसव ही कादंबरीतील ऐतिहासिक पात्रे तर भगवती व दीक्षित ही कल्पानिक पात्रे. लंगडा बसव हे पात्र साक्षात पाप म्हणूनच सर्व कादंबरीभर राजेंद्रची संगत करते. या सर्व व्यक्तीरेखा अतिशय जिवंत उभ्या करण्यात मास्ती कमालीचे यशस्वी ठरले आहेत. केवळ कन्नडमधीलच नव्हे, तर सर्वच आधुनिक भारतीय भाषांतील ही एक अक्षर अशी कलाकृती म्हणावी लागेल.
उमाकांत ठोंबरे यांनी चिक्कवीर राजेंद्रचा मराठीत अनुवाद केला असून तो नॅशनल बुक ट्रस्टतर्फे १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)
“