मासेओ : ब्राझीलमधील आलागोअस राज्याची राजधानी. लोकसंख्या ३,७५,७७१ (१९८०). हे रेसीफेच्या नैर्ऋत्येस २०९ किमी. अटलांटिक महासागर व नॉर्ती खारकच्छ यांमधील चिंचोळ्या भागावर वसलेले आहे. राज्यातील प्रमुख व्यापारी व दळणवळण केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथे दोन विमानतळ आहेत. सतराव्या शतकारंभी साखर कारखान्याच्या परिसरात या शहराची वाढ झाली. १६५४ मध्ये हे पोर्तुगीजांच्या ताब्यात आले व एकोणिसाव्या शतकात एक प्रमुख साखर निर्यात केंद्र म्हणून यास महत्त्व प्राप्त झाले. येथून कापडही निर्यात होते. याच्या आसमंतात नारळाच्या बागा आहेत. येथे कापड, साखर, लाकूडकाम, अन्नप्रक्रिया, सिगारेट, साबण इ. व्यवसाय विकसित झाले आहेत. आलागोअस राज्याचे हे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असून येथे राज्य विद्यापीठ, कॅथीड्रल तसेच साहित्य अकादमी आहे. येथील दीपगृहे प्रवाशांचे प्रमुख आकर्षण होय. 

गाडे, ना. स.