माली : पश्चिम आफ्रिकेतील एक खंडांतर्गत प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ १२,४०,००० चौ. किमी. लोकसंख्या ७३,४२,००० (१९८२ अंदाज). हा देश १०° १० उ. ते २५° उ. व ४° १५ पू. ते १२° १५ प. यांदरम्यान असून त्याचा ईशान्य–नैर्ऋत्य विस्तार १,८५२ किमी. व वायव्य–आग्नेय विस्तार १,२५८ किमी. आहे. माली प्रजासत्ताकाच्या उत्तरेस व ईशान्येस अल्जीरिया, पूर्वेस आणि आग्नेयीस नायजर, दक्षिणेस अपर व्होल्टा व आयव्हरी कोस्ट, नैर्ऋत्येस गिनी, पश्चिमेस सेनेगल आणि वायव्येस मॉरिटेनिया हे देश आहेत. देशाच्या सरहद्दीची लांबी ७,५०१ किमी. असून बामाको (लोकसंख्या ४,०४,०२२–१९७६) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन :  मालीची भूमी सपाट व साधारणपणे एकसारखी असून पठारी व मैदानी प्रदेश असे देशाचे मुख्य दोन प्राकृतिक विभाग पडतात. उच्च भूमीचे प्रदेश तुटकतुटक आहेत. दक्षिण व नैर्ऋत्य भागांतील पठारी प्रदेश म्हणजे गिनीतील फूटा जालन पठार तसेच गिनी व आयव्हरी कोस्टमधील उच्च भूमीचा विस्तारित प्रदेश आहे. या पठारी प्रदेशाची सस. पासूनची उंची सु. ३०५ ते ४८७ मीटरच्या दरम्यान आहे. बामाकोजवळील मांडिग्वे पठाराची उंची सु. ६१० मी., तर सातादुगू येथे ती ६४० मी. पेक्षाही अधिक आढळते. हा पठारी प्रदेश वालुकाश्मापासून तयार झालेला असून पृष्ठभागावर सेनेगल, नायजर व त्यांच्या उपनद्यांनी तयार केलेल्या खोल दऱ्या व धबेधबे आहेत. पठाराचे काठ तुटलेल्या कड्यांसारखे दिसतात. आग्नेय व पूर्वेकडील पठारी प्रदेशही गिनी उच्चभूमीचेच विस्तारित भाग असून त्यांवर छोट्याछोट्या परंतु विदारित टेकड्यांच्या मालिका आढळतात. पठाराची आग्नेय भागातील सीकासॉ विभागाची उंची ३०५ मी., तर मौंट मिना येथील उंची ५३० मी. आहे. मौंट मिनाच्या उत्तरेस साहेल विभाग आहे. नायजर नदीच्या पूर्वेकडील डोगोन पठाराची उंची पश्चिमेकडे नदीखोऱ्याच्या बाजूस हळूहळू कमी होत गेलेली दिसते, तर आग्नेय काठावर तुटलेले कडे आढळतात. बांदिआगारा येथे या कड्यांची उंची सु. १,००० मी. आहे. बांदिआगाराच्या पूर्वेस होंबोरी टोंडो हे देशातील सर्वोच्च शिखर (उंची १,५५५ मी.) आहे. ईशान्य भागात आद्रार दे झीफोरा हा एकमेव पर्वत असून अल्जीरियातील अहॅग्गर पर्वतप्रदेशाचा तो विस्तारित भाग आहे. मालीचा उत्तर व मध्य भाग (नायजर खोऱ्याचा मैदानी प्रदेश व सहारा प्रदेश) हा दुसरा प्राकृतिक विभाग होय. यांपैकी देशाचा उत्तरेकडील निम्मा भाग सहारा वाळवंटी प्रदेशाने व्यापलेला असून त्यात तानेझ्रूफ्त व ताऊदेनी हे विस्तृत मैदानी प्रदेश आहेत. या मैदानी प्रदेशांत वालुकागिरी व अर्ग आढळतात. देशाच्या मध्यवर्ती भागात नायजर नदीखोऱ्याचा जलोढीय मैदानी प्रदेश असून देशातील मृदा बहुतेक नापीकच आहे. दक्षिण भागातील मृदा लोहयुक्त असून जास्त बाष्पीभवनामुळे ती कडक व तांबडी बनली आहे. सहाराच्या दक्षिण भागात तपकिरी व तांबड्या रंगांची, तर सहारा वाळवंटी प्रदेशात वाळू, खडक व रेतीयुक्त मृदा आढळते.

सेनेगल व नायजर या देशातील दोन मुख्य नदीप्रणाली असून त्या प्रामुख्याने सॅव्हाना व साहेल प्रदेशांत आहेत. देशाच्या पश्चिम भागातून वायव्येस वाहणाऱ्या सेनेगल नदीचे बाफँग व बाकोई (बारवॉय) हे दोन मुख्य शीर्षप्रवाह फूटा जालन पठारात उगम पावतात. या दोन शीर्षप्रवाहांचा बाफूलाबे येथील संगमानंतरचा प्रवाह सेनेगल या नावाने ओळखला जातो. फालेमे ही डाव्या तीरावरील, तर कोलींबीने व काराकोरो या सेनेगल नदीच्या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. जुलै ते ऑक्टोबर या काळात नदीला भरपूर पाणी असते तर एप्रिल-मे मध्ये ते बरेच कमी होते. नायजर ही देशातील दुसरी प्रमुख नदीप्रणाली असून नदीच्या एकूण प्रवाहापैकी सु. एक-तृतीयांश म्हणजेच १,६२५ किमी. लांबीचा प्रवाह मालीतून वाहतो. ही नदी फूटा जालन पठारावर उगम पावत असून बानांकोरोजवळ ती मालीमध्ये प्रवेश करते. मांडिग्वे पठारावरून ती ईशान्येस वाहत जाऊन सोतूबा येथील प्रपातावरून खाली कोसळते. कूलीकोरोपासून तिचे पात्र बरेच विस्तृत झाले आहे. पुढे मोप्ती येथे तिला उजवीकडून बानी नदी येऊन मिळते. येथे नदी अगदी सपाट प्रदेशातून वाहत असल्याने तेथे तिने खंडांतर्गत त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. येथील बराचसा प्रदेश दलदलयुक्त आहे. या त्रिभुज प्रदेशाच्या भागात नायजर नदी अनेक शाखांनी तसेच अनेक सरोवरांमधून काहीशीउत्तरेकडे वाहत जाते. देबो, फाती, टेले व फागबीन ही या भागातील प्रमुख सरोवरे आहेत. तिंबक्तूजवळ नायजर नदी पूर्ववाहिनी होते. पुढे बूरेम येथे मोठे वळण घेऊन ती दक्षिणवाहिनी बनते. ‘नायजर बेंड’ या नावाने हे वळण प्रसिद्ध आहे. गाऊ व आन्साँगो शहरांवरून दक्षिणेस वाहत जाऊन लाब्वेझांगा येथे ती नायजर देशात प्रवेश करते. नायजर नदीच्या शीर्षप्रवाहाकडे जुलै ते ऑक्टोबर, त्रिभूज प्रदेशात सप्टेंबर ते नोव्हेंबर, तर मोठ्या वळणावर डिसेंबर ते जानेवारी या काळात पाण्याचे प्रमाण जास्त असते. या नदीतून बामाको ते गाऊ यांदरम्यान ऑगस्ट ते जानेवारी या काळात जलवाहतूक चालते. नियमितपणे येणारे पूर व गाळाची सुपीक मृदा यांमुळे तिचा त्रिभूज प्रदेश शेतीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.

