मार्टेन : सस्तन प्राण्यांच्या कार्निव्होरा (मांसाहारी) गणातील मुस्टेलिडी कुलात या प्राण्यांचा समावेश होतो. यांच्या प्रजातीचे नाव मार्टेस असे आहे. याच्या बऱ्याच जाती आहेत. त्या अमेरिका, यूरोप व आशिया खंडांत आढळतात. भारतात याच्या दोन जाती मुख्यत्वे आढळतात. त्यापैकी एक बीच किंवा स्टोन मार्टेन (मार्टेस फॉइना) आणि दुसरी पिवळ्या गळ्याचा मार्टेन (मा. फ्लॅव्हिग्युला) ही होय. अमेरिकन मार्टेन ( मा. अमेरिकाना) आणि यूरोपियन मार्टेन (मा. मार्टेस) यांत बरेच साम्य आहे.
मार्टेन जंगलात विशेषतः डोंगराळ प्रदेशात आढळतो. याचा आकार प्रकार मांजराएवढा असून नर मादीपेक्षा आकाराने व वजनाने मोठा असतो. शरीराची लांबी सु. ३४ ते ६१ सेंमी. पर्यंत असते. शरीर लवचिक व सडपातळ असते. शेपूट लांब व दाट केसांनी आच्छादिलेले असते. शेपटाची लांबी १५ ते ३० सेंमी. पर्यंत असते. पाय आखूड व मान लांब असते. कान आखूड व गोल असतात. पूर्ण वाढ झालेल्या मार्टेनचे वजन १–२ किग्रॅ. पर्यंत असते. हा प्राणी एकलकोंडा आहे. याला रक्त आवडते. खारी, ससे, लहान कोकरे व गोड फळे हे याचे अन्न आहे.
मार्टेनचे रंग विविध आहेत. पाय व शेपूट काळसर असते. छातीवर नारिंगी, पिवळा किंवा पांढरा ठिपका असतो. याची लोकर किंमती गणली जाते [→ फर – २].
मोठ्या आकाराच्या फिशर मार्टेनला मा. पेनंटी असे म्हणतात. तो उत्तर अमेरिकेत आढळतो. याचा नर ९० सेंमी. लांब असतो. याची मादी लहान असून तिचे वजन नराच्या निम्मे असते. याचे आयुष्य ५ ते १७ वर्षे असते. भारतातील स्टोन मार्टेन हा १,५२५ मी. उंचीवर हिमालयात आढळतो. काही देशांत मार्टेनला ‘सेबल’ असेही म्हणतात.
भारतातील स्टोन मार्टेनच्या नरमादीच्या मीलनाचा हंगाम साधारणतः फेब्रुवारीत असतो. नऊ आठवड्यांनी म्हणजे एप्रिलच्या अखेरीस मादी चार ते पाच पिलांना जन्म देते. नुकत्याच जन्मलेल्या पिलाचे वजन सु. २८ ग्रॅ असते. झाडांच्या कोटरात किंवा खडकांच्या भेगांत पिलांची वाढ होते. जन्मतः पिलांचे डोळे बंद असतात. मोठी झाल्यावर पिले आईबरोबर भक्ष्याच्या शोधार्थ हिंडतात. लहान पिले माणसाळवणे शक्य असते.
कुलकर्णी, सतीश वि.
“