मानसशास्त्र, अनुप्रयुक्त : (सायकॉलॉजी, अप्लाइड). एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडात मानसशास्त्राची ‘शास्त्र’ म्हणून वाटचाल सुरू झाली. या काळात ‘मन’ आणि ‘मानसिक क्रिया’ या संज्ञांचा अर्थ विस्तारू लागला आणि अल्पावधीत मानसशास्त्रीय प्रयोगशाळांत ‘मानवी वर्तनाचा’ अभ्यास सुरू झाला. जाणीव, वेदन, संवेदन, स्मरण, अध्ययन इ. मानसिक क्रियांचे व्यापक स्वरूप लक्षात येऊ लागले. या मानसिक क्रियांचे मापन करता येऊ लागले. प्रायोगिक संशोधन आणि त्यावर आधारित मानसशास्त्रीय सिद्धांतांचे महाविद्यालये आणि विद्यापीठांतून अध्यापन अशा स्वरूपाचे काम मानसशास्त्रज्ञ प्रारंभी करत. मूलभूत मानसशास्त्राच्या प्रगतीचा यापुढील टप्पा म्हणजे अनुप्रयुक्त मानसशास्त्राची सुरुवात म्हणता येईल.
मूलभूत मानसशास्त्रात आणि अनुप्रयुक्त मानसशास्त्रात तशी भिन्नता नाही. ⇨ह्यूगो म्यून्स्टरबर्ग (१८६३ – १९१६) आणि वॉल्टर डिल् स्कॉट (१८५९–१९५५) ह्या दोघा मानसशास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना त्या दिशेने वळण लागले. संशोधनाचे निष्कर्ष–विशेषतः सामाजिक स्तरावर– मानवी समस्या सुलभ करणे किंवा उलगडणे यासाठी राबवता येतील, हे दाखवण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. म्यून्स्टरबर्गचे सायकॉलॉजी अँड इंडस्ट्रिअल एफिशन्सी हे १९१३ मध्ये लिहिलेले पुस्तक आणि वॉल्टर डिल् स्कॉटचे १९०८ मधील द सायकॉलॉजी ऑफ ॲडव्हर्टाइझिंग हे पुस्तक या दृष्टीतून विशेष महत्त्वाची पुस्तके मानली जातात. मूलभूत शास्त्रीय सिद्धांतांची व्यावहारिक क्षेत्रातील उपयुक्तता, सुरुवातीला उद्योग आणि उत्पादन या क्षेत्रांपुरतीच मर्यादित होती.
पहिल्या जागतिक युद्धात व त्यानंतर उद्भवलेले नानाविध वैयक्तिक व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मानसशास्त्रज्ञ पुढे आले. मानवी वाताहत, नैराश्य, भय, बेकारी, स्त्रियांचे प्रश्न, तसेच बालसंगोपन, प्रगत वैद्यकशास्त्र, क्रीडाक्षेत्र, प्रचंड नवी शहरे, मानवी संपर्क आणि संघर्ष, शिक्षण, शेती, उद्योगधंदे इ. क्षेत्रांतील समस्या मानसशास्त्रीय अंगाने सोडवावयास हव्या अशी जाणीव निर्माण झाली. मॅक्डूगलने म्हटल्याप्रमाणे मानवी स्वभावाचे यथार्थ ज्ञान संपादून ते ज्ञान स्वतःच्या व सभोवतालच्या व्यक्तीचे अधिक शहाणपणाने व परिणामकारकपणे नियोजन करण्यासाठी योजणे, असे मानसशास्त्राचे ध्येय आहे. मानवी कल्याणासाठी मानसशास्त्रीय ज्ञान राबवणे हा अनुप्रयुक्त मानसशास्त्राचा प्रधान हेतू आहे. मानसशास्त्राचे व्यवहारीकरण अनुप्रयुक्त मानसशास्त्रात घडून येते. परिणामी अनुप्रयुक्त मानसशास्त्राच्या पुढीलप्रमाणे काही ठळक शाखा निर्माण झाल्या :
(१) औद्योगिक मानसशास्त्र, (२) ग्राहकाचे मानसशास्त्र, (३)चिकित्सालयीन मानसशास्त्र, (४) गुन्हेगारांचे मानसशास्त्र, (५) शैक्षणिक मानसशास्त्र, (६) मानवांग अभियांत्रिकी, (७) विधी व न्याय- मानसशास्त्र, (फोरेन्सिक सायकॉलॉजी), (८) व्यावसायिक मार्गदर्शन, (९) बालमानसशास्त्र, (१०) रहदारी-वाहतूकसंबंधीचे मानसशास्त्र, (११) वृद्धांचे मानसशास्त्र, वगैरे.
