मायोसीन : (मध्यनूतन). भूवैज्ञानिक इतिहासातील तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) पाच विभागांपैकी चौथ्या विभागाचे नाव. काळाच्या विभागाला मायोसीन युग आणि त्या युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाला मायोसीन माला असे नाव आहे. या विभागात सु. २ ते १·२ कोटी वर्षांपर्यंतचा काळ व त्या काळातील खडक आणि जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) यांचा समावेश होतो. चार्ल्स लायेल यांनी १८३३ मध्ये फ्रान्स आणि इटालीतील खडकांच्या अभ्यासावरून यानंतरच्या प्लायोसीन (अतिनूतन म्हणजे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीपर्यंतच्या) विभागातील जीवाश्मांपेक्षा या विभागातील जीवाश्मांच्या जातींची संख्या कमी असल्याने ‘कमी नूतन’ या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून मायोसीन हे नाव दिले.
मायोसीन काळातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) नंतरच्या काळातील जलवायुमानापेक्षा ऊबदार आणि सर्वत्र एकसारखे होते पण मायोसीनच्या शेवटी शेवटी उत्तरेकडील प्रदेशातील जलवायुमान थंड होत गेले, त्यामुळे त्या भागातील प्रवाळ व तत्सम प्राण्यांचे दक्षिणेकडे स्थलांतर झाले. या आधीच्या (ऑलिगोसीन म्हणजे ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात भूकवचाच्या हालचाली होऊन नवीन भूमी वर उचलली गेली होती आणि नवे डोंगर, दऱ्या–खोरी अशी भूरूपे निर्माण झाली होती. मायोसीन काळाच्या सुरूवातीला, तसेच उत्तरकाळात सार्वत्रिक स्वरूपाची दोन सागरी आक्रमणे घडून येऊन सागरांचा क्षेत्रविस्तार झाला. या सागरांनी जवळजवळ इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील सागरांएवढे क्षेत्र व्यापले होते. या दोन सागरी आक्रमणांच्या दरम्यान मध्य मायोसीन काळात कवचाच्या स्थानिक गिरिजनक हालचाली होऊन पर्वतनिर्मिती सुरू झाली आणी सागरी खाड्यांचे विस्थापन झाले. मायोसीन काळाच्या अखेरीसही पुन्हा कवचाच्या वर उचलल्या जाण्याच्या हालचाली घडून सागर मागे हटले व त्यानंतर प्लायोसीनमध्ये पुन्हा सागरी आक्रमण झाले.
मायोसीन काळात तयार झालेले सागरी खडक म्हणजे यूरोपातील तुर्कस्थानपर्यंत पसरलेले प्रथम भूमध्य सामुद्रिक समुदायाचे खडक, सायरेनेईकापासून ईजिप्तमध्ये व पुढे इराणपर्यंत गेलेले खडक, भारतातील गज मालेचे खडक, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून तेव्हाच्या झांझिबारपर्यंत व मोझांबिकच्या खाडीत साचलेले, तसेच सीलोन (श्रीलंका) येथील खडक इ. आहेत. मध्य मायोसीन काळापर्यंत टेथिस सागर पूर्णपणे नाहीसा होऊन हिमालयाच्या पर्वतरांगांचे उत्थान (वर उचलणे) सुरू झाले होते. भारतातील सिंधु-गंगेच्या खोऱ्याचे क्षेत्र सागरपातळीच्या वर उचलले गेले व हिमालयाच्या रांगांच्या पायथ्याशी ⇨ शिवलिक संघाचे भूखंडीय (जमिनीवरचे) निक्षेप साचले. या निक्षेपांत इतर स्तनी प्राण्यांबरोबर मानवसदृश्य कपींचे आणि आदिमानवांचे जीवावशेष सापडतात.
याच काळात यूरोपातील आल्प्स पर्वतरांगा उंचावून त्यांना घड्या पडल्या. त्याचप्रमाणे ॲपेनाइन, कॉकेशन, अंडीज इ. पर्वतगंगा उंचावल्या गेल्या. दक्षिण आशिया भागात बांदा चापापासून सेलेबीझ ते फिलिपीन्स बेटापर्यंत जाणारी नागमोडी पर्वतरांगा निर्माण झाली.
