मायाफळ : (हिं. माजूफल सं. मायाफल क. माचिकाई इ. अलेप्पो ओक, गॉल ओक, डायर्स ओक, लॅ. कर्कस इन्फेक्टोरिया कुल-फॅगेसी). ⇨ ओक (वंजू, बंज, बान) वृक्षाच्या काही देशी या विदेशी जातींवर वाढणाऱ्या गाठींना ‘मायफळ’ म्हणतात. उत्तम प्रकारचे मायफळ ज्या झाडापासून मिळते ते २–५ मी. उंच क्षुप
(झुडूप किंवा लहान वृक्ष असून तो मूळचा ग्रीस, आशिया मायनर, सिरिया व इराण येथील आहे. भारतात मायफळांची आयात मोठ्या प्रमाणात लेबानन, इराण व तुर्कस्थान येथून होते. भारतातील देशी ओकपासून मिळालेली मायफळे कमी प्रमाणात निर्यात केली जातात. भारतातील कुमाऊँ, गढवाल व बिजनोरच्या जंगलांतून मायफळे गोळा करतात यांपैकी काही भारतात उपयोगात येतात. मायफळांना व्यापारात ‘अलेप्पो गॉल’ व ‘नट गॉल’ म्हणतात.
विदेशी मायफळाच्या वृक्षाला ४–६ सेंमी. लांब, ताठर व गुळगुळीत पाने असून त्यांच्या कडावर तीक्ष्ण दाते असतात. ह्याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ फॅगेसी म्हणजे वंजू कुलाच्या व ⇨ ओकच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. कोवळ्या फांद्यांवर खोल जखम करून ⇨ ऊतककरात एक विशिष्ट कीटक (ॲडलेरिया गॉलि-टिंक्टोरी) अंडी घालतो व त्यातून आलेल्या अळीभोवती वनस्पतीचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) वाढते व गाठ बनते हेच मायफळ होय. गाठी फुटून कीटक बाहेर येण्यापूर्वी त्या काढून घेतल्यास व्यापारी दृष्ट्या उपयुक्त असतात त्या गाठी नंतर सुकवितात. त्या सु. ६·५० मिमी. व्यासाच्या, गोलसर, तपकिरी किंवा करड्या पिंगट, खरखरीत व तुरट असतात. त्यांमध्ये भरपूर टॅनिक, गॅलिक, इलॅगिक ही अम्ले, डिंक, स्टार्च, साखर आणि उडून जाणारे तेल इ. असतात. आयात केलेल्या गाठींत आकार, रंग, व रूप यांत विविधता आढळते. मायफळे स्तंभक (आंकुचन करणारी) असून मूळव्याधीच्या मलमात व लेपात वापरतात अतिसार व आमांशावर पोटात घेण्यास व एरवी गुळण्या करण्यास गाठींतून काढलेल्या अर्काचा उपयोग करतात, जखमांवर उगाळून लेप लावतात. कातडी कमाविणे, रंगविणे, शाई बनविणे व रंग पक्के करणे इत्यादींत फार मोठ्या प्रमाणात मायफळे वापरतात. ह्या वनस्पतीची साल व फळे स्तंभक असून इसब वगैरे चर्मरोगांवर गुणकारी असतात.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“