(१) औद्योगिक मानसशास्त्र : यातील प्रमुख प्रश्न म्हणजे कामगाराची कार्यक्षमता, त्याचे व्यक्तिविशेष, कसब, कार्यपद्धती आणि पर्यावरणातील घटकांचा – उदा., योग्य प्रकाश, स्वच्छता, पुरेशी खेळती हवा, निर्दोष यंत्रणा, कार्यस्थळाची रचना यांचा–त्यावर होणारा परिणाम. त्याचप्रमाणे ⇨ थकवा,एकाग्रता, कंटाळा ह्या घटानांचे शारीरिक आणि मानसिक स्वरूप समजाऊन घेऊन त्यांची तीव्रता कमी करणे. औद्योगिक परिसरातील ⇨ अपघात,कामगारांची सुरक्षितता, हमी या गोष्टींचाही अभ्यास यात केला जातो. एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे मानसशास्त्रीय तंत्र म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र असे म्हणावयास हरकत नाही. [⟶ औद्योगिक धोके].
औद्योगिक परिसरातील व्यवस्थापनाचे प्रश्नही याच्याशी निगडित आहेत. कर्मचाऱ्यांवर देखरेख करून त्यांच्याकडून काम करून घेणे, त्यांच्या विविध कार्याचा समन्वय साधणे, नोकर–मजूर संबंधाची माहिती आणि मजुरामजुरांमधील संबंध, कुशल कामगारांची निवड, त्यांना द्यावयाचे प्रशिक्षण, बढती, बदली वगैरे प्रश्नांच्या अभ्यासाची आणखी एक शाखा ‘व्यवस्थापन मानसशास्त्र’ ह्या नावाने निर्माण झाली. कार्यपद्धतीची योजना, वेगवेगळ्या स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या भूमिकांचे स्वरूप, संघटनेतील फेरबदल अशा अनेक उपशाखाही यातून वाढीस लागल्या. [⟶ औद्योगिक मानसशास्त्र औद्योगिक व्यवस्थापन, भारतातील व्यवस्थापनशास्त्र].
(२) ग्राहकाचे मानसशास्त्र : ग्राहकाच्या मानसशास्त्रात माणसाकडे उपभोक्ता म्हणून पाहिले जाते. उत्पादकापासून वितरकांमार्फत ग्राहकापर्यंत यशस्वी व्यवहार हे जाहिरातीच्या मानसशास्त्रचे प्रधान कार्य होय. ग्राहकाचे मानसशास्त्र त्याच्याही पुढे सरकते. जाहिरातीचे मानसशास्त्र एका अर्थाने एकांगी असते. ग्राहकाला खरेदीच्या मोहात टाकणे एवढेच त्याचे काम. उदा., पंखे, वातानुकूलित यंत्रांची जाहिरात म्हणजे फक्त उन्हाळ्यापासून सुटका नव्हे, तर सर्व कुटुंबियांना आनंदाने, उत्साहाने एकत्र वेळ घालवण्याचे ठिकाण. दुसरे उदाहरण म्हणजे दंतमंजनाचे. ते निव्वळ दात स्वच्छ करण्याचे साधन नसते, तर सामाजिक यशापयशाचेही ते गमक ठरते. [⟶ जाहिरात].
