प्रेस्टर जॉन : मध्ययुगीन काळातील एक आख्यायिकीय ख्रिस्ती राजा. जेष्ठ किंवा वडीलधारा या अर्थाच्या ‘प्रेसब्युटेरॉस’ ह्या मूळ ग्रीक शब्दापासून प्रेस्टर हा शब्द आला आहे. प्रेसबिटर जॉन किंवा जॉन द एल्डर या नावानेही तो प्रसिद्ध आहे. जॉननामक एका राजाला प्रेस्टर असे विशेषण लावून प्रेस्टर जॉन असे संबोधण्यात येऊ लागले. तो नेस्टोरियन या ख्रिस्ती पंथाचा होता. त्याच्या ख्रिस्ती साम्राज्यातील अमाप ऐश्वर्याच्या कथा मध्ययुगीन इतिवृत्ते व दंतकथांतून उपलब्ध आहेत परंतु ह्या साम्राज्याची स्थापना व स्थान ह्यांबद्दल इतिहासात निश्चित नोंद नसल्यामुळे हे साम्राज्य काल्पनिकसुद्धा असू शकेल. धर्मयुद्धाच्या वेळी (इ. स. ११ वे ते १३ वे शतक) या कथेस महत्त्व प्राप्त झाले व पॅलेस्टाइन मुसलमानांकडून घेण्यासाठी तिचा वापर करण्यात आला. जर्मनीतील फ्रीसिंगच्या बिशप ऑटो यांने याची पहिली नोंद क्रॉनिकॉन या इतिवृत्तात ११४५ मध्ये केली. हे साम्राज्य आशिया किंवा आफ्रिका खंडात असावे, असा अंदाज आहे. त्याबाबात वेळोवेळी सांगितल्या गेलेल्या आख्यायिका पुढीलप्रमाणे आहेत : इ. स. ११४५ मध्ये एका सिरियन धर्मगुरूने एका दंतकथेच्या आधारे असे नमूद केले आहे, की इराणच्या पूर्वेकेडे कुठेतरी राज्य करणाऱ्या प्रेस्टर जॉननामक एका ख्रिस्ती राजाने इराण किंवा मीडिया राज्य पादाक्रांत केले होते. बाराव्या शतकाच्या मध्यास प्रेस्टर जॉनने पोपला किंवा बायझंटिनच्या बादशाहाला एक पत्र लिहिले असावे. त्या पत्रात आपल्या साम्राज्यात अमाप संपत्ती असून दुर्गुण किंवा दारिद्र्य नाही, असे नमूद केले होते असे सांगतात. तेराव्या शतकात मार्को पोलो या प्रसिद्ध इटालियन प्रवाशाने प्रेस्टर जॉनचा वारस जॉर्ज किंवा तार्तर राजा वांगखान याचे साम्राज्य गोबी वाळवंटाच्या दक्षिणेस पाहिल्यासारखे वाटते, असे नमूद केले आहे. चौदाव्या शतकातील प्रवाशांचा जो काही पुरावा उपलब्ध आहे, त्यावरून असे दिसते की, हे एक फार मोठे ख्रिस्ती साम्राज्य असून ते आफ्रिकेतील अबिसिनियात (विद्यमान इथिओपियात) असावे. त्यावरून ते प्रेस्टक जॉनचे साम्राज्य असावे असा कयास आहे कारण अँबिसिनियात ख्रिस्ती लोक होते व त्यासंबंधी ऐतिहासिक पुरावा सापडतो.

पंधराव्या शतकात भूगोलाचे ज्ञान वाढले आणि प्रेस्टर जॉन व त्याचे राज्य ह्याविषयींच्या दंतकथा कमी ऐकण्यात येऊ लागल्या. ॲबिसिनियावर मुसलमान लोकांचे आक्रमण झाल्यावर पोर्तुगीज लोकांनी ॲबिसिनियाला मदत करून तेथील ख्रिस्ती लोकांना मुसलमानी वर्चस्वातून वाचवले परंतु पोर्तुगीज सैन्याची फार मोठ्या प्रमाणात कत्तल झाली व ह्यानंतर प्रेस्टर जॉन आणि त्याच्या ऐश्वर्यशाली साम्राज्याच्या दंतकथा ऐकिवातून गेल्या.

आयरन, जे. डब्ल्यू.