हवामान : मालीचे हवामान उष्ण व कोरडे असून सामान्यपणे कोरडा व आर्द्र असे दोन ऋतू स्पष्टपणे आढळतात, नोव्हेंबर ते जून या काळात कोरडा ऋतू असतो. या काळात येथून अलाइज व हरमॅटन वारे वाहतात. यांपैकी अलाइज हे साधारण थंड वारे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ईशान्येकडून तर मार्च ते जून या काळात हरमॅटन हे उष्ण व कोरडे वारे पूर्वेकडून वाहत येतात. जून ते ऑक्टोबर आर्द्र ऋतू असून या काळात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहतात. ढगांचा गडगडाट व वीजांचा चमचमाट होऊन या काळात पर्जन्यवृष्टी होते. सर्वाधिक पर्जन्य ऑगस्टमध्ये पडत असून या काळात तापमानही बरेच कमी असते.


सूदानी, साहेलियन व सहारा प्रकार असे देशाचे प्रमुख तीन हवामानविभाग करता येतात. देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून १५° उ. अक्षांशापर्यंतचा देशाचा सु. एक-तृतीयांश क्षेत्रफळाचा प्रदेश सूदानी प्रकारच्या हवामानात मोडतो. या प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० ते १३० सेंमी. व सरासरी तापमान २४° ते ३०° से. असते. सूदानी प्रकारच्या हवामान प्रदेशापासून उत्तरेस सहारा प्रकारच्या हवामान प्रदेशापर्यंतच्या साहेल हवामान विभागातील पर्जन्यमान २० ते ५० सेंमी. व तापमान २३° ते ३६° से. असते तर साहेल विभागाच्या उत्तरेकडील सहारा प्रकारच्या हवामान विभागात दिवसाचे तापमान ४७° ते ६०° से. पर्यंत वाढते व रात्रीचे तापमान ४° ते ५° से. इतके कमी होत असलेले आढळले. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १८ सेंमी. पेक्षाही कमी असते. पर्जन्य अत्यंत अनियमित व कमी असून एखादे वर्ष पर्जन्याशिवाय जाते. या भागातील हवामान अतिशय कोरडे आहे.

वनस्पती व प्राणी: देशातील सहारा प्रकारच्या हवामान प्रदेशात केवळ मिमोसा व ॲकेशिया यांसारख्या जड पानांच्या आणि काटेरी वनस्पती, साहेल प्रदेशात स्टेपी प्रकारच्या व गोरखचिंच, ताड यांसारख्या कोरड्या हवामानाला तोंड देऊ शकणाऱ्या वनस्पती, तर दक्षिणेकडील सूदानी हवामानाच्या प्रदेशात, विशेषतः गिनीच्या सरहद्दीदरम्यान आणि नद्यांच्या खोऱ्यांत, ठिकठिकाणी जंगले असून बाकीच्या प्रदेशात सॅव्हाना गवत व तुकळक वनस्पती आढळतात. सूदानी प्रदेशात नेरे, आफ्रिकन मॅहॉगनी, शेवरी, गोरखचिंच, शिया व टॅपिओका ह्या वनस्पतींचे प्रमाण अधिक आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे वनस्पतींचे प्रमाण फारच कमी होत जाते.

सूदान व साहेल प्रदेशांतील प्राणिजीवन समृद्ध व विविध प्रकारचे आहे. यात कुरंग, हरिण, जिराफ व हत्ती हे तृणभक्षक, तर सिंह, बिबळ्या, तरस हे मांसभक्षक प्राणी आढळतात. नद्यांमध्ये सुसरी, मगरी व पाणघोडे पहावयास मिळतात. यांशिवाय विविध प्रकारची माकडे, साप व पक्षी आहेत. सहारा प्रदेशात आफ्रिकी गॅझेल, चित्ता, रानमेंढ्या दिसून येतात. देशात एक राष्ट्रीय उद्यान, प्राण्यांची चार राखीव वने (क्षेत्र ८,०८,६०० हेक्टर) आणि सहा राखीव वने (२,२९,४०० हेक्टर) आहेत. साहेलमध्ये एक हत्तींचे अभयारण्य (१२,००,००० हेक्टर) व एक जिराफ अभयारण्य (१७,५०,००० हेक्टर) आहे. संरक्षित प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर चोरून केली जाणारी शिकार व इंधनासाठी केली जाणारी बेसुमार जंगलतोड यांना परिणामकारण आळा कसा घालावा हा शासनाचा मुख्य प्रश्न आहे.