१९६८ ते १९७२ या चार वर्षांच्या काळात पूर्वी कधीही लिहिले गेले नाही इतके साहित्य आणि संशोधन ग्राहकाच्या मानसशास्त्रात झाले. १९७६ नंतर तर ‘ग्राहकाचे समाधान’ हा परवलीचा शब्द होऊन बसला. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनापूर्वी ग्राहकाच्या गरजा, आवडी-निवडी, त्याची क्षमता, ती वस्तू वापरण्यामागची त्याची भूमिका, वापरण्याची पद्धती वगैरेंच्या अभ्यासातून व अनुभवातून प्रश्नावली व बाजारपेठेतील त्या मालाचा उठाव यांचा अभ्यास केला जातो. ग्राहकाचे स्वास्थ्य महत्त्वाचे. वस्तूचे वजन, वेष्टन वापरलेल्या घटकांचे प्रमाण यांसंबंधी संशयातीत असे उपाय योजणे हे महत्त्वाचे मानले जाते. ग्राहकाचे संपूर्ण हित तसेच ग्राहकाला वस्तूमागचे ‘सत्य’ समजण्याचा हक्क मान्य केला गेला आहे. उत्पादकांनी ग्राहकांच्या प्रश्नांची जाणीव ठेवली पाहिजे. मालाची विक्री करताना व्यक्ती आणि समाज ह्या दोहोंचे हित नजरेआड होऊन चालत नाही.
(३) चिकित्सालयीन (क्लिनिकल) मानसशास्त्र : ही शाखा दोन पातळ्यांवर काम करते. एक म्हणजे मार्गदर्शन व सल्लामसलत. नित्याच्या जीवनातील सर्वसामान्य माणसांना काही वेळा जेव्हा अडचणीचे प्रश्न निर्माण होतात–उदा., पतिपत्नी–संबंध, नोकरीव्यवसायातील अडचण अगर अध्ययन-अध्यापन, यासंबंधात उद्भवणारे प्रश्न-अशा वेळी मानसशास्त्रज्ञ ते प्रश्न हाताळण्यास मदत करतो. [⟶ मार्गदर्शन व सल्लामसलत].
दुसरे म्हणजे मानसिक विकृती, काही अधिक गंभीर प्रकारचे भावनिक असमतोल, व्यक्तिमत्त्वातील गंभीर प्रकारचे मानसिक दोष इत्यादींवर उपचार करणारे मानसशास्त्र होय. फ्रॉइड, युंग, ॲड्लर, होर्नाय वगैरेंच्या प्रयत्नांनी सुरू झालेल्या या अनुप्रयुक्त शाखेचा उपयोग दिवसेंदिवस अधिकाधिक होताना दिसतो. शरीरविज्ञान आणि शारीरक्रियाविज्ञान तसेच तंत्रिका तंत्रविज्ञान यांमुळे मिळत गेलेल्या माहितीमुळे मानसिक व्याधींची कारणमीमांसा करता येऊ लागली. प्रारंभीचे महत्त्वाचे सर्व मानसशास्त्रज्ञ वैद्यकशास्त्रात पारंगत होते. शारीरक्रियाविज्ञानाचा मानसशास्त्राच्या प्रगतीला जसा उपयोग झाला, तद्वत मानसशास्त्रीय सिद्धांतामुळे काही शारीरिक व्याधींचा उलगडाही झाला. वैद्यकीय मानसशास्त्राचे काम मुख्यतः मनोविकृतिमीमांसा, निदान आणि उपचार अशा प्रकारचे असते. नित्याच्या जीवनाशी जुळते घेऊन सामान्यपणे जीवन जगण्यासाठी मनोरुग्णांना तयार करावे लागते. औद्योगिक प्रगतीमुळे वेगवान झालेल्या संस्कृतीचा मनावर ताण येत असतो. सामाजिक जटिल संबंध व ते जपण्याच्या प्रयत्नात अनेकांना मानसिक व्याधी जडतात. वैद्यकीय मानसशास्त्राची गरज आज पहिल्यापेक्षाही अधिक वाढली आहे. [⟶ मानसचिकित्सा].
