माधवाचार्य:(सु. १२९६–१३८६). चौदाव्याशतकातनिर्माणझालेल्याविजयानगरराज्याचेप्रधानमंत्री, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्व ज्ञआणिआयुष्याच्याअखेरच्याकालखंडात ‘विद्यारण्य’ म्हणूनशृंगेरीयेथीलशांकरमठाच्यापीठावरअधिष्ठितझालेलेआचार्य. माधवाचार्यांचापितामायण, माताश्रीमतीआणिसायणवभोगनाथहेसख्खेबंधू अशीमाहितीस्वतःमाधवाचार्यांनीचपराशरमाधवम्हणूनप्रसिद्धअसलेल्यापराशरस्मृतीच्यास्वकृतटीकेतप्रारंभीदिलीआहे. तेथेचस्वतःचेभारद्वाजगोत्र, बौधायनसूत्रआणियजुर्वेदयांचाहीनिर्देशकेलाआहे. विजयानगरयेथेस्थापलेल्याराजघराण्याची माहिती काही बाबतीत वादग्रस्त आहे. शेकडो कोरीव लेख उपलब्ध झाले आहेत व तज्ञांनी वाचले आहेत त्यांत अनेक ठिकाणी विसंगती आहे परंतु राजा संगम, हरिहर-१, कंप वा कंपण, संगम-२, बुक्क किंवा बुक्कण-१, हरिहर-२ (१३७९–९९), बुक्क-२, मारप, मुद्दप अशी ही एकापाठीमागून एक अशा रीतीने आलेल्या ९ राजांची मालिका साधारणपणे सांगता येते. यांपैकी पहिल्या चार पिढ्यांपर्यंत प्रधानमंत्री म्हणून माधवाचार्यानी कार्यभार उचललेला असणे संभवते. विजयानगर या राजधानीची स्थापना माधवाचार्यानी केली असे अनेक उत्कीर्ण लेखांमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ ते प्रधान मंत्री असताना त्यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली राजप्रतिनिधी या नात्याने त्यांनी केलेल्या रूपरेषेनुसार विजयानगर उभारले गेले व राज्याभिषेकही त्यांनी नेमलेल्या आचार्यांच्या पौरोहित्याखाली झाला, अशी कल्पना करता येते. स्वतः माधवाचार्यांनी धर्मशास्त्र, ज्योतिष, पूर्वमीमांसा व उत्तमीमांसा (वेदान्त) या विषयावर विद्वत्तापूर्ण प्रमाणभूत ग्रंथ लिहिले भारतीय संस्कृतीच्या इतिहासातली महत्त्वाची घटना म्हणजे चारी वेदांची म्हणजे संहिता आणि ब्राह्मण या दोन्ही प्रकारच्या वेद ग्रंथांची भाष्ये माधवाचार्यांनी आपला कनिष्ठ बंधू सायण याच्या संपादकत्वाखाली करवून घेतली. सायणाचार्यांच्या संपादकत्वाखाली हे वेदभाष्यांचे महान कार्य विजयानगर राजांच्या चौथ्या पिढीत बुक्क-१ हा राजा राज्य करीत असता झाले. वेदभाष्याच्या प्रारंभी माधवाचार्याचे मोक्षगुरू विद्यातीर्थ यांचे वंदव आणि बुक्कमहिपतीचाही ‘परमेश्वराचे ते एक रूप आहे’, असा भक्तीयुक्त निर्देश आलेला आहे.

माधवाचार्यांनी कालनिर्णय या ग्रंथात भारतीतीर्थ, विद्यातीर्थ आणि श्रीकंठ या तीन गुरूंचा निर्देश केला आहे परंतु त्यामध्ये विद्यातीर्थ यांचा साक्षात महेश्वर अथवा परमात्माच ते आहेत असाच परमादरपूर्वक निर्देश केला आहे. भारतीतीर्थांचेही विद्यातीर्थ यती हे गुरू असावेत, असे अनुमान करण्यास जागा आहे.

तैत्तिरीय संहिता भाष्याच्या (कलकत्ता प्रत – १८६०) एका पाठामध्ये भूमिकेत असे म्हटले आहे, की वीर बुक्क महिपतीने माधवाचार्यांना वेदभाष्ये लिहा, असा आदेश दिला. तेव्हा माधवाचार्यांनी बुक्क राजाला सांगितले, की माझा लहान भाऊ सायणाचार्य हाही चांगला विद्वान आहे. तेव्हा बुक्क राजाने सायणाचार्याला वेदभाष्य लिहिण्याचा आदेश दिला. भाष्य निर्मितीत साहाय्य करणाऱ्या अनेक पंडितांना मानधन देण्यात आले, असाही उल्लेख सापडतो. हे वेदभाष्यांचे प्रचंड कार्य सामुदायिक रीतीनेच पार पडले. त्याला मुख्य पाठिंबा प्रधान मंत्री माधवाचार्यांचा होता. म्हणून वेदभाष्यांच्या अध्यायसमाप्तीच्या निवेदनात ‘माधवीये वेदार्थ प्रकाशे’ असे आलेले आहे.