इतिहास व राजकीय स्थिती: इ.स. चौथ्या शतकात सांप्रतच्या मालीमध्ये घाना साम्राज्याची सुरुवात झाली. तेव्हापासून मालीचा लिखित स्वरूपातील इतिहास उपलब्ध होतो. दहाव्या शतकातील भरभरटीच्या काळात या साम्राज्याने पूर्व सेनेगल, नैर्ऋत्य माली व दक्षिण मॉरिटेनियावर ताबा मिळविला व हळूहळू सहारा प्रदेश पार करून अरब राष्ट्रांशी आपले व्यापारी संबंध प्रस्थापित केले. तेराव्या शतकात घाना साम्राज्यात फूट पडून त्यातून माली साम्राज्य उदयास आले. यावरूनच पुढे स्वतंत्र प्रजासत्ताकाचे नाव माली असे घेतलेले आढळते. तसेच मालिंके (मांडिंगो) लोकांचे येथे राज्य होते त्यावरूनही माली हे नाव आलेले दिसते. चौदाव्या शतकात माली साम्राज्य भरभराटीच्या अत्युच्च स्थानावर असताना मन्स मूसाच्या नेतृत्वाखाली (कार.१३०७–३२) तिंबक्तूवर ताबा मिळवून माली हे मुस्लिमांच्या विद्याव्यासंगाचे मुख्य केंद्र बनविले. तसेच तिंबक्तू व जेने ही सहारा प्रदेशपर व्यापाराची प्रमुख केंद्रे बनली. सतराव्या शतकात माली साम्राज्याचा प्रभाव कमी झाला. साम्राज्याच्या उत्तरेकडील बऱ्याच भागावर त्वारेगांनी ताबा मिळविला. दरम्यानच्या काळात पूर्वेकडे मध्य नायजरमध्ये सोंघाई साम्राज्य उदयास आले (इ.स.सु. ७००). सोंघाई साम्राज्याने पुढे गाऊ हे आपले मुख्य केंद्र केले आणि १४६८ मध्ये तिंबक्तू काबीज केले. सोन्नी अली बेर (कार. १४६४–९२) व पहिला अस्किआ मुहम्मद (१४९२–१५२८) हे या काळातील प्रमुख राज्यकर्ते होते. १५९१ मध्ये मोरोक्को सैन्याने सोंघाई साम्राज्यावर आक्रमण करून त्यावर ताबा मिळविला. तेथील गाऊ, तिंबक्तू व जेने येथे आपले सुरक्षित तळ उभारून सभोवतालच्या प्रदेशावरही आपला राज्यविस्तार केला. तथापि या विस्तारित प्रदेशावर मोरोक्को राजवटीला आपला विशेष प्रभाव पाडता आला नाही परंतु १७८० मध्ये हा प्रदेश लहानलहान राज्यांमध्ये विभागला गेला. त्यांपैकी सेगूचे बांबारा राज्य विशेष महत्त्वाचे होते. एकोणिसाव्या शतकात तुकुलार जमातीतील अल्‌-हाजी उमर याने मूर्तीपूजा करणाऱ्यांविरुद्ध धार्मिक युद्ध उभारले. १८६२ मध्ये त्याने सेगू आणि मासीना शहरे काबीज केली व पुढल्याच वर्षी तिंबक्तू लुटले. १८६४ मध्ये उद्‌भवलेले बंड मोडून काढण्याच्या प्रयत्नांत तो मारला गेला. १८८० च्या दरम्यान सांप्रतच्या माली प्रजासत्ताक प्रदेशात फ्रेंचांचे आगमन झाले. त्याला मांडिंगो नेता सॅमरॉय ताउरे याने विरोध करण्यास सुरुवात केली (१८८२–९८) तथापि त्यात तो पकडला जाऊन त्याला हद्दपार व्हावे लागले. १८९८ मध्ये सीकासॉ हस्तगत करून फ्रेंचांनी विजय मिळविला.

फ्रेंच प्रशासनाखाली असताना हा प्रदेश फ्रेंच सूदान म्हणून ओळखला जाई व तो फ्रेंच पश्चिम आफ्रिकेचा एक भाग होता. फ्रेंचांच्या कारकीर्दीत डाकार-बामाको लोहमार्ग बांधणीचे व नायजर त्रिभुज प्रदेशाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले. १९४६ मध्ये सूदानी लोक फ्रेंच नागरिक बनले तसेच ते फ्रेंच संसदेचे प्रतिनिधित्व करू लागले. १९४६ च्या घटनेनुसार प्रादेशिक विधानसभेची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. १९५७ मध्ये सार्वत्रिक मताधिकार देण्यात आला. या प्रादेशिक विधानसभेला अंतर्गत व्यवहारांबाबत जबाबदार असणाऱ्या मंत्रीमंडळाची निवड करण्याचा अधिकारही देण्यात आला. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या घटनेनुसार १९५८ मध्ये फ्रेंच सूदानचे फ्रेंच समूहांतर्गत स्वायत्त अशा सूदानी प्रजासत्ताकात रूपांतर झाले. जानेवारी १९५९ मध्ये डाकार येथे सूदानी प्रजासत्ताक, सेनेगल, दाहोमी व अपर व्होल्टा यांनी मिळून माली महासंघाच्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला. परंतु फक्त सूदानी प्रजासत्ताक व सेनेगल यांनी या राज्यघटनेला मान्यता देऊन ते माली महासंघाचे सभासद झाले. त्यानंतर माली महासंघाने फ्रेंच समूहाचे सभासद राहण्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याचीच मागणी केली. तीनुसार जून १९६० मध्ये माली महासंघ स्वतंत्र झाला. तथापि अंतर्गत व परराष्ट्रीय धोरणांवरून मतभेद होऊन सेनेगल महासंघातून बाहेर पडला. २० ऑगस्ट १९६० रोजी हा महासंघच बरखास्त करण्यात आला २२ सप्टेंबर १९६० रोजी फ्रेंच सूदानने माली प्रजासत्ताक या नावाने स्वतःच आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आफ्रिकन लोकशाही विधानसभेचा सहसंस्थापक व माली महासंघाच्या आफ्रिकन महासंघ पक्षाचा राजकीय सचिव मोडीवो केईटा याने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. याचदरम्यान माली फ्रँक विभागातून बाहेर पडला. फ्रेंच समूहातून बाहेर पडण्याच्या निर्णयाबरोबरच सेनेगलशी संबंध तोडण्याचा निर्णयही घेण्यात आला. १९६३ पर्यंत म्हणजेच सेनेगल-माली यांच्यात ऐक्य होईपर्यंत सेनेगलशी किंवा सेनेगलमधून व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली होती.


मालीमध्ये राष्ट्राध्यक्ष केईटा यांनी चीनच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या धर्तीवरील एकपक्षीय हुकूमशाही असलेली समाजवादी राजवट आणली. देशात प्रचंड प्रमाणावर झालेल्या चलनवाढीमुळे केईटा राजवटीला पुन्हा फ्रँक विभागात प्रवेश करणे भाग पडले (१९६७). आर्थिक समस्या व लोकांमधील असंतोष अनावर झाला (१९६८). त्याचा फायदा घेऊन १९ नोव्हेंबर १९६८ रोजी लेफ्टनंट माउसा त्राओरे यांनी कनिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका गटाच्या मदतीने रक्तहीन क्रांती घडवून आणली. तीत केईटा यांचे शासन उलथवून टाकण्यात आले. १९६० ची राज्यघटना बरखास्त करण्यात आली. ‘मिलिटरी कमिटी फॉर नॅशनल लिबरेशन’ (सीएम्‌एल्‌एन्‌) ची स्थापना करून तिने सत्ता हस्तगत केली. १९७९ पर्यंत हीच सत्ता अधिकारावर राहिली. १९६९ मध्ये लेफ्टनंट त्राओरे व त्यानंतर कॅप्टन योरो डिआकिटे राष्ट्राध्यक्ष बनले. १९७२ मध्ये लष्करी समितीने डिआकिटे यांना सत्तेवरून काढून टाकले. १९७३ मध्ये डिआकिटे यांचे तुरूंगातच निधन झाले. लष्करी राजवटीने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, तथापि १९६८–७४ या काळातील तीव्र दुष्काळामुळे ते सफल होऊ शकले नाहीत. या दुष्काळी स्थितीच्या कालावधीत सु. ३३% लोकसंख्या निराश्रित बनली. एप्रिल १९७४ मध्ये सीएम्‌एल्‌एन्‌ने नवी प्रस्तावित राज्यघटना घोषित केली. या घटनेत एकपक्षीय राजवट तसेच लष्करी राजवट पाच वर्षांपर्यंत ठेवण्याची तरतूद होती. जून १९७४ मध्ये सार्वमताने ही घटना स्वीकारण्यात आली. १९७६ मध्ये डेमॉक्रॅटिक युनियन ऑफ मालीयन पीपल (युडीपीएम्‌) या अधिकारारूढ पक्षाची निर्मिती झाली. १९७९ मध्ये याला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली. तथापि काही राजकारणी व विद्यार्थ्यांनी या राजवटीला विरोध केला. त्यांनी बहुपक्षीय पद्धतीचा पुरस्कार केला. १९७८ मध्ये काही लष्करी व पोलीस अधिकाऱ्यांनी चालू राजवटीविरुद्ध कट केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. नव्या राज्यघटनेनुसार १९७९ मध्ये झालेल्या अध्यक्षीय व विधिमंडळीच्या निवडणुकीत त्रा ओरे हे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाच वर्षांसाठी बहुमताने निवडून आले. माली हे एकपक्षीय राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले. संविधानीय राजवट आली, तरी प्रशासनावर लष्करी प्रभाव तसाच होता. या राजवटीविरुद्ध देशातील विद्यार्थ्यांनी अत्यंत तीव्र आंदोलने उभारली. सप्टेंबर १९८१ मध्ये घटनेत दुरुस्ती करून राष्ट्रीय विधानसभेची मुदत तीन वर्षे करण्यात आली.

