माझरी : (हिं. माझारी इं. माझरी पाम लॅ. नॅनोऱ्हॉप्स रिक्सिना कुल-पामी). ह्या ताल वनस्पतीच्या नॅनोऱ्हॉप्स प्रजातीत एकूण चार जाती असून भारतात एकच जाती वायव्य भागात आढळते. ह्या सर्वच जाती झुडपासारख्या असून त्यांचा प्रसार पाकिस्तान ते इराणच्या आखातापर्यंत आहे. महाराष्ट्रात हर्णेजवळ समुद्रसपाटीपासून सु. १५० मी. उंचीपर्यंत माझरी आढळते. ह्या झुडपांचे लहानमोठे समूह बनतात कारण एका झुडपाच्या जमिनीतील सु. २·५० ते ३·१० मी. लांबीच्या आडव्या खोडापासून अनेक फांद्या (तिरश्चर) पसरतात व प्रमुख खोडापासून अनेक मोठ्या पानांचे झुबके जमिनीवर वाढतात कधी कधी त्या खोडाचा भाग जमिनीवर सु. ६ मी. पर्यंत उंच वाढतो व त्यावर पाने येतात. ही पाने सु. ०·६–०·९ मी. लांब व तितकीच रुंद, साधी, ताठर, चुणीदार, पंख्यासारखी, करडी हिरवी असून त्यांचे सु. ३०–३७ सेंमी. लांबीचे सु. ८–१५ लांबट व दुभंगलेले खंड बनलेले असतात देठांवर काटे नसतात व ते पन्हळीसारखे असून त्यांच्या तळाशी पिंगट रंगाचे लोकरीसारख्या केसांचे पुंजके असतात. फुलोरे [स्थूलकणिश ⟶ पुष्पबंध] स्तूपासारखे, पानांच्या बगलेत व शाखायुक्त असून त्यांवर त्रिभागी, द्विलिंगी व एकलिंगी नर-फुले, लहान पातळ छदांच्या बगलेत, जोडीने, ऑगस्ट ते नोव्हेंबरात येतात. महाछद नलिकाकृती केसरदले सहा (क्वचित नर-फुलात नऊ) व किंजपुटात तीन कप्पे असतात [⟶ फूल]. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) एकबीजी व लांबट गोलसर, १·५–२·२ सेंमी. व्यासाचे आणि बी कठीण, गर्द तपकिरी, लंबगोलसर, सुरकुतलेले व ९–१६ मिमी. व्यासाचे असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पामी वा ताल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. अभिवृद्धी (लागवड) बिया व तिरश्चरांपासून करतात.
माझरीची कोवळी पाने, कळ्या, फुलोरे व फळे खातात. पशुवैद्यकात कोवळ्या पानांचा उपयोग रेचकाप्रमाणे केला जातो. अतिसार व आमांश यांवर पाने गुणकारी आहेत. जून पानांपासून जाडे भरडे धागे काढून त्यांचा उपयोग दोर, चट्या, टोप्या, जाळी इ. वस्तूंकरिता करतात. बियांच्या माळा करतात. सुकलेल्या भागांचा जळण म्हणून वापर होतो. खोड व देठ यांतील धाग्यांपासून सुंभ तयार करतात.
संदर्भ : C. S .I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.
नवलकर, भो.सु. परांडेकर, शं. आ.
“