मारवेल : (हिं. अपांग इं. मारवेल ग्रास लॅ. डायकँथियम ॲन्युलेटम अँड्रोपोगॉन ॲन्युलेटस कुल-ग्रॅमिनी). भारतातील सर्व परिचित गवतांपैकी मारवेल हे एक गवत आहे. त्याचे चाराविषयक महत्त्व प्रथमतः पुणे येथे माहीत झाले. याचा प्रसार भारताच्या उष्ण व उपोष्ण कटिबंधीय ह्या दोन्ही प्रदेशांच्या अनेक भागांत मैदानी प्रदेशांत व ९१० मी. उंचीपर्यंतच्या डोगराळ भागात आहे. मात्र उत्तर भारतातील टेकड्यांवर हे आढळत नाही. तामिळनाडू राज्याच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील जिल्हांत हे आढळते. यांशिवाय पाकिस्तान, ब्रम्हदेश, चीन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक बेटे येथेही हे आढळते. हे एक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत उभे आणि झुपकेदार असते व याचे खोड पेरेदार व बारीक असते. कधी कधी हे काहीसे जमिनीसरपटही वाढते. दमट ओलसर जागेत हे चांगले वाढते. पूर्ण वाढलेल्या गवताची उंची १–२ मी. असते. खोडे जांभळट लाल किंवा निळसर रंगाची असून पेऱ्यांवर पांढरट केसांचे स्पष्ट असे वलय (कडे) असते. पाने साधी, २३–४५ सेंमी. लांब व अरूंद आणि निळसर हिरव्या रंगाची असून पानाची मध्यशीर पिवळसर असते. याचा फुलोरा संयुक्त मंजिरी प्रकारचा [→ पुष्पबंध] व जांभळट असतो. खोडाच्या टोकावर कणिशांचा झुपका असून प्रत्येकांवर कणिशकांच्या जोड्या असतात याची सर्वसाधारण लक्षणे ⇨ ग्रॅमिनी अथवा तृण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. तुसांवर बारीक खाचा नसणे हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. व यामुळे ही हिच्याशी अगदी साम्य असणाऱ्या बोथ्रिओक्‍लोआ पर्टूजा या जातीपासून वेगळी ओळखता येते.

मारवेलाचे गवत विविध प्रकारांच्या जमिनीत वाढते तथापि उत्तम निचऱ्याची ओलसर दुप्पट जमीन याला चांगली मानवते. कमी पावसाच्या प्रदेशातील सखल भाग या गवताच्या लागवडीच्या दृष्टीने चांगला असतो. याला बरीचशी लवणयुक्त (खारट) जमीन चालते परंतु अम्‍लयुक्त जमिनीत हे वाढत नाही.

मारवेलाची लागवड सामान्यतः ठोंबे लावून करतात कारण बी जमवून वापरणे ही बाब कष्टाची व खर्चाची असते. हे दोन ओळींत व दोन ठोंबांत ६० सेंमी. अंतरावर मोसमी पावसाच्या सुरूवातीस लावतात. याची लागवड करावयाची झाल्यास आधी रोपे तयार करून प्रत्यक्ष बुरबूर पडू लागल्यावर त्यांची भाताप्रमाणे पुनर्लागण करतात.

फक्त पावसाच्या पाण्यावरही या गवताचे भरपूर उत्पन्न येते व एका वर्षात ३–४ कापण्या करून हेक्टरी सु. ७०६ क्विंटल गवताचे उत्पादन झाल्याची नोंद आहे. हे खताला चांगला प्रतिसाद देते व जमिनीच्या मशागतीच्या वेळी १२५–२०१ क्विंटल शेणखत आणि नंतर वर्षाला ६८ किग्रॅ. एमोनियम सल्फेट दिल्यास किफायतशीर उत्पन्न येते.

ओल्या गवतात ६६% जंलाश, २·२% प्रथिने वर्गीय पदार्थ, ११·६% तंतू व ३·७% राख असते आणि वाळलेल्या गवतात ३५·२% तंतू, ३·१% प्रथिनवर्गीय पदार्थ, १०% राख व ०·४४% कॅल्शियम, ०·१४% फॉस्फरस व १% पोटॅशियम ही द्रव्ये असतात. वैरणीच्या दृष्टीने ओला चारा व वाळलेले गवत, चराऊ रान इ. दृष्टींनी हे एक उत्तम गवत आहे. ह्यात प्रथिने जरी कमी असली, तरी जनावरांना हे फार आवडते. अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर येथे केलेल्या पहाणीत असे आढळून आले आहे की, मेंढ्यांना ते फारसे आवडत नाही पण गायीगुरे व विशेषकरून घोड्यांना ते चांगले मानवते. भारताच्या बऱ्याच भागांत ते वाळवून ठेवतात.

भारतात याच्या ७ जाती आढळतात. डायकँथियम या याच्या प्रजातीत एकूण २० जाती असून डायकँथियम कँरिकोसम (हिं. कार्तक खेल) ही मारवेलाच्या प्रजातीतील दुलरी जाती ३०–६० सेंमी. उंच, असून सखल भागात व कमी उंचीच्या डोंगराळ प्रदेशात ९१४ मी. उंचीपर्यंत सर्वत्र आढळते पण मारवेलापेक्षा तिया प्रसार कमी आहे. दक्षिण भारतात सांघिक वाढ आढळते. हिला कोरडी हवा व रेताड जमीन लागत असल्यामुळे ही केरळच्या किनाऱ्यावर आढळत नाही. ओल्या चाऱ्याचे हेक्टरी सु. ८९·६ क्विंटल उत्पन्न येते. हे गवतही गुरे-ढोरे आवडीने खातात.

पहा : गवते ग्रॅमिनी.

संदर्भ : Narayanan. T. R. Dabadghao, P. M. Forage Crops of India, ICAR, New Delhi, 1972

जमदाडे, ज. वि.