मासारिक, टॉमस गॅरिग : (७ मार्च १८५०–१४ सप्टेंबर १९३७). चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताकाचा सहसंस्थांपक पहिला अध्यक्ष (कार. १९१८–३५) व एक थोर मुत्सद्दी मोरेव्हीया प्रांतातील ओडोनिन या खेड्यात राजाच्या गाडीवानाच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. लाइपसिक व पुढे व्हिएन्ना विद्यापीठांत शिक्षण घेऊन त्याने डॉक्टरेट ही पदवी मिळविली. (१८७६) त्यावर्षीच त्याने कॅथलिक पंथ सोडून प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला. याच सुमारास त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या अनेक श्रद्धांविरुद्ध भूमिका स्वीकारली. लाइपसिक विद्यापीठात शिकत असताना त्याचा शालार्ट गॅरिन ह्या अमेरिकन युवतीशी परिचय आला. त्याचे रूपांतर पुढे त्याच्या विवाहात झाले (१९७८). १८७९ पासून तो काही दिवस व्हिएन्ना विद्यापीठात अध्यापन करीत असे (१८७९–८२).
त्याने १८८२ पासून १९११ पर्यंत प्राग विद्यापीठात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विषयांचा प्राध्यापक म्हणून
अध्यापन केले. १८८१ मध्ये सुसाइड ॲज ए मास फेनॉमेनन ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन (इं. भा.) हे समाजशास्त्रातील पुस्तक त्याने लिहिले. १८८५ मध्ये द बेसिस ऑफ कॉन्क्रिट लॉजिक हा त्याचा तर्कशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला. अध्यापनाबरोबरच त्याने नियतकालिके चालविली व त्यात विपुल लेखन केले. अथेनियअम् (१८८३) आणि नासे दोबा (इं. भा. अवर इपॉक – १८९३) ही नियतकालिके त्याने सुरू केले. शिवाय १८८९ मध्ये केस टाइम ह्या नियतकालिकाचे त्याने राजकीय साप्ताहिकात रूपांतर केले. १८९१ मध्ये तो प्रथम संसदेवर निवडून आला, पण १८९३ मध्ये त्याने या पदाचा त्याग केला. त्या काळातील प्रचलित भावनाधिष्ठित राष्ट्रवाद त्याला मान्य नव्हता. म्हणून त्याने ‘वास्तववादी’ गटाची स्थापना केली. त्याचा गट ‘रिॲलिस्ट’ ह्याच नावाने ओळखला जाई. १९०७ आणि १९११ असा पुन्हा तो दोन वेळा ह्या गटातर्फे संसदेवर निवडून आला. वरील नियतकालिकांतून राजेशाहीविरुद्ध तो परखडपणे लिहू लागला आणि त्याने एक स्वतंत्र पक्ष काढून भूमिगत गुप्तसंघटना स्थापना केली. ऑस्ट्रो-हंगेरियन राजेशाही उलथून पाडणे व चकोस्लोव्हाकियात संविधानात्मक लोकशाही स्थापन करणे, या ध्येयाने प्रेरित होऊन त्याने पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस जन्मभूमी सोडली. प्रथम स्वित्झर्लंडमध्ये राहून पुढे त्याने इंग्लडमध्ये वास्तव्य केले. इंग्लंडमध्ये त्याने एदूआर्त बेनेश याच्या सहकार्याने चेकोस्लोव्हाक नॅशनल कौन्सिल ही संस्था स्थापन केली आणि हॅप्सबर्ग साम्राज्यशाहीला प्रतिकार करण्याचे धोरण अवलंबिले .या संस्थेत दोस्त राष्ट्रांनी मान्यता दिली. मासारिकाने अमेरिका, फ्रान्स, रशिया आदी देशांचे सदिच्छा दौरे काढून आपल्या संकल्पित ध्येयास पाठिंबा मिळविला. एवढेच नव्हे तर काही निधीही गोळा केला. १९१७ च्या रशियातील क्रांतिनंतर चेकोस्लोव्हाक स्वातंत्र्यासाठी मदत करण्याकरिता त्याने नव्या रशियन सरकारचे मन वळविले (१९१८). दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रिया-हंगेरीचा पराभव केला (१९१८). पहिले महायुद्ध संपल्यानंतर चेकोस्लोव्हाकियाची स्थापना होताच १४ नोव्हेंबर १९१८ रोजी त्याची पहिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९२०,१९२७ आणि १९३४ अशी आणखी तीनवेळा त्याची या पदावर फेरनिवड झाली. १९३५ च्या डिसेंबर महिन्यात वृद्धापकाळामुळे त्याने हे पद सोडले आणि त्यानंतर दोन वर्षांनीच तो मरण पावला.
मासारिकने आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत जमिनीविषयक अनेक सुधारणा केल्या आणि अल्पसंख्याकाचे प्रश्न, चर्च व राज्यसंस्था यांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. तत्त्वज्ञ आणि राजकीय नेता या दोन्ही नात्याने मासारिकने जनमानसात श्रेष्ठ स्थान मिळविले. तत्त्वज्ञ म्हणून त्याने जीवनाच्या एकात्मतेचा पाठपुरावा केला. धर्म आणि राज्यव्यवहार या दोन्हींच्या संयुक्त अस्तित्वानेच जीवन आकार घेते, असे त्याचे मत होते. त्याने विपुल लेखन केले. त्याने लहानमोठे सु. पंधरा ग्रंथ लिहिले. वरील दोन ग्रंथाशिवाय त्याचे पुढील काही ग्रंथ महत्त्वाचे आहेत. द थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी अँड ह्यूम्स स्केप्टिसिझम (१८८२), द थेअरी ऑफ हिस्टरी ॲकॉर्डिंग टू टी. एच्. बकल (१८८४), द झेक क्वश्चन (१८९५), द फिलॉसॉफिकल अँड सोशिऑलॉजिकल फाउंडेशन्स ऑफ मेरिइझम (१८९८), द स्पिरिट ऑफ रशिया (१९१३), द मेकिंग ऑफ ए स्मॉल स्टेट मेमरीज अँड ऑब्झर्व्हेशन्स १९१४–१९१८ (१९२५). त्याच्या बहुतेक पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे झाली असून काहींची जर्मन भाषेतही भाषांतरे झाली आहेत.
संदर्भ : 1. Capek Karel Ed. Tomas Masaryk Tells His Story, London. 1970.
2. Ludwig Emil, Defender of Democracy : Masaryk of Czechoslovakia, New York, 1936.
3. Selver Paul, Masaryk : a Blography, Toronto, 1940.
4. Zeman, Zbynek Masaryk: The Making of Czechoslovakia, Totowa, 1976.
देशपांडे सु. र. पळशीकर, सुहास.
“