(४) गुन्हेगारांचे मानसशास्त्र : गुन्हेगाराचे वर्तन हे गुन्हेगारव्यक्ती आणि त्याचा परिसर, विशेषतः समाजव्यवस्था, समाजाचेस्वरूप, घटक यांतील विसंवादाचे फल आहे. १९०४ मध्ये शेपर्ड आयव्हरी फ्रांझ आणि १९०९ मध्ये विल्यम हीली (१८६९–१९६२) यांनी बालगुन्हेगारांसाठी ⇨सुधारगृहे चालविली होती. [⟶ गुन्हेशास्त्र बालगुन्हेगारी].
(५) शैक्षणिक मानसशास्त्र : शाळा, विद्यालये वगैरे संस्थांशी निगडित असलेले विद्यार्थी, त्यांच्यातील व्यक्तिभिन्नता, विद्यार्थी आणि शिक्षक संबंध, अध्ययनाचे विषय, विषयांची निवड व शिकवण्याच्या पद्धती यांवर अनुभव आणि प्रयोगांवर आधारित असे खूप संशोधन झाले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचे ध्येय त्यामध्ये आहे. शिक्षणक्रम, शिक्षकांचे प्रशिक्षण ,बुद्धिमापन कसोट्या, भाषिक ज्ञानाचे मापन, प्रज्ञाशोधनाच्या अनेक वस्तुनिष्ठ कसोट्या आता रूढ झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्राची प्रगती झपाट्याने होत आहे. या मानसशास्त्राच्या सुरुवातीचे श्रेय ई. एल्. थॉर्नडाइक (१८७४–१९४९) यांच्याकडे जाते. आता प्रवेशपूर्व कौशल्येही बघितली जातात. शाळेत प्रविष्ट होण्याचे वय ठरवले जाते. विचार व निर्णयाची क्षमता, दृक् तसेच श्रवण संवेदनांची तीक्ष्णता–मंदता तपासली जाते. शारीरिक हालचाल वगैरे अनेक गोष्टींची दखल घेतली जाते. [⟶ मानसिक कसोट्या शैक्षणिक मानसशास्त्र].
(६) मानवांग–अभियांत्रिकी : या शाखेची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जोमाने झाली. माणूस व त्याची कामाची साधने, हत्यारे, यंत्रे यांच्या संबंधातले मानसशास्त्र म्हणजे मानवांग अभियांत्रिकी होय. ⇨ एफ्. डब्ल्यू. टेलर (१८५६–१९१५) यांनी काळजीपूर्वक अभ्यासातून मानवी कार्य व अवजारे–हत्यारे ह्यांचा संबंध तपासला. फावड्यांच्या आकारावर, वजनावर कामाचा उठाव किती होतो हे बरेचसे अवलंबून असते. फ्रँक बी. गिलब्रेथ यांनी १९१६ मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्यांचे नमुने तयार केले. कामाचे स्वरूप, त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन कमीतकमी थकवा जाणवेल अशा प्रकारचे खुर्च्यांचे नमुने त्यांनी बनवले. त्यासाठी त्यांनी एक हालचाली टिपणारा चित्रपट तयार केला. काटकसरीने शारीरिक हालचाली करून कामाच्या पद्धतीत सुधारणा करता येते आणि कार्यलाभांश होतो, असे दिसून येते. गुंतागुंतीची यंत्रे चालवण्यासाठी मानसिक शक्ती फार वापरावी लागते. त्यामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी, यंत्राचा आकार, रूप, रंग, चालकासाठी खास बैठक, सुरक्षितता वगैरे अनेक गोष्टींकडे लक्ष वेधले गेले. आज मानवांग अभियांत्रिकीचा विस्तार कल्पनेबाहेर वाढला आहे. [⟶ मानव-यंत्र अभियांत्रिकी शास्त्रीय व्यवस्थापन].
