माया भाषासमूह : अमेरिकन इंडियन लोकांच्या बोलींपैकी मेक्सिकोचा दक्षिण भाग, ग्वातेमाला, हाँडुरस येथील बऱ्याचशा सलग भूप्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलींचा समूह. सुमारे २५ लक्ष लोक २४ बोली बोलतात त्यांचा एक भाषासमूह बनतो. माया, मायन, माया-कीचे ह्या नावांनी हा समूह ओळखला जातो. माया (३·५ लक्ष), कीचे (५ लक्ष), काक्चीकेल (४ लक्ष), केवची (३ लक्ष), माम (३·५ लक्ष), त्सोत्सिल (१·२ लक्ष), त्सेल्ताल (८० हजार), हुआस्तेको ह्या प्रमुख बोली होत.

यांपैकी माया बोलीला एक निराळे महत्त्व आहे. अमेरिका खंडात ज्या माया, ⇨ ॲझटेक, ⇨ इंका ह्यांसारख्या पुढारलेल्या संस्कृती नांदल्या, त्यांपैकी सगळ्यात प्रगत अशी माया भाषकांची संस्कृती (इ. स. सु. ३००–९००) होय. पिरॅमिडवर बांधलेली दगडी देवळे, चित्रे, मातीची भांडी, नगरराज्ये, गणित आणि ज्योतिष ह्यांवर आधारलेले पंचांग हे त्यांच्या संस्कृतीचे काही विशेष सांगता येतील. शून्यासाठी स्वतंत्र चिन्ह ठेवण्याची युक्ती भारतीयांप्रमाणे त्यांनाही सुचली होती. सु. ८५० चित्रवजा चिन्हांच्या लिपीत लिहिलेले माया ग्रंथही उपलब्ध आहेत. त्यांतील बरेचसे दुर्दैवाने धर्मांध स्पॅनिश पाद्र्यांनी नष्ट केले. ही लिपी, गणित व पंचांग यासंबंधीची चिन्हे वगळता, अजून संपूर्णपणे वाचता आलेली नाही. इ. स. सु. ९०० पासून उताराला लागलेली ही संस्कृती १७०० पर्यंत कशीबशी तग धरून होती. आजचे माया भाषक मात्र इतर अमेरिकन इंडियन लोकांच्या इतपतच सुधारलेले आहेत. ओटो स्टोल ह्या जर्मन अभ्यासकाने १८८४ मध्ये माया भाषासमूह पहिल्यांदा मानला.

संदर्भ : 1. Kaufman, Terrence, “Teco : A New Mayan Language”. International Journal of American Linguistics, 35 : 154-174, Bloomington (Indiana), 1969.

           2. Voegelin, C. F. Voegelin, F. M. Anthropological Linguistics, 7: 7. 6-11. Bloomington (Indiana), Oct.1965.

केळकर, अशोक रा.