जीवसृष्टी : मायोसीन सागरात काही शंखधारी प्राण्यांमध्ये पुष्कळ विविधता येऊन त्यांची संख्या वाढली. शिंपाधारी व ऑयस्टर यांच्या आकारमानात वाढ झाली. न्युम्युलाइट नष्ट झाले पण त्यांची जागी इतर मोठ्या आकारमानाच्या फोरॅमिनीफेरांनी घेतली. कित्येक ठिकाणी डायाटम, प्रवाळ, सेफॅलोपॉड (शीर्षपाद), क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी आणि मोठे दात असणारे शार्क मासे यांचे प्राबल्य होते. स्तनी प्राण्यांत सील, जलसिंह, वॉलरस, सागरी गाय यांचा उदय होऊन त्यांचे स्वरूप आधुनिक काळातील जातींसारखे झाले. या काळात सागरातील प्राण्यांच्या मुक्त संचाराला अडथळा निर्माण करणारी भूशिरे, अत्यंत खोल आणि अरूंद सागरी दऱ्या आणि सागरी पाण्याच्या तापमानातील बदल यांमुळे सर्वत्र सरमिसळ पद्धतीची सागरी प्राणिसृष्टी राहिली नाही आणि स्थानीय क्रमविकास (उत्क्रांती) होऊन स्थानीय वेगळेपणा असणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले. द. अमेरिका, मॅलॅगॅसी (मादागास्कर), ऑस्ट्रेलिया हे प्रदेश इतर भूभागापांसून अलग पडलेले राहिले. त्यामुळे तेथील प्राण्यांचा क्रमविकास वेगळ्या प्रकारे होऊन शिशुघानी (पोटावरील पिशवीत पिलाचा संभाळ करणारे) व अंडजस्थनी (अंड्यातून पिलांचा जन्म झाल्यानंतर त्यांना स्तनपान देणारे) वेगवेपण कायम राहिले.
जमिनीवर कृंतक वर्गीय (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या वर्गातील) प्राणी सोडल्यास आज अस्तित्वात असणाऱ्या बहुतेक सर्व स्तनी प्राण्यांच्या जाती या काळात होत्या. गवताळ प्रदेशांचा विस्तार झाल्यामुळे आधीच्या काळातील विचित्र आकाराच्या मोठ्या आणि झाडपाच्या खाणाऱ्या प्राण्यांपेक्षा चरणाऱ्या प्राण्यांच्या जातींत व संख्येत वाढ झाली. यूरोप व आशियातील प्राण्यांत हरिण, जिराफांचे आदिम पूर्वज, गोकुलीय प्राणी, घोडा, उंट इ. होते. उंट व घोडा यांचा क्रमविकास झपाट्याने होऊन त्यांचा सर्वत्र प्रसार झाला. घोड्याच्या आकारमानात वाढ झाली. सध्या आढळणारे बहुतेक सर्व मांसाहारी प्राणी मायोसीन काळात होते. मांसाहारी प्राण्यांमध्ये नंतरच्या काळात नष्ट झालेला ॲम्पिसियॉन हा अस्वली-कुत्रा ठळकपणे आढळतो. याच काळात मॅस्टोडॉनाचा प्रसार प्रथमच उत्तर अमेरिकेत झाला.
भारतात मायोसीन गटाचे खडक पुढीलप्रमाणे आढळतात : कच्छ, काठेवाड आणि त्रावणकोर भागात गज माला उत्तर पंजाब, काश्मीर, सिमला व त्यांच्या लगतच्या हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत मरी माला आसाममध्ये सुरमा माला इ. स. मायोसीन काळातील खडक आणि पंजाब व हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांमध्ये शिवालिक संघाचे सु. ४,५०० ते ६,००० मी. जाडीचे भूखंडीय निक्षेप (साठे).
पहा : तृतीय संघ.
सोवनी, प्र. वि.