(७) विधी व न्याय-मानसशास्त्र : आता अनुप्रयुक्त मानसशास्त्राने कायद्याच्या शाखेवर आक्रमण केले आहे. कायदे मानवाच्या सामाजिक वर्तनावर अधिष्ठित असतात. कायद्यांमध्ये बदल फार सावकाश होतात. औद्योगिक क्रांती, महायुद्धे, तंत्रविज्ञानाची झेप यांमुळे सामाजिक वर्तन पार बदलून गेले. तेव्हा कायद्यांनी बदलत्या सामाजिक परिवर्तनाचे भान ठेवणे आवश्यक असते, असे या शाखेचे प्रतिपादन आहे. सामाजिक समस्या आणि त्यांचे स्वरूप बदलले, त्यामुळे सामाजिक प्रश्नांच्या संशोधनाबरहुकूम कायद्यात परिवर्तन करणे, साक्षीदाराकडून माहिती काढण्याचे तंत्र, आरोपीचे वर्तन, असत्यशोधनाचे उपकरण, रक्तदाब, इतर शारीरिक बदल आणि गुन्हेगारीवर्तन ह्यांचा संबंध लक्षात येणे या तऱ्हेची कामगिरी या क्षेत्रात अनुप्रयुक्त मानसशास्त्र करत असते. मानसशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने पुढील चार गोष्टींत लक्ष घातले आहे : (१) न्यायदानाची कोर्टकचेरीतील प्रक्रिया, (२) समाजविघातक वर्तनाचे स्वरूप आणि कारणे, (३) गुन्हेगारांच्या बाबतीत व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांची भूमिका आणि (४) मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून देशीय आणि आंतरदेशीय कायद्यांमध्ये सुधारणा. [→ न्यायवैद्यक विधि].
(८) व्यावसायिक मार्गदर्शन : हे मानसशास्त्रज्ञांचे अतिशय भरभराटीस आलेले लोकप्रिय क्षेत्र. व्यवसायासाठी लागणारे गुणविशेष, पात्रता, शारीरिक-मानसिक क्षमता, इतर व्यक्तिमत्त्वाचे पैलू यांची माहिती याद्वारे मिळते. व्यवसायात सामावून जाण्याची शक्यता, आर्थिक लाभ, व्यावसायिक प्रशिक्षण, भवितव्य यांबाबत अद्ययावत माहिती आणि मार्गदर्शन यामुळे शक्य झाले आहे.
५०% हून अधिक मानसशास्त्रज्ञ अनुप्रयुक्त वा व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करतात. उदा, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा रुग्णालये, बँका, कंपन्यांचे व्यवस्थापन, उद्योगसमूह, न्यायालये, सुधारगृहे, सरकारी वा निमसरकारी सुरक्षासेवा आणि खाजगी रीत्या देण्यात येणारा सल्ला वगैरे क्षेत्रांत मानसशास्त्रज्ञ वावरत असतात. ते वेगवेगळ्या वेळी उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय देण्यात मदत करत असतात. नाना प्रकारच्या जागांसाठी योग्य मंडळींची, ती ‘भूमिका’ चांगल्या प्रकारे निभाऊ शकतील अशांची, निवड करतात. अनुप्रयुक्त मानसशास्त्रज्ञांना प्रायोगिक आणि वैधानिक पद्धतीचा पुनःपुन्हा उपयोग करावयाचा असतो. मानवी स्वभाव, क्षमता आणि वैशिष्ट्ये ह्यांच्या मापनाच्या विविध ‘कसोट्या’ योजावयाच्या असतात. [→ व्यवसाय मार्गदर्शन].
