मार्शल, सर जॉन ह्यूबर्ट : (१९ मार्च १८७६–१७ ऑगस्ट १९५८). भारतातील पुरातत्त्वविद्या सर्वेक्षण खात्याचा ब्रिटिश संचालक (१९०२–३१) आणि मोहें-जो-दडो व तक्षशिला या स्थलांचा सुप्रसिद्ध उत्खनक. त्याचा जन्म सधन घराण्यात चेस्टर (चेशायर- इंग्लंड) येथे झाला. लॉर्ड कर्झन यांनी मार्शल यांची पुरातत्त्वखात्याचे प्रमुख म्हणून १९०२ मध्ये नेमणूक केली. मोहें-जो-दडो, तक्षशिला, चारसद्द, सांची, सारनाथ, श्रावस्ती, पाटणा, भीटा आणि कासिया या स्थलांची उत्खनने करून त्यांचे विस्तृत वृत्तांत त्यांनी प्रसिद्ध केले. पुराणवास्तू व वस्तू संरक्षणाचा कायदा संमत करवून घेऊन (१९०४) त्यांनी भारतातील प्राचीन वास्तूंना शासनाकडून संरक्षण मिळवून दिले आणि खात्यात एका पुरातत्वीय रसायनज्ञाची नेमणूक केली (१९१७). पुढे त्यांनी येथील संशोधकांना पुरातत्त्वीय उत्खननाचे प्रशिक्षण देऊन भारतीयांमध्ये प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासाबद्दल आत्मीयता निर्माण केली आणि पुरातत्व खाते शासनाकडून कायम करवून घेतले (१९०६). संग्रहालये व पुरातत्त्वीय संग्रहालयाची वाढ करून काही शिलालेख प्रसिद्ध केले. या बहुविध सुधारणांमुळे त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांनी पुरातत्त्व खात्याच्या प्रशासनाची व्यवस्था आणि अवशेषजतनाची मूलभूत तत्त्वे विशद करून त्यानुसार कार्यवाही केली व इतर बाबी कटाक्षाने सांभाळल्या. मार्शल यांनी केवळ शासकीय कामाकडेच लक्ष दिले असे नाही, तर भारतीय पुराणवस्तूंवर अत्यंत महत्त्वाचे ग्रंथही लिहिले. उत्खननाने वृत्तांत प्रसिद्ध करीत असताना त्यांनी संशोधनाच्या इतर अंगांकडेही लक्ष पुरविले. त्यांचा भारतीय दुर्गांविषयीचा अभ्यास, गांधार कलेवरील ग्रंथ हे मौलिक ठरले तथापि त्यांच्या कारकीर्दीत प्रागितिहास आणि अश्मयुग यांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष झाले. असे म्हटले जाते.
त्यांच्या ग्रंथांपैकी द मॉन्यूमेंटस ऑफ सांची (तीन खंड–१९३९), मोहेंजोदरो अण्ड द इंडस सिव्हिलायझेशन (तीन खंड–१९३१) आणि तक्षशिला (१९५१) हे प्रसिद्ध असून त्यांच्या सिंधू संस्कृतीचा शोध व गांधार शैलीबद्दलचे कलात्मक विवरण यांनी प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांना एक नवीन दालन उघडले. निवृत्तीनंतर ते इंग्लंडला गेले. त्यांना सर हा बहुमान देण्यात आला. ते इंग्लंडमध्येच मरण पावले.
संदर्भ : Archaeological Survey of India, Ancient India, No.9, New Delhi, 1953.
देव, शां. भा.
“