माधवाचार्यांनी स्वतः लिहिलेले आणि नावाजलेले ग्रंथ म्हणजे पराशरस्मृतिभाष्य, कालमाधव किंवा कालनिर्णय, जैमिनीय न्यायमालाविस्तार, वैयासिक न्यायमालाविस्तार, जीवन्‌मुक्तिविवेक, विवरणप्रमेयसंग्रहपंचदशी. माधवाचार्यप्रणीस सर्वदर्शनसंग्रह हा अत्यंत विद्वन्‌मान्य असलेला भारतीय तत्त्वज्ञानांचा वा दर्शनांचा कोश होय, असे म्हणता येते. या ग्रंथात आस्तिक आणि नास्तिक अशा १३ तत्त्वदर्शनांचे थोडक्यात व प्रामाणिक स्पष्टीकरण केले आहे. या ग्रंथाच्या प्रारंभी विद्यातीर्थ इ. तीन गुरूंपैकी कोणाचाही उल्लेख न करता ‘शार्ङ्गपाणिपुत्र सर्वज्ञ विष्णू या गुरूला मी नमस्कार करतो’ असे म्हटले आहे पण ते विसंगत नाही कारण अनेक गुरू एका व्यक्तीला असू शकतात. परंतु ‘सायणरूपी क्षीरसागरातले कौस्तुभरत्न म्हणजे माधवाचार्य हा सर्वदर्शनसंग्रह लिहीत आहे’ असे तेथे म्हटले आहे. याचा अर्थ सायण हे माधवाचार्यांचे कुलनाम होय असा होतो. मात्र यावरून हे सर्वदर्शनसंग्रहकार माधवाचार्य निराळे, असे अनुमान काढण्याचे कारण नाही. हा श्लोक कोणीतरी माधवाचार्यानंतर १००-२०० वर्षांनी झालेल्या पंडिताने अधिक माहिती पुरवण्याकरता नीट माहिती नसताना प्रक्षिप्त केला असणे शक्य आहे.

संक्षेपशंकरजय किंवा शंकरदिग्विजय या नावाने प्रसिद्ध असलेला ग्रंथ माधवाचार्यकृत वा विद्यारण्यमुनीकृत म्हणून छापलेला आहे. तो आद्य शंकराचार्यांच्या चरित्राचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ आनंदाश्रम प्रेस, पुणे या संस्थेतर्फे प्रसिद्ध झाला असून त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. हा ग्रंथ माधवाचार्य (विद्यारण्य) यांचा नसावा, असे अनेक संशोधकांचे मत आहे. या ग्रंथामध्ये एकूण १,८४३ श्लोक आहेत त्यांपैकी १,१०० पेक्षा अधिक श्लोक तत्पूर्वीच्या अनेक ग्रंथांतून त्या त्या ग्रंथाचे ऋण निर्दिष्ट न करता घेतलेले आढळतात. उदा., व्यासाचलाचा शंकरविजय ग्रंथ यात निर्दिष्ट केला आहे. म्हणजे या ग्रंथापूर्वीचा व्यासाचलाचा जो ग्रंथ आहे त्यातील ४७५ श्लोक ऋणनिर्देशावाचून घेतलेले यात सापडतात. तिरुमलदासाच्या शंकराभ्युदय या काव्यातून ४७५ श्लोक घेतलेले दिसतात. असेच अनेक इतर ग्रंथांतील शेकडो श्लोक त्या त्या ग्रंथाचा निर्देश न करता या ग्रंथकाराने संग्रहीत करून हा ग्रंथ बनविला आहे. या ग्रंथावर धनपतिसूरी आणि अच्युतराय मोडक यांच्या टीका उपलब्ध आहेत. धनपतीची १७९८ मधील आणि अच्युतराय मोडकांची १८२४ मधील टीका आहे. म्हणजे हा ग्रंथ जास्तीत जास्त २५० वर्षांचा जुना आहे. माधवाचार्यांसारखे प्रमाणभूत विश्वविख्यात विद्वान वरीलप्रमाणे बनबाबनवी करून ग्रंथ निर्माण करणे अशक्य आहे.

संदर्भ : Mahadevan, T. M. P. The Philosophy of Advaita With Special Reference to Bharatitirtha Vidyaranya, Madras 1957.

जोशी, लक्ष्मणशास्त्री