(९) बालमानसशास्त्र : बालकांच्या जन्मापासून किंबहुना बालक गर्भात असल्यापासून तो अर्भक, शैशव, बालक, कुमार व प्रौढ ह्या बालकाच्या विकासातील टप्प्यांच्या अभ्यासात अलीकडे प्रायोगिक पद्धतींचे उपयोजन केले जाते. अभिसंधान तंत्र, बुद्धिमापनादी कसोट्या, विविध प्रश्नावली, व्यक्तिमत्त्व कसोट्या, प्रक्षेपण कसोट्या, सामाजिक समायोजन इत्यादींचा वापर बालविकासाच्या अभ्यासात केला जातो. वेदन-संवेदन, भाषा, बुद्धिमत्ता, सामाजिकता, भावनिकता तसेच शैक्षणिक व अपसामान्य वर्तन या क्षेत्रांतही मानसशास्त्राचे उपयोजन केले जाते. [→ बालमानसशास्त्र].
(१०) रहदारी-वाहतूकसंबंधीचे मानसशास्त्र : या शाखेत रहदारीतील मानवी वर्तन, वाहन चालविण्याची क्षमता, अपघातप्रवणता, व्यसनाधीनता हे संबंधित विषय असून ते मानवी व्यक्तिमत्त्वाशी निगडित आहेत. या क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचे उपयोजन केले जाते.
(११) वृद्धांचे मानसशास्त्र : वार्धक्य ही मानवी जीवनातील नैसर्गिक अवस्था आहे. तथापि या वार्धक्यामुळे परावलंबित्व येऊन जे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, वैद्यकीय इ. स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्या अभ्यासासाठी व सोडवणुकीसाठी मानसशास्त्राचे उपयोजन केले जाते. [→ वार्धक्य].
वरील प्रमुख शाखांव्यतिरिक्त अनुप्रयुक्त मानसशास्त्राचा वापर संरक्षण विभागातील विविध निवडींसाठी आणि प्रशिक्षणासाठी प्रशासनातील आणि राजनीतीतील सामाजिक न्याय, शांतता, अधिकारशाही, पूर्वग्रह, निर्वासित व विकसनशील देशांतील विविध विषयांच्या प्रश्नात धार्मिक क्षेत्रात, धार्मिक अनुभवातील श्रद्धा-तत्त्वे तपासण्यासाठी खेळांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण प्रक्रियांना मदत म्हणून तसेच त्यातील अभिवृत्ती, यशापयश, नैराश्य इत्यादींच्या अभ्यासात विद्यार्थ्यांतील असंतोष, आत्महत्येची, प्रवृत्ती, विवाह मार्गदर्शन इ. कितीतरी क्षेत्रांत कमीअधिक प्रमाणात केला जातो. म्हणूनच ‘मानवी व्यवहाराचे कुशल नियंत्रण’ हे ब्रीदवाक्य असलेल्या अनुप्रयुक्त मानसशास्त्राची उपयुक्तता आधुनिक समाजाला कायम व अधिकाधिक वाटत राहील, यात शंका नाही.
संदर्भ : 1. Anastasi, Anne, Fislds of Applied Psychology, New York, 1964.
2. Barnes, R. M. Motion and Time Study, New York, 1958.
3. Brown, J. M. Berrin, F. K. Russel, D. L. Applied Psychology, New York, 1966.
4. Dudycha, G. J. Applied Psychology, New York, 1963.
5. Fleishman, E. A. Ed. Studies in Personnel and Industrial Psychology, Home- Wood, III, 1961.
6. Fryer, D. H. Henry, D. R. Ed. Hand- book of Applied Psychology, New York, 1950.
7. Gray, J. S. Psychology Applied to Human Affairs, New York, 1954.
8. Likert, Renis, New Patterns of Management, New York, 1961.
9. McCormick, E. J. Human Factors Engineering, New York, 1964.
10. Ogg, Elizabeth, Psychologists in Action, Washington, 1955.
11. Roe, Anne, The Psychology of Occupations, New York, 1956.
12. Super, D. E. Psychology of Careers, New York, 1957.
13. Tyler, L. E. The Work of The Counselor, New York, 1961.
खंडकर, अरुंधती
“