सूदान प्रोग्रेसिव्ह पार्टी (पीएस्‌पी) हा मालीमधील पहिला प्रभावी राजकीयपक्ष होय. १९५५ पर्यंत प्रादेशिक विधानसभेत या पक्षाने आपले बहुमत टिकविलेहोते. दरम्यानच्या काळात सूदानी युनियन या क्रांतिक्रारी व वसाहतविरोधीपक्षाचा उदय झाला होता. मार्च १९५७ मधील प्रादेशिक विधानसभा, मार्च १९५९मधील विधानसभा व एप्रिल १९६४ मधील संसदीय निवडणुकीत सूदानी युनियन यापक्षाने बहुमत मिळविले होते. युडीपीएम पक्षाने १९७९ व १९८२ मधील राष्ट्रीयविधानसभेच्या निवडणुकांत अनुक्रमे ९९·८९ व ९९·८२ मते मिळविली. या पक्षाच्यास्थापनेपासून जनरल माउसा त्राओरे हे महासचिवपदी आहेत. मालीचाराष्ट्राध्यक्ष हा देशाचा आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख असून सार्वत्रिकमतदानाने सहा वर्षांसाठी त्याची निवड होत असते. राज्यकारभाराच्या सोयीसाठीदेशाचे मुख्य आठ विभाग व ४६ उपविभाग पाडलेले आहेत. राजधानी बामाको हा एकस्वतंत्र विभाग आहे. केंद्रशासनाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांकडून मुख्यविभागांचा कारभार पाहिला जातो.

बामाको येथे १९६९ मध्ये सर्वाच्‍च न्यायालयाची स्थापना झाली असून त्यात१९ न्यायाधीश ५ वर्षांसाठी नियुक्त केलेले असतात. येथेच आपील न्यायालय आहे.याशिवाय येथे कामगार दंडाधिकारी न्यायालय व विशेष राज्यसुरक्षा न्यायालयआहे.

देशातील सशस्त्र दलात एकूण ४,९५० सैनिक होते (१९८३) त्यांपैकी ४,६००भूदलात, ३०० नौसेनेत व ५० वायुसेनेत होते. वायुसेनेकडे २३ विमाने वनौसेनेकडे नद्यांमध्ये गस्त घालणाऱ्या ३ बोटी होत्या सैनिकासम (पॅरामिलिटरी) संघटनेची संख्या ५,००० असून रशिया व पूर्व यूरोपीय देशांकडूनमालीला लष्करी मदत मिळते. १९८१ चा संरक्षणावरील अंदाजे खर्च ४०० लक्षअमेरिकी डॉलर एवढा होता.

आर्थिक स्थिती :आर्थिक दृष्ट्या माली मागासलेलाच आहे. देश प्रामुख्याने कृषिप्रधान असूननिर्वाह व व्यापारी अशी दोन्ही प्रकारची शेती तेथे चालते. ९०% पेक्षा जास्तलोक निर्वाह शेतीत गुंतले आहेत. कृषिविकास मुख्यतः नायजर नदीच्या खोऱ्यातआणि विशेषतः नायजरच्या त्रिभुज प्रदेशात झालेला आहे. याशिवाय सुदानी वसाहेली हे प्रदेशही शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. देशाच्या एकूणक्षेत्रापैकी २% क्षेत्र शेतीखाली आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका हीयेथील प्रमुख अन्नधान्याची पिके असून यांशिवाय कापूस, भूईमूग, ऊस, तंबाखू, चहा, फळे व भाजीपाला, शिया (वनस्पतिजन्य लोणी देणारे झाड), टॅपीओकायांचेही उत्पादन घेतले जाते. कापूस आणि भुईमूग ही प्रमुख नगदी पिके आहेत.१९८१ मध्ये प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (हजार मे. टनांमध्ये)ज्वारी, बाजरी ९३०, तांदूळ १४२, मका ८०, ऊस २२५, रताळी व सुरण ५०, टॅपीओका५६, भाजीपाला १३५, फळे १०, कडधान्ये ३६, भुईमूग १९०, सरकी ७०, कापूस ४० कमीहोत गेलेल्या पर्जन्यमानामुळे बऱ्याचशा पिकांच्या उत्पादनाचे प्रमाण कमीझालेले आहे. १९८०–८१ पर्यंत तर माली हा पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख कापूसउत्पादक देश होता. त्यानंतर मात्र आयव्हरी कोस्टने मालीला कापूस उत्पादनातमागे टाकले आहे. अन्नधान्याच्या बाबतीत पूर्वी स्वयंपूर्ण असलेल्या मालीदेशाला आज अन्नधान्याची आयात करावी लागतत असून वाढती लोकसंख्या व अपुरापर्जन्य ही यामागची प्रमुख कारणे आहेत. शासनाकडून व्यापारी शेतीच्याविकासास प्रोत्साहन दिले जात आहे. कापूस व तांदूळ यांच्या उत्पादनवाढीच्या दृष्टीने १९३२ मध्ये नायजर ऑफिस या शासन –नियंत्रितअभिकरणाची स्थापना करण्यात आली असून हे अभिकरण जलसिंचन विकासाचे कार्यहीकरते. देशातील सु. ५७,५१० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली आहे.


पशुपालन हा येथील दुसरा प्रमुख व्यवसाय आहे. बराचसा भाग वाळवंटी असल्यानेतेथे केवळ हाच व्यवसाय चालू शकतो. १९८१ मध्ये देशातील पशुधन व पशुधनउत्पादन पुढीलप्रमाणे होते. पशुधन (आकडे हजारांमध्ये) गुरे ५,१३४, मेंढ्या६,३५०, शेळ्या ७,०००, डुकरे ४५, घोडे १३९, गाढवे ४२०, उंट १७३, कोंबड्या१२,५००. पशुधन उत्पादन (आकडे मे. टनांमध्ये) दूध १,७६,००० लोणी २,४७६ मांस८५,००० कोंबड्यांची अंडी ९,००० कातडी १४,६९५. पशुपालन व्यवसाय प्रामुख्यानेसाहेल, नायजर नदीचा मध्यवर्ती त्रिभुज प्रदेश व नायजरच्या मोठ्या वळणाच्याप्रदेशात चालतो. बहुतेक सर्व गुरे भटक्या जमातींच्या मालकीची आहेत.शेजारील देशांत असलेल्या जास्त किमतीमुळे गुरांचा चोरटा व्यापार मोठ्याप्रमाणावर केला जातो. आयव्हरी कोस्ट व घाना हे गुरांचे तर आयव्हरी कोस्ट वअल्जीरिया हे शेळ्या–मेंढ्याचे प्रमुख ग्राहक देश आहेत. गिनी, सेनेगल, नायजर व बेनिन प्रजासत्ताक या शेजारील देशांनाही मांस व गुरांची निर्यातकेली जाते. देशातील बामाको व गाऊ येथे मोठे कत्तलखाने आहेत.

उद्योग : औद्योगिक विकासाच्या दृष्टीने देशात फारसा वाव नाही. कारण औद्योगिकविकासाला लागणारी शक्तिसाधने व खनिजे पुरेशी उपलब्ध नाहीत. देशात एकूण बाराविद्युत्‌निर्मिती प्रकल्प असून त्यांपैकी दोन जलविद्युत्‌निर्मिती व दहाऔष्णिक विद्युत्‌निर्मिती केंद्रे आहेत. नायजर नदीवरील सोतूबा व मार्कालाधरणांजवळ आणि सेनेगल नदीवरील फेलाऊ धरण येथे विद्युत्‌निर्मिती केंद्रेआहेत. एकूण विद्युत्‌निर्मिती १,१०० लक्ष किवॉ. ता. इतकी होती (१९८१)सौरशक्ती विकासाचेही प्रयत्न चालू आहेत. बहुतेक खनिज तेलाची आयातच करावीलागते. १९८१ मध्ये १,३२,००० टन खनिज तेलाची आयात करण्यात आली. देशांतसंगमरवर, लोह, बॉक्साइट, चुनखडी, फॉस्फेट, मीठ, सोने, मँगॅनीज, कॅल्शिअम, केओलीन, तांबे, कथिल, जस्त, शिसे, हिरे, लिथियम, यूरेनियम, टंगस्टंन यांचेसाठे आहेत. बाफूलाबे येथे संगमरवर, डिआमाऊ येथे चुनखडक, बूरेम येथे फॉस्फेट, तर कालाना येथे सोन्याच्या खाणी आहेत. इतर खानिजांचे उत्पादन पुरेशावाहतूक साधनांच्या विकासावरच अवलंबून आहे.

देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६% क्षेत्र (८० ल. हेक्टर) अरण्यांखालीआहे. १९८१ मध्ये ३,०२,४९,००० घ. मी. एवढे लाकडाचे उत्पादन झाले , त्यांपैकी२,९९,७३,००० घ. मी. एवढे इंधनाचे लाकूड होते. इंधनासाठी केली जाणारी बेसुमारजंगलतोड ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मालीच्या जल व वन सेवाविभागांकडून वनसंवर्धनाचे तसेच जंगलाच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचेकार्य केले जाते.

मासेमारी हा सुद्धा देशातील महत्त्वाचा व्यवसाय असून त्यात सु. २,००,००० लोकगुंतलेले आहेत. मासेमारीत पश्चिम आफ्रिकेतील मोरोको व सेनेगलनंतर मालीचातिसरा क्रमांक लागतो. नायजर व तिच्या उपनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरमासेमारी केली जाते. ९०% मासे मोप्ती विभागात पकडले जातात. नायजर व बानीनद्यांमुळे पावसाळ्यात येथील त्रिभुज प्रदेशजलामय झालेला असतो. सेनेगलनदीही मासेमारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ९०% मासे सुकविले जातात. २०%माशांची निर्यात केली जाते. १९६८–७४ या काळातील दुष्काळामुळे मासेमारीचेप्रमाण फारच कमी झाले. १९८१ मध्ये एकूण ९८,००० टन मासे पकडण्यात आले. त्यांपैकी ७०,००० टन माशांचा स्थानिक वापर झाला.

देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांना विशेष महत्त्वाचे स्थान नाही.देशाच्या स्थूल अंतर्गत उत्पादनात केवळ १८% वाटा औद्योगिक उत्पादनाचा आहे.अन्नधान्य, कापूस, कातडी यांच्यावरील प्रक्रियाउद्योगांचे प्रमाण अधिकअसून शासनाकडूनही त्यांच्या विकासास अधिक प्राधान्य दिले जात आहे. भातसडी, पिठाच्या गिरण्या, सरकी काढणे, तेल गिरण्या, साबण, आसवन्या, चर्म संस्करणी, कत्तलखाने, फळ-संस्करण, साखर, सिगारेटी, आगपेट्या, सिमेंट हे येथील प्रमुखउद्योगधंदे आहेत. तसेच वस्त्रे, मातीची भांडी, पादत्राणे, टोपल्या, लाकडावरील कोरीव काम हे हस्तव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. ९०%उद्योगधंदे सार्वजनिक क्षेत्रात आहेत. देशात कूलीकोरो, बामाको, बाग्वीनेडा, डाउगाबाउगाऊ, जालिबा, डिआमाऊ इ. प्रमुख नगरे आहेत. १९८२ मध्ये काहीमहत्त्वाची औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली . कच्ची साखर ५,६२६ मे. टन, बीर १०, १५२ हेक्टोलिटर, सौम्य पेये २३,४१३ हेक्टोलिटर, सिमेंट २०,४२४मे.टन (१९८०), साबण १,३२७ मे.टन औद्योगिक विकासाच्या दृष्टीने परकीयगुंतवणुकीस शासन प्रोत्साहन देत आहे. १९८१ मध्ये देशातील ७५% औद्योगिकउलाढाल केवळ २९ सरकारी कंपन्याकडून झाली.

व्यापार-वाणिज्य व अर्थ :स्वातंत्र्यापासून मालीची दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय व्यापार तुटीचा राहिलाअसून दिवसेंदिवस परदेशांवरील अवलंबित्व वाढत आहे. बहुतेक सर्वनिर्मितीवस्तूंची आयात करावी लागते. मालीचा व्यापार प्रामुख्याने फ्रान्स, बेल्जियम, आयव्हरी कोस्ट, चीन, सेनेगल, अमेरिका, पश्चिम जर्मनी, जपान, ग्रेटब्रिटन, रशिया नेदलर्लंडस यांच्यांशी चालतो. त्यांपैकी जास्तीतजास्तव्यापार (२७·१%) फ्रान्सशी चालतो. एकूण आयात व्यापारापैकी ३२·५% व एकूणनिर्यात व्यापारापैकी १४·३% व्यापार फ्रान्सशी चालतो (१९८१). याचवर्षीएकूण निर्यात व्यापारापैकी २१·७% निर्यात व्यापार बेल्जियमशी झाला. १९८२मध्ये एकूण आयात-निर्यात पुढीलप्रमाणे झाली. (आकडे कोटी माली फ्रँकमध्ये)आयात. वाहने व यंत्रे ६,२०० खनिज तेल उत्पादने ४,५६० अन्नसामग्री ४,०५०रसायने व औषधे उत्पादने २,००० बांधकाम सामग्री २,००० वस्त्रे, कातडी वत्वचा १,०१० इतर २,०२०. निर्यात : कापूस व कापूस उत्पादने ३,७२०, पशुधन ३,४१०शिया झाडाची फळे ४७० भुईमूग व शेंगदाणा तेल १७० सुकविलेले मासे १५० इतर१,६६० या वर्षांतील व्यापारातील एकूण तूट १२,२६० कोटी माली फ्रँक इतकी होती.ही तूट आंतराष्ट्रीय संघटना व परदेशांकडून मिळणाऱ्या मदतीतून भरून काढलीजाते. कडक सीमाशुल्क निर्बंध असूनही विशेषतः गुरे व मासे यांचा चोरटाव्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. समुद्रपार व्यापारासाठी मालीला सेनेगलच्याडाकार बंदरावर अवलंबून राहावे लागते. टोगोमधील लॉमे बंदरात मालीने आपलीवखार उघडली असून (१९८३) मालीला व्यापारी दृष्ट्या ती विशेष महत्त्वाची आहे.१९७० मध्ये आलेल्या लष्करी राजवटीपासून देशातील व्यापारी संघटना संपुष्टातआल्या आहेत.

फ्रेंच पश्चिम आफ्रिकी प्रदेशांसाठी १९५९ मध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापनाकरण्यात आली होती. जुलै १९६२ मध्ये मालीन यातून बाहेर पडून स्वतंत्र बँकेचीस्थापना केली. या बँकेने माली फ्रँक हे नवीन चलन काढले. १९६७ मध्ये मालीनेपुन्हा फ्रँक विभागात प्रवेश केला. १ जून १९८४ पासून मालीने पुन्हा फ्रँकसीएफ्‌ए (२ माली फ्रँक) असे आपले अधिकृत चलन प्रचारात आणले. मार्च १९६८मध्ये बँकांची पुनर्रचना करून ‘सेंट्रल बँक ऑफ माली’ या मध्यवर्ती बँकेची स्थापना केली. डिसेंबर १९८२ मध्ये मालीचा पश्चिम आफ्रिकन सुद्धा संघटनेत पुनर्प्रवेशाचा अर्ज नाकारण्यात आला. या पुनर्प्रवेशाला प्रामुख्याने अपर व्होल्ट या देशाने विरोध केला. मध्यवर्ती बँकेशिवाय देशात डेव्हलपमेंट बँक ऑफ माली, मालीयन बँक फॉर क्रेडिट ॲन्ड सेव्हिंग्ज, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, बँक ऑफ आफ्रिका-माली, फ्रेंच बँक, इटरनॅशनल बँक ऑफ. वेस्ट आफ्रिका या बँका आहेत (१९८१). देशात एकूण चार विमाकंपन्या आहेत (१९७९) येथे रोखेबाजार नाही.


फ्रँक सीएफ्‌ए हे मालीचे चलन आहे. १०० सेंटिम = १ फ्रँक सीएफ्‌ए होतो.१, २, ५, १०, २५, ५०, व १०० फ्रँक सीएफ्‌ए ची नाणी आणि १००, ५००, १,०००, ५,०००, व१०,००० फ्रँक सीएफ्‌एच्या नोटा चलनात आहेत. १ फ्रेंच फ्रँक = ५० फ्रँकसीएफ्‌ए १ स्टलिंग पौंड = ५५८·५ फ्रँक सीएफ्‌ए, १ अमेरिकी डॉलर = ४८२·२५फ्रँक सीएफ्‌ए आणि १,००० फ्रँक सीएफ्‌ए = २·०७३६ स्टलिंग पौंड = १·७९०५अमेरिकी डॉलर, असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८४).

राष्ट्रीय अर्थकारण :मालीचे अंदाजपत्रक साधारणपणे तुटीचेच असते. एकूण खर्चापैकी ७०% खर्च वेतनव मजुरीवरील असतो. शिक्षण ही खर्चाची मुख्य बाब असून त्याखालोखालसंरक्षणावर खर्च होतो सीमाशुल्क आणि कर ह्या उत्पन्नाच्या मुख्य बाबीआहेत. आयकर, विक्रीकर, धंद्यांवरील लाभकर, अल्कोहॉलयुक्त पेये, इंधन, वंगणतेले, बंदुकीच्या गोळ्या व काडतुसे, तंबाखू इत्यादीवर उत्पादनकर बसविलाजातो. यांशिवाय संपत्ती, पशुधन, मोटारगाड्या, दारूगोळा, हत्यारे इत्यादीवरतसेच नोंदणी व मुद्रांकशुल्कही आकारले जाते. इंधन आयातीवर आणि भुईमूग वकापूस यांच्या निर्यातीवर विशेष सीमाशुल्क आकारले जाते. सर्व प्रकारच्याआयातीसाठी आयात अनुज्ञप्ती घ्यावी लागते. देशात परकीय गुंतवणूकीचे प्रमाणबरेच कमी आहे. प्रामुख्याने किरकोळ व्यापार व लघुउद्योगांतच परकीय गुंतवणूकआढळते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून परकीय खाजगी गुंतवणूक बंदच झालेली दिसते.मात्र लष्करी राजवटीच्या काळात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने परकीय खाजगीगुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले. तथापि देशाचे खंडांतर्गत स्थान, अविकसित वाहतूक–व्यवस्था, मर्यादित स्थानिक बाजारपेठ इत्यादींमुळे परकीयखाजगी गुंतवणूक करण्यास सहसा कोणी तयार होत नाही.

वाहतूक व संदेशवहन :शासनाच्या ‘माली वाहतूक प्राधिकरणा’ कडून येथील वाहतूक-व्यवस्था पाहिलीजाते. सेनेगल सरहद्दीपासून बामाकोमार्गे कूलीकोरोपर्यंत जाणारा (लांबी ६४०किमी.) हा देशातील एकमेव महत्त्वाचा लोहमार्ग आहे. हाच लोहमार्ग पुढे सेनेगलमधील डाकार बंदरापर्यंत जातो. देशाच्या खंडातर्गत स्थानामुळे परदेशीव्यापारासाठी मालीला सेनेगलमधील डाकार बंदरावर अवलंबून रहावे लागते. यादृष्टीने या लोहमार्गाला महत्त्वाचे स्थान आहे. १९८० मध्ये या मार्गाने सु.६,३९,१०० इतकी प्रवासी वाहतूक झाली. या लोहमार्गाच्या आधुनिकीकरणासाठीजागतिक बँकेने आर्थिक मदत केली आहे. देशातील रस्त्यांची एकूण लांबी सु.१८,००० किमी. असून त्यांपैकी ७,५०० किमी. लांबीचे रस्ते बारमाही उपयोगाचेआहेत. वाहनांची एकूण संख्या १९,३३६ होती (१९७६). नायजर नदीची देशातील लांबी१,७८२ किमी. असून तिचा बामाकोकूलीकोरो हा ५९ किमी. लांबीचा द्रुतवाहयुक्तप्रवाह वगळता बाकीचा सर्व प्रवाह जलवाहतूकयोग्य आहे. नायजरच्या बानी याउपनदीचा सान-मोती यांदरम्यानचा २२४ किमी. लांबीचा प्रवाहसुद्धा जल वाहतुकीसउपयुक्त आहे. सेनेगल नदीच्या केझसच्या खालच्या प्रवाहातून ऑगस्ट तेऑक्टोबर यांदरम्यान जलवाहतूक चालते. माली, सेनेगल व मॉरिटेनिया यांनी मिळून ‘सेनेगल नदी’ विकास संघटनेची स्थापना केलेली आहे. बामाको व बामाकोपासून १४ किमी. वरील सेनोऊ येथे मुख्य विमानतळ आहेत. बामाको येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मालीची वेगवेगळ्या पश्चिम आफ्रिकी देशांशी दररोज आणि पॅरिसशी आठवड्यातून एकदा हवाई वाहतूक चालते. याशिवाय बूरेम, गाऊ, मोप्ती, केझ, कीडाल, न्योरो, तिंबक्तू, सेगू, टेस्सालिट आणि गूंडाम येथे छोटे विमानतळ असून सु. ४० ठिकाणी छोट्या धावपट्‌ट्या आहेत.

देशातील प्रसारमाध्यमे सरकारच्या मालकीची असून सर्व पत्रकार सरकारीनोकरदार असतात. आकाशवाणीवरून फ्रेंच, इंग्रजी व इतर सात देशी भाषांतूनकार्यक्रम प्रसारित केले जातात. १९८३ मध्ये एकूण १०,००,००० रेडिओसंच वापरातहोते. लिबियाच्या आर्थिक मदतीने देशात रंगीत दूरचित्रवाणीचा प्रसारकरण्यात आला आहे. देशात ८,४८५ दूरध्वनिसंच असून (१९८२) दूरध्वनीने पॅरिसशीथेट संपर्क साधला आहे.

लोक व समाजजीवन : देशात एकूण लोकसंख्येपैकी ३० ते ३५% बांबारी वंशाचे व १० ते १३% फुलानीवंशाचे लोक असून शिवाय मार्का, सोंघाई, मालिंके, त्वारेग, मिनिआंका, सेनाउकोव डोगोन या वंशाचे लोकही आहेत. यांपैकी बांबारी व्यवसायाने मुख्यतः शेतकरीअसून मध्य व दक्षिण भागांत त्यांचे आधिक्य आहे. फुलानी किंवा पेऊल हेअर्धभटके गुराखी देशात सर्वत्र आढळत असले, तरी मोप्ती विभागात त्यांचेप्रमाण अधिक आहे. प्राचीन घाना साम्राज्याचे स्थापनकर्ते म्हणून ओळखलेजाणारे मार्का लोक सेगू विभागात आढळतात. नायजर नदीच्या खोऱ्यातील सोंधाईलोक शेती, मासेमारी व व्यापारात गुंतले आहेत. मालिंके लोक बाफूलाबे, कीटा वबामाको विभागात. बर्बर गटातील भटके त्वारेग लोक देशाच्या उत्तर भागातीलआद्रार दे झीफोरा विभागात, शेतीव्यवसाय करणारे मानिआंका लोक कूटीआल विभागातव सैनौफो लोक सीकासॉ विभागात, तर बांदिआगारा सभोवतालच्या पठारी भागातडोगोन लोक आढळतात. डोगोन हे मालीचे मूळ रहिवासी समजले जातात. मालीतीलबहुसंख्य लोक निग्रॉइड वांशिक गटातील आहेत. देशाच्या राज्यघटनेने धार्मिकस्वातंत्र्य दिले आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६५% मुस्लीम, ३०% जडप्राणवादी व५% ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चनांपैकी १% रोमन कॅथलिक पंथाचे होते (१९७९). १९७५ ते १९८० या काळातील वार्षिक सरासरी दरहजारी जन्मप्रमाण ४९·४ वमृत्यूप्रमाण २२·२ होते. लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर २·५ ते २·८%यांदरम्यान आहे. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी. स. ५·९ असून (१९८२)नायजर खोऱ्यात ती सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे. उत्तरेकडील वाळवंटीप्रदेशातील फुलानी त्वारेग व इतर भटक्या जमाती देशाच्या सरहद्दी मुक्तपणेपार करून जातात. सेनेगल व आयव्हरी कोस्ट या शेजारी देशांकडे काहीकामगारांचे हंगामी स्थलांतर होत असते. ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडेहोणाऱ्या स्थालांतराचे प्रमाण वाढले आहे. एकूण लोकसंख्येत १७% नागरी, १०% भटक्या जमातीची व उर्वरित लोकसंख्या ग्रामीण आहे.

देशाच्या प्रमुख शहरांमध्ये यूरोपीय पद्धतीची घरे आढळतात. त्वारेगसारख्याभटक्या जमातीचे लोक तंबूमध्ये रहात असल्याचे दिसते, तर खेड्यामध्येमातीच्या गोलाकार झोपड्या व परंपरागत सूदानी प्रकारच्या इमारती पहावयासमिळतात. रिअल इस्टेट ट्रस्ट या सार्वजनिक महामंडळाची १९४९ मध्ये स्थापनाझालेली असून स्वतःच्या जमिनीवर घरे बांधू इच्छणाऱ्या व्यक्तींना हे महामंडळकर्ज देते. कामगारांना वैद्यकीय व सेवानिवृत्ती मदत, कुटूंबभत्ता, प्रसूतिलाभ इ. सुविधा पुरविल्या जातात. तसेच प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात महिला व बालके यांच्या घ्यावयाच्यी काळजी संबंधीची माहिती देणारे वर्ग घेतले जातात. स्त्रियांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात असून त्यामुळे सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गर्भपात बेकायदेशीर आहे.


देशातील बहुतेक सर्व वैद्यकीय सेवा सार्वजनिक क्षेत्राच्या अखत्यारीतीलआहेत. खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची आणि सुसज्ज अशा वैद्यकीयसंस्थांची संख्या खूपच कमी आहे. १९८० मध्ये देशात १२ रूग्णालये, ३२७ आरोग्यकेंद्रे, ४४५ दवाखाने, ३,२०० खाटा, ३१९ डॉक्टर, १८ शल्यचिकित्सक, १४दंतवैद्य, २४ औषधनिर्माते (१९७८), २५० प्रसाविका व १,३१२ परिचारिका होत्या.येथे चार वैद्यकीय प्रशिक्षण संस्था आहेत. शासनाकडून पीतज्वर निर्मूलनसेवा पुरविल्या जातात. १९८३ मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने आरोग्यविषयक सुविधांच्या विकासासाठी १६७ लक्ष डॉलर एवढे कर्ज मालीला देऊ केलेआहे. बामाको येथे उष्ण कटिबंधीय नेत्रचिकित्साशास्त्र संस्था व मार्चौक्सकुष्ठरोग संस्था असून त्यांत आरोग्य सेवांबरोबर संशोधन कार्यही केले जाते.देशात हिवताप, कुष्ठरोग, क्षयरोग, आंत्रदाह इ. रोगांचे प्रमाण अधिकआढळते. सरासरी आयुर्मान अंदाजे ४२ वर्षे होते (१९७०).

भाषा व साहित्य :फ्रेंच ही मालीची अधिकृत, प्रशासनाची व शिक्षणाची मुख्य भाषा आहे. देशाच्यापश्चिम, मध्य व दक्षिण भागांत बांबारी नायजरच्या त्रिभूज प्रदेशाच्याभागात फुलानी, तर पूर्व व ईशान्य भागांत प्रामुख्याने सोंघाई भाषा बोललीजाते. ६०% लोक बांबारी भाषा बोलतात. याशिवाय वेगवेगळ्या वांशिक गटांच्या ववेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. यात फुलफुल्‌डी, सोनराई, तामाशेक, सोनिंके, डोगोन, मालिंके, कासोंके, वासुळुंका (आउसाउलाऊ)ब्वा, सीनूफो, मिनिआंका या भाषा महत्त्वाच्या आहेत. सेमिटिक भाषिक अरब वहॅमिटिक भाषिक त्वारेग यांची लेखनाची परंपरागत अशी स्वंतत्र भाषा आहे.लेसॉर हे देशातील मुख्य दैनिक व साप्ताहिक आहे. राजधानी बामाको येथे अनेकग्रंथालये व वस्तुसंग्रहालये असून त्यांतली राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आणि१५,००० ग्रंथ (१९८२) असलेले राष्ट्रीय ग्रंथालय ही प्रसिद्ध आहेत. तिबंक्तूयेथे इतिहास संशोधन केंद्र असून त्यात महत्त्वाच्या अरबी हस्तलिखितांचासंग्रह आहे. तेथे एक वस्तुसंग्रहालयही आहे.

शिक्षण :देशातील ६ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत आहे.प्राथमिक शिक्षण नऊ वर्षाचे आणि माध्यमिक शिक्षण तीन वर्षाचे आहे. प्राथमिकशिक्षण सक्तीचे असले, तरी ६ ते १५ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांचेप्रमाण केवळ ३०% एवढेच आहे. साक्षरतेचे सरासरी प्रमाण ९·४% असून हेचप्रमाण पुरुषांच्या बाबतीत १३·५% व स्त्रियांच्या बाबतीत ५·७%एवढे होते (१९७६). १९७९ मध्ये प्राथमिक शाळांत २,९३,२२७ विद्यार्थी व ६,८७७ शिक्षक, माध्यामिक शाळांत ७०,६२५ विद्यार्थी व ३,००४ शिक्षक तसेच तांत्रिक शाळांत२,६०९ (१९७७), शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत २,५११ व उच्‍च शिक्षणघेणारे ५,२८१ विद्यार्थी होते. उच्‍च शिक्षण देणाऱ्या सहा संस्था होत्या (१९७६) बामाको येथे व्यवसाय, प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतशास्त्र व शिक्षणशास्त्र विषयक शौक्षणिक संस्था व कूलीकोरो येथेतंत्रनिकेतन संस्था आहे. उच्‍च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी परदेशांत, विशेषतः फ्रान्स व सेनेगल मध्ये जातात. देशातील निरक्षरतेचे प्रमाण कमीकरण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मालिंके व सोंघाई लोकांमध्ये संगीताची व नृत्याची आवड बरीच दिसते . पूजाअर्चा करण्यासाठी लागणारे मुखवटे, मूर्ती इत्यादींचे लाकडी कोरीव काम करण्यात बांबारी व व्हॉल्टेइक गटांतील लोक प्रवीण आहेत. बांबारी लोकांचे कुरंगाचे मुखवटे (टिएवारा) विशेष प्रसिद्ध आहेत. नायजर नदी-खोऱ्यात वास्तुशास्त्राचा विशेष विकास झाला असून जेने व तिंबक्तू येथील अनेकमजली इमारती आणि मशिदी यांत सुदानी वास्तुशिल्प आढळते. मांडिगो लोकांचे जडजवाहीरकाम उल्लेखनीय आहे. मोठ्या शहरांतून खेळ, नाट्य, संगीत, नृत्य इ. कार्यक्रमांचे आयोजन युवक संघटना करतात. बामाको येथे साजरा केल्या जाणाऱ्या द्विवार्षिक युवक सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धा होतात. मालीयन बॅले नृत्य मंडळाला जगभर चांगला प्रतिसाद मिळतो. बामाको येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस्‌ आणि आर्टिझॅन सेंटर येथे कलाकारांना प्रशिक्षण देण्याच्या सोयी आहेत. फुटबॉल (सॉकर) हा येथील लोकांचा आवडता खेळ आहे.

महत्त्वाची स्थळे : मालीमध्ये, विशेषतः मोप्ती, तिंबक्तू व गाऊ यांच्या परिसरात, शिकार, मासेमारी व प्रेक्षणीय स्थळांच्या विकासासाठी शासकीय पर्यटक संघटनेचीस्थापना करण्यात आली आहे (१९७४). बामाको व तिंबक्तू येथे अत्याधुनिकपद्धतीची मोटेले असून मालीमधील राष्ट्रीय उद्यान व शिकारीची राखीव वने हीपर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. फ्रान्स व पूर्वीचा फ्रेंच आफ्रिका वगळताइतर सर्व परदेशी प्रवाशांना मालीत येण्यासाठी प्रवेशपत्र घ्यावे लागते.१९७७ मध्ये एकूण २२,१३२ पर्यटकांनी मालीला भेट दिली. तर १९८० मध्येपर्यटनापासून देशाला ९० लक्ष अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. राजधानीबामाकोशिवाय सेगू (लोकसंख्या ६४,८९०–१९७६) मोप्ती (५३,८८५), सीकासॉ (४७,०३०), केझ (४४,७३६), गाऊ (३०,७१४), तिंबक्तू (२०,४८३) व कूलीकोरो (१६,८७६) ही देशातील इतर महत्त्वाची शहरे आहेत. 

चौधरी, वसंत


माली देशाचा नकाशा

डोगान जमातीच्या काष्ठशिल्पांचे नमुने : उभयलिंगी पुतळ्याचा शीर्षभाग

डोगान जमातीच्या काष्ठशिल्पांचे नमुने : माता व मूल

सेगू : देशातील कापसाची प्रमुख बाजारपेठ

जेने येथील मशीद : पारंपरिक वास्तुकलेचा एक नमुना