मार्शल : (इ. स. सु. ४०–सु. १०३) श्रेष्ठ रोमन कवी. पूर्ण लॅटिन नाव मार्कस व्हालेव्हिअस मार्शिएलिस. १ मार्च रोजी जन्मला, म्हणून मार्शिएलिस. बिलबिलीस ह्या स्पेनमधील रोमन वसाहतीत त्याचा जन्म झाला. आपण केल्टिक आणि आयबेरिअन वंशांचे आहोत, असे तो अभिमानाने म्हणत असे. साहित्यशास्त्राचे पारंपरिक शिक्षण त्याने घेतले होते. इ. स. ६४ मध्ये तो रोमला आला. तेथे सेनीका आणि ल्यूकन ह्या साहित्यिकांची मैत्री आणि आधार त्याला लाभला. परंतु पुढल्याच वर्षी, रोमन सम्राट नीरो ह्याच्या विरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून मार्शलच्या ह्या आधारदात्यांना प्राणांना मुकावे लागले. मार्शलची सांपत्तिक स्थिती चांगली नव्हती आणि श्रीमंतांच्या आश्रयाने, चरितार्थासाठी तो काव्यलेखन करीत होता.

‘ऑन द स्पेक्टॅकल्स ’ (इ.स. ८०– इं . शी.) हा मार्शलच्या कवितांचा पहिला संग्रह सम्राट टायटसने कलोझिअमच्या केलेल्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने निघाला. त्यात तेहेतीस कविता असून त्यांतून सम्राटाची अतोनात स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर झेनिआ आणि ॲपोफोरेटा ही ग्रीक शीर्षके असलेले दोन संग्रह प्रसिद्ध झाले. हे आरंभीचे तीन संग्रह फारसे महत्त्वाचे नाहीत. तथापि इ. स. ८६ पासून ‘एपिग्राम’ ह्या काव्यप्रकारात मोडणाऱ्या त्याच्या कवितांचे जे बारा भाग निघाले, त्यांवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. कोणती तरी एकच एक कल्पना नेमकेपणाने आणि प्रभावी रीत्या व्यक्त करणारी ‘एपिग्राम’ ही एक लघुकविता होय. मार्शलच्या बऱ्याच कविता कोणातरी खऱ्या वा काल्पनिक व्यक्तीला उद्देशून लिहिलेल्या आहेत. त्यांतून तत्कालीन रोममधील विविध व्यक्तींची अत्यंत वास्तववादी चित्रे तो रेखाटतो. दांभिक, व्यभिचारी, खादाड, पैशाच्या मागे लागलेली अशी ही अनेक प्रकारची माणसे परंतु त्याच्या काही कवितांतून पतिनिष्ठ स्त्रिया, इमानदार मित्र, खरेखुरे कवी आणि प्रामाणिक समीक्षक ह्यानांही तो समूर्त करतो. आपल्या काही आश्रयदात्यांविरुद्धची गाऱ्हाणीही त्याच्या कवितांत येतात, तसेच आपल्याला काही दान वा कर्ज मिळावे, अशी त्याची अपेक्षाही व्यक्त होते. रोमन सम्राट डोमिशिअन ह्याला उद्देशून त्याने लिहिलेल्या कविता स्तुतीने ओथंबलेल्या आहेत. आपल्या स्पॅनिश जन्मभूमीबद्दलचा अभिमान, ग्रामीण जीवनाबद्दल प्रेम आणि मित्रांबद्दलच्या उत्कट भावनाही तो व्यक्त करतो. थडग्यावर वा अन्यत्र कोरलेले लेख (विलापलेख, स्तुतिलेख इ.) हा ‘एपिग्राम’ ह्या शब्दाचा मूळ अर्थ. त्या अर्थाशी सुसंगत अशाही काही रचना त्याने केलेल्या आहेत. इरोशन नावाच्या एका बालिकेच्या मृत्यूवर त्याने केलेल्या काही कविता ह्या संदर्भात लक्षणीय आहेत.

मार्शलची काव्यशैली सरळ, साधी पण परिणामकारक आणि सफाईदार अशी आहे. त्याच्या मार्मिक विनोदबुद्धीचा तसेच माणसांबद्दलच्या सखोल सहानुभूतीचा प्रत्यय त्याच्या कवितांतून मिळतो. ‘एपिग्राम’ ह्या कविताप्रकाराला त्याने विशेष लोकप्रिय केले त्यावर स्वतःच्या सर्जनशीलतेचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटविला. परंतु आश्रयदात्यांची अफाट स्तुती करणे, हा त्याचा एक दोष म्हणून दाखविला जातो. त्याचप्रमाणे त्याच्या बऱ्याच कवितांतून आढळणारी अश्लीलताही टीकार्ह ठरलेली आहे. त्याच्या एकूण कवितेची विलोभनीयता मात्र मनावर ठसते. विविध शतकांतील कवींनी आणि अन्य रसिकांनी केलेल्या अनुवाद-अनुकरणांच्या रूपाने ह्याची प्रचिती येते. त्याच्या कवितेतील ओळीही अनेकदा उद्‌धृत केल्या जातात.

त्याच्या उपर्युक्त बारा कवितासंग्रहांपैकी अकरा रोममध्ये प्रकाशित झाले, तर बारावा त्याने स्पेनहून रोमला पाठविला (इ. स. १०२). त्याचा स्नेही प्लिनी द यंगर (धाकटा प्लिनी–विख्यात रोमन प्रशासक आणि पत्रलेखक) ह्याने इ. स. १०४ च्या आपल्या एका पत्रात तो मरण पावल्याचा उल्लेख केला आहे. त्यावरून इ. स. सु. १०३ मध्ये तो मरण पावला असावा. आपल्या रोममधील वास्तव्यात प्लिनी द यंगर प्रमाणेच क्विंटिल्यन (रोमन वक्ता, लेखक, विधिज्ञ), जूव्हेनल (रोमन उपरोधकार) ह्यांसारखे कर्तृत्ववान मित्र त्याला लाभले होते.‘मिलिटरी ट्रिब्यून’ हे सन्माननीय पदही त्याला रोममध्ये देण्यात आले होते. आपल्या आयुष्याच्या अखेरीस तो स्पेनमध्ये आपल्या मूळ गावी परतला. मार्सेल्ला नावाच्या एका स्पॅनिश स्त्रीने त्याला एक शेत दिले होते. तेथे तो राहू लागला. बिलबिलीस येथेच त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Carrington. A. G. Aspects of Martial’s Epigrams, 1960.

              2. Nixon, Paul, Martial and the Modern Epigram, New York, 1927.

              3. Walter, C. A. Ker, Martial : Epigrams, 2 Vols., London, 1919-20

कुलकर्